(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मार्गेटले, कुलूप कुठं ठेवलय गं, दिसतय का तुला? मालकीनबाईंनी आवाज दिला. “ठेवणार या आणि आठवणीची अपेक्षा माझ्याकडून. वारे वा! वारे वा! चांगला मामला आहे हा,” मार्गाारेट स्वत:शीच पुटपुटली.

पुन्हा मालकीनबाईंचा आवाज आला. “मार्गे खादाडे, तुला काहीच कसं लक्षात राहत नाही. आँ!”

“ओह माय गॉड, हे तर फार झालं? ज्याच्याशी माझा कवडीचाही संबंध नाही, जे मला काहीच ठाऊक नाही, ते कसं बरं लक्षात राहणार? सारखा समोसा-पाव नि अंडीभूर्जी-पाव खाऊन खाऊन मालकीनबाईंचा मेंदू बथ्थड झालाय. आळसावलाय. पण हे त्यांना सांगणार कसं? मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? बाबा.” मार्गारेट मनात म्हणाली. मालकीनबाईंसाठी मांजरीची उपमा सुचल्याबद्दल तिला फार भारी वाटलं. स्वत:च्या हुषारीचं कौतुक वाटलं. आपणही मांजर ‍नि मालकीनबाईही मांजर! मग एका मांजरिने दुसऱ्या मांजरीला प्रेमानं वागवायचं असतं की असं खेकसायचं असतं?” मार्गारेट स्वत:शीच पुन्हा पुटपुटली.

“ओय ओय ओय,” मालकीनबाईंनी तिचा जोराने कान ओढला, तेव्हा वेदनेने विव्हळली.

“गधडे, इकडे कुलपासाठी माझा जीव चाललाय, नि तू बसलीस अशी मद्दाडासारखी! कुलूप शोधण्यासाठी जरा हातपाय हलव. मालकीनबाई मार्गारेटवर ओरडल्या. मालकीनबाईंच्या हाताला कडकडीत चावा घ्यावा असं तिला तीव्रतेनं वाटलं. पण बिळाच्या भोकातून बघणाऱ्या रॉबिन्सनने असं काही करु नको असा इशारा केला नि टीपॉयच्या खाली पडलेल्या कुलुपाकडे इशारा केला. मार्गारेटने, मालकीनबाईचं तिकडे लक्ष वेधलं. त्यांनी खाली वाकून टीपॉयच्या खालून कुलूप काढलं. मार्गारेटला थँक्ससुध्दा म्हणण्याचं सौजन्य त्यांनी दाखवलं नाही. त्यांना बाहेर जायचं असल्याने त्या लगेच बाहेर पडल्या. जाताना कुलूप लावलं.

त्या घराबाहेर जातात, रॉबिन्सन बिळाच्या बाहेर आला. फ्रिजवर ठेवलेल्या बॉक्समधून, चिज आणून मावशीला दिलं.

मालकीनबाईंच्या आरडाओरडीमुळे आणि कान उपटल्यामुळे वैतागलेल्या मावशीला बरं वाटलं. तिने प्रेमाने मामाचे गाल चाटले.

“काय गं मावशे, या मालकीनबाईंच्या आठवणीत काहीच कसं राहत नाही?”

“मला ठाऊकायना त्याचं कारण.”

“ग्रेट, ग्रेटच हो माझी मावशी. मग, मावशीबाई आम्हाससुध्दा ते सांगा की.”

“रॉबू, आठवणीची क्रिया मेंदूशी  जोडलेली असते.”

“ती कशी?”

“अरे, आपल्या डोळे, कान, नाक, त्वचा, जिभ या पंचेंद्रियांकडून विद्दूतरासायनिक संदेशाच्या रुपात माहिती‍ येत असते.”

“हो का. मग हे संदेश जातात कुठे?”

“आपल्या पंचेद्रियांना जोडलेल्या मज्जातंतूवर विहरत  विहरत या आठवणी मेंदूकडे जातात.”

“या आठवणीचं मेंदू काय करतो?”

“अरे, आपल्या मेंदूमध्ये असंख्य चेतापेशी (न्युरॉन्स) असतात. त्याला एक केंद्र असतं. ते पेशितील रसात बोटासारखं वावरत असतं. या चेतापेशींना ॲक्झॉन आणि  ड्रेण्ड्राईट नावाचे दोन ॲन्टेना असतात. यातला ॲक्झॉन अँटेना चेतापेशीकडे संदेश आणतो तर डेन्ड्राइ्रट ॲण्टेना दुसरीकडे संदेश पाठवतो.”

“थोडक्यात काय तर, पोस्टमनगिरी करतो म्हणायचा.”

“अगदी बरोबर, या डेन्ड्राईटचं जाळं बऱ्याचदा कित्येक मीलीम‍िटर लांब पसरु शकतं. या डेन्ड्राईटला अनेक शाखा फुटलेल्या असतात. यातली प्रत्येक शाखा दुसऱ्या जोडली जाऊ शकते. यातून या चेतापेशीची जाळी तयार होते. ”

“अच्छा, आपल्या आठवणी या जाळ्यात अडकतात म्हणायच्या.”

“तसं नाही रे.”

“मग?”

“अरे, एखाद्या आठवणीच्या स्वरुपातील संदेश थोड्या कालावधीसाठी साठवून ठेवायचं असल्यास हे तयार झालेलं जाळं लवचिक असल्याने एकतर तुटतं किंवा दुसऱ्या प्रकारे जोडलं जातं. असं जेव्हा घडतं, तेव्हा ती आठवण पुसली जाऊ शकते. याला शॉर्ट टर्म मेमरी किंवा अल्पस्मृती म्हणतात.”

“म्हणजे मालकीनबाईंची स्मृती शॉर्ट आहे तर..”

“हे थोडं खरं आहे.”

“म्हणजे थोडं खोटंही आहे का? मज्जाच मज्जा!”

“रॉब्या, तसं नाही रे. आता मालकीनबाई प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी कुलूप ठेवतात. त्या क्षणापुरते ते त्यांच्या आठवणीत राहतं. मग त्या इतर कामात बुडून जातात, त्यामुळे त्या कुलूपाची आठवण विसरतात. पण, त्यांनी हे कुलूप नेहमी एकाच ठिकाणी ठेवलं तर, त्यांना कुलूपाच्या जागेचं विस्मरण होणार नाही. याला दीर्घ स्मृती किंवा लाँग टर्म मेमरी म्हणतात. आपण, आठवण जागृत करण्यासाठी हे चेतापेशीचं जाळं कार्यान्वित करतो. हे जाळं मेंदूच्या हिप्पोकॅम्पस आणि अमिग्डाला या उपांगात साठवलं जातं. दीर्घस्मृती तयार करण्याचं कार्य हिप्पोकॅम्पस करतो तर भावनिक स्‍मृती, अमिग्डाला तयार करतो.”

“हे दोन्ही उपांगे मालकीनबाईंच्या मेंदूत असतील ना गं मावशे?”

“असतील तर ओकेच ओके! नसतील तर, अर्जंटली त्यांच्या मेंदूत ही दोन्ही उपांगे, टाकरे गणपतीबाप्पा नि सोडव आम्हाला, त्यांच्या ‘कुलूप कटकटितून’ अशी प्रार्थना करुया.” मावशी डोळे बारीक करुन म्हणाली. मावशीच्या या तिरकस विनोदला, मिशा हलवत, दात बाहेर काढत नि तिरप्या नजरेने बघत मामाने दाद दिली.

सुरेश वांदिले