कु.माशा,सचिनराव आणि चिंधीबाई
रामराव आणि रमाबाई हे चारचौघांसारखं जोडपं होतं. त्यांच्यासह सप्तकोनी (तीन मुलं आणि सासू – सासरे) संसार सुखातचालला होता. या सुखी संसाराचं रहस्य दडलं होतं एका मंत्रात. हा मंत्र होता वाद आणि तंट्याच्या. हा वाद काही अगदीचभारत आणि पाकिस्तान यांच्या किंवा बच्चन कुटुंबीय आणि अमरसिंग यांच्या इतका आणि तंटा इस्त्रालय आणि अरबराष्ट्रांसारखा यांच्यासारखा ढाँसू टाइपचा नव्हता हे प्रारंभीच स्पष्ट केललं बरं. वाद मर्यादित आणि तंटा आखूड असं त्याचंस्वरुप होतं. हा वाद आणि तंटा दोघांपुरता आणि घरातल्या जेष्ठ आणि कनिष्ठ सदस्यांनी बनलेल्या युनायटेड नेशन्सपुरताचमर्यादित होता.
ज्याप्रमाणे पंधरा-पंधरा दिवसांनी एकादशा येतात आणि त्यांच्या उपवास केला की बरेच जण विशेषत: महिलामंडळकॅट्रिना कैफ सारखे लिरिल फ्रेश होतात. तसच रामराव आणि रमाबाई यांचं होतं. त्यांनी पंधरा दिवसात एकदा तरी वाद किंवातंट्याची लक्ष्मणरेषा ओलांडली नाही तर घरातील युनायटेड नेशन्स सदस्यांच्या मनात काळजीचे घनदाट मेघ दाटून येत. घरात सुख-शांती-समाधान नांदण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत संपण्यापूर्वीच बरेचदा हेच सदस्य वाद आणि तंट्याचे मुद्देसुध्दा अतिशय हुषारीने दोघांपर्यंत पोहचवण्याची डिप्लोमॅसी करत असत. त्यामुळे रामराव आणि रमाबाईंच्या संसार सुखालाआडवं जाण्याची हिम्मत एकाही काळ्याकुट्ट आणि नार्मल मांजरांना अद्यापपर्यंत तर झाली नव्हती.
000
2
या पंधरवाड्याचा शेवटचा दिवस अगदी काही तासांवर येऊन ठेपला तरी रामराव आणि रमाबाईंमध्ये वादाची ठिणगीपडण्याचं कोणतच कारण अवतीभवती वावरत नव्हतं. मात्र त्यामुळे कसं होणार, काय होणार अशी शंका घरातीलकुणाच्याही मनात नव्हती. कारण याआधी पंधरवाड्याची अगदी शेवटची पाच मिनिटे शिल्लक असताना सुध्दा वादाच्याविषयाचं शुभआगमन झाल्याचं या घरगुती युनायटेड नेशन्सला ठाऊक होतं. आताही तसचं झालं. हा पंधरवाडा संपन्याच्यासाडेतीन मिनिटे आधी रामराव आणि रमाबाईंना वादवर्तुळात अलगद ढकलण्यासाठी कुमारी मारिया शारापोव्हा (माशा) अशाअवघड नावाच्या कन्यकेने घरात प्रवेश केला.
कु.दीपिका पदुकोन ते कुमारी ऍ़ण्ड सौभ्यागवती यादरम्यान जे काही असलेल्या स्कार्लेट जॉन्सनपर्यंतच्या चारही खंडातीलबऱ्याच सौंदर्यवतींच्या चंद्राला ग्रहण लावण्याची क्षमता असलेल्या कु.माशा या जगातील सर्वश्रेष्ठ टेनिसपटू आहेत. त्या सततकोणती ना कोणती स्पर्धा जिंकत असतात आणि अब्जावधी रुपयांची कमाई करतात. आपल्या देहसौंदर्यांनं तमाम पुरुषांनाआणि खेळसौंदर्यानं तमाम प्रेक्षकांना घायाळ आणि बेशुध्द करत असतात. ही तथ्ये रमाबाईंसाठी अगदीच गैरलागू आहेत. मात्र रामरावांबाबत तसं नाही. कारण कु.माशा यांच्या सुयोग्य ट्रॅकवर त्या सतरा वर्षाच्या आणि ते स्वत: सत्तावीस वर्षाचेअसल्यापासूनच रामराव आहेत. कु.माशा प्रसंगपरत्वे त्यांना मेनका, मंदाकिनी, मर्लिन मन्रो, मोनिका लेंविस्की, मालासिन्हा वगैरे वगैरे वाटत आल्या आहेत. कु.माशा यांच्या छबीदर्शनाने रामरावांच्या ह्रदयी कधी कमलपुष्पे तर कुधी गुलाबपुष्पेउमलली आहेत. आपली होणारी सौभ्यागवती जर कु.माशासारखी मिळाली तर पुणेरी श्रीखंडात काश्मिरच्या शुध्द केशरचाअलभ्य लाभच होईल, असं रामरावांना त्यांच्या वधुशोध मोहिमेच्या काळात वाटलं होतं. अर्थात हे सारं काही त्यांनी त्यांचंस्वत:पुरतच मर्यादित ठेवलं होतं.
असो, रमाबाईंना कु.माशा यांच्याबद्दलचं सामान्य ज्ञान कितपत होतं, याबद्दल ठाम सांगता येत नाही. जर रामरावांनीचुकूनमाकून एखादे वेळस कु.माशांबद्दलची चर्चा छेडली असती तर त्या पृथ्वीतलावरील आहेत की परग्रहावरच्या असाहीप्रश्न रमाबाईंना पडू शकला असता. पण तसा काही प्रसंग अद्याप आला नाही. याचा अर्थ रामरावांसाठी ज्ञात असलेल्याकु.माशा या रमाबाईंसाठी अज्ञातच होत्या. ही परिस्थिती अनंत युगेसुध्दा अशीच राहू शकली असती. पण कु.माशा यांनीसचिनराव तेंडुलकरांबाबात , मी नाही गडे सचिनवचिनला ओळखत, हे जे तारे तोडले ते कुणाच्यातरी मार्फत रमाबाईंच्याकानी पडताच बाभळीच्या काट्यासारखे त्यांच्या ह्रदयाला रुतले. त्यांनी कु.माशाची मायबहीण आणि असलेली नसलेलीभावजयसुध्दा काढली. आपल्या ह्रदयस्थितच कां होईना पण कु.माशा या प्रिय पात्रावरचा असा अश्लाघ्य वार रामरावांनाकसा सहन होणार? आणि इथेच वादाची ठिणगी पडली. घरातील युनायटेड नेशन्सने सुटकेचा नि:श्वास टाकला.
000
3
रामराव आणि रमाबाई यांच्यातला वाद हा कधी एकमेकांच्या समोर उभे राहून तर कधी सोफ्यावर आजूबाजूला बसून तरकधी एकमेकांच्या डोळयात बघून तर कधी तोंड वाकडं करुन पुढे सरकायचा यावादानं विशिष्ट टप्पा पार केला की त्याचीरंगत क्षणाक्षणाला वाढत जायची.
या पंधरवाड्याच्या वादाचा प्रारंभ रामरावांनी केला. कु.माशाला रमाबाईंनी केलेल्या शिविगाळीचा धागा पकडत तेरमाबाईंना म्हणाले,
अगं, तुझी नणंद नसली म्हणून तू मारियाला अशा शिव्या देऊन स्वत:च्या जिभेला अपवित्र करुन कां घेतेस?
रामरावांच्या या कथनरुपी प्रश्नावर रमाबाई तत्काळ उद्गारल्या..
– अरे वारे वा, म्हणे कां शिव्या देतेस? ही कोण लागून गेलीय मारिया की फारिया इंद्राची अप्सरा. सचिनराव तेंडूलकरांनाओळखत नाही म्हणजे याचा अर्थ मी काय घ्यायचा. ही बया स्वत:ला लेडी माऊंटबेटन समजते की काय ?
– अहो रमाबाई, तुम्ही सुध्दा लेडी माऊंडबेटनला कुठे ओळखता? रामरावांनी रमाबाईंच्या जखमेवर मीठ चोळले.
– हे बघा तिची बाजू घेऊ नका, मी लेडी माऊंटबेटनला ओळखत नसलेही पण ही मारिया स्वत:ला लेडी माऊंटबेटनसमजते की काय?
– रमाबाई, ती खुद्द मारिया शारापोव्हा असताना कशाला स्वत:ला लेडी माऊंटबेटन समजेल? तिच्यापुढे आजच्याकाळातील पाचपन्नास लेडी माऊंटबेटन झक मारतील. रामराव कु.माशांची बाजू भक्कमपणे लढवत उद्गारले.
– हो का? ती जर एव्हढीच ग्रेटब्रिट असेल तर मग ती सचिनराव तेंडुलकरांना ओळखत नाही,याचा अर्थ काय घ्यायचा ? रमाबाई तावातावाने म्हणाल्या.
वादाचा तवा आता चांगलाच तापू लागल्याचे बघून घरगुती युनायटेड नेशन्स सदस्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटूलागल्या.
– अहो, रमाबाई या जगातले असंख्य लोक त्यांच्या जन्मदात्या बापाला सुध्दा तो स्वर्गवासी होईस्तोव नीट ओळखतनाहीत. तर हे सचिनराव कोण लागून गेलेत तिस्मारखाँ. रामराव तिरकसपणे बोलले.
– अहो तुम्ही सुध्दा सचिनरावांना असं कसं म्हणू शकता. मारिया की फारियानं पार भ्रष्ट करुन टाकलय तुम्हाला. तुम्हीअक्कल गहाणबिहाण ठेवली की काय आज म्युन्सिपाल्टीच्या गटारात. स्वत:ला फारच ग्रेटब्रिट समजायला लागलात तुम्ही. रमाबाई फणकाऱ्यानं म्हणाल्या.
000
3
आपला नवरा सचिनराव सोडून मारियाची वकिलीगिरी करतोय ही कल्पनाच रमाबाईंना सहन होईना. याच टप्प्यावर वादानेतंट्यामध्ये परिवर्तनाची संधी शोधली होती. रमाबाईंनी भ्रष्ट म्हंटल्याचं रामरावांना अजिबातच रुचलं नाही. म्युन्सिपाल्टीच्यागटारात बुध्दी कशी गहाण ठेवतात, हे तर त्यांच्या आकलनाच्या पलिकडचं होतं. यावर प्रतिवाद केला तर आपली बुध्दीसुलभ इंटरनॅशनलमध्ये कडिकुलपात ठेवण्यास रमाबाई याक्षणी कमी करणार नाही हे रामरावांनी ताडलं. पण रमाबाईंना उत्तरदेणं आवश्यकच होतं. इतक्या लवकर पांढरं निशान फडकवणं त्यांच्याकडून शक्यच नव्हतं. त्यामुळे ते रमाबाईंना डिवचतम्हणाले
रमाबाई, मी स्वत:ला अजिबात ग्रेट समजत नाही तर स्वत:ला उंदिर समजतो. कारण उंदिर म्युन्सिपाल्टीच्या गटारात राहूशकतात ना.
रामराव वाकडेघाटात शिरल्याचं रमाबाईंनी ताडलं. आता रामरावांना कात्रजचा घाट दाखवून कोंडित पकडायचच असानिर्धार करुन त्यांनी श्री जंग्योदेवीचं स्मरण केलं आणि त्या पूर्ण फोर्सनी रामरावांचे बॉल टोलवू लागल्या. वन डे सामना आताआता टी व्टेंन्टीचा झाल्यानं घरगुती युनायटेड नेशन्सचा आनंद दे माय झाला होता.
– रामराव साहेब, तुम्ही ग्रेट तर नक्कीच नाहीत आणि उंदिर सुध्दा नाही. मारिया का फारियाची हिम्मत नाही एखाद्यामाणसाला उंदिर करण्याची. रामरावांच्या अंगावर जात रमाबाई ठासून म्हणाल्या. (रामराव मनात हसले आणि मनीचम्हणाले, माणसाला उंदिरच काय चिलटं सुध्दा मारिया बनवू शकते हे या वेडीला कळणार कसं?)
रमाबाईंचा वार चुकवण्यासाठी रामराव त्यांच्यावर चाल करत प्रकटपणे उद्गारले,
– रमाबाई माणूस उंदिर नाही मात्र सचिनराव तर होऊ शकतो ना.
– याचा अर्थ मारिया की फारियाने सचिनरावांना ओळखलच पाहिजे म्हणजे पाहिजेच. रमाबाई आपल्या मुद्यावर ठाम होत्या.
– समजा, त्या सचिनरावांना ओळखतही असेल तरी सचिनराव माणूस आहेत हे कशावरुन ? रामराव बोलून गेले. त्यांचे हेबोल मात्र रमाबाईंना फारच लागले. आपल्या नवऱ्याला नक्कीच वेड लागलेल्या कुत्र्यानं चावलं असून त्यामुळेच तो असापागलासारखा बडबड करतोय असं त्यांना वाटलं. त्यामुळे सचिनरावांवर आक्षेप घेणाऱ्या नवऱ्यावर कितीतरी जोराने रमाबाईओरडल्या. तो आवाज कानाचं आरोग्य खराब करण्याइतपत डेसिबलची पातळी ओलांडून गेला होता. या ओरडण्यामुळे त्यांनाजबर ठसका बसला. ही परिस्थिती उद्भवण्याचीच वाट बघत जय्यत तयारीत असलेल्या घरगुती युनायटेड नेशन्समधील ज्येष्ठसदस्यानं तत्काळ रमाबाईंना लिंबूपाणी दिलं. लिंबूपाण्याचा एक घुट पोटात गेल्यावर रमाबाई किंचित शांत
झाल्या. वादाचं रुपांतर तंट्यात होऊन आता ते बखेड्याकडे मार्गक्रमण करत असल्याचं रामरावांच्या जरी लक्षात येत असलंतरी तेसुध्दा आता मागे वळण्यास तयार नव्हते. घरगुती युनायटेड नेशन्सच्या सदस्यांच्या आनंदरुपी उपग्रहानं पृथ्वीचीपरीघरेषा ओलांडून दुसऱ्या ग्रहाकडे जोरात वाटचाल सुरु केली होती.
आता का ओरडता रमाबाई, सत्याचा स्वीकार करणं कठिण असतं, नाही का? समजा सचिनराव माणूस नसतील तरघोडा राहू शकत नाहीत का ? किंवा मग सिंह किंवा रमजानला शहीद होणारा बकरा. रामरावांची गाडी सुसाटच झाली होती. आपल्या नवऱ्याला आता 11 इंजेक्शनं सुध्दा अपुरे पडतील याची खात्री रमाबाईंना पटली होती. त्या पुन्हा रामरावांच्याअंगावर धावून जात म्हणाल्या..
– विजय मल्याच्या कंपनीची अशुध्द दारु पिल्यासारखं काहीही बरळू नका. सचिनराव माणूस नाही काय म्हणता. घोडा,वाघ काय काय म्हणता,त्यांना. तुमच्या मेंदुचं इतकं अध:पतन होईल असं चुकुनही वाटलं नव्हतं मला. रमाबाईअविश्वासानं आणि आश्चर्यचकित होऊन बोलत्या झाल्या. त्यांना पुन्हा एक घुट लिंबूपाणी प्यावं लागलं. रमाबाईंचा हाबिघडलेला सूर असाच कायम ठेवण्याचा निर्धार करत रामराव म्हणाले
– रमाबाई तुम्ही कशा आमच्या सांगण्यावर अविश्वास दाखवू शकता. तसं जर असेल तर मग आम्ही असं समजायचं कासचिनराव खोटे आहेत. फ्रॉड आहेत म्हणून..
– तोबा तोबा, मी असं कस म्हणू शकेन रामराव साहेब. सचिनराव, सचिनरावच आहेत. पण ते घोडा नाहीत. तेसिंह नाहीत आणि रमजानचा बकरा शाहरुख राहू शकतो, द ग्रेट सचिनराव तर अजिबातच नाही. रमाबाई एका दमात बोलूनगेल्या. रामरावांचा वाकडेघाट त्यांना आज चांगलाच दमायला लावत होता. पण त्या सुध्दा इरेलाच पेटल्या होत्या. त्यांच्याअस्मितेला आज मोठे आव्हान मिळालं होतं. ते आव्हान परतून लावण्यची शक्ती टिकून राहावी म्हणून त्यांनी श्री चंफामातेलाचारवेळा मनी वंदन करुन घेतलं. काही क्षण शांततेत गेले. रामराव आपला मुद्दा पुढे रेटत म्हणाले..
– रमाबाई, तुम्ही जर सचिनरावांबद्दल एव्हढ्याच कॉन्फिडन्ट आहात तर पुरावा कां बरं देत नाहीत.
– सचिनरावांसाठी कशाला हवा पुरावा.
– मग आम्ही कसा आणि कां विश्वास ठेवायचा की सचिनराव हत्ती आहेत म्हणून..
– हत्ती ?
– मग हरीण..
– अहो रामराव ते माणूस आहेत. तुम्हाला सुध्दा ते चांगलं ठाऊक आहे. रडवलेल्या सुरात रमाबाई म्हणाल्या.
– मग तुम्ही तसा पुरावा कां देत नाही ?
– हे तर सूर्यालाच पुरावा मागण्यासारखं झालं.
– त्यालाही पुरावा मागा नं. आम्ही नाही म्हंटलय का? कधी कुणी प्रयत्न केलाच नाही ना सूर्याला पुरावा मागण्यासाठीआतापर्यंत. म्हणूनच ज्याला आपण सूर्य म्हणतो तो कदाचित झूल पांघरलेला शुक्रही राहू शकतो.
– ही बकवासबाजी झाली.
– सचिनराव बकवास कसा राहू शकेल? रमाबाई अस्वस्थ होवून म्हणाल्या. आता मात्र रमाबाईंना आपली नैसर्गिक उर्मीआणि उर्जा संपल्यासारखी वाटू लागली. त्यामुळे त्या कशाबशा बोलून सोफ्यावर बसल्या. त्यांच्या अत्यंत लाडक्याव्यक्तिमत्वाला आपला हक्काचा माणूसच बकवास म्हणतो. ते सुध्दा कोणत्यातरी फडतूस मारिया का फारियासाठी हीकल्पना त्यांना सहन होईना. त्यांनी परत लिंबूपाण्याचा घुट घेतला. डोळे मिटले. श्री अनुसयामातेचं आणि श्री अंबामातेचंस्मरण केलं. श्री महाकालीची आरती मनात म्हंटली. त्यामुळे गेलेला उत्साह परत आल्यासारखा त्यांना वाटला. या नव्याउत्साहानं त्या रामरावांना सामोरे गेल्या. आता रामरावांसोबत पानिपतचं तिसरं युध्द करुन त्यांना बेचिराख करुन टाकायचाअसा अहमदशाही अब्दाली निर्धारच त्यांनी केला.
– अहो,तेच तर मी मघापासून सांगण्याचा प्रयत्न करतेय ना की सचिनराव महापराक्रमी माणूस आहे म्हणून.
– पुरावा द्या ना मग..
– अहो तुम्ही पुराव्याच्या पाठिमागे असे कां हात धुवून लागले आहात.
– मग काय मारियाच्या पाठिमागे लागू. आतापर्यंत रामरावांच्या ह्रदयाच्या बंदिस्त अशोकवनात मुक्तपणे विहरणारीगुजबात अशी चटदिशी बाहेर पडली. रमाबाईंनी त्यांच्या नजरेला नजर भिडवत सवाल केला.
– ही कोण बया ? कॉलेजातलं जुनं लफडं तर नाही ना..
रामरावांच्या लक्षात आलं की आपल्या वाकडे घाटातून आपणच रमाबाईंच्या कात्रजच्या घाटात पोहचण्याचा गाढवपणाकरुन बसलो आहोत. पण आता आलेल्या प्रसंगाला तोंड देण्यातच पुरुषार्थ होता. त्यामुळे उसनं अवसान आणत ते उत्तरले..
-रमाबाई, मी कशाला कॉलेजातील मारियाच्या आता पाठिमागे लागू. काहीतरी संशय घेऊन कोल्ह्याची बकरी करुनका.
-मग मारियाच्या पाठिमागे लागण्याचा अर्थ तरी काय समजायचा आम्ही ,रमाबाई ओरडल्या.
अहो रमाबाई, रामराव नरमाईच्या स्वरात म्हणाले , ज्या मारियाबद्दल मला सांगायचं ना त्या त्या माया आहेत हो माया. अशा या माया मेमसाहब म्हणजेच मारियाला तू ओळखत नाहीस. म्हणजे प्रियंका चोप्राला तुझ्या लाडक्या बंधुराजानं नओळखण्यासारखं झालं.
– अहो मिस्टर आता पायाखालची वाळू घसरली म्हणून काहीही फुसके उदाहरणं देऊन तोंडाची वाफ दडवू नका. हीमारिया का फारियाची ओळखपाखळ ठेवायला ती माझी मावस बहीण नक्कीच नाही. आत्याला तर मुलगीच नाही. माझ्याभावाच्या नादाला कशाला लागता.त्याचं तो बघेल ना. त्याला प्रियंका चोप्रा माहीत नसेल म्हणून काय झालं परिणिती चोप्रातर ठाऊकाय ना.. भावाला संरक्षण देत रमाबाई उद्गारल्या.
– वा व, याचा अर्थ सचिनराव यांची गाडी मारियाच्या आतेभाऊ असण्यापासून ते तुमच्या भावाच्या परिणिती याप्रेमापात्रापर्यंत जाते असं समजायचं का आम्ही. मिस्किलपणे रामराव म्हणाले.
– याचा अर्थ, याचा अर्थ काय करता प्राध्यापका सारखे. असा जर इकडून तिकडूचा संबंध जोडून तुम्हाला अर्थचकाढायाचा असेल तर मग रामराव साहेब सचिनराव हे माणूसच आहेत हे तुम्हाला शंभर टक्के मान्यच आहे असा होत नाही का?
– मारियाचा चुलतआतेभाऊ वाघ राहू शकत नाही का, त्यासाठी सचिनरावच कशाला हवेत? रामराव म्हणाले. ते आपला ट्रॅक सोडायला तयारच नव्हते.
– सचिनराव वाघ आहेत, असं तुम्हाला म्हणायच का? रमाबाई रामरावांना खिंडित पकडण्यासाठी बोलल्या.
– असं आम्ही कुठे म्हणालो.
– मग हा वाघ कुठून आला मध्येच.
– कलानगरमधून..
– हेच ते ठिकाण जिथे सचिनरावांचा जन्म झाला.
– ताडोबाचं नामकरण कलानगर कधी झालं बाँ.औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादच धाराशीव झाल्याचंठाऊक होतं. रामराव आता पूर्ण सुटले होते. ह्रदयातील मारिया उघड झाल्यावर जी अडचणीची स्थिती निर्माण झाली होती, ती हळू हळू अशी अलगद निवळू लागल्याचं लक्षात येताच त्यांना हायसं वाटू लागलं होतं. रमाबाईंना रामरावांचा डाव लक्षातआला असला तरी खिंड लढवण्याचा त्यांचा निर्धार कायमच होता. त्या काही क्षण परत शांत झाल्या. लिंबूपाण्याचा आणखीएक घुट त्यांनी घेतला. श्री रेणुकामातेचं स्मरण केलं. रामरावांना फटकारत त्या म्हणाल्या..
– अहो, असं विचित्र बोलून मला वेडी करण्याचा डाव तर नाही ना तुमचा..
– आम्ही कसा काय डाव रचू शकतो बाँ. आता तुम्हीच सांगा ना कलानगरात वेडे राहतात की वाघ की सचिनराव कीआणखी कुणी..
– नाही नाही, तिथे माणसं, कुत्रे, कबुतरं आणि कावळे राहतात. रमाबाई वैतागून म्हणाल्या.
– उडाले ते कावळे मधील कावळे की रामचंद्र सुरेशचंद्र कावळे मधील कावळे? रामरावांनी चिमटा काढत विचारलं. आता मात्र रमाबाईंची सहनशक्ती संपली. त्या रामरावांच्या अंगावर खेकसत म्हणाल्या..
– कलानगरात कोण राहतात हे ना मी विनोद कांबळीला विचारुन सांगते, थांबा जरा एक मिनिट,
– कोण हा कांबळी, मध्येच कसा कडमडला, रामरावांची सुसाट गाडी कात्रजच्या घाटातील सगळयाच वळणांनाबेदखल करत होती. रमाबाई खेकसून खेकसून त्या गाडीचा ब्रेक कसा फेल होईल यावर लक्ष केंद्रित करुन होत्या. हारमानायचीच नाही हा त्यांचा निर्धारच होता. आता तर त्यांनी डोळे न मिटताही श्री तुळजाभवानीचं स्मरण करुन घेतलं. आणिरामरावांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या मुखी भिरकावलं.
-विनोद कांबळी कोण विचारताय ना तुम्ही. अहो सचिनरावांचा मित्र आहे तो..
– अरे वा, अरे वा.. कुणी कुणाचा मित्र राहावा की राहू नये यावरुन तर काही मारियाने सचिनरावांना ओळखावं हेकाही बंधनकारक नाही ना रमाबाई.
रामरावांनी सिक्सर लगावला. रमाबाई हिरमुसल्या. त्यांचा चेहरा कोमजू लागलेल्या
झेंडुच्या फुलासारखा झाला. सचिनरावांच्या विरोधात आपला नवरा मारिया की फारियाकडून तलवार चालवतो म्हणजेसलमानखान आणि ऐश्वर्याच्या भांडणात अभिषेकनं सलमानची बाजू घेण्यासारखं होतं. त्यामुळे रमाबाईंचं ह्रदय विषण्णझालं.
रामरावांना या स्थितीची जाणीव झाली असावी. श्री.श्री.रवीशंकरांचं स्मरण करत ते रमाबाईंना म्हणाले.
रमाबाई, आपण एका सेंकदासाठी सचिनराव आणि कु. माशाला बाजुला ठेऊ, या तिसऱ्या व्यक्तिसाठी किती वेळआपण वाद विवाद करत बसणार?
असं कसं, असं कसं. सचिनरावांना ती मारिया-फारिया ओळखत नसताना तिच्यासाठी तुम्ही मला वाट्टेल तसं बोलतसुटला आहात.
बरं बाबा,आता मी काहीच तुम्हाला बोलणार नाही. पण आता आपण द एन्ड करायला हवा की नाही या चर्चेचा. नाहीतरतुलाही रुखरुख लागेल आणि मी सुध्दा झोप गमावून बसेन .
म्हणजे काय म्हणायच तुम्हाला?
आपण आता मारिया-फारिया आणि सचिनराव प्रकरणाचा तुकडाच पाडून टाकू. मान्य आहे का तुम्हास.
काय करावं लागेल त्यासाठी मला.
फक्त मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या आता.
विचारा ..
तुम्ही मला आता सांगा..रमेश तेंडुलकर कोण आहेत ते.
माहीत नाही. रमाबाई उत्तरल्या.
सुचेता कृपलानी कोण, सांग बघू
माहीत नाही.
बरं ते जाऊ दे..
प्रतिभा देविसिंग चौहान कोण आहेत ?
माहीत नाही.
श्वेता नंदा कोण आहेत ?
माहीत नाही. बस्स झाले तुमचे प्रश्न. आपलं घर म्हणजे यूपीएसीचा परीक्षा हॉल नव्हे. रमाबाई वैतागून म्हणाल्या.
रमाबाई अशा वैतागू नका हो. आम्ही ज्यांची ज्यांची नावं घेतली ना त्या सर्व प्रसिध्द भारतीय भगिनी आहेत. त्यांचीचओळख जर आपणास नसेल तर एखाद्या परकीय भगनीस, आपल्या देशी सचिनरावांची ओळख कां बरं असावी. युध्दजिंकल्याच्या थाटात रामराव उद्गारले.
000
4
रमाबाईंना ते पटणं शक्यच नव्हतं. वड्याचं तेल वांग्याला लावण्याचा हा प्रकार झाला. असं त्यांना वाटलं. सचिनरावांना नओळखणाऱ्या मारिया की फारियाची बाजू आपला नवरा राम जेठमलानी बाण्यानं लढवतो. ही कल्पनाच त्यांना सहन होईना. त्यांचं तणतणणं आता नेक्स्ट लेव्हला जावू लागलं. अशासमयी त्या नेहमीच दोनचार भांड्यांना भूमातेचा प्रसाद देत असत. तोक्षण समीप आल्याचं, या वादावादीवर सुक्ष्म नजर ठेऊन असणाऱ्या घरगुती युनाटेड नेशन्समधील ज्येष्ठतम सदस्याच्यालक्षात आलं. पूर्वानुभव असा होता की अशा वेळेस रमाबाईंची पावलं किचनकडे वळत. पण आज मात्र त्यांची नजरटीव्हीकडेच जात असल्याचं या ज्येष्ठ सदस्याच्या लक्षात आलं. हे चिन्ह काही बरोबर नव्हतं. हातात येईल ती वस्तू जमिनीवरफेकण्याचा रमाबाईंचा पराक्रम त्या ज्येष्ठ सदस्यास चांगलाच ठाऊक होता. त्यामुळे रमाबाईने एखादी वस्तू हाती घेऊनटीव्हीवर फेकण्याआधीच ती ज्येष्ठ व्यक्ती टीव्ही फुटण्याची अप्रिय घटना टाळण्यासाठी टीव्हीसमोर ढालीसारखी उभी राहिली.
रमाबाईंची अवस्था आता डिवचलेल्या नागिणीसारखी झाली होती. अहमदशहा अब्दाली या नागिणीच्या पाठिमागेहोताच. आता मागे वळणे नाही ,जय जय मल्हार असं मनी अस्पष्ट पुटपुटत भान हरपलेल्या रमाबाईंनी टेबलवरचा लोटाउचलला नि टीव्हीच्या दिशने भिरकावला. टीव्ही समोर कुणीतरी उभं आहे हे सुध्दा त्या अवस्थेत त्यांच्या लक्षात आलं नाही. टीव्हीकडे भिरकावलेला लोटा ज्येष्ठ सदस्याच्या कपाळावर जाऊन आदळला. त्या दणक्याने तो जेष्ठ सदस्य विव्हळून मटकनखालीच बसला. त्यांला ग्लानी आली.
आता मात्र रमाबाई भानावर आल्या. रामराव अवाक झाले. असा दुर्धर प्रसंग पहिल्यांदाच घरी घडत असल्याने घरगुतीयुनायटेड नेशन्समधील सदस्य थिजून गेले.
काही क्षण शांततेत गेले. मटकन खाली बसलेला सदस्य आता विव्हळू लागला होता. त्याच्या डोक्यावर टेंगूळ आलं होतं. टीव्ही वाचला असला तरी या ज्येष्ठ सदस्याचं डोकं फुटता फुटता राहिलं होतं.
रमाबाईंनी त्या जेष्ठ सदस्यांच्या पायावर लोळण घातली. चूक पदरात घाला सासूबाई, असं म्हणून त्या धाय मोकलून रडूलागल्या. रामरावांनाही मेल्याहून मेल्यासारखं झालं.
घालीन ही चूकही पदरात घालीन.पण आधी माझ्या एक प्रश्नाचं उत्तर दे रमाबाई. सासुबाई विव्हळत म्हणाल्या..
विचाराना सासूबाई.. रमाबाई कशाबशा म्हणाल्या.
चिंधीबाईला ओळखतेस का तू..
न न नाही..सासूबाई
रमे, तुझ्या आईचं पाळण्यातलं नाव होतं ते. आपल्याला आपल्या आईबापाचं नाव सुध्दा माहीत नसतं. मात्र अमुकानेतमुकाला ओळखलच पाहिजे अशी मात्र सक्ती करतो आणि वाद घालत असतो. मारियानं सचिनरावांना ओळखलं काय निनाही ओळखलं काय, आपल्या बापाचं काय गेलंय. वाद घालून तोंडाची वाफ दवडली. टीव्ही फुटता फुटता वाचला. माझंडोकं कसं बसं वाचलं. माझं डोकं फुटलं असतं तर आली असती का ती मारिया अन तो सचिनराव मला वाचवायला ..
नाही नाही..रमाबाई आणि रामराव एकाच सुरात बोलले.
000
सुरेश वांदिले