रोजगार संधी मिळवून देण्यासाठी टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायंस (टिस्स) या संस्थेचे कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतात. या संस्थेने १२ वी नंतर करता येतील असे काही कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत – (कंसातील माहिती अभ्यासक्रम ज्या ठिकाणी करता येईल त्याची आहे.)
(१) बॅचरल इन ऑटोमेटिव्ह सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजी (मुंबई), करिअर संधी- ऑटोमेटिव्ह सर्व्हिस टेक्निशिअन, ऑटो इंस्ट्रक्टर, व्हेइकल इन्स्पेक्टर, ऑटो बॉडी टेक्निशिअन, ऑटो इलेक्ट्रिशिअन,
ऑटो मेकॅनिक, क्वालिटी टेस्टिंग इंजिनीअर, ऑटोमोटिव्ह वर्कशॉप मॅनेजर
(२) बँकिंग फायनांशिअल सर्व्हिसेस ॲण्ड इंश्युरन्स (मुंबई), करिअर संधी-इन्शुरन्स ॲडव्हायजर, फायनांशिअल प्लॅनर, म्युच्युअल फंड ॲडव्हायझर्स इत्यादी.
(३) मेकॅट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (मुंबई), या विषयातील तंत्रज्ञ स्वयंचलित उपकरणांचे डिझाइन करतात आणि त्यांची देखभाल करतात. त्यांना प्रयोगशाळा, निर्मितीच्या कारखान्यात अथवा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी, कार्यालये येथे संधी मिळू शकते.
(४) सोशल रिसर्च ॲण्ड डाटा मॅनेजमेंट (मुंबई), हा अभ्यासक्रम केल्यावर शासकीय प्रयोगशाळा, पर्यावरणीय संस्था, संशोधन संस्था इत्यादी
ठिकाणी रोजगार मिळण्याची शक्यता असते.
(५) ऑफिस ऑटोमेशन (मुंबई), करिअर संधी- ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट, कॉम्प्युटर ऑपरेटर, डेस्कटॉप सर्पोट इंजिनीअर्स, फिल्ड सपोर्ट इंजिनीअर्स, नेटवर्क इंजिनीअर, आयटी ॲडमिनिस्ट्रेशन इत्यादी.
(६) रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनिंग (मुंबई), करिअर संधी- फिल्ड इंजिनीअर, मेकॅनिकल डिझायनर, इन्स्टालर्स, सेल्स आणि मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्ह इत्यादी.
(७) डायलेसीस टेक्नॉलॉजी (मुंबई आणि पुणे), हा अभ्यासक्रम केल्यावर खाजगी रुग्णालयात रोजगार मिळू शकतो किंवा डायलिसीस तंत्रज्ञ म्हणून स्वत:चा रोजगार सुरु करता येतो.
(८) बॅचलर ऑफ ऑप्टिमेट्री (मुंबई/पुणे), हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना आय क्लिनिक्स, ऑप्टिशिअन, ऑप्टिशिअन शोरुम, कॉन्टक्ट लेन्स ऑप्थॅलमिक लेन्स उद्योग, रुग्णालयातील बाहरुग्ण कक्ष व्यवस्थापन इत्यादी
(९) मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी, (मुंबई, पुणे, नंदुरबार, अहमदनगर सातारा, गोंदिया). करिअर संधी- हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना डायग्नोस्टिक सेंटर्स, मेडिकल ऑफिसेस, संशोधन संस्था, हेल्थ केअर मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशन, हॉस्पिटल्स ॲण्ड रेडिऑलॉजी क्लिनिक्स अशा ठिकाणी रोजगाराच्या संधी मिळू शकतात.
(१०) मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी (मुंबई, पुणे, नंदुरबार, अहमदनगर सातारा, गोंदिया), करिअर संधी- लॅब टेक्निशिअन, लॅब टेक्नॉलॉजिस्ट, लॅब सुपरव्हायजर, लॅब मॅनेजर
(११) सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, करिअर संधी- सॉफ्टवेअर डेव्हलपर, फ्रन्ट एंड डेव्हलपर, डेस्क टॉप डेव्हलपर, मोबाइल डेव्हलपर, सॉफ्टवेअर इंजिनीअर, डाटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर, आयटी आर्किटेक्ट, बिग डाटा डेव्हलपर, गेम डेव्हलपर, नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर, ग्रॅफिक डेव्हलपर, डाटा सायंटिस्ट, सिस्टिम ॲनॅलिस्ट.
(१२) ग्रॅफिक ॲण्ड मल्टिमीडिया (मुंबई), करिअर संधी- प्रोड्युसर, प्रोजेक्ट मॅनेजर, क्रिएटिव्ह रायटर, मल्टिमीडिया डिझायनर, आर्ट डायरेक्टर, व्हिज्युएल, डिझायनर, इंटरफेस डिझायनर, आर्टिस्ट, स्क्रिप्ट रायटर, टू डी ॲनिमेटर, साऊंड प्रोड्यूसर, सब्जेक्ट मॅटर स्पेशॅलिस्ट, इंस्ट्रक्शनल डिझायनर.
(१३) जर्न्यालिझम (मुंबई)- हा अभ्यासक्रम केल्यावर टीव्ही कार्यक्रम निर्मिती कंपन्या, रेडिओ स्टेशन्स, डिजिटल मीडिआ कंपन्या, इंटरनेट मीडिआ, प्रिंट मीडिआ, वृत्त वाहिन्या आदींमध्ये वार्ताहर, संपादक, प्रक्षेपण तंत्रज्ञ, छायापत्रकार, स्तंभलेखक, छायाचित्रकार, विश्लेषक, वृत्तनिवेदक, अशा करिअर संधी मिळू शकतात.
(१३) रिटेल मॅनेजमेंट, (मुंबई), करिअर संधी-कस्टमर सेल्स असोशिएट्स, फ्लोर मॅनेजर, टिम लिडर, रिटेल ऑपरेशन्स मॅनेजर, रिटेल बायर्स ॲण्ड मर्कंडायझर्स, व्हिज्युअल मर्कंडायझर्स, लॉजिस्टिक मॅनेजर्स, वेअरहाऊस मॅनेजर
(१४) रिटेल मॅनेजमेंट वुइथ ऑटोमेटिव्ह रिटेल (मुंबई), हा अभ्यासक्रम मारुती सुझुकी या कंपनीच्या सहकार्याने सुरु करण्यात आला आहे. करिअर संधी-मारुती सुझुकी कंपनीत प्लेसमेंटची संधी मिळू शकते. इतर संधी- रिलेशनशीप मॅनेजर, रिटेल डिपार्टमेंटल मॅनेजर, रिटेल स्टोअर मॅनेजर, व्हिज्युअल मर्कंडायजर
(१५) स्पोर्ट्स मॅनेजमेंट (मुंबई), करिअर संधी स्पोर्ट्स ॲडमिनिस्ट्रेशन ॲण्ड मॅनेजमेंट, मॅनेजमेंट ऑफ स्पोर्ट्स इव्हेंट्स, स्पोर्ट्स फायनांस मॅनेजमेंट
(१६) हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट (पुणे), आणि (१७) हॉटेल मॅनेजमेंट (मुंबई)- हे अभ्यासक्रम केल्यावर फ्रंट डेस्क ऑफिसर, अकाउंटिंग मॅनेजर, सेल्स मॅनेजर, शेफ, रेसिडंट मॅनेजर, हाऊसकीपर, कनव्हेंशन सर्व्हिस मॅनेजर, फ्रंट ऑफिस मॅनेजर्स, अशा संधी मिळू शकतात. (१८) हॉटेल मॅनेजमेंट वुइथ गोल्डन थ्रिशहोल्ड (मुंबई), टाटा समुहाच्या इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेड अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळया हॉटेल्समध्ये ऑन जॉब ट्रेनिंग दिले जाते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर गुणवत्ता आणि शैक्षणिक कामगिरीनुसार हॉटेल्समध्ये प्लेसमेंट मिळू शकते. तथापि याच ठिकाणी नोकरी करण्याचे कोणतेही बंधन टाकले जात नाही.
(१९) ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम, (मुंबई), हा अभ्यासक्रम केल्यावर टुरिस्ट असिस्टंट, ट्रॅव्हल एजंट, टुर गाईड, टूर ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट, हॉटेल असिस्टंट, उद्योजकता अशा संधी मिळू शकतात.
हे अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करता येतात.
०००
(१९) आर्टिफिशिअल इंअेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग (मुंबई), अर्हता-१२ वीमध्ये विज्ञान आणि गणित हे विषय घेतले असावेत. हा अभ्यासक्रम केल्यावर डाटा सायंटिस्ट इन डीप लर्निंग, ऑटोमेशन वुइथ मशिन लर्निंग, ॲनॅलिटिक्स, मशिन इंटेलिजन्स अशा सारखा करिअर संधी मिळू शकतात.
वैशिष्ट्ये
(१) या सर्व अभ्यासक्रमांमध्ये प्रात्यक्षिकांवर भर देण्यात आल्याने, प्रत्यक्ष कामाशी ते जोडण्यात आले आहेत. (२) सर्व अभ्यासक्रमांना विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता मिळाली आहे. (३) या अभ्यासक्रमांचा कालावधी तीन वर्षाचा असला तरी रोजगार उपलब्ध झाल्यास आणि विद्यार्थ्यांची इच्छा असल्यास एक वर्षानंतर प्रमाणपत्र अभ्यासक्रम करुन बाहेर पडता येते. दुसऱ्या वर्षानंतर पदविका घेऊन बाहेर पडता येते. (४) या विद्यार्थ्याला आपल्या ज्ञान आणि कौशल्यात वाढ करायची असल्यास तो पुन्हा उर्वरित अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतो. कोणत्याही परिस्थितीत चार वर्षात पदवी अभ्यासक्रम करणे आवश्यक आहे. (५) प्रमाणपत्र, पदविका आणि पदवी, टीस्स मार्फत दिली जाते. (६) प्लेसमेंटसाठी विद्यार्थ्यांना साहाय्य केले जाते.
या अभ्यासक्रमांचा प्रारंभ जुलै २०२४ मध्ये होईल. याची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज ऑनलाइन करावा लागतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जून २०२४ ही आहे.
संपर्क- व्ही. एन.पुरव मार्ग, देवनार, मुंबई-४००००८, ईमेल-feedback@sve.tiss.edu, दूरध्वनी-०२२-२५५२५६२१, संकेतस्थळ-
sve.tiss.edu/admission
०००
कौशल्य कल चाचणी
या संस्थेने स्किल ॲप्टिट्यूड टेस्ट (कौशल्य कल चाचणी) देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. कौशल्य विकासाच्या १५ ही घटकांमध्ये ही चाचणी विद्यार्थ्यांना देता येते. यामुळे आपणास कोणत्या क्षेत्रात गती राहू शकेल याची कल्पना येऊ शकते. ही चाचणी या संस्थेने डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ सॉयकॉजिकल रिसर्च आणि डिफेन्स रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या संस्थांच्या तांत्रिक सहकार्याने तयार केली आहे. ही चाळणी देशी तंत्रज्ञानावर आधारित असल्याने बहुतेक भारतीय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आणि विश्वासाहर्य अशी आहे. सॉफ्टवेअरच्या साहाय्यानं घेतली जाणारी ही चाचणी आहे. व्यक्तिगतरीत्या वा समूहात ही चाचणी देता येते. विद्यार्थी एकावेळी त्यांच्या आवडीच्या तीन घटकांसाठी ही चाचणी देऊ शकतो. चाळणीनंतर स्वयंस्पष्ट असा अहवाल स्वत: प्राप्त करता येतो. समुपदेशन व मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. विद्यार्थ्यांच्या कलानुसार कोणत्या घटकाचं शिक्षण घ्यावं हे कळत असल्याने, निर्णय घेणं सोपं जाऊ शकतं. या चाळणीसाठी https://www.tissvocationease.com/Login/Registration.aspx या लिंकवर जाऊन नोंदणी करता येते.
ह्युमन रिसोर्स ॲण्ड लेबर रिलेशन्स
या संस्थेच्या, स्कूल ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड लेबर स्टडीज मार्फत, एम ए. इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ॲण्ड लेबर रिलेशन्स हा अभ्यासक्रम चालवला जातो. मनुष्यबळ संसाधन व्यवस्थापन (ह्युमन रिसोर्स) शाखेसाठी देशातील सर्वोत्कृष्ठ अभ्यासक्रमांपैकी हा अभ्यासक्रम समजला जातो. अनेकांना हा अभ्यासक्रम क्रमांक एकचा वाटतो. या अभ्यासक्रमाने घडवलेले अनेक विद्यार्थी हे देशविदेशातील मोठ्या कंपन्या व कॉर्पोरेटमध्ये उच्चपदावर आहेत. मनुष्यबळ विकास या शाखेत उच्चश्रेणीचं करिअर घडवणाऱ्या या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी फार मोठी स्पर्धा असते. गेल्या वर्षीपर्यंत या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी टिस्स मार्फतच चाळणी परीक्षा घेतली जायची. मात्र यंदापासून या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी, कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स एक्झामिनेशन – पोस्ट ग्रॅज्युएट (सीयुईटी-पीजी) या परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातील. संपर्क- https://tiss.edu/view/14/mumbai-campus/school-of-management-and-labour-studies/
सुरेश वांदिले