क्रीडा क्षेत्र – प्रशिक्षण ते व्यवस्थापन
भारत सरकार देशातील क्रीडाक्षेत्राला प्राधान्य देत आहे. या क्षेत्रात करिअरच्या उत्तमोत्तम संधी मिळू शकतात. त्यामुळे गुणवंत खेळाडुंनी या क्षेत्राकडे वळाचे यासाठी बहुवीध प्रयत्न केले जात आहेत. खेलो इंडिया स्पर्धेच्या माध्यमातून दरवर्षी एक हजार प्रतिभावंत क्रीडापटूंना हेरुन त्यांना पुढील आठ वर्षे दरवर्षी पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते.
महाराष्ट्र सरकारने खेळाडूंना शासकीय नोक-यांमध्ये पाच टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा साधारणत: पन्नास क्रीडापकारातील खेळांना होणार आहे. हे सर्व खेळ आंतरराष्ट्रीय ऑलंपिक संघ व राष्ट्रीय ऑलंपिक संघ व महाराष्ट्र ऑलंपिक संघाने मान्य केलेले आहेत. या खेळांमधील व्यक्तिगत आणि सांघिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विशेष कामगिरी बजावणा-या महिला आणि पुरुष खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील नोक-यांमधील शासनाच्या अ,ब,क आणि ड या संवर्गात (कॅटेगरी) पाच टक्के आरक्षणाचा फायदा मिळू शकतो.
क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याच्या अनुषंगाने प्रत्यक्ष खेळातील सहभागासोबतच, क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा मानसशास्त्र, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा स्पर्धा आयोजन (इव्हेंट्स), क्रीडा पत्रकारिता अशा बाबीही सध्या महत्वाच्या ठरताहेत. या अनुषंगाने राज्य आणि देशपातळीवर अभ्यासक्रमही सुरु झाले आहेत.
अभ्यासक्रम आणि संस्था
(1) नॅशनल स्पोर्टस युनिव्हर्सिटी
भारत सरकारच्या युवक कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत, नॅशनल स्पोर्टस युनिव्हर्सिटीस केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. मणिपूर राज्यातील इंफाळ येथे असणाऱ्या या विद्यापीठामध्ये पुढील अभ्यासक्रम करता येतात. –
1) बी.एस्सी इन स्पोर्टस कोचिंग, कालावधी – 4 वर्षे/आठ सत्रे. या अभ्यासक्रमामध्ये क्रीडा प्रशिक्षणाच्या विविध पध्दती आणि सिध्दांत, क्रीडा तंत्र, व्यायामाच्या पध्दती, इत्यादी बाबींचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षकाचे कौशल्य, ज्ञान आणि तज्ज्ञता प्राप्त व्हावी असे अपेक्षित आहे.
अर्हता – 45 टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील 12 वी उत्तीर्ण. प्रवेश घेतेवेळी उमेदवाराचे वय 17 वर्षापेक्षा अधिक असावे. कमाल वयोमर्यादा – 23 वर्षे. उमेदवाराने ऑलंपिक क्रीडा स्पर्धा, जागतिक क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा, दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धा, चॅम्पियन्स ट्रॉफी, एशिया कप, जागतिक विद्यापीठ क्रीडास्पर्धा या सारख्या स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले असावे. या स्पर्धेतील यशानुसार अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी गुण दिले जातात.
या प्रशिक्षणामध्ये तिरंदाजी, बॅडमिंटन, मैदानी खेळ, मुष्टीयोध्दा, नेमबाजी, हॉकी, जलतरण, भारोत्तोलन, या खेळांचा समावेश आहे. विद्यार्थ्यास प्रारंभीच यापैकी कोणताही एका क्रीडा प्रकार, स्पेशलयायझेशनचा विषय म्हणून निवडावा लागतो. हा क्रीडाप्रकार त्याला नंतर बदलता येत नाही.
उमेदवारांच्या निवडीसाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पध्दतीची परीक्षा घेतली जाते. यामध्ये सामान्य ज्ञान, क्रीडा विषयक सामान्य ज्ञान याविषयी 100 गुणांचे प्रश्न विचारले जातात. कालावधी 1 तास 20 मिनिटे. क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी 50 गुण दिले जातात.
2) एम.एस्सी इन स्पोर्टस कोचिंग, कालावधी-दोन वर्षे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी आणि स्पोर्टस कोचिंग विषयातील पदविका किंवा चार किंवा दोन वर्षे कालावधीचा बीपीएड (बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन) किंवा बी.एस्सी इन स्पोर्टस कोचिंग किंवा बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन इन स्पोर्टस कोचिंग. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना किमान 50 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. या उमेदवाराने किमान एकदा वरिष्ठ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा किंवा अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा यामध्ये सहभाग घेतलेला असावा. या अभ्यासक्रमांतंर्गत बॅडमिंटन, फूटबाल आणि ॲथलेटिक्स या क्रीडाप्रकाराशी संबंधित प्रशिक्षक – प्रशिक्षण दिले जाते. उमेदवारांच्या निवडीसाठी लेखी परीक्षा, मुलाखत आणि क्रीडा स्पर्धातील सहभाग या तीन घटकांचा समावेश केला जातो.
3) एम.ए.इन स्पोर्टस सायकालॉजी. अर्हता- बीपीएड, किंवा सायकॉलॉजी या विषयासह बी.ए (ऑनर्स) किंवा सायकॉलॉजी किंवा स्पोर्टस सायकॉलॉजी विषयासह कोणत्याही विषयातील पदवी. उमदेवारांना पदवी परीक्षेत किमान 50 टक्के गुण मिळणे आवश्यक. निवडीसाठी लेखी परीक्षा, मुलाखत आणि क्रीडा प्रकारातील सहभाग या बाबींचा समावेश केला जातो.
संपर्क – रजिस्ट्रार, नॅशनल स्पोर्टस युनिव्हर्सिटी, सेकंड फ्लोअर, ऑलंपिक भवन, खुमन लम्पक स्पोर्टस कॉम्प्लेक्स, इम्फाळ, मणिपूर – ७९५००१, दूरध्वनी- ०३८५-२४२१४७१, ईमेल- registrar@nsu.ac.in, संकेतस्थळ-www.nsu.ac.in
(