नेताजी सुभाष नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स ही क्रीडा क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम चालवणारी, प्रशिक्षण देणारी आणि देशात क्रीडा संस्कृतीची ठोसपणे रुजुवात करणारी महत्वाची संस्था. या संस्थेत क्रीडा प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, उपकरणं, साहित्य उपलब्ध करुन दिलं जातं. इथे प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना उत्तमोत्तम करिअरच्या संधी मिळू शकतात.
गेल्या काही वर्षात भारतातील क्रीडा पर्यावरणात आमुलाग्र बदल झालाय. भारत सरकारने, ‘खेलो इंडिया’, उपक्रमाच्या माध्यमातून संबंध देश ढवळून काढला आहे. क्रीडा क्षेत्रातही चांगलं करिअर घडू शकतं हे ‘खेलो इंडिया’च्या यशामुळे सिध्द होत असल्याचं दिसतं. बरीच मुलं/मुली ‘खेलो इंडिया’त सहभागी होऊन चांगलं यश मिळवतात. त्यापैकी बऱ्याच जणांना वेगवेगळ्या राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची व पराक्रम गाजवण्याची संधी मिळते. वर्षभर भारतीय खेळाडू जगातील विविध भागात होणाऱ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करताना दिसतात. या खेळाडुंना पुढे उत्तम कोच (प्रशिक्षक) म्हणून करिअर करता येणं शक्य होतं. या दृष्टिने संस्थेमार्फत सुरु करण्यात आलेला, ‘डिप्लोमा इन कोचिंग’ हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. १२ वीपर्यंत शिक्षण झालेल्या व नंतर आपल्या आवडीच्या क्रीडा प्रकारात झोकून देऊन वेगवेगळया स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रीय मुलांनी या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग
प्रवेश प्रकिया
(१) कॅटेगरी अ (थेट प्रवेश)- या उमेदवारांनी क्रीडा क्षेत्रात पुढील कामगिरी बजावलेली असावी- (अ) ऑलंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व, (ब) वरिष्ठ जागतिक स्पर्धा सहभाग, (क) कॉमनवेल्थ किंवा आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणतेही पदक.
(२) कॅटेगरी ए दोन (आंतरराष्ट्रीय क्रीडा पटूंसाठी)– १२ वी उत्तीर्ण आणि ऑलंपिक स्पर्धा, वरिष्ठ जागतिक स्पर्धा, आशियाई स्पर्धा, कॉमनवेल्थ स्पर्धा, युवा ऑलंपिक स्पर्धेत सहभाग
(३) कॅटेगरी ब अर्हता- पदवी आणि आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय महत्वाच्या क्रीडा स्पर्धेत सहभाग
कॅम्पस आणि क्रीडा प्रकार प्रशिक्षण
(अ) पतियाळा कॅम्पस- (१) बॉक्सिंग, (२) सायकलिंग, (३) फेन्सिंग, (४) हँडबॉल, (५) हॉकी, (६) ज्युडो, (७) वेटलिफ्टिंग, (८) कुस्ती, (९) वुशू, (१०) योग (११) ॲथेलिटिक्स
(ब) बेंगळुरु कॅम्पस- (१) बॅडमिंटन, (२) बास्केटबॉल, (३) हॉकी, (४) कबड्डी, (५) खोखो, (६) शुटिंग, (७) स्विमिंग, (८) टेनिस, (९) व्हॉलीबॉल, (१०) टायकवोंदो, (११) ॲथलेटिक्स,
(क) कोलकता कॅम्पस- (१) आर्चेरी, (२) ॲथेलिटिक्स, (३) फूटबॉल, (४) जिमनॅस्ट, (५) टेबल टेनीस,
(ड) थिरुवनंतपूरम कॅम्पस- (१) कॅनोइंग ॲण्ड कायाकिंग, (२) रोविंग,
या प्रशिक्षक अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षं. एकूण ७६५ उमेदवारांना प्रवेश दिला जाईल. ऑनलाइन चाळणी परीक्षा देशातील विविध केंद्रांवर घेतली जाते. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर या केंद्रांचा समावेश आहे.
अशी असेल परीक्षा
पेपरमध्ये सामान्य ज्ञान- १० गुण, सर्वसामान्य संगणकीय ज्ञान- ५ गुण, भाषा आणि संवाद कौशल्य- १० गुण, तार्किक क्षमता आणि क्रीडा कल -१० गुण, स्पेशलाइज्ड स्पोर्ट्स थिअरी- २५ गुण असलेले वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.
शैक्षणिक कामगिरी १० गुण, मुलाखत १० गुण, क्रीडा कामगिरीला २० गुण दिले जातील.
०००
इतर अभ्यासक्रम
१) एम.एस्सी इन स्पोर्ट्स कोचिंग. हा अभ्यासक्रम पतियाळा येथील कॅम्पसमध्ये चालवला जातो. या अभ्यासक्रमात सैध्दांतिक आणि प्रात्यक्षिकांचा समावेश करण्यात आलाय. प्रशिक्षणाच्या विविध पध्दती, शारीरिक विकास, नेतृत्व विकास, क्रीडा विज्ञान, क्रीडा मानसशास्त्र या विषयघटकांचा समावेश आहे. कालावधी- दोन वर्षे.
प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ॲथेलिटिक्स, बॉस्केटबॉल, फूटबॉल, जिमनॅस्टिक्स, हॉकी, स्विमिंग, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग आणि कुस्ती या खेळांचं प्रशिक्षण दिलं जातं.
निवड प्रक्रिया पटियाळा येथे पार पाडली जाते. क्रीडा विज्ञानावर आधारित लेखी चाळणी आणि त्यानंतर मुलाखत घेतली जाते. मुलाखतीमध्ये क्रीडा क्षेत्रातील ज्ञान, व्यक्तिमत्व, अभिव्यक्तीचा दर्जा यांची चाचपणी केली जाते. एकूण ४० उमेदवारांना प्रवेश दिला जातो.
अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी सोबत, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स (पतियाळा) चा डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेतील डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेतील चार वर्षे कालावधीचा बीएस्सी इन स्पोर्ट्स कोचिंग किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग. उमेदवारांना किमान ५५ टक्के गुण मिळायला हवेत.
(२) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स न्युट्रिशन- कालावधी एक वर्षं.
अर्हता- पुढीलपैकी कोणत्याही एका विषयात पदवी- (१) न्युट्रिशन, (२) लाइफ सायंस, (३) स्पोर्ट्स सायंस, (४) फिजिकल एज्युकेशन ॲण्ड स्पोर्ट्स, (५) मेडिकल ॲण्ड अलाइड हेल्थ सायंस, (६) फिजिकल एज्युकेशन, (७) कोणत्याही विषयातील पदवी सोबत डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग.
पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत. ५० उमेदवारांना प्रवेश दिला जातो. प्रवेशासाठी १०० गुणांची परीक्षा घेतली जाते. यामध्ये ८० गुण लेखी परीक्षेला आणि २० गुण मुलाखतीला दिले जातात.
(३) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स सॉयकालॉजी. या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा आहे.
अर्हता- पुढीलपैकी कोणत्याही एका विषयात पदवी- (१) सॉयकॉलॉजी, (२) स्पोर्ट्स सायंस, (४) फिजिकल एज्युकेशन ॲण्ड स्पोर्ट्स, (५) मेडिकल ॲण्ड अलाइड हेल्थ सायंस, (६) फिजिकल एज्युकेशन, (७) कोणत्याही विषयातील पदवी सोबत डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग.
उमेदवारांना पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत. एकूण ५० उमेदवारांना प्रवेश दिला जातो. प्रवेशासाठी १०० गुणांची परीक्षा घेतली जाते. यामध्ये ८० गुण लेखी परीक्षेला आणि २० गुण मुलाखतीला दिले जातात.
(४) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्ट्रेंग्थ ॲण्ड कंडिशनिंग-
कालावधी एक वर्षं. क्रीडा क्षेत्रात या विषयाला सध्या महत्व मिळू लागलेय. यामध्ये खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतावृध्दीचं तंत्रकौशल्य, पध्दती यांचा ढोबळमानाने समावेश होतो. नेतृत्व विकासावरही लक्ष केंद्रित केलं जातं. पोषण आहार आणि क्रीडा पुनर्वसन यांचाही समावेश करण्यात आल्यानं उमेदवारांना प्रगत आणि वैविध्यपूर्ण विषयांचं ज्ञान प्राप्त होतं. उमेदवारांच्या प्रात्यक्षिकांच्या कौशल्यात वाढ व्हावी, त्यांनी भविष्यात या विषयात संशोधनाचं कार्य करावं, यावरही लक्ष केंद्रित केलं जातं.
अर्हता- पुढीलपैकी कोणत्याही एका विषयात पदवी- (१) फिजिओथेरपी, (२) स्पोर्ट्स सायंस, (४) फिजिकल एज्युकेशन ॲण्ड स्पोर्ट्स, (५) फिजिकल एज्युकेशन, (६) कोणत्याही विषयातील पदवी सोबत डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग.
उमेदवारांना पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत. एकूण ५० उमेदवारांना प्रवेश दिला जातो. प्रवेशासाठी १०० गुणांची परीक्षा घेतली जाते. यामध्ये ८० गुण लेखी परीक्षेला आणि २० गुण मुलाखतीला दिले जातात.
(५) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स परफॉर्मन्स ॲनॅलिसीस. कालावधी एक वर्षं. या अभ्यासक्रमामध्ये खेळाडूच्या कामगिरीचं विश्लेषण करण्याचं तंत्र आणि कौशल्याचं ज्ञान प्रदान केलं जातं. प्रभावी संवाद कौशल्य वाढीसाठी प्रयत्न केले जातात. मोठमोठ्या कंपन्या किंवा कॉर्पोरेट तसेच राष्ट्रीय संस्थांच्या टीमच्या निवडीच्या निर्णय प्रकियेत महत्वाची भूमिका बजवावी लागते.
या अभ्यासक्रमात पुढील विषय घटकांचा समावेश आहे- सरावातील कामगिरीचं विश्लेषण, कामगिरी मापनाचे निदर्शके (इंडिकेटर्स), उपयोजित क्रीडा विज्ञान, क्रीडा कामगिरी विश्लेषण आणि मूल्यमापनाच्या पध्दती, उपयोजित क्रीडा कामगिरी विश्लेषण, व्यावसायिकदृष्ट्या क्रीडा कामगिरीचं विश्लेषण, संशोधन, माहितीचं विश्लेषण आणि आराखाडा बांधणं.
अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण. एकूण ५० उमेदवारांना प्रवेश दिला जातो. प्रवेशासाठी १०० गुणांची परीक्षा घेतली जाते. यामध्ये ८० गुण लेखी परीक्षेला आणि २० गुण मुलाखतीला दिले जातात.
संपर्क:- नेताजी सुभाष नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स, ओल्ड मोतीबाग, पतियाळा- १४७००१, दूरध्वनी- ०१७५-२३०६१७१, फॅक्स- २२१२०७०, संकेतस्थळ-https://sportsauthorityofindia.nic.in आणि www.dipsc.nsnis.in, ईमेल-nsnisacademics@gmail.com हेल्पलाइन-०१७५ २३९४२६१
सुरेश वांदिले