(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

शिकवणी वर्गांमध्ये काही विषय घटकांवर अत्याधिक भर दिला जातो तर काही विषय घटकांच्या तोंडाला पाणी पुसलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जागरुक राहणं आवश्यक ठरतं. त्यासाठी बोर्डाने तयार केलेली विषयांची पुस्तकं मुळापासून वाचायला हवित. मुळापासून याचा अर्थ धड्यातील प्रत्येक शब्द नि शब्द. तसे केले तरच त्या धड्यातील कठीण शब्द, व्याख्या, सूत्रं हे लक्षात येतील. त्यापैकी जे कळणार नाही ते शिकवणी वर्गातील सरांना विचारायला हवं. एकदा त्याचं स्पष्टीकरण आल्यावर तेही कळलं नाही तर पुन्हापुन्हा विचारायला हवं. असं समजून उमजून पुढे गेलो नाही तर भरधाव निघालेली गाडी कुठे आणि कशी पंक्चर होईल, हे सांगता यायचं नाही.

बहुतेक विद्यार्थी विषय घटकांच्या संकल्पना समजून घेणं म्हणजे वेळ वाया घालवणं असं समजतात. यात त्यांचं नुकसान होतं. पेपर खूप कठीण होता किंवा पेपरमध्ये अभ्यासक्रमाच्या बाहेरचे प्रश्न आले होते. अशी आरडाओरड होते. प्रत्यक्षात तसं अपवादानच होतं. सीईटी किंवा नीट किंवा जेईई  या परीक्षांचा पेपर हा अभ्यासक्रमावरच आधारलेला असतो. विषय घटकांच्या बाहेरच्या घटकांचा अजिबात विचार केला जात नाही.  ही बाब विद्यार्थ्यांनी कायम लक्षात ठेवावी.

स्वत:चे वेळापत्रक

सीईटीच्या तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना १२० ते १५० दिवसांचा कालावधी मिळू शकतो. या कालावधीत शिकवणी वर्गात बऱ्याच चाळण्या होतील. या चाळण्यांमध्ये प्रत्येक वेळी चांगले गुण मिळाले तर ते उत्तमच. कारण त्यामुळे मनात नकारात्मक विचार येत नाहीत. पण या चाळण्यामंधील हे उत्कृष्ट गुण काही सीईटी परीक्षेतही उत्तम गुण मिळवून देण्याची हमी देऊ शकत नाहीत. शिकवणी वर्गात विशिष्ट पध्दतीनं शिकवलं जातं व तशाच विशिष्ट पध्दतीनं प्रश्नपत्रिका काढल्या जातात. त्यांचा वारंवार सराव केल्यानं त्यात गुण मिळणं सुलभ जाऊ शकतं, ही बाब लक्षात ठेऊन विद्यार्थ्यांनी विषय घटकांच्या संकल्पना सर्वांशानं समजून घ्यायला प्राधान्य दिलं पाहिजे.

चाळणी परीक्षांमध्ये जे प्रश्न सोडवणे कठीण जातात,ते कशामुळे? ही बाब लक्षात घ्यायला हवी. जे प्रश्न चुकले आहेत,त्याचे उत्तर कसे किंवा कोणते राहील,त्याची पध्दती नेमकी कोणती? ही बाब  ट्यूशन  किंवा शाळेच्या सरांकडून समजून घेणे गरजेचे आहे.  प्रत्येक चाळणी पेपरसाठी हे सूत्र वापरायला हवे. तरच आपल्या चुका कळतील व त्या दुरुस्त होतील. त्यातून आत्मविश्वासही वाढेल. 

राज्य शासनाच्या सीईटी सेलकडून काही नमूना प्रश्नपत्रिका प्रकाशित केल्या जातात. त्या संकेतस्थळावरही ठेवल्या जातात. गेल्या वर्षीच्या किंवा त्याच्या आधीच्या वर्षिच्या अशा प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करावा. जे प्रश्न सोडवताना कठीण जातात, त्याची उत्तरं शोधण्यासाठी शिकवणी वर्गातील किंवा शाळेतील शिक्षकांकडून समजून घेतलं पाहिजे. त्यात काही वावगं वाटून घेऊ नये.

वेळापत्रक तयार करा

१२० ते १५० दिवसांमध्ये विषयानुसार स्वत:चं वेळापत्रक बनवावं. आपणास जे विषय कठीण वाटतात त्याला अधिक वेळ द्यावा. मात्र एखादा विषय सोपा जातो म्हणून त्याला अजिबातच वेळ न देण्याची चूक करु नये. सोपे विषयसुध्दा परिपूर्ण समजून घेतले पाहिजे. भाषेचा अभ्यास हा केवळ किमान गुण मिळण्यापुरताच करायला हवा, अशी एक चुकीची समजूत आहे. कारण पुढे पदवी अभ्यासक्रमात भाषेचा उपयोग उत्तम संवादकौशल्य आत्मसात करण्यासाठी होतो. ज्याचे संवादकौशल्य आणि सादरीकरण उत्तम असते त्याला यश मिळणं सोपं जातं. भाषा आणि संवादकौशल्याच्या अभावामुळे चांगल्या रोजगार संधी हातातून जाऊ शकतात. या बाबी लक्षात ठेऊन पुढील १२० ते १५० दिवसांठीचं अभ्यासाचं नियोजन केलं पाहिजं. वेगवेगळया शिकवणी वर्गात कितीही व्यस्त असलो किंवा सारखी पळापळ करावी लागत असली तरी पाठ्यपुस्तक मंडळाची सर्व विषयांची पुस्तकं संपूर्णपणे वाचून काढण्यासाठी वेळ काढायलाच हवा. जे असा वेळ काढतील त्यांना सीईटी आणि पुढेही चांगलं यश मिळेल. जे वेळ काढणार नाहीत, त्यांचा अडथळ्याचा प्रवास कधी संपेल हे सांगता यायचं नाही.

सुरेश वांदिले