गा,वाजवा आणि नृत्य करा-
भारतीय संगीताला 2000 सालापासूनची प्राचीन परंपरा आहे. त्याकाळी गुरुकुल आणि आश्रमांमध्ये संगीताचे अध्ययन केले जात असे. भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्याचा विकास होण्यासाठी गुरुशिष्य परंपरेचा लक्षणीय हातभार लागला आहे.
कालपरत्वे भारतीय संगीतात विविध प्रयोग होत राहिले. त्यातून कंठ संगीत, वाद्यसंगीत आणि नृत्याचा विकास झाला. या तीनही बाबी भारतीय संस्कृतीच्या अभिन्न अंग बनलेल्या आहेत. यातूनच संगीत शिक्षणाला संस्थात्मक स्वरुप प्राप्त होऊ शकले.
संगीताच्या शिक्षण आणि प्रशिक्षणास संस्थात्मक आणि सैध्दांतिक स्वरुप ब्रिटिशांच्या काळात आले. त्याचा विशिष्ट कालावधी या काळात ठरवण्यात आला.
पंडित दिंगबर पळुस्कर यांनी 1901 साली लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. संगीत शिक्षणाच्या संस्थात्मक पर्वाचा हा प्रारंभ ठरला. त्यानंतर पंडित विष्णू नारायण भातखंडे यांनी संगीत शिक्षणाला संस्थात्मक स्वरुप देण्याचे ऐतिहासिक कार्य केले. 1926 साली त्यांनी लखनौ येथे मॅरिस कॉलेज ऑफ म्युझिक या नावाने संगीत शिक्षण संस्था सुरु केली. 1966 साली हे विद्यालय उत्तर पद्रेश शासनाच्या अखत्यारित आले. या विद्यालयास भातखंडे कॉलेज ऑफ हिंदुस्थानी म्युझिक असे नाव उत्तरप्रदेश सरकारने दिले. आक्टोबर 2000 मध्ये या संस्थेस केंद्र सरकारने डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा प्रदान केला. गेल्या 88 वर्षात या संस्थेत अनेक श्रेष्ठ गुरु आणि तज्ज्ञांनी प्राचार्य म्हणून कार्य केले आहे.
शिक्षण- प्रशिक्षण
भातखंडे राज्य संस्कृती विश्वविद्यालय हे देशातील शास्त्रीय संगीत आणि नृत्य या विषयांमध्ये शिक्षण-प्रशिक्षण देणारी महत्वाची शिक्षण संस्था आहे.पूर्वी ही संस्था भातखंडे म्युझिक इंस्टिट्यूट या नावाने ओळखली जात असे. आक्टोबर 2000 मध्ये या संस्थेस केंद्र सरकारने डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा प्रदान केला. गेल्या अनेक वर्षात या संस्थेत अनेक श्रेष्ठ गुरु आणि तज्ज्ञांनी प्राचार्य म्हणून कार्य केले आहे.
या विद्यालयात पुढील विषयांचे शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाते. (1) कंठसंगीत (शास्त्रीय कंठसंगीत, ठुमरी, दादरा, सुगम संगीत), (2) नृत्य (कथ्थक, भरतनाट्यम, कुचिपुडी, लोकनृत्य), (3) स्वरवाद्ये (सतार, सरोद, गीटार, व्हायोलिन, सारंगी, हार्मोनिअम, बासरी), (4) तालवाद्य – (तबला ,पखवाज) आणि (5) संगीतशास्त्र. या पाचही प्रकाराचे अभ्यासक्रम शिकवण्यासाठी पाच स्वतंत्र विभाग आहेत.
अभ्यासक्रम- (अ)(1)बॅचलर इन परफॉर्मिंग आर्ट् स,कालावधी- तीन वर्षे, (2) मास्टर इन परफॉर्मिंग आर्ट् स,कालावधी- दोन वर्षे. (ब)दोन वर्षे कालावधीचे पदविका अभ्यासक्रम- (1)प्रवेशिका, (2)परिचय, (3)प्रबुध्द, (4)पारंगत,(क) दोन वर्षं कालावधीचे स्पेशल अभ्यासक्रम- (1) ध्रुपद धमार , (2) ठुमरी दादरा, (3) हार्मोनियम, (4)लोक नृत्य, (4) सुगम संगीत (क) एक वर्षं कालावधीचे स्पेशल अभ्यासक्रम-(1)लोक संगीत , (2) ढोलक
या संस्थेत उच्च दर्जाच्या शिक्षणावर भर दिला जातो. सध्या 1500 च्या आसपास विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेत आहेत. कला आणि संगीताच्या क्षेत्रात या विद्यार्थ्यांना तत्काळ करिअरच्या संधी प्राप्त होत आहेत. यासाठी संस्थेच्या वतिने विशेष प्रयत्न केले जातात. संस्थेत वेळोवेळी वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रमांच्या निमित्त श्रेष्ठ कलावंतांना त्यांची कला सादर करण्यासाठी बोलावले जाते. त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होतो.
या संस्थेत भारतीय विद्यार्थ्यांसोबत श्रीलंका, युरोप, नेपाळ, भूतान, बांगला देश, मध्य आणि पूर्व आशियातील विद्यार्थी संगीताचे शिक्षण घेण्यासाठी येतात. अनूप जलोटा, दिलराज कौर सारख्या अनेक नामवंत गायकांनी याच संस्थेतून शिक्षण घेतले आहे.
ही संस्था एकाच वेळी दोन पदवी वा पदविका अभ्यासक्रम करण्याची परवानगी देत नाही. वर्गांमध्ये 75 टक्के उपस्थिती आवश्यक असून त्याअभावी वार्षिक परीक्षेला विद्यार्थ्यांना बसू दिले जात नाही. संस्थेमार्फत आजोजित सर्व कार्यक्रमांना विद्यार्थ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
प्रवेश प्रक्रिया
अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दरवर्षी साधारणत: 9जुलै ते 17 जुलै रोजी चाळणी परीक्षा घेतली जाते. निकाल 20 जुलै रोजी लावला जातो. 27 जुलैपासून प्रत्यक्ष शिकवणीस प्रारंभ होतो. 25 मे ते 25 जून या कालावधीत प्रवेश अर्ज करता येतो. भारत सरकारच्या नियमानुसार अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास संवर्ग आणि दिव्यांगांसाठी जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी संबंधित संवर्गातील उमेदवारांनी अर्ज न केल्यास त्या जागा खुल्या संवर्गातील संवर्गातून भरल्या जातात.
निवास व्यवस्था
या संस्थेत मुलींसाठी असलेल्या वसतिगृहात 60 विद्यार्थींनीच्या राहण्याची व्यवस्था केली जाते. मुलांच्या वसतिगृहाची क्षमता 15 विद्यार्थ्यांच्या निवासापुरती मर्यादित आहे.
संपर्क-
संपर्क: भातखंडे म्युझिक इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी , 1 कैसरबाग लखनौ(उत्तरप्रदेश.)-२२६००१, संकेतस्थळ-www.bhatkhandemusic.edu.in,ईमेल-info@ www.bhatkhandemusic.edu.in दूरध्वनी–०५२२–४०४५६८६/२६१०२४८,फॅक्स–२६२२९२६
श्रीराम भारतीय कला केंद्र
दिल्लीस्थित श्रीराम भारतीय कला केंद्र, ही संगीत आणि नृत्य या विषयात शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी देशातील महत्वाची संस्था आहे. दिल्लीतील सांस्कृतिक संस्थांचे केद्र बनलेल्या मंडी भागात ही संस्था कार्यरत आहे. संस्थेची स्थापना 1948 साली करण्यात आली. या संस्थेला मनुष्यबळविकास मंत्रालायाने मान्यता प्रदान केली आहे. या संस्थेचे शैक्षणिक वर्षं दरवर्षी 1 जुलै रोजी सुरु होते.
या संस्थेत (1) हिंदुस्थानी शास्त्रीय कंठ गायन-खयाल, (2)हिंदुस्थानी शास्त्रीय कंठ सुगम गायन आणि गझल, भजन आणि गीत गायन, (3) तबला/ सतार/ सरोद , (4) कथ्थक(जयपूर घराणे आणि लखनौ घराणे), (5) भरतनाट्यम (कलाक्षेत्र शैली), (6) ओडिशी (केलूचरण मोहपात्रा शैली), (7) छाऊ(मयूरभंज शैली), (8) नृत्य-नाट्य याविषयांचे प्रशिक्षण घेता येते.
संस्थेत पुढील अभ्यासक्रम चालविण्यात येतात- (1) संगीत आणि नृत्य रसग्रहण अभ्यासक्रम, कालावधी- एक ते दोन वर्षे, (2) प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कालावधी- 3 वर्षे, (3) पदविका अभ्यासक्रम, कालावधी – 2 वर्षे, (4) पदविकोत्तर अभ्यासक्रम, कालावधी –2 वर्षे, (5) व्यावसायिक अभ्यासक्रम- हा अभ्यासक्रम पदविकोत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर करता येतो. कालावधी- एक वर्षाच्या पुढे.
संपर्क– श्रीराम भारतीय कला केंद्र,कॉलेज ऑफ म्युझिक ॲण्ड डान्स, 1 कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली- 110001, दूरध्वनी- 011-43503333,टेलेफॅक्स-23386428, ईमेल- sbkk@thekendra.com, संकेतस्थळ- sbkk.in
०००
बॅचलर ऑफ आर्ट्स इन म्युझिक प्रॉडक्शन ॲण्ड कम्पोझिशन
व्हिसलिंगवूड या संस्थेने हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. संगीत संयोजक, संगीत दिग्दर्शक आणि संगीत निर्माते होण्यासाठीचे शिक्षण आणि प्रशिक्षण या अभ्यासक्रमात देण्यात येते. यामध्ये अत्याधुनिक संगीत साधने, संगणकीय संगीत प्रक्रिया आदिंचा समावेश आहे. जगातील मान्यवर संगीतज्ज्ञांना हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी बोलावले जाते. उच्चदर्जाच्या संगीतकारांची निर्मिती व्हावी या अनुषंगाने या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना भारतीय शास्त्रीय संगीत, पाश्चिमात्य शास्त्रीय संगीत,लोकसंगीताचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना लघु चित्रपटांच्या पार्श्वसंगीताची जबाबादारी उचलता येते. म्युझिक अल्बम, पार्श्वसंगीत, सोप ऑपेराचे संगीत, जाहिरातीतील संगीत, जिंगल्स मधील संगीताची निर्मिती करण्याची संधी मिळू शकते. संगीताचे अध्यापनही करता येते.
संपर्क- पत्ता–व्हीसलिंग वूड्स इंटरनॅशनल,फिल्मसिटी कॉम्प्लेक्स,गोरेगाव(पूर्व) मुंबई–४०००६५,दूरध्वनी–०२२-३०९१६१४६/३०९१६००/८४५१८०३८५२ ईमेल-admissions@ whistlingwoods.net संकेतस्थळ -www.whistlingwoods.net
000
०००
बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स इन कंटेम्पोरेरी वेस्टर्न म्युझिक
नर्सी मोंजी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या संस्थेने हा बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स इन कंटेम्पोरेरी वेस्टर्न म्युझिक हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. यामध्ये संगीताचा इतिहास, व्यवसाय, संगीत तंत्रज्ञान, संगीत सिध्दांत संगीत रचना, की-बोर्ड अभ्यास, म्युझिक अरेंजिंग, कंपोझिशन प्रॉजेक्ट्स अशा विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे.अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील १२ वी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला स्वत:चा संगीत अल्बम यू-ट्यूबवर अपलोड करावा लागतो. त्याची लिंक संस्थेकडे पाठवावी लागते. त्यानंतर मुलाखत आणि कलचाचणीसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यानंतर अंतिम निवड केली जाते.
संपर्क– एनएमआयएमएस, स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट् ,दादाभाई रोड, सीएनएमएसच्या बाजूला, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई-४०००५६, संपर्क-०२२-४२३३२२७१, टेलेफॅक्स-४२३५५५५५, इमेल-enquiry@nmims.edu,संकेतस्थळ-performingarts.nmims.edu
००००
