(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

भारतरत्न गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रितर्थ्य महाराष्ट्र शासनाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला होता. त्यानुसार शासनाने काही‍ अभ्यासक्रम तात्पुरत्या स्वरुपात प्रभादेवी येथील पु.ल.देशपांडे कला अकादमीमध्ये सुरु केले आहेत. संगीत क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या प्रतिभावंतांसाठी हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतात.

हे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत

(१) हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कालावधी-एक वर्षं, प्रवेश संख्या-२५, (२) भारतीय बासरी वादन प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कालावधी-एक वर्षं, प्रवेश संख्या-२५, (३) तबला वादन प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कालावधी-एक वर्षं, प्रवेश संख्या-२५, (४) सतार वादन प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कालावधी-एक वर्षं, प्रवेश संख्या-२५, (५) पियानो/कीबोर्ड प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कालावधी-एक वर्षं, प्रवेश संख्या-२५, (६) संगीत निर्मिती प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कालावधी-एक वर्षं,प्रवेश संख्या-२५, (७) ध्वनी अभियांत्रिकी प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कालावधी-एक वर्षं, प्रवेश संख्या-२५ (८) भावसंगीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कालावधी-  सहा महिने, प्रवेश संख्या- ५० (हा अभ्यासक्रम सुप्रसिध्द संगीतकार सलील कुलकर्णी, शनिवार आणि रविवार हे दोन दिवस शिकवतील.) इतर अभ्यासक्रमांसाठीचे गुरु पुढीलप्रमाणे आहेत- (१) पं.उपेंद्र भट, (२) पं.भवदीप जयपूरवाले, (३) ‍गिरीश संझगिरी, (४) सभापती पिल्लाई, (५) आनंद डबरे, (६) मिथिलेश पाटणकर, (७)विनायक दाबके. याशिवाय संगीत क्षेत्रातील इतर मान्यवर तज्ज्ञांना अध्यापनासाठी बोलावण्यात येईल.

अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची अंतिम निवड ऑडिशन (अभियोग्यता) चाचणी नंतर केली जाईल. संबंधित विषयाचे किमान ज्ञान, आवड, कौशल्य, गती या बाबींचा  चाचणीत चाचणीत समावेश असेल.

संपर्क– दुसरा मजला, पु,ल.देशपांडे कला अकादमी,रविंद्र नाट्यमंदीर, सयानी रोड, प्रभादेवी,मुंबई-४०००२५,संकेतस्थळ-www.doa.maharashtra.gov.in ईमेल- bldmsm@gmail.com

०००

(२) मुंबई विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ म्युझिकमध्ये संगीत विषय विविध अभ्यासक्रम चालवले जातात. या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आणि महत्वाकांक्षा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतात. या क्षेत्रात पाया मजबूत करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक महत्वाचे पाऊल ठरु शकते.

हे अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहेत-

(१) बॅचलर ऑफ म्युझिक (हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत-कंठ/ सतार/तबला)-या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षाचा आहे. प्रवेशासाठी अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी. १२वीमध्ये संगीत विषयाचा अभ्यास केलेला असावा आणि ऑडिशन किंवा कोणत्याही विषयातील १२ वी आणि ३ वर्षे कालावधीचा संगीत विषयातील पदविका किंवा समकक्ष प्रमाणपत्र. उदा-मध्यमा पूर्ण आणि ऑडिशन  किंवा मुंबई विद्यापीठाचा ३ वर्षे कालावधीचा संगीत पदविका अभ्यासक्रम आणि ऑडिशन. ज्या विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रमात ७० टक्के गुण मिळाले असतील त्यांना ऑडिशन देण्याची गरज नाही.

मास्टर इन म्युझिक– हिंदुस्थानी शास्त्रीय कंठ संगीत-  प्रवेशासाठी अर्हता- बीए ऑनर्स, बॅचलर ऑफ म्युझिक किंवा बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स इन म्युझिक आणि ऑडिशन किंवा बीए/बीकॉम/बीएस्सी/कोणतीही पदवी आणि संगीत विशारद/संगीत प्रभाकर /संगीत वीद यासारखी पदविका आणि ऑडिशन किंवा मुंबई विद्यापीठाची बॅचलर ऑफ म्युझिक ही पदवी आणि ऑडिशन. या पदवीमध्ये ७० टक्के गुण मिळाले असल्यास ऑडिशन देण्याची गरज नाही.

पदविका अभ्यासक्रम

(१) प्रि डिप्लोमा फाऊंडेशन कोर्स इन हिंदुस्थानी शास्त्रीय कंठ संगीत, कालावधी एक वर्षं, (२) डिप्लोमा कोर्स इन हिंदुस्थानी शास्त्रीय  कंठ/सुगम संगीत/सतार/तबला/हार्मोनियम,कालावधी दोन वर्षे,

(३)पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्ले बॅक सिंगिंग

प्रमाण पत्र अभ्यासकम

(१)स‍‍र्टिफिकेट कोर्स इन साउंड रिकॉ‍र्डिंग ॲण्ड रिप्रॉडक्शन कोर्स,कालावधी-सहा महिने

(२)स‍‍र्टिफिकेट कोर्स इन म्युझिक कंपोझिशन ॲण्ड डायरेक्शन,कालावधी- चार

संपर्क-डिपार्टमेंट ऑफ म्युझिक,दुसरा माळा,सांस्कृतिक भवन,युनिव्हर्सिटी कॅम्पसच्या उत्तर दरवाज्याच्या विरुध्द दिशेला,हंसभुर्गा रोड,सांताक्रुज पूर्व मुंबई-४०००५५,ईमेल- udmusic01@gmail.com,संकेतस्थळ- https://mu.ac.in/department-of-music

०००

(३)सोमय्या विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या, माया सोमय्या कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट आणि म्युझिक या संस्थेत पुढील अभ्यासक्रम करता येतात- (१) बॅचलर इन स्वरवाद्य, (२) बॅचलर इन कंठ संगीत, (३) बॅचलर इन तालवाद्य,(४) मास्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स इन स्वरवाद्य,(५) मास्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स इन कंठ संगीत, (६) सर्टिफिकेट कोर्स इन म्युझिक ॲप्रिशियेशन ॲण्ड जर्न्यालिझिम, कालावधी सहा महिने,(७) सर्टिफिकेट कोर्स इन म्युझिक कंपोझिशन ॲण्ड डायरेक्शन कालावधी, सहा महिने

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ऑडिशन घेतली जाते. पदव्युत्‍तर पदवी आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी ऑडिशन आणि मुलाखत घेतली जाते.

संपर्क- संकेतस्थळ https://mssmpa.somaiya.edu ईमेल- admissons@somaiya.edu

०००

(४) व्हिसलिंग वूडस इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फिल्म कम्युनिकेशन ॲण्ड क्रिएटिव्ह आर्ट, या संस्थेला विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता मिळाली आहे.या संस्थेतील, स्कूल ऑफ म्युझिकमध्ये, बॅचलर ऑफ आर्ट्स इन म्युझिक प्रॉडक्शन ॲण्ड डायरेक्शन हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षाचा आहे. .हा अभ्यासक्रम केल्यावर म्युझिक प्रोड्युसर, म्युझिक डायरेक्टर, म्युझिक एडिटर,साऊंड इंजिनीअर,प्रोफेशनल म्युझिशिअन, कम्पोझर,डीजे आणि आर जे, या करिअर संधी मिळू शकतात.

या अभ्यासक्रमाची पदवी राजीव गांधी इंस्टिट्यूट ऑफ यूथ डेव्हलपमेंट या संस्थेमार्फत‍ दिली जाते.ही संस्था भारत सरकारच्या अखत्यारीत असून तिला इंस्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा देण्यात आला आहे.

प्रवेश प्रक्रिया– या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण विद्यार्थी अर्ज करु शकतात. त्यांची संगीत कलचाचणी आणि मुलाखत घेतली जाते.

लघु मुदतीचे अभ्यासक्रम

(१)सर्टिफिकेट कोर्स इन म्युझिक फाउंडेशन -लेव्हल वन.कालावधीदहा आठवडे. (२)सर्टिफिकेट इन शुट अ साँग इन बॉलिवूड, कालावधी- तेरा दिवस

संपर्क संकेतस्थळ- https://www.whistlingwoods.net/admissions/school-music/ ईमेल- admissions@ www.whistlingwoods.net

०००

(५) नर्सी मोन्जी युनिव्हर्सिटी अंतर्गत येणाऱ्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

(१)बॅचलर आफ आर्ट इन वेस्टर्न कंटेमपररी म्युझिक.या अभ्यासक्रमाचा कालावधी -तीन वर्ष. यामध्ये गिटार,ड्रम,पियानो आणि कंठ संगीताचा समावेश आहे.

(२) बॅचलर आफ आर्ट इन इंडियन म्युझिक. यामध्ये प्रामुख्याने सतार आणि कंठ संगीतावर भर दिला जातो.

प्रवेश प्रक्रिया-१२वीतील कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्याला प्रवेश मिळू शकतो. प्रवेशासाठी संगीत कलचाचणी आणि  मुलाखत घेतली जाते.

संकेतस्थळ-https://performingarts.nmims.edu/BA-Music-Indian-Music/

०००

(६)एस.एन.डी.टी वुमेन्स युनिव्हर्सिटीच्या पुणे कॅम्पस येथील डिपार्टमेंट ऑफ म्युझिकमध्ये,एम ए इन म्युझिक, हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमात कंठ संगीत, हार्मोनियम, सतार, बासरी आणि व्हायोलीयन यावर भर दिला जातो.

अर्हता- कोणत्याही विद्यापीठातील बॅचलर इन म्युझिक ही पदवी किंवा कोणत्याही विषयातील पदवी आणि संगीत विशारद किंवा तत्सम अभ्यासक्रम करत असलेले विद्यार्थी किंवा कोणत्याही विषयातील पदवी असलेल्या मात्र संगीत विषयातील पदवी नसलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी किमान पाच वर्षे नामांकित गुरुंकडे प्रशिक्षण घेतले असेल, असे विद्यार्थी अभ्यासक्रमासाठी अर्ज करु शकतात. त्यांना संबधित गुरुंचे शिफारसपत्र सादर करावे लागेल. विद्यार्थ्यांची निवड ऑडिशनव्दारे केली जाते. संपर्क-संकेतस्थळ- https://sndt.ac.in/index.php/musicpune,ईमेल-

admissionspgmusic@gmail.com

०००

(७)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत ललित कला केंद्र कार्यरत आहे. या केंद्राचे स्वरुप गुरुकुलाचे आहे. या ठिकाणी पुढील अभ्यासक्रम करता येतात-(१) इंटिग्रेटेड बीए-एमए इन म्युझिक-या अभ्यासक्रमाचा कालावधी पाच वर्षाचा आहे. कोणत्याही विषयातील १२वी झालेल्या विद्यार्थ्याला हा अभ्यासक्रम करता येतो. चार वर्षाचा अभ्यासक्रम झाल्यावर बीए इन म्युझिक ही पदवी मिळेल. चार वर्षानंतर अभ्यासक्रम सोडण्याची सुविधा आहे. पाच वर्षे पूर्ण केल्यावर एमए इन  म्युझिक ही पदवी मिळेल. (२)एम.ए इन म्युझिक-या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षांचा आहे.यातील पहिले वर्ष हे ब्रीज अभ्यासक्रमाचे आहे.(ब्रिज अभ्यासक्रमात मुख्य अभ्यासक्रम कठीण जाऊ नये आणि शिकण्याची गती कायम राहावी यासाठीचे पूर्व तयारी केली जाते.) उर्वरित दोन वर्षात प्रत्यक्ष अभ्यासक्रम शिकवला जातो.अर्हता-कोणत्याही विषयातील पदवी.

प्रवेशासाठी ऑनलाईन चाळणी परीक्षा आणि अभियोग्यता कलचाचणी (ऑडिशन ॲप्टिट्यूड टेस्ट) घेतली जाते. या अभ्यासक्रमासाठी किमान पूर्वानुभव आणि पूर्व प्रशिक्षण आवश्यक आहे. त्यामुळे त्यासंबंधीची कागदपत्रे प्रवेशाच्‍यावेळी सादर करावी लागतात.

संपर्क-ईमेल-campus.unipune.ac.in,संकेतस्थळ- http://www.unipune.ac.in/dept/fine_arts/centre_for_performing_arts

०००

(८) एचएसएनएसी (हैदराबाद-सिंध नॅशनल कॉलिजिएट बोर्ड)युनिव्हर्सिटीमध्ये, बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमात तबला, हिंदुस्थानी कंठ संगीत आणि तालवाद्याचा समावेश आहे. कालावधी तीन वर्षे.अर्हता-कोणत्याही विषयातील १२वी झालेल्या विद्यार्थ्यास या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. प्रवेशासाठी ऑडिशन घेतली जाते.

संपर्क– एचएसएनसी युनिव्हर्सिटी,मुंबई डी.एम.हरीश बिल्डिंग,४७,डॉ.आर जी थाडानी मार्ग, वरळी मुंबई ४०००१८,संकेतस्थळ- https://www.hsncu.edu.in/school-of-performing-art/files/Prospectus_SoPA.pdf, ईमेल-

sopa@ hsncu.edu.in

सुरेश वांदिले