गुणवत्तेला संशोधनाची जोड
मुलं आयआयटीच्या (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) प्रवेशासाठी जीवाजी बाजी लावून प्रयत्न करतात. चांगल्या गुणांनी जेईई(जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन) मेन परीक्षा उत्तीर्ण होऊन ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र ठरतात. साधारणत: ही संख्या दीड ते दोन लाखांपर्यंत जाते. सहा ते लाख विद्यार्थ्यांमधून दोन लाखात येणे ही मोठीच बौध्दिक कामगिरी समजायला हवी. २३ आयआयटीमधील एकूण जागा या १६ हजारच्या आसपास आहेत. त्यात मग विविध संवर्गातील राखीव जागा आहेत. त्यामुळे ॲडव्हान्स्ड परीक्षेत उत्तम गुण मिळवूनही बऱ्याच जणांच्या पदरी आयआयटीच्या प्रवेशासाठी निराशा पडते. काही जणांना मनासारखी आयआयटी किंवा मनाजोगती ज्ञानशाखा मिळत नाही. त्यामुळे ते आयआयटीकडे जाणारी वाट वाकडी करण्याच्या निर्णयाप्रत येतात. काही विद्यार्थी तसा निर्णयही घेऊन टाकतात. मग मागची दोन तीन वर्षे किंवा त्याहुनही अधिक केलेली तयारी, सातत्यपूर्व सराव आणि प्रत्यक्ष परीक्षेतही उत्तम कामगिरी करुनही आयआयटीमधील प्रवेशापासून वंचित राहावे लागते की काय अशी स्थिती निर्माण झाल्यावर पायाखालची वाळू घसरु शकते. हताश आणि नैराश्याने विद्यार्थी आणि पालकांना ग्रासले जाऊ शकते. मात्र आयआयटीचा एक पर्याय केवळ काही गुणांमुळे किंवा तांत्रिक बाबींमुळे हुकला असला तरी इतर काही उत्तम व उत्कृष्ठ पर्याय अशा हुषार आणि प्रज्ञावंत मुलांसाठी उपलब्ध आहेत, त्याकडेही लक्ष द्यायला हवे. असा एक पर्याय आहे, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च म्हणजेच आयसर या संस्थेतील प्रवेशाचा.
संशोधनाला प्राधान्य
या संस्थेची स्थापना केंद्रीय शिक्षण विभागाने विज्ञान शाखेतील संशोधनाला गती आणि चालना देण्यासाठी केला. संशोधनाकडे अधिकाधिक हुषार मुलांनी वळावे आणि आधुनिक काळासाठी आवश्यक असणाऱ्या वैज्ञानिक बाबींवर संशोधनकार्यात झोकून द्यावे, हा ही संस्था स्थापन करण्याचा मुख्य उद्देश. संस्थेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन कार्य, प्रकल्प कार्य करण्यासाठी सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोई- सुविधा-यंत्रसामग्री- उपकरणे- रसायने यांनी युक्त अशा प्रयोगशाळांची उपलब्धता या संस्थेमध्ये करण्यात आली आहे. या संस्थांना सेंटर ऑफ एक्सलन्सचा दर्जा भारत सरकारने दिला आहे. त्याचबरोबर शैक्षणिक स्वायत्तताही प्रदान केली आहे. त्यामुळे अभ्यासक्रम किंवा विषय घटकांमध्ये कालानुरुप विविध बदल सुलभतेने करता येतात. या संस्थेला स्वत:ची पदवी/पदव्युत्तर पदवी प्रदान करण्याचाही अधिकार देण्यात आला आहे. सध्या या संस्थेचे पुणे, कोलकता, भोपाळ, थिरुवनंतपुरम, तिरुपती, मोहाली, बेहरामपूर अशा सात ठिकाणी कॅम्पस आहेत. यामध्ये जवळपास १७ शे जागा आहेत. या ठिकाणी बीएस-एमएस (बॅचलर ऑफ सायन्स-मास्टर ऑफ सायन्स) हा ड्युएल डिग्री अभ्यासक्रम सुरु करता येतो. या अंतर्गत गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. या अभ्यासक्रमाला निवड झालेल्या काही टक्के विद्यार्थ्यांना इन्स्पायर (इनोव्हेशन इन सायन्स परस्युट फॉर इन्स्पायर्ड रिसर्च) या योजनेंतर्गत -स्कॉलरशीप फॉर हायर एज्युकेशन (शी) शिष्यवृत्ती दिली जाते. ही यामध्ये वार्षिक ८० हजार रुपयांच्या अर्थसाहाय्याचा समावेश आहे.या शिष्यवृत्तींतर्गत प्रत्येक संशोधक विद्यार्थ्यास मेंटॉरशीप () सहाय्यतेचा समावेश आहे.
हा अभ्यासक्रम आंतरज्ञानशाखीय स्वरुपाचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या स्पेशलायझेशनच्या विषयांसह इतर लघु (मायनर) विषयांचा अभ्यास करता येतो. त्यामुळे एकूणच संशोधनात्मक बाबींकडे बघण्याचा व्यापक दृष्टिकोन त्याला प्राप्त होतो. या अभ्यासक्रमाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पाचवे वर्षं हे पूर्णपणे संशोधन कार्यासाठी राखीव ठेवले जाते. आता पर्यंत ज्ञानग्रहण करत असताना आवड निर्माण झालेल्या वा गती असलेल्या विषयामध्ये हे संशोधन करता येते.
या अभ्यासक्रमातील २५ टक्के जागा या जेईई ॲडव्हान्स्ड आणि किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेतील गुणांचा आधार घेऊन भरल्या जातात. त्यामुळे जेईई ॲडव्हान्स्डमध्ये उत्तम गुण मिळवूनही आयआयटीमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी या संस्थेमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करायला हवा. त्यांना केवळ अर्ज भरावा लागेल. इतर चाळणी परीक्षा पुन्हा देण्याची गरज नाही.
आयआयटीमध्ये प्रवेश कां घ्यायचा असतो तर तेथे असणाऱ्या सर्वोत्कृष्ट शैक्षणिक सुविधा, अत्यंत स्पर्धात्मक वातावरण आणि पुढे शेवटच्या वर्षी उत्कृष्ट प्लेसमेंट. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा आयसरमध्ये सुध्दा उपलब्ध होतात. आयआयटीमधील प्लेसमेंट हे तगडे होत असल्याच्या बातम्या आपण वाचत असतो. मात्र ते सगळयाच आयआयटीमध्ये आणि सगळयांच्या विद्यार्थ्यांसाठी असते हा भ्रम काढून टाकायला हवा. आयआयटीच्या प्लेसमेंट प्रक्रियेत पुन्हा अंतर्गत चाळणी परीक्षा किंवा मुलाखती किंवा समूहचर्चा किंवा तिन्ही बाबी एकत्र असे काहीसे स्वरुप असते. शिवाय आतापर्यंतची शैक्षणिक कामगिरीही लक्षात घेतली जाते. याचा अर्ज आयआयटीत प्रवेश मिळाला म्हणजे गंगेत घोडे न्हाले असे होत नाही. काही जणांचे घोडे चांगले न्हाले जातात. बरेच घोडे मागे राहतात. बातम्या येतात त्या चांगल्या घोड्यांच्या न्हाल्याची. आयसर सारख्या संस्थेत प्लेसमेंटशी तुलना जुन्या आणि वरच्या श्रेणितील आयआयटींशी करणे योग्य नाही. आयआयटीचा ब्रँड आणि त्याचे औद्योगिक विश्वातील स्थान महात्म्य हे वेगळे असल्याने इतर शैक्षणिक संस्थांसोबत त्याची तुलान गैरलागू आहे. मात्र आयसरने गेल्या दशकभरात संशोधनात्मक कार्यातील आपला अभ्यासक्रम सातत्याने चैतन्यशील ठेवल्याने व विद्यार्थ्यांना सर्व सुविधा पुरवल्याने, या संस्थेमधील विद्यार्थी हा संबंधित उद्योग- खाजगी किंवा शासकीय प्रयोगशाळा यामध्ये कार्य करण्यासाठी बऱ्याच अंशी परिपूर्ण झाल्याचे समजले जात असल्याने विविध कंपन्या आणि उद्योगांमध्ये संधी मिळतात. अर्थातच विद्यार्थ्याची गुणवत्ता, दर्जा आणि त्याची पाच वर्षातील शैक्षणिक कामगिरी या बाबी प्लेसमेंटच्या वेळेस लक्षात घेतल्या जातात. (संशोधनात्मक अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना प्रारंभीच आयआयटीसारखे डोळे दीपवून टाकणारे पॅकेज मिळणार नाही, ही बाब ध्यानात ठेवावी. मात्र दीर्घ मुदतीच्या कालावधीत हे विद्यार्थी यशाची वेगवेगळी शिखरे पादाक्रांत करु शकतात.)
गेल्या काही वर्षात या संस्थेतून बाहेर पडून वेगवेगळया ठिकाणी कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्यांची उत्तम साखळी तयार झाली आहे. हे विद्यार्थीसुध्दा नव्या विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी साहाय्य करतात किंवा त्यांचा उपयोग केला जातो. या विद्यार्थ्यांना परदेशातील काही नामवंत प्रयोगशाळांमध्ये कार्य करण्याची संधी मिळाली आहे. अर्थातच अंतिम निर्णय घेण्यापूर्वी विद्यार्थी आणि पालकांनी शक्य असल्यास पुणे किंवा इतर एखाद्या आयसरला भेट देऊन प्रत्यक्ष चाचपणी सुध्दा केलेली बरी. त्यामुळे या संस्थेमध्ये असणाऱ्या अनेक सक्षम आणि समर्थ पायाभूत सुविधा, शैक्षणिक वातावरण, प्राध्यापक, प्रयोगशाळा, निवास व्यवस्था, क्रीडांगण, वाचानालये, कॅम्पस परिसर आदीबाबी प्रत्यक्ष बघता येतील. आयसर मधील शिक्षण हे परवडणाऱ्या शुल्कामध्ये करता येते. बँकांकडून सुलभतेने शैक्षणिक कर्ज मिळू शकते.
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स
जेईई-मेन/ॲडव्हान्स्ड परीक्षेतील गुणांवर प्रवेश देणारी आणखी एक महत्वाची संस्था म्हणजे बेंगळुरु स्थित इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स. या संस्थेतील बी.एस (बॅचलर ऑफ सायन्स) रिसर्च, या चार वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जेईई- मेन/ॲडव्हान्स्ड परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. हा अभ्यासक्रम संशोधनाला चालना देणारा आहे. हा आंतरज्ञानशाखीय अभ्यासक्रम पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या समकक्ष समजला जातो. या विद्यार्थ्यांना थेट पीएचडी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. या संस्थेमध्ये सर्वोत्कृष्ट अशा पायाभूत सुविधा (अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त प्रयोगशाळा, समृध्द ग्रंथालय, सर्व सोयिंनी युक्त असे वसतिगृह इत्यादी.)आहेत.
विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी संस्थेमार्फत विशेष प्रयत्ने केले जातात. संस्थेचा आणि अभ्यासक्रमाचा दर्जा लक्षात घेऊन अनेक महत्वाच्या संस्था/उद्योग कंपन्या/ प्रयोगशाळा प्लेसमेंट प्रकियेत सहभागी होतात. याही अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क परवडणारे आहे. ज्यांना हे शुल्क परवडू शकत नाही, त्यांना या संस्थेच्या गुणवत्तेमुळे सुलभतेने शैक्षणिक कर्ज मिळू शकते.
संपर्क- द असिस्टंट रजिस्ट्रार, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरु-560012 दूरध्वनी- 080-22933440,फॅक्स- 23600853, संकेतस्थळ- iisc.ac.in ईमेल- ar@academic.admin.iisc.ernet.in
०००
.jpg)