(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

एकदा शहरातील एका मोठ्या ग्रंथालयाच्या काही ग्रंथातील पात्रांना फार कंटाळा आला. दिवसभर कुणी ना कुणी त्यांना हात लावत. पृष्ठांची चाळवाचाळव करत. कुणी वाचत बसत. कुणी ग्रंथातील पृष्ठांवरील माहितीचे टिपण लिहून काढत, तर कुणी ग्रंथांना घरी घेऊन जात. त्यामुळे दिवसभर ग्रंथालयात चैतन्य असे. मात्र रात्री आठनंतर ग्रंथालय बंद झाले की, त्या काळोखाचा या ग्रंथातील पात्रांना कंटाळा येऊन भीतीही वाटायची.

तर, परवा ग्रंथपाल निघून गेल्यावर दोन ग्रंथातील प्रत्येकी दहापात्र ग्रंथातून बाहेर पडली. त्यांनी एकमेकांना कधी बघितलं नव्हतं. त्यामुळे त्यांना अवघडल्यासारखं झालं. काय बोलावं, हे कुणास कळेना. काही क्षण असेच शांततेत गेले. ही शांतता त्या काळोखात आणखीनच खायला उठली. त्यामुळे काही पात्रं भीतिने थरथर कापू लागली. काही पात्र पुन्हा ग्रंथात परतण्याची भाषा करु लागली. ते बघून दोन्ही ग्रंथातील दोन चुणचुणीत मुलं खुदकन हसली. या हसण्याने ग्रंथालयाच्या त्या निरव शांततेला भंग केले.

“तुम्ही हसता कां वेड्यासारखे?”  एका ज्येष्ठ पात्रानं विचारलं.

“सांगतोना. पण आपण आधी एकमेकांची ओळख करुन घेऊया ना.” एका ग्रंथातील चुणचुणित मुलगा म्हणाला, “तर मी जेरी.” त्याने परिचयाची सुरुवात स्वत:पासूनच केली. ते बघून दुसऱ्या ग्रंथातील चुणचुणीत आणि गोबरी मुलगी समोर येऊन म्हणाली, “मी जेनी.”

जेरी आणि जेनीच्या पुढाकाराने सगळ्यांचं अवघडलेपण संपलं. सगळयांनी एकमेकांशी हस्तांदोलन करत, आपला परिचय करुन दिला. सगळयांना फार भारी वाटलं. काही क्षण शांततेत गेले. “तुम्ही कां हसलात रे?” असं विचारणारे आजोबा म्हणजे, मार्टिन यांनी तोच प्रश्न पुन्हा विचारला. त्यांच्या ग्रंथात मार्टिन आजोबा कडक शिस्तित वागायचे. असं कुणी उगाचच हसलेलं त्यांना अजिबात आवडायचं नाही. म्हणून त्यांनी या दोन मुलांच्या हसण्यावर आक्षेप घेतला.

“अहो मार्टिन आजोबा, तुम्ही तुमच्या ग्रंथात मारे पराक्रम गाजवता. कशालाच भीतबित नाही. मग, आता इथे दोन मिनिटात कां बरं तुमचे पाय लटलट करु लागलेत? तुमचे दाखवायचे दात वेगळे नि खायचे वेगळेच आहेत की काय?” जेरी डोळे मिचकावत म्हणाला.

“ग्रंथात तर तुम्ही राणाभीमादेवीच्या गर्जना करता.. ग्रंथातून बाहेर पडल्यावर कां बर, तुमचा आवाज बसला?” जेनीही डोळे बारिक करुन म्हणाली.

“आगावू शहाणपणा करु नका. असं मोठ्यांना उलटून बोलणं, ही चांगली सवय नाही,” जेरी आणि जिनी या दोघांच्याही आई त्यांच्यावर रागावल्या.

“बरं बाबा, आम्ही काहीच कुणाला बोलणार नाही. पण आता आपण ग्रंथांच्या बाहेर आलोच आहोत, तर असं इथे नुसतं बसून नि कुणाचं काय चूक नि बरोबर यावर काथ्याकूट करण्यातच वेळ घालवून काय उपयोग? त्यापेक्षा या ग्रंथालयाच्या बाहेर पडूया ना.” जेरीनं सुचवलं.

ही कल्पना सगळ्यांना फार आवडली. मग, हळूच सर्व पात्रं ग्रंथालयाच्या फटीतून बाहेर पडली. चौकिदाराच्या लक्षात येणार नाही, याची काळजी घेऊन ते सर्व ग्रंथालयासमोरच्या रस्त्यावर आले. रात्र झाली असली तरी रस्त्यावर, गाड्या भरधाव येतजात होत्या. अशा वाहतुकीची या पात्रांना अजिबात सवय नसल्यानं, सगळी पात्रं भांबावून गेली. गाडयांच्या हार्नचा गोंगाट, पोलिसांच्या शिट्यांच्या आवाजानं सगळयांचं डोकं दुखायला लागलं.

“आता, याची सवय करावी लागेल. नाहीतर आपल्याला काहीच बघता यायचं नाही. आपण आता समोर जायला हवं.” जिनी म्हणाली.

सगळ्यांनी जेनिचं म्हणणं ऐकायचं ठरवलं. तिथे सर्व २० पात्रं गोलाकार एकत्र आली आणि त्यांनी, जेरी आणि जिनीला आपला कॅप्टन केलं. ते सांगतील तसं वागायचं ठरवलं.

“पण, त्यांना काहीच अनुभव नाही, या जगाचा.” एक जेष्ठ पात्र अलेक्झांडर म्हणाले. ते, त्यांच्या ग्रंथात वेगवेगळया प्रांतातील बऱ्याच लढाईत सामील झाले होते.

“नसेलना, पण त्यांना भीती वाटत नाही. सगळ्या नव्या गोष्टीकडे ते उत्सुकतेनं आणि कुतुहलतेनं बघतात. आपण, आपल्याला सारं काही कळतं नि समजतं  आणि तथाकथित अनुभवाच्या अंहकारातून बाहेर पडत नाही.” दुसरे जेष्ठ नेपोलियन, यांनी मत व्यक्त केलं. त्यांनी तरुणपणी आईबाबांचं नं ऐकता, जंगलभ्रमंती करुन वेगळा अनुभव घेतला होता.  त्यांचे बोल अनुभवातूनच आले असल्याचं इतर पात्रांच्या लक्षात आल्यानं, त्यांना हा सल्ला पटला.

जेरी आणि जिनीच्या नेतृत्वाखाली ही वीसपात्र मग, रस्त्याच्या कडेकडेने पुढेपुढे जाऊ लागली. काही अंतरावर त्यांना समुद्र लागला. तिथे अंसख्य बोटी होत्या. ग्रंथात तर, ही पात्रं बोटी आणि जहाजावर बसून सगळं जग फिरून आली होती. पण आज प्रत्यक्ष बोटिवर बसण्याची संधी समोर होती, ते बघून जेरी आणि जिनीचा उत्साह व्दिगुणित झाला. बोटीत बसून जलसफर करण्याची कल्पना त्यांनी सुचवली.

“अरे, पण बोट बुडाली तर आपण सगळेच, या समुद्राच्या तळाशी जाऊना.”

“या बोटिला दुसरी बोट धडकली तर, आपल्या बोटिला भगदाड पडून त्यात पाणी शिरायचं नि आपण या पाण्यात वाहून जायचो.”

“आपल्या या जलसफरीत एखादा समुद्रचाचा हल्ला करुन, आपल्याला ठारसुध्दा करु शकतो.” अशी भीतियुक्त मतं रॉबर्ट, जोसेफ, बराक या ज्येष्ठांनी व्यक्त केली. तरी बरं, रॉबर्ट, जोसेफ आणि बराक हे तिघेही त्यांच्या तरुणपणात वास्को द गामाच्या जहाजात खलाशी म्हणून जगभर फिरले होते. बऱ्याच पात्रांनी बोटिवर बसण्यास नकार दिला. त्यांचा पिच्छा सोडायला भीती तयारच नव्हती.

“जे बोटित बसणार नाहीत, त्यांची मासोळी होईल, मग या समुद्रातील मगरी या मासोळींना गप्पदिशी खाऊन टाकतील.” जेरी आकाशाकडे बघत म्हणाला.

“खरं की काय?” आजी ज्युलिया भीतिने म्हणाली नि चटदिशी बोटित चढली. आजी ज्युलिया, तिच्या ग्रंथात कुणावरही चटदिशी विश्वास ठेवायची नि पटदिशी निर्णय घ्यायची. आताही तसच झालं. ज्युलिया आजीचं बघून इतर पात्रं  पटपट बोटीत बसली. जेरी आणि जिनीने एकमेकांना टाळी दिली.

बोट पुढे निघाली. थंडगार वाऱ्यानं सगळयांची मनं प्रसन्न झाली. आकाशातील ताऱ्यांकडे जेरी आणि जिनीनं, सगळयांचं लक्ष वेधलं. ताऱ्यांनी चमचणारं आभाळ बघून सगळयांना आनंद झाला. चंद्रांचं प्रतिबिंब पाण्यात पडलं होतं. हा चंद्र खरा की आभाळतील चंद्र खरा, मर्लिन काकूंना प्रश्न पडला. त्यांच्या ग्रंथात, या काकू अशाच प्रश्नांसाठी प्रसिध्द होत्या. त्यांच्या अशा प्रशांनी बरेचदा इतर पात्रे बेजार होत. पण काहीवेळा त्यांच्या प्रश्नांमुळे नवं काहीतरी अनुभवयाची संधीही मिळे. तर, अशा या मर्लीनकाकू कधी वर आकाशाकडे टक लावून बघायच्या तर कधी समुद्रातील चंद्राच्या प्रतिबिंबाकडे. मध्ये एक मोठी लाट आली नि ते प्रतिबंब लाटेसरशी वरखाली झालं. हे बघून त्यांना खूप मजा वाटली.

बोट पुढेपुढे जात होती. काही अंतर पार केल्यावर मग, एके ठिकाणी थांबली. समोर एक गुहा होती. या गुहेत काय दडलय, हे बघूया, जिनी आणि जेरी म्हणाले.

“अरे, पण या गुहेत राक्षस असेल तर?”

“डायनोसॉरसुध्दा राहू शकतो.”

“किंवा मग जगातला सगळयात मोठा भुजंग. आपण दिसताच तो तोंड उघडेल, त्यातून ज्वाळा बाहेर पडतील नि आपण जळून खाक होऊन जाऊ.” सर्वात जेष्ठ आजोबा नेल्सन यांनी भीतिचा सूर आवळला. काही पात्रांनी त्यांना समर्थन दिलं. काहिंच्या घशाला कोरड पडली. काहिंचे डोळे पांढरे होऊ लागले.

जिनी आणि जेरीला मात्र अजिबातच भीती वाटत नव्हती. गुहेत कधी जातो, असं त्यांना झालं होतं. मात्र त्यांचे आईबाबा त्यांना पुढं जाऊ देण्यास तयार नव्हते. आगावूपणा करु नका म्हणून त्यांनी दोघांवर डोळेही वटारले. पण जेरी आणि जिनी मागे हटायला तयार नव्हते. शेवटी नाइलाजाने इतर सगळे जण त्यांच्यासोबत जायला तयार झाले.

गुहेच्या बंद फटितून सगळी पात्रं आत शिरली. आत काळोख मी म्हणत होता. वटवाघळाची फडफड आणि आवाजाने आतलं वातावरण आणखीनच भीतीदायक झालं होतं. जेरी आणि जिनी सोडून सगळयांनी गच्च डोळे मिटले आणि एकमेकांचे हात घट्ट पकडले. जेरीने एकबाजूने आणि जिनीने दुसऱ्या बाजूने भिंतीवर हात फिरवला. जेरीच्या हाताला कसला तरी खटका लागली नि तो वर उचलला गेला. त्याने गुहेतील लाइट लागले. गुहा उजळून निघाली. प्रकाशामुळे सर्वच पात्रांची भीती पळाली. त्यांनी डोळे उघडले. समोरचे दृष्य बघून ते थक्क झाले. ती गुहा चुनखडीपासून बनलेली होती. गेल्या शेकडो वर्षापासून वरुन खाली आणि खालून वर असा चुनखडीचा थर गोळा होत, वेगवेगळ्या आकाराचे स्तंभ तिथे तयार झाले होते. काही स्तंभ भव्या राजमहालासाराख काही महालासारखे, काही राज सिंहासनासारखे, काही किल्ल्यासारखे काही चित्रविचित्रित प्राण्यांच्या आकाराचे, काही राक्षसांच्या डोळयांसारखे होते. ते स्तंभ बघून सर्व पात्रांचे डोळे दिपून गेले. प्रकाशात, त्यांना सगळं काही छान दिसू लागलं. ग्रंथात असताना, त्यांनी असं काही बघितलंच नव्हतं. त्यामुळे त्यांना या नव्या अनुभवाचा खूप आनंद मिळत होता.

सगळयांनी संपूर्ण गुहा बघितली. चालून चालून त्यांचे पाय दुखले तरी, त्यांना त्याचं काही वाटत नव्हतं. ही गुहा संपूच नये असं सगळयांना वाटत होतं. जेरी आणि ‍जिनीने घड्याळाकडे बघितलं, पहाटेचे चार वाजत होते. सूर्य उगवण्याआधी पुन्हा ग्रंथालयात परतणं आवश्यक होतं. तसं त्यांनी सगळयांना सांगितलं. तिथून जाण्याची इच्छा नसतानाही सगळी पात्रं गुहेच्या बाहेर आली. परतीच्या वेळी जेरीने खटका खाली करुन दिवे विझवले. सगळी पात्रं बोटित बसली.

“आजी-आजोबा, काका-काकू कसा वाटला आजचा प्रवास आपला?” जेरीने विचारलं.

“अरे तो तर मस्तच होता, पण एक धडासुध्दा आम्ही शिकलो?”

“कोणता हो?”जिनीनं विचारलं.

“उगीच भीती बाळगायची नाही. भीतीची काळजी करत बसलो तर काहीच नवं अनुभवता यायचं नाही नि आंनदसुध्दा घेता यायचा नाही. थँक्यू पोरांनो, आमचे डोळे उघडल्याबद्दल.” पिटर आाजोबा म्हणाले. त्यांच्या ग्रंथात पिटर आजोबा हे, आपली चूक लगेच कबूल करण्यात नि चांगल्याला मनापासून दाद देण्यासाठी प्रसिध्द होते.

सगळयांनी टाळ्या वाजवून पिटर काकांच्या म्हणण्याला पाठिंबा दिला. सर्व पात्रांना नवा उत्साह आणि उर्जा मिळाली. त्यांचा कंटाळा कुठल्या कुठे पळून गेला. अधूनमधून असंच ग्रंथालयाच्या बाहेर पडून नवा अनुभव घेण्याचं ठरवून सर्व पात्रं परतीच्या प्रवासाला निघाली.

सुरेश वांदिले,

७०१,देवराई सहकारी गृहनिर्माण संस्था,सेक्टर सहा,चारकोप,कांदिवली पश्चिम,मुंबई ६७

भ्रमणध्वनी-९३२४९७३९४७

ईमेल- ekank@hotmail.com