ग्रेट होण्यासाठी?
संगीता म्हणजे एकदम हौशी मुलगी. तिला सगळ्यात फार रस असायचा. विशेषत: खेळण्यात, अवांतर वाचण्यात आणि अभ्यासात सुध्दा. तशी ती ऑलरांडर होती. त्यामुळे शाळेत शिक्षकांची लाडकी आणि घरी आईबाबांची. पण गेल्या काही महिन्यांपासून सारच बिनसलंय. त्यासाठी कारणीभूत ठरलेत ते टीव्हीवरचे रियॅलिटी शोज.
बरेचदा रात्रीच्या जेवण्याच्या वेळी आई टीव्हीवरचे हे रियॅलिटी शोज लावायची. भोजनाचा आस्वाद घेत सर्वजण या कार्यक्रमाचाही आनंद घेत. प्रारंभी संगीतला या कार्यक्रमांमध्ये विशेष रस वाटला नाही. पण नियमितपणे हेच कार्यक्रम बघण्यात येऊ लागल्यानं तिला या कार्यक्रमांमध्ये मजा येऊ लागली. ती हे कार्यक्रम एन्जॉय करु लागली.
रियॅलिटी शोज कोणते असतात याचा शोध तिने घेतला. त्यासाठी सुट्यांच्या दिवशी ती तासन् तास टीव्हीपाशी बसून चॅनेल सर्फिंग करत असे. त्यातून तिला कळलं की रियॅलिटी शो हे नृत्य, गायन, अभिनय, विनोद, साहस अशा प्रकारातले असतात. तिने मग कोणत्या दिवशी कोणता शो कोणत्या चॅनेलवर सुरु होतो, याचं वेळापत्रक केलं नि तिच्या खोलीत लावलं. सुरुवातीला आईबाबांना आणि आजूबाजूच्या काका–कांकूंना तिचं भारीच कौतुक वाटलं.
या कौतुकाचा संगीताला मनस्वी आनंदही झाला त्यामुळे प्रत्येक चॅनेलवरचा रिऍ़लिटी शो ती बघू लागली. एकमेकांच्या वेळेत जर हे शो असतील तर रात्रीचे पुर्नप्रक्षेपित भाग ती बघू लागली. तेही शक्य झालं नाही तर रविवारी हे शो जेव्हा पुन्हा दुसऱ्यांदा प्रक्षेपित होत तेव्हा तर न चुकता बघू लागली.
दररोज हे शो कधी सुरु होतात याची ती वाटच बघत असे. शाळेतून आली की सारं लक्ष या शो सुरु होण्याकडे. त्यामुळे यात तिचा खूप वेळ जाऊ लागला. डोळ्यांची पापणीही न हलवता ती हे कार्यक्रम बघायची. प्रारंभी कौतुक करणाऱ्या आईबाबांना तिचं हे या शोजला असं चिकटून बसणं आवडेनासं झालं. सारखं सारखं तेच ते बघितल्यानं डोळ्यावर परिणाम होतील, अभ्यासावर परिणाम होईल, पाठ दुखेल असं आईनं समजावून सांगितलं. बाबाही अधूनमधून रागावायचे. पण ती या कानाने सोडून त्या कानाने सोडून द्यायची. फार तर एखाद–दुसरा कार्यक्रम टाळायची. पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या.
शेवटी व्हायचं तेच झालं. तिचं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं. याचा परिणाम अभ्यासावर झालाच. शाळेत होणाऱ्या विविध स्पर्धा, चाचण्या यात ती मागे पडू लागली. असं याआधी कधी झालं नव्हतं. शिक्षकांनाही चिंता वाटू लागली. वर्गशिक्षिकेने संगीताच्या बाबांची भेट घेऊन त्यांची चिंता कळवली. आता बाबानांही काळजी वाटू लागली. बाबांनी तिला बरच समजावलं. पण तेव्हढ्यापुरतच. संगीताचं रियॅलिटी शो बघण्याची तिची हौस काही फिटली नाही.
यावर उपाय काय करावा हे काही बाबांना सुचेना. अशा वेळी ते संगीताला घेऊन बांद्र्याच्या समुद्रकिनारी असलेल्या बँडस्टँडला जायचे.
हे संगीताचं मुंबईतलं सर्वात आवडतं ठिकाण. कारण तिथे आहे. शाहरुख खानचा मन्नत बंगला. शाहरुख तिचा आवडता हिरो. एकना एक दिवस शाहरुख या बंगल्यात दिसेल असं तिला वाटायचं. त्यामुळे बँडस्टँडला जाण्याची गळ ती नेहमीच बाबांना घालायची. बँड स्टँडला जाण्याचं बाबांनी सांगताच तिने बाबांना मस्त पप्पी दिली.
000
बँडस्टॅडला आल्यावर शाहरुखच्या बंगल्याकडे कौतुकाने बघत संगीता बाबांना म्हणाली,
बाबा बाबा शाहरुख किती ग्रेट आहे नाही का,
आहेच की, पण तो ग्रेट कां आहे याचा विचार केलास का कधी .
हे बघा बाबा, तो टीव्ही बघत नाही म्हणून ग्रेट ब्रिट आहे असं काही प्रवचन देऊ नका हं. संगीता म्हणाली. त्यावर आईबाबा दोघेही हसले.
मी अजून कुठे काय म्हणालोय. तूच निष्कर्ष काढलास. बाबा म्हणाले. रियॅलिटी शोजचे दुष्परिणाम संगीताला समजावून सांगणं कठिण असलयाचं त्यांच्या लक्षात आलं होतं.
बरं तर, मग तुमच्या मते शाहरुख खान ग्रेट कां आहे.
सांगू का, पण तुला ते पटणार नाही. कदाचित धक्काही बसेल. बाबांनी लांबलचक प्रस्तावना केली. संगीतानं जांभई दिली.
बाबांकडे कंटाळलेल्या चेहऱ्यानं बघत संगीता म्हणाली
बाबा बोर करु नका ना. डायरेक्ट सांगा की.
बरं बाई, सांगतो. तुझा आवडता शाहरुख ग्रेट झाला याचं महत्वाचं कारण म्हणजे टीव्हीवरील रियॅलिटी शो. बाबांचं हे वाक्य कानावर पडताच संगीताच्या चेहऱ्यावरचा कंटाळा पळाला. बाबा आपली खेचताहेत असं तिला वाटलं. त्यामुळे ती त्यांना हलकेच चिमटा घेत म्हणाली,
बाबा तुम्ही माझी खेचताहात, अहो तुम्हाला हे शोज आवडत नाहीत. परवा किती रागावलात तुम्ही मला.
अगं मी रियॅटिली शो आवडत नाही असं कुठं म्हणालो, त्यासाठी तुला रागावलो पण नाही.
खरं की काय? पण मला खरच वाटत नाही हो. कारण मी रियॅटिली शो बघते तेव्हा तुम्ही आणि आई किती कुरकूर करता.
तेच तर मला सांगायचय बाळे. बाबा तिला म्हणाले आणि मन्नत जवळ असलेल्या एका सिमेंटच्या आसनाकडे घेऊन गेले. त्यांनी बुट्येवाल्याला हाक मारली. तीन गरमागरम बुट्टे घेतले. त्यांचा आस्वाद घेत पुन्हा ते मूळ विषयावर आले.
बाबा, तुम्ही मघा म्हणालात की मला तेच सांगायचय म्हणून. काय ते सांगाना.
अगं ,माझ्यासारखी आणि तुझ्या आईसारखी शाहरुखची आई सुध्दा कटकट करायची, त्याच्या टीव्हीवरील रियॅटिली शो बघण्यावरुन.
हो का, मग पुढे काय झालं?
काय होणार? शाहरुख चिडला.
खरचं?
शाहरुखची शप्पथ !
बरं बरं , पुढे काय झालं.
शाहरुखने चिडून प्रतिज्ञा केली की यापुढे मी रियॅटिली शोच बघणार नाही.
बाबा तुम्हाला काय सांगायचय ते कळलय मला. संगीता लटक्या रागाने म्हणाली. शाहरुखच्या आडून उपदेशाचे डोस बाबा आपल्याला पाजताहेत हे तिच्या लक्षात आलं होतं.
अगं पुढंच तर ऐकून घे ना.
सांगा, समद्राच्या लाटांकडे बघत संगीता नाखुषिने म्हणाली.
शाहरुख त्याच्या मम्मीला म्हणाला , अम्मी तू सारखी रागावतेस ना या रियॅलिटी शो बघण्यावरून मला, बघ एके दिवशी मी या शोमध्ये कामच करुन दाखवीन. बाबांना जे त्याक्षणी सुचलं ते बोलून गेलं.
रियॅलिटी शो न बघणं, पण त्यात काम करणं ही आयडिया झक्कासच असल्याचं संगीताच्या चटदिशी लक्षात आलं. आवडत्या शाहरुखलाच हे असं धम्माल सुचू शकतं असं वाटून ती आनंदली. तिने बाबांकडे कौतुकानं बघितलं. तिचा राग गेल्याचं बाबांच्या लक्षात आलं. त्यांनी तीन आईस्क्रीम घेतले. संगीता जाम खुष झाली. त्या आनंदातच ती म्हणाली,
पुढे काय झालं बाबा..
पुढे तेच झालं. शाहरुखने बोलल्याप्रमाणे करुन दाखवलं. रियॅलिटी शो बघणं थांबवल्यानं त्याचा वेळ वाचला. या वाचलेल्या वेळेचा उपयोग तो अभिनयाच्या सरावासाठी करु लागला. त्यातून त्याचं अभियन कौशल्य वाढलं. त्याला एका टीव्ही मालिकेत काम मिळालं. पुढे सिनेमात काम मिळालं. तो मोठा हिरो झाला. माय डियर संगीताचा तो आवडता हिरोसुध्दा बनला. आता तर प्रत्येक रिऍ़लिटी शो मध्ये दिसतो.
खरंच की बाबा.
खरय ना. तेच तर मला सांगायच. हे शोज बघू नकोस असं कुठे मी किंवा मम्मी म्हणतोय .पण किती वेळ त्यात घालवायचा हे तर तू ठरवू शकतेस ना. आतापर्यंत खूप शोज बघितलेस. आता न बघता या शोचाच भाग होण्यासाठी प्रयत्न कर की. तुला बॉलिवूड नृत्य आवडतात .त्याचा सराव कर ,रियॅलिटी शोच्या वेळेत. नि भाग घे एखाद्या नृत्य शो मध्ये.वाटल्यास तुला मी टेरेन्स लुईची शिकवणी लावून देतो. बाबा एका दमात बोलून गेले .
बाबांच्या बोलण्यात पॉईंट असल्याचं चाणाक्ष संगीतानं ओळखलं. शो बघण्याऐवजी शोमध्ये सहभागी होण्याची आयडिया ग्रेट आणि स्मार्ट होती, अगदी तिच्या आवडत्या शाहरुख सारखीच.
संगीता, आता शाळेतून आल्यावर दररोज दोन तास नृत्याच्या सराव करतेय.
रिऍ़लिटी शोमध्ये भाग घेणारच याचा तिने निर्धार केलाय.
000
सुरेश वांदिले
.jpg)