२०२३ मध्ये भारताने अंतराळ विज्ञान क्षेत्रात घेतलेल्या उंच उडीनं अवघं जग विस्मयचकीत झालं. भारताने चंद्राच्या दक्षीण ध्रुवावर चंद्रयान यशस्वीपणे उतरवलं. ही कामगिरी पार पाडणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. या चंद्रयान तीन मोहिमेसाठी अवघा ७५ मिलियन डॉलर्स खर्च आला. इतर कोणत्याही देशांनी चंद्रावर पाठवेल्या यानासाठी खर्च केलेल्या रक्कमेच्या कितीतरी कमी. यामुळे भारत, अंतराळ विज्ञान क्षेत्रातील महत्वाचा देश असल्याचं सिध्द झालं.
चंद्रयान मोहीम चारची घोषणा झाली असून या मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावरील माती/ दगड/ धातू यांचे नमुने पृथ्वीवर आणून त्यांचं सखोल परीक्षण केलं जाईल. अंतराळ संशोधन क्षेत्रातील भारताच्या वाढत्या जिज्ञासेचा हा आणखी एक पुरावा.
सूर्याच्या संदर्भातील अनेक रहस्यांचा शोध घेण्यासाठी भारताने यशस्वीपणे, “आदित्य एक” या यानास पाठवलं. त्याचं काम नियोजनानुसार सुरुही झालं. “गगनयाना”व्दारे भारतीय संशोधकांना अंतराळात पाठवण्याची तयारी सुरु झाली असून, या मोहिमेच्या अंतराळवीरांची निवडही झाली आहे. या सर्व बाबी यापुढे अंतराळ विज्ञान क्षेत्राला आपल्या देशात मोठं महत्व मिळणार असल्याचं स्वयंस्पष्ट करतात. या क्षेत्रासाठी अधिकाधिक प्रशिक्षित बुध्दीवान मनुष्यबळाचीही गरज भासणार आहे. ही बाब लक्षात घेऊन महत्वाकांक्षी आणि दूरदृष्टीच्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे अधिकाधिक संख्येनं वळायला हवं.
–
करिअरची सुरुवात
या क्षेत्रातील करिअरची सुरुवात वेगवेळया अभ्यासक्रमांनी होऊ शकते. यामध्ये एरोनॉटिकल इंजिनीअरिंग आणि एव्हिऑनिक्स टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. एरोनॉटिकल इंजिनीअरिंग ही तांत्रिक बाबींच्या प्रशिक्षणाशी संबंधित असून एव्हिऑनिक्स टेक्नालॉजी ही थेट अंतराळ क्षेत्राशी संबंधित आहे. भौतिकशास्त्र, संगणकशास्त्र, गणित आणि त्यासंबंधित इतर विषय, अभियांत्रिकीच्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील करिअरच्या संधी मिळू शकतात.
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्त्रो), इतर अंतराळ संशोधन संस्था, या क्षेत्रातील स्टार्टअप यामध्ये रोजगार, इंटर्नशीप (अधिवासिता), संशोधनाची संधी मिळू शकते. अंतराळ विज्ञान क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी १० वी १२ वी मध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र यांचा पाया मजबूत करणं गरजेचं आहे. या तिनही विषयातील त्याच्या संकल्पना स्वयंस्पष्ट असतील तरच त्याला या क्षेत्रातील विविधांगी समस्या सोडवण्यासाठी लागणारं कौशल्य प्राप्त करणं सुलभ जाऊ शकतं.
अभियांत्रिकी पदवी, विज्ञानशाखेतील पदव्युत्तर पदवीच्या कालावधीत अंतराळ विज्ञान, एरोस्पेस इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रीकल इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर सायंस हे विषय सखोल अभ्यासले तर अंतराळ विज्ञान क्षेत्रातील प्रवेशासाठीची उत्तम तयारी होऊ शकते.
इस्त्रो सेंट्रलााइज्ड रिक्य्रुटमेंट बोर्डामार्फत (आयसीआरबी) दरवर्षी किंवा आवशक्यतेनुसार विविध पदांच्या निवडीसाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. त्याची तयारी पदवी अभ्यासक्रमाला असल्यापासून करता येणं शक्य आहे. गणित विज्ञान आणि अभियांत्रिकी विषयातील विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या ज्ञानाची चाचणी या परीक्षेव्दारे घेतली जाते. या परीक्षेत उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्त्रोसह इतर शासकीय अंतराळ संस्था व काही खाजगी अंतराळ संस्थांमध्ये नोकरी मिळू शकते.
इस्त्रोमध्ये कनिष्ठ संशोधक फेलोशीप योजना राबवली जाते. या संस्थेतील वरिष्ठ संशोधकांच्या हाताखाली प्रत्यक्ष काम करण्याची व अंतराळ विज्ञान क्षेत्रासाठी आवश्यक प्रात्यक्षिकांचा अनुभव घेण्याची संधी फेलोशीपमुळे मिळू शकते. शिक्षण आणि प्रात्यक्षिकं यांची उत्तम सांगड घालण्यासाठी ही एक महत्वाची संधी ठरु शकते.
अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्राशी संबंधित विविध विषयांमध्ये पीएचडी केल्यास या क्षेत्रासाठी नव्या संधी सुलभतेनं उपलब्ध होऊ शकतात. विशेषत: ॲस्ट्रोाफिजिक्स, प्लॅनेटरी सायंस, स्पेसक्रॉफ्ट इंजिनीअरिंग हे विषय महत्वाचे ठरतात.
महत्वाच्या संस्था
पुढील काही संस्थामध्ये अंतराळ विज्ञान क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम अथवा संशोधनकार्य करण्याची संधी मिळू शकते.
(१) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ रिमोट सेंसिंग ही संस्था देहरादून येथे असून रिमोट सेंसिंग आणि जिओ इन्फॉर्मेटिक्स क्षेत्राच्या क्षमता निर्मितीसाठी ही संस्था स्थापन करण्यात आली. ही संस्था संयुक्त राष्ट्र संघाशी संलग्नित असल्यानं आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रासाठी अंतराळ संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण देणारी महत्वाची संस्था ठरली आहे. या संस्थेत एम टेक, एम एस्सी हे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा अभ्यासक्रम व पीएचडी अभ्यासक्रम करता येतात.
अभ्यासक्रम
(१) एम.एस्सी इन जिओइर्न्फमेशन सांयस ॲण्ड अर्थ ऑर्ब्झव्हेशन.
(२) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रिमोट सेंसिग ॲण्ड जीआयएस. या अभ्यासक्रमांतर्गत पुढील विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येतं. (१) ॲग्रिकल्चर ॲण्ड सॉइल, (२) फॉरेस्ट रिसोर्स ॲण्ड इकोसिस्टिम ॲनॅलीसीस, (३) नॅचरल हजार्ड्स ॲण्ड डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट, (४) अर्बन ॲण्ड रिजनल स्टडीज, (५) सॅटेलाइट इमेज ॲनॅलीसीस ॲण्ड फोटोग्रॅमेट्री, (६) वाटर रिसोर्सेस, (७) मरीन ॲण्ड ॲटमोस्फेरिक सायंस.
संपर्क- https://admissions.iirs.gov.in/coursecalender-
(२) आर्यभट्ट रिसर्च इंस्टिट्यूट- नैनिताल येथे असणाऱ्या या संस्थेत ॲस्ट्रोफिजिक्स, ॲस्ट्रोनॉमी आणि ॲटमॉस्फेरिक सायंस या विषयाच्या शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनावर भर दिला जातो.
संपर्क- https://aries.res.in/
(३) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स-बेंगळुरुस्थित या संस्थेमध्ये ॲस्ट्रोफिजिक्स, ॲस्ट्रॉनॉमी आणि संबंधित विषयांच्या संशोधनावर लक्ष केंद्रित केलं जातं. या संस्थेच्या भारतात अनेक ठिकाणी प्रयोगशाळा आहेत. या भारताच्या अॅस्ट्रोसॅट या पहिल्या अंतराळीय निरीक्षण प्रयोगशाळेच्या कार्यात महत्वाचा वाटा ही संस्था उचलत असते.
या संस्थेत एमटेक-पीएचडी इंटिग्रेटेड प्रोगॅम इन ॲस्ट्रॉनॉमिकल इंस्ट्रुमेंट्स, हाअभ्यासक्रम करता येतो. अर्हता- ६० टक्के गुणांसह बीटेक/बीई इन (इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल/इंस्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर सांयस / मेकॅनिकल) किंवा एमएस्सी इन (फिजिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स सायंस/ ॲल्पाइड मॅथेमॅटिक्स/ ॲप्लाइड फिजिक्स). पहिली दोन वर्षे दरमहा २० हजार रुपये विद्यावेतन दिलं जातं. जे उमेदवार पीएचडी साठी निवडले जातील त्यांना तिसऱ्या वर्षी दरमहा ३१ हजार रुपये, चौथ्या वर्षी ३५ हजार रुपये विद्यावेतन दिलं जाईल. संपर्क- https://www.iiap.res.in/
(३) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायंस एज्युकेशन ॲण्ड रिसर्च- २००६ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली. कोलकता, पुणे, भोपाळ, तिरुपती, मोहाली, थिरुवनंतपूरम येथे या संस्थेचे कॅम्पसेस आहेत. या संस्थेला स्वायतत्ता प्रदान करण्यात आली आहे. या संस्थेत इंटिग्रेटेड पदवी, इंटिग्रेटेड पदव्युत्तर पदवी, पीएचडी, आणि पोस्ट डॉक्टोरल अभ्यासक्रम करता येतात. संशोधन कार्याला सर्वाधिक महत्व दिलं जातं. संपर्क- https://www.iiserpune.ac.in/education/admissions/integrated-phd-programme
(४) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायंस- बेंगळुरु स्थित या संस्थेस डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा १९५८ सालीच देण्यात आला. या संस्थेतील पदवी अभ्यासक्रम हे बीएस्सी (ऑनर्स) रिसर्च या नावानेच ओळखले जातात. संशोधन कार्यास प्राधान्य देणारी ही महत्वाची संस्था आहे. संस्थेत एम.एस्सी, एमटेक (रिसर्च) ॲण्ड पीएचडी, इंटिग्रेटेड पीएचडी, हे अभ्यासक्रम करता येतात.
संपर्क-https://iisc.ac.in/admissions/msc-programmes/
(५) इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी ॲण्ड ॲस्ट्रोफिजिक्स-“आयुका” नावाने सर्वपरिचित असणारी ही संस्था विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अखत्यारित असून, तिला स्वायत्तता मिळाली आहे. पुणेस्थित या संस्थेत ॲस्ट्रोफिजिक्स आणि ॲस्ट्रोनॉमी या दोन विषयांच्या संशोधनावर भर दिला जातो. या ठिकाणी, एम.एस्सी इन फिजिक्स एम.एस्सी इन ॲस्ट्रॉनॉमी पीएचडी हे अभ्यासक्रम करता येतात.
संपर्क- https://www.iucaa.in/en/
(६) नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोनॉमी- ही संस्था पुणे विद्यापीठाच्या परिसरात वसली असून रेडियो ॲस्ट्रॉनॉमी या ज्ञानशाखेतील सर्वोच्च गुणवत्ता प्राप्त संस्था आहे. टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेचा एक भाग म्हणून कार्यरत असणारी ही संस्था, कॉस्मॉलॉजी पासून सूर्यापर्यंतच्या विविध अंतराळीय बाबींचा सखोल अभ्यास करते. या संस्थेत ॲस्ट्रॉनॉमी, ॲस्ट्रोफिजिक्स, रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी, सोलर फिजिक्स, थिऑरेटिकल कॉस्मॉलॉजी, क्वासार्स, रेडिओ गॅलॅक्सी, पल्सार्स ॲण्ड न्युट्रॉन स्टार्स आदी विषयांवर पीएचडी करता येतं.
संपर्क-http://www.ncra.tifr.res.in/ncra/students/ph-d-programme.
(७) रमण रिसर्च इंस्टिट्यूट – या संस्थेची स्थापना नोबल पारितोषिक विजेते डॉ.सी.व्ही.रमण यांनी केली. बेंगळुरुस्थित या संस्थेचा ताबा आता भारत सरकारकडे असून या ठिकाणी रमण यांच्या संशोधन कार्यास पुढे नेणाऱ्या विविध प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केलं जातं. या संस्थेत ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स, लाइट ॲण्ड मॅटर फिजिक्स, सॉफ्ट कंडेन्स्ड मॅटर फिजिक्स, थिऑरेटिकल फिजिक्स या विषयांमध्ये पीएचडी करता येते. संपर्क-https://www.rri.res.in/careers/phd-programme
सुरेश वांदिले
Your content goes here. Edit or remove this text inline or in the module Content settings. You can also style every aspect of this content in the module Design settings and even apply custom CSS to this text in the module Advanced settings.