अकरा सप्टेबरला अमेरिकेच्या न्युयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरचे व्टीन टॉवर्स दहशतवाद्यांकडून उध्दवस्त करण्यास २० वर्षे झाली. त्याविषयी टीव्हीच्या बातम्यांमध्ये खूप सारी माहिती बातम्यांमध्ये देण्यात येत होती. बाबा बातम्यांमध्ये काय चाललय हे बघत असताना, तेजोमयीचं लक्ष या माहितीकडे गेलं. तिची उत्सुकता जागृत झाली. बाबा दुस-या वाहिनीवर जाण्याआधी तिने बाबांच्या हातून रिमोट घेतला. आणि बाजूला ठेवला. ती पुढचे १० मिनिटे व्टीन टॉवर्स पडण्याची माहिती काळजीपूर्वक ऐकत होती.
अगं तुला हे दोन व्टॉवर्स पडण्यात इतका कसा काय रस निर्माण झालाय.. बाबांनी विचारलं. आईलाही हाच प्रश्न पडला.एकटक तेजोयमी इतका वेळ बघत बसल्याचे पाहून अलेक्झांडर नाराज झाला, कारण त्याला त्यावेळी तेजोयमीसोबत खेळायचं होते. तेजोमयी जागची हलत नाही बघून त्याने तिच्या बाजूलाच ताणून दिली.
बाबांच्या प्रश्नाने तेजामयी भानावर आली. बाबांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी तिने बाबांना विचारलं की, हे व्टीन टॉवर्स पडल्यानंतर या घटनेच्या अवतीभवती खूप साऱ्या गोष्टी घडल्या असतील ना..
नक्कीच घडल्या असतील की..
तुम्हाला माहीत आहेत का हो बाबा. तेजोमयीनं विचारलं. आता आली की नाही पंचाईत. बाबांचं सामान्यज्ञान यथातथाच असल्याने, त्यांनी चक्क नाही बाँ म्हणून माघार घेतली. आपला तर काही प्रश्नच नाही असं सांगून आईने याचर्चेतूनच अंग काढून घेतलं..
ओके..आपल्यापैकी कुणालाही ठाऊक नाही, हे कळलं. पण बाबा,आपण तिघांनी मिळून हे व्टीन टॉवर्स पडल्यानंतर काय काय घडत गेलं याचा शोध घेतला तर..आपण या यास शोध एक खेळ असं नाव देउु..
अगं, तुझं काहीतरी भलतच डोकं चालतं.आई म्हणाली.
हे बघ आई आपण प्रयत्न तर करु या..
कसा प्रयत्न करु या..बाबांनी विचारलं.
बाबा सोपं आहे. आपण तिघेही हे टॉवर पडलेल्या वर्षापासून, त्यासंदर्भात काय काय घडलं याचा शोध गुगल बाबांच्या मदतिने घेऊ. आपण प्रत्येकी सात वर्षे घेउु..आईला सहा वर्षे देऊ. पहिल्या सहा वर्षाची माहिती आई तिच्या लॅपटॉपवर शोधून काढेल, नंतरच्या सात वर्षांची तुम्ही शोधा..त्यानंतरच्या सात वर्षाची मी शोधते. मग आपण ही माहिती वर्षनिहाय क्रमवारीने लावून घेऊ. त्याचं वाचन करु. यातील आपल्या तिघांना महत्वाच्या वाटतात तेव्हढ्या घटना निवडू. म्हणजे आपल्या हाती नक्कीच काहीतरी लागेल.
तेजोयमीची आयडिया बाबांना आवडलीच. पण अशा बाबतीत फारसा उत्साह न दाखवणारी आईनेही होकार दिला.
पुढे दोन-तीन दिवस, रात्री दोन तास तिघेही जण त्यांना त्यांना मिळालेल्या वर्षांची माहिती गोळा करु लागले. बाबा आणि तेजोमयीचं ठीक होतं. पण आईही त्यांच्यासारखी करायला लागल्याचं, अलेक्झांडरला आश्चर्य वाटलं. त्याने थोडा त्रागाही केला. कारण त्याच्याशी बोलणारं, खाऊ देणारं कुणीच उरलं नव्हतं. आईने त्याच्या त्राग्याकडे दुर्लक्ष केलं. अलेक्झांडर जात्याच हुषार. आता आईच्या पाठिमागे लागण्यात अर्थ नाही हे त्याच्या लक्षात आलं. त्याने आपला त्रागा पळवून लावला आणि तो आईच्या बाजुला बसून लॅपटावरची तिची शोध मोहीम तो कौतुकानं बघू लागला.
तीनचार दिवसात, तिघांनीही व्टीन टॉवर्सच्या बाबत काय काय घडलं याची सालनिहाय माहिती शोधून काढली. बांबानी ती माहिती एकत्रित गेली. बिनमहत्वाची माहिती खोडून टाकली.
आता काय, आईने उत्सुकतेने विचारलं. खोदा पहाड निकला चुहा असं नको व्हायला, असं ती म्हणाली. हो नारे ठोंब्या, अलेक्झांडरकडे बघत आई म्हणाली.तो कशाला नाही म्हणालाय जातोय. त्याने होकारार्थी मान हलवली.
अगं आई आता आपण केलेली ही यादी मी वाचते. म्हणजे आपल्या लक्षात येईल काय काय घडले ते..
आई बाबा सरसावून बसले. तेजोमयी स्क्रीनवर क्रमवार टाईप केलेली माहिती वाचू लागली..
माहिती वाचून झाली तेव्हा,आई बाबा आणि तेजोयमीच्या तोंडून अरे असं घडलं त्यानंतर, असे उद्गार एकाच वेळी घडलं.
अमेरिकेसारख्या सर्वात बलशाली राष्ट्रातील दोन ईमारती दिवसाढवळया उध्दवस्त होतात, ही बाब अमेरिकेच्या सरकारने फार फार मनावर घेतली..ज्या दहशवाद्यांनी हे घडवून आणलं ते सौदी अरेबियात राहतात असं, अमेरिकेच्या लक्षात आलं. सौदी अरेबिया हा देश खनिज तेलाचा मोठा उत्पादक. यापुढे आपण सौदी अरेबिया आणि त्याच्या अवतीभवती असणाऱ्या आखाती देशावर खनिज तेलासाठी अवलंबून राहायचं नाही, हे अमेरिकेन ठरवलं. हे ठरवणं इतकं पक्क होतं की, या काळात अमेरिकेत वेगवेगळया पक्षाची सरकार आली, तरी त्यांनी यावरच लक्ष अजिबात विचलित होऊ दिलं नाही. याकाळातील जॉर्ज बुश या राष्ट्रध्यक्षांचे आखाती देशातील तेल व्यापारात हितसंबंध होते. त्यांनी या हिंतसंबंधात कठोरपणे तिलांजली दिली. अमेरिकेचं आखाती देशांवरचं तेलाचं अवलंबित्व कमी व्हावं म्हणून जोमदार प्रयत्न सुरु राहिले. कमित कमी इंधन लागणाऱ्या गाड्यांच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्यात आलं. इलेक्ट्रीकवर चालणाऱ्या वाहनांच्या दिशेनं पाउुल टाकण्यात आलं. खनिज तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायचच, या उद्दिष्टपूर्तीसाठीच्या प्रयत्नांना प्रचंड गती देण्यात आली. त्यासाठी प्रचंड पैसा देण्यात आला. अभियंते, शास्त्रज्ञ, कामगार, प्रशासक रात्रंदिवस कामास लागले. या अथक प्रयत्नातूनच समुद्राच्या तळापासून काही किलोमीटर असलेल्या दगडधोंड्यांच्या सांदित अडकलेले खनिज तेल आणि नैसर्गिक वायू बाहेर काढण्याचं तंत्रज्ञान शोधलं गेल. हे तंत्रज्ञान चांगलच यशस्वी ठरलं. २००८ सालापासून अमेरिका स्वत:चं तेल उत्पादन करु लागली. हे उत्पादन हळूहळू वाढत २०१५ साली, ते ९४ लाख बॅरल्सपर्यंत पोहचलं. या काळात तेल उत्पादनात सरासरी ८८ टक्के वाढ झाली. त्यामुळे या देशाची तेल आयात ६० टक्क्यांनी घटली. तेव्हा बराक ओबामा हे राष्ट्रध्यक्ष होते. त्यांच्या कारकीर्दिच्या शेवटच्या वर्षात ही आयात आणखी घटली. त्यांच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाले. ते ओबामा यांचे कट्टर विरोधक पण त्यांनी एक अवाक्षरही न बोलता, तेलाबाबात स्वयंपूर्ण व्हायचेच या धोरणाला आणखी जोमाने पुढे नेले. आणि आश्चर्य घडले इतर देशांवर मोठ्याप्रमाणावर खनिज तेलासाठी अवलंबून असणारी अमेरिका २०१८ साली चक्क तेल निर्यात करु लागली. आता तर अमेरिकेचं तेल उत्पादन सौदी अरेबिया या जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशापेक्षा अधिक झालं आहे.
तेजोमयीचं वाचून होताच,केवळ चित्तथरारक..अशी आईची उत्स्फुर्त प्रतिक्रिया होतह.
केवळ अविश्वसनीय,असं बाबा म्हणाले..
ग्रेट..तेजोमयीही बोलून गेली..
एखादी गोष्ट करायची ठरवली तर काहीही अशक्य नाही हेच या घटनाक्रमावरुन दिसतं, नाही का गं आई..
हो….आई म्हणाली.
केवळ ठरवणं नाही तर त्यासाठी झोकून देणं महत्वाचं. ते अमेरिकेनं केलं. देशाचं हित सर्वोच्च मानलं. आपल्या प्रयत्नात अजिबातच कसूर केली नाही. एकमेकांच्या विरोधाची मुंगीसुध्दा शिरणार नाही याची काळजी घेतली.तेव्हा कुठे असं यश मिळालं..
कोणतंही यश मिळवण्यासाठी हा खरा मंत्र ठरतो नाही का हो..आई बाबांकडे बघून तेजोमयी म्हणाली..
जसं आपल्या अलेक्झूचं
म्हणजे, बघना त्याला चटकन कळलं की आई महत्वाच्या कामात गुंतलीय. त्यामुळे आता लाडकोड करुन घेणं, खाण्यापिण्यासाठी हट्ट करणं योग्य नाही..त्यामुळे आईच्या कामात अजिबात खोडा आणला नाही.आता बघ आईकडून या शहाणपणाची कशी कसूर काढतो ते..
शहाणा हो माझा ठोंब्या..आई अलेक्झांडरकडे बघत म्हणाली.त्याला कॉलर असती तर त्याने त्यावेळी याकौतुकाने नक्कीच वर केली असती. अशावेळी आईच्या कुशीत शिरुन त्याला काय म्हणायच हे तो बरोबर सांगून जातो. आताही त्याने तेच केले…
०००