चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट
गणित आणि संगणकीय शास्त्र विषयातील शिक्षण देणारी आणि संशोधन कार्यास सहाय्य करणारी आपल्या देशातील एक महत्वाची संस्था म्हणून चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटने ख्याती प्राप्त केली आहे. अशा या संस्थेकडे १२ वी नंतरच्या करिअर प्लॅनिंगमध्ये महाराष्ट्रीय पालक व विद्यार्थी फारसे लक्ष देत नाहीत.
प्रतिभावंत विद्यार्थी आणि दर्जेदार संशोधकांमध्ये सातत्यपूर्ण संवाद होत राहिला तरच शैक्षणिक गुणवत्तेची पातळी उंचावते असे संबंध जगात दिसून आले आहे. आपल्याकडे याकडे थोडेसे दुर्लक्ष करण्यात आले आहे. विविध संशोधनात्मक कार्य करणाऱ्या संस्थांमध्ये कार्यरत असणाऱ्या संशोधकांच्या ज्ञानापासून प्रतिभावंत विद्यार्थ्यांना वंचित रहावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन या संस्थेची स्थापना १९८९ साली करण्यात आली.
या संस्थेने आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केली आहे. संस्थेला भारत सरकारने विद्यापीठाचा दर्जा दिला आहे. भारत सरकार आणि इतर खाजगी उद्योग या संस्थेला वित्तीय सहाय्य करतात.
उच्चत्तम दर्जा
अध्यापन आणि संशोधन या दोन्ही क्षेत्रात उच्चत्तम दर्जा साध्य करण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे. संस्थेतील गणित आणि संगणकीय शास्त्रातील संशोधक हे देशात सर्वोत्कृष्ट समजले जातात.
अत्युकृष्ट गणितीय आणि संगणकीय कौशल्याची गरज भासणाऱ्या विविध क्षेत्रांसाठी निवडक प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रशिक्षत करण्यासाठी संस्थेने अभ्यासक्रम सुरु केले आहेत. हे सर्व अभ्यासक्रम सध्या भौतिकशास्त्र, गणित आणि संगणकीय क्षेत्रात संशोधन क्षेत्रात सक्रीय असणारे संशोधक शिकवत असल्यामुळे विद्यार्थ्यांना सातत्याने नव्या संकल्पना शिकायला मिळतात.
एम.एस्सी पातळीवरील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात गणित, संगणक शास्त्रातील प्रगत विषयांचा समावेश करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम लवचिक असून तो विद्यार्थ्यांना संशोधनात्मक करिअरमध्ये उत्कृष्टतता साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरतो. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे संगणकीय कौशल्य अवगत व्हावे यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. हे अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना जगभरातील नामवंत संस्थांमध्ये उच्चपदस्थ नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत.
संस्थेतील अभ्यासक्रम- (१) बी.एस्सी (ऑनर्स) इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड कॉम्प्युटर सायन्स, (२) बी.एस्सी (ऑनर्स) इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड फिजिक्स (३) एम.एस्सी इन मॅथेमॅटिक्स (४) एम.एस्सी इन कॉम्प्युटर सायन्स. (५) एम.एस्सी इन ॲप्लिकेशन ऑफ मॅथेमॅटिक्स. (६) पी.एचडी इन मॅथेमॅटिक्स (७) पीएचडी इन कॉम्प्युटर सायन्स, (८) पी.एचडी इन फिजिक्स.
बी.एस्सी अभ्यासक्रम
हा तीन वर्षाचा असून तो सहा सत्रांमध्ये विभाजित करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांच्या निवडीसाठी अखिल भारतीय पातळीवर चाळणी परीक्षा घेतली जाते. गणित विषयासह १२वी उत्तीण विद्यार्थी या परीक्षेला बसू शकश्तात. नॅशनल सायन्स ऑलम्पियाड मध्ये उत्कृष्ठ कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्यांना चाळणी परीक्षेमधून सूट मिळते. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मर्यादित स्वरुपात शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये संपूर्ण शिकवणी माफ आणि दरमहा ५ हजार रुपयांच्या नैमत्तिक खर्चाचा समावेश आहे.
एम.एस्सी अभ्यसाक्रम
हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा आणि चार सत्रांमध्ये विभाजित करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाते. चाळणी परीक्षा देशभरातील विविध केंद्रावर होत असली तरी मुलाखत मात्र चेन्नई कॅम्पस मध्येच घेतली जाते. अर्हता- बी.एस्सी, बी.मॅथ, बी.स्टॅट,बी. टेक.
या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मर्यादित स्वरुपात शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये संपूर्ण शिकवणी माफ आणि नैमेत्तिक खर्चासाठी दरमहा ६000 रुपये यांचा समावेश आहे. काही विद्यार्थ्यांना फक्त शिकवणी शुल्क माफ केली जाते. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची प्रत्येक सत्राची कामगिरी तपासली जाते.
पीएचडी अभ्यासक्रम-
अर्हता- एम.एस्सी गणित किंवा अभियांत्रिकी पदवी आणि संशोधन करण्याकडे तीव्र कल. संगणकीय शास्त्रामध्ये पी.एचडी करण्यासाठी अर्हता- एम.एस्सी किंवा अभियांत्रिकी /तंत्रज्ञान पदवी, एमसीए किंवा विज्ञान विषयातील पदवी आणि संशोधन करण्याकडे तीव्र कल. भौतिक शास्त्रामध्ये पीएचडी करण्यासाठी अर्हता- एमएस्सी- भौतिकशास्त्र, किंवा भौतिकशास्त्र विषयातील पदवी आणि संशोधन करण्याकडे तीव्र कल.
शिष्यवृत्ती
या तिन्ही पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशभरातील विविध केंद्रांमध्ये चाळणी परीक्षा घेतली जाते. मुलाखती चेन्नई येथे घेतल्या जातात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या दोन वर्षासाठी दरमहा २५ हजार रुपये आणि पुढील तीन वर्षासाठी दरमहा २८ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. पुस्तके खरेदी व इतर नैमेत्यिक खर्चासाठी वार्षिक १० हजार रुपये दिले जातात.
हे अभ्यासक्रम शिकवण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फन्डामेन्टल रिसर्च-मुंबई, आयआयटी-मद्रास, द इंटरयुनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी ॲण्ड ॲस्ट्रोफिजिक्स-पुणे आदी महत्वाच्या संस्थांमधील संशोधक शिकवायला येतात.
परदेशी सहकार्य आणि संधी
या संस्थेने पॅरिसस्थित इकॉले नॉर्मले सुप्रियर या संस्थेशी शैक्षणिक सहकार्य करार केला आहे. इकॉले नॉर्मले सुप्रियर ही संस्था गणित विषयात संशोधन करणारी आणि शिक्षण देणारी जगातील आघाडीची संस्था समजली जाते. या संस्थेत चेन्नई मॅथेमॅटिकल संस्थेच्या विद्यार्थ्यांना उन्हाळी संशोधनात्मक प्रकल्पासाठी पाठवले जाते. याशिवाय इतरही परदेशी संस्थांसोबत असेच शैक्षणिक सहकार्य करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञान कक्षा रुंदावण्यासाठी सहाय्य होते.
या संस्थेतील विद्यार्थ्यांना अमेरिकेतील कॅल्टेक, शिकॅगो, कॉर्नेल, हार्वर्ड, एमआयटी, प्रिन्सटॉन, स्टॅन्डफोर्ड, यू पेन, येल विद्यापीठांमध्ये, फ्रान्समधील इएनएस-पॅरिस, युनिव्ह-पॅरिस, युनिव्ह- बॉरडेक्स विद्यापीठात, जर्मनीतील मॅक्स प्लॅन्क इन्स्टिट्यूट, हॅमबोल्ड युनिव्हर्सिटी अशासारख्या नामवंत विद्यापीठांमध्ये पुढील शिक्षण घेण्याची संधी प्राधान्याने मिळते.
प्लेसमेंट
या संस्थेतील विद्यार्थ्यांना मुख्यत्वे गणित, संगणकीय शास्त्र आणि भौतिकशास्त्र या क्षेत्रात उत्तमोत्तम करिअरच्या संधी मिळत असल्या तरी काही विद्यार्थी फायनांशिअल मॅथेमॅटिक्स, मॅनेजमेंट ॲण्ड इकानॉमिक्स या क्षेत्रातही करिअर करत आहेत. देशातील उत्कृष्ट सॉफ्टवेअर कंपन्यांमध्येही या विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे.
वसतिगृह व्यवस्था – संस्थेचे अभ्यासक्रम हे पूर्णपणे निवासी स्वरुपाचे असल्याने विद्यार्थ्यांसाठी कॅम्पसमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे
संपर्क – चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट, एच वन, सिपकॉट आयटी पार्क, सिरुसेरी केलाम्बक्कम – ६०००१३०, दूरध्वनी- ०४४-२७४७०२२६,२७१९६१००, फॅक्स-२७४७०२२५, संकेतस्थळ- www.cmi.ac.in/admissions , ईमेल-admissions@ cmi.ac.in
000