चोरी की लिला?
टीव्हीवरील आस्था नावाच्या वाहिनीवर एक महाराज बाळकृष्णाच्या लिलांवषियी बरच काही सांगत होते. ते ऐकण्यात आई-बाबा दंग होऊन गेले होते. चार वेळा या खोलितून त्या खोलित जा-ये करुनही, आईबाबांचं टीव्ही बघणं थांबलं नसल्याचं अलेक्झांडर(द डॉगी)ला बरोबर कळलं. आता आपण काहीही केलं तरी आई काही आपल्याकडे लक्ष देणार नाही.त्यामुळे आईजवळ बसलेलं बर असा विचार करुन अलेक्झांडर आईजवळ बसला. टीव्हीकडे एक टक बघू लागला. मध्येच जिभ लांब करुन आईबाबांकडे बघायचा. पण त्या दोघांचेही लक्ष बाळकृष्णांच्या लिलांवरील व्याख्यानाकडे.
आपला गृहपाठ संपवून तेजोमयी दिवाखान्यात आली. घरचे तिघेही सदस्य टीव्ही बघण्यात दंग आणि गुंग झाल्याचे बघून तिही सोफाव्यावर बसली आणि बाळकृष्णाच्या लिलांची महती ऐकू लागली.
ही महती सांगणारे महाराज बाळकृष्णाच्या माखन म्हणजे लोणी चोरीच्या लिलेविषयी रंगवून रंगवून सांगत होते. बाळकृष्ण आणि त्याचे सवंगडी काय, त्यांना लोणी खावं वाटलं आणि त्यांनी ते त्यांच्या पध्दतीने मिळवलं. आम्ही नाही का, कैरी खायची असली तर बरोबर ते आम्रवृक्ष गाठतोच की नाही.. तेजोमयी मनात म्हणाली. बिचाऱ्या बाळकृष्णाच्या मनात चोरीचा लवलेशही नसावा, मात्र महाराजांनाच त्याचे कृत्य चोरी वाटत असावी.चोरी तर चोरी वर शिरजोरी.असंच त्या महाराजांचं सांगणं होतं.
काय काय ते सांगत होते बिचारे आणि बाळकृष्णाने लोण्याची चोरी केली नसून ती त्यांची लिला होती. ती त्याचं अमूक होतं, तमूक होतं. म्हणजे ते महाराज चोरी होतीही म्हणत होते आणि लगेच चोरी नव्हतीही म्हणत होते. बिच्चारा बाळकृष्ण आज इथे असता तर त्याने महाराजांना म्हंटले असते, बुवा लोणी नको पण प्रवचन आवरा आता. असं काहीसं तेजोमयीच्या मनात आलं आलं नि ती खुदकन हसली. आईबाबा दोघांनीही तिच्याकडे चमकून बघितलं. बरं झालं, तेव्हाच या बाळकृष्णाच्या लिला प्रवचनाचा शेवट झाला. अन्यथा आईचा रागाच्या फटकारा तेजोमयीस बसलाच असता.
प्रवचन संपताना आईने टीव्हीतल्या महाराजांना नमस्कार केला.बाबांचा हात वर जाता जाता राहिला. टीव्ही बंद झाल्याचे लक्षात आल्यावर अलेक्झांडर महाशय ताडकन उठले आणि आईच्या मांडिवर जाऊन बसले.
अगं, अलेक्झूने मन लावून लोणी प्रकरण बघितलं बघ.तेजोमयी म्हणाली.
आहेच हो माझा ठोंब्या शहाणा.आई अलेक्झांडरंच गाल ओढत म्हणाली.
अगं, पण तू मध्येच कां बर हसलीस. बाबांनी विचारलं..
अहो बाबा, त्या महाराजांना किती कष्ट पडत होते ना, त्याचं हसू आलं मला..
कशाचे कष्ट गं, आईनं विचारलं.
अगं,एकदा ते म्हणत होते की बाळकृष्णाने लोण्याची चोरी केली. दुसऱ्यांदा म्हणत होते की नाही नाही ती चोरी नव्हती. ती त्याची लिला होती. किती हा गोंधळ.चोरी केली असं म्हंटल्यावर बाळकृष्ण रागावणार आहेत का,सांग बरं?
अगं बाई, तू काहीबाही बोलू नकोस.ते महाराज किती मोठे ज्ञानीपुरुष.त्यांना असं नाव बोटं ठेऊ नकोस.आई नाराजीच्या सुरात म्हणाली.यावर तेजोमयी हसली आणि तिच्या गळयात पडून म्हणाली.
अगं आई, बाळकृष्णाला लोणी फार आवडायचं हे त्याच्या आईला आणि त्याचं सदैव लाड करणाऱ्या गोकुळातल्या काकू-ताई-मामी-आजी-आत्यांना ठाऊक होतं की नाही?
होतं की.आई म्हणाली.
मला कॅडबरीचं चॉकलेट खूप आवडत की नाही?तेजोमयीनं विचारलं.
आवडतं..
मग बाबा जेव्हा ते बाजारातून आणतात तेव्हा तू ते काय लपवून ठेवतेस की माझा हात पुरणार नाही अशा ठिकाणी ठेवतेस?
आँ,अगं तुझ्या कॅडबरीच्या आणि लोण्याचा काय संबंध? आईने विचारलं. यावर बाबा हसले.
आता तुम्हाला काय झालं हसायला?आईने रगावून विचारलं. आई, बाबांना रागावल्याचं लक्षात आल्यावर अलेक्झांडर स्वारी बाबांच्या समोर उभी राहून आता द्या ना उत्तर, अशा आशयाची मान हलवू लागली.
अगं बाई रागावतेस कशाला?सांगतो ना.तेजोमस काय म्हणायचं ते कळलंय मला.बाबा म्हणाले.
वावा वावा,तेजोमयीने आनंदान उद्गारली.
सांगा की मग..
अगं, यशोदा मातेस आणि तिच्या मैत्रिणींना जर ठाऊक होतं की बाळकृष्णाला लोणी फार आवडतं, तर ते त्याच्या हाताला लागेल असं नव्हतं का ठेवायचं त्यांनी. तसं एकिनेही केलं नाही. आता ते एवढचं लेकरु,त्याला आवडणारं, त्याला पाहिजे त्या पध्दतीनं घेणारच की.त्याने तसं केलं तर लगेच हाकबोंब की ,बाळकृष्ण चोरी करतो म्हणून.
आँ..आई उद्गारली..
हाँ आई,तू सुध्दा असाच विचार करुन बघ..म्हणजे बाळकृष्णाने चोरीबिरी केली नाही असं लक्षात येईल..
मग महाराज जे सांगत होते ते..
जाऊ दे गं आई..बाळकृष्णाने त्याचं काम केलं..महाराज त्याचं काम करताहेत.आपण आपलं काम करु या.
काय करु या?
कॅडबरीज खाऊ या.सोफ्यावरुन उडी मारत तेजोमयी म्हणाली. अलेक्झांडरही या आनंदात सामील झाला.आपणही आपल्या पोरिच्या आनंदात सामील व्हायला हवं नाहीतर तिही कॅडबरीची चोरी करेल नि मग आपणासस ही तिची लिला म्हणून स्वत:ची समजूत घालावी लागेल.असं स्वत:शी पुटपुटत आई लगबगीने कॅडबरी आणण्यासाठी स्वयंपाक खोलित गेली.
सुरेश वांदिले
