आज मी माझ्या जन्माची गोष्ट सांगणारेय. माझा जन्म झाला ८५ लक्ष दशलक्षापूर्वी! दचकलात का? दचकू नका. कारण पुढे अनेक अशा गोष्टी येतील नि तुम्ही प्रत्येक वेळी दचकू लागला तर गचकूनच जाल. हा हा हा! जाऊ द्या विनोद केला. तुमच्यापेक्षा मी खूप म्हणजे खूपच सिनीयर, कारण तुम्ही म्हणजेच मनुष्यप्राण्याचा जन्म झाला ३ लाख १५ हजार वर्षांपूर्वी. माझा जन्म वर सांगितलेलाच आहे की.
माझा जन्म झाला, तेव्हा मिस्टर डायनोसॉर हे शेवटचा श्वास घेत होते. म्हणजे जवळपास नष्ट झाले होते म्हणाना. ते गेले नि मी आले, असं तुम्ही म्हणू शकता. मिस्टर डॉयनोसॉरांनी बराच काळ या पृथ्वीवर राज्य केलं. पण आमच्या १९ हजार प्रजाती असतानाही आम्ही राज्यबिज्य स्थापन करण्याच्या भानगडित पडलो नाही. आम्ही आमच्या ‘इटुकल्या-पिटुकल्या’ राज्यात खूप खुष आणि आनंदी होतो.
अशी अनेक वर्षे गेली. तुमचा पृथ्वीवर जन्म झाला. तुम्ही इतरांपेक्षा खूप खूप हुषार झालात. या हुषारांमधले जे अधिक इंटेलिजेंट होते, ते सारखे काहीतरी नव्याचा शोध घेऊ लागले. त्यातूनच त्यांनी आपला मोर्चा आमच्या राज्याकडे वळवला. आमच्या या असंख्य प्रजातींचा उपयोग, त्यांनी जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी केला. पृथ्वीवरील अनेक किटकांची उत्क्रांती, आमच्या अभ्यासामुळेच मानवाला कळू शकली.
१५० ते २०० दशलक्ष वर्षापूर्वी, आमचे पूर्वज असलेले दोन पतंग म्हणा किंवा पाकोळ्या त्यांच्या मूळ प्रजातीच्या किटकांपासून दूर झाले. मग या पतंगाची उत्क्रांती होत आजचे स्वरुप आम्हाला लाभले. आमचे पूर्वज असलेल्या पंतगांची दृष्टी फारच क्षिण होती. त्यांचा सगळा भर हा गंध किंवा वासावर. पण, आमची दृष्टी मात्र विलक्षण तेज बरं का.
आमच्या जीवनप्रवासात, दृष्य स्वरुपातले संकेत महत्वाचे ठरतात. त्यामुळेच आम्ही आकर्षक असतो. आमच्या शरीरावरच्या आकर्षक रंगांमुळे शत्रूपासून आमचा बचाव होतो. आम्ही थंड रक्त प्रकारातील असल्याने, आमच्या शरीरावरील काळ्या रंगामुळे शरिराचं तापमान सुयोग्य राखण्यासाठी मदत होते.
आमच्यातील काही प्रजातींनी चित्तवेधी किंवा मोहक गुणधर्म, स्वत:मध्ये विकसित केलीत. शत्रूने हल्ला केल्यास ही आमची प्रजाती स्वत:भोवती रासायनिक थर निर्माण करु शकते. आमच्यातील काही प्रजाती, इतर किटक किंवा पक्षांसाठी विषारीच ठरतात. ते या प्रजातींजवळ जाऊ लागले की त्यांचा बंदोबस्त झालाच म्हणून समजा. विषारी वृक्षावर खातपित असणारं या प्रजातीचं सुरवंट, समजा एखाद्या पक्षानं मटकावलं तर, ते त्याला पचवणं अशक्य जातं. असं असलं तरी ही प्रजात, तिच्या चकाकत्या पंखांनी, ‘आमच्यापासून दूर राहा, आमच्याकडे येऊ नकोस’, असा इषारा शत्रूला देवून सावध करते.
आमच्यातील काही प्रजाती विषारी नसतात, पण, त्या एखाद्या विषारी प्रजातीचं रुप काही क्षणासाठी घेऊ शकतात. काही प्रजाती विषारी प्रजातीच्या आवाजाची नक्कल करु शकतात. आम्ही जेव्हा उडतो, तेव्हा अनेक प्रकारच्या खुणा करतो किंवा इशारे देतो. आमची रंगसंगती हा एक इशाराच असतो. उडण्याच्या विविध पध्दतीसुध्दा वेग-वेगळे इशारेच असतात. काही हळूवार उडतात, तर काही वेगाने उडतात, काही सरळ रेषेत तर काही वक्र पध्दतीने उडतात. आमच्यातल्या काहिंना त्यांचा सामाजिक गट बरोबर ओळखता येतो. या प्रजातील ‘नरा’मध्ये अनेक स्त्री रुपे असतात. यातील स्त्रीरुप तीन पध्दतीने दिसतं. एक नकला करु शकणारं, विषारी नसलेलं अणि इतर दोन विषारी प्रजातीचं नक्कल करु शकणारं.
लिंबू किंवा संत्राच्या झाडावर सुरवंट असतो. लहान असताना त्याचा रंग पक्षांच्या विष्ठेसारखा असतो. त्यामुळे भुकेलेले पक्षी हे त्यापासून दूर राहतात. हे सुरवंट मोठे झाले की त्यांचा रंग हिरवा होतो. ही झाली एक प्रजाती. आमच्या अनेक प्रजातींच्या अशा अनेक गमतीजमती आहेत. म्हणूनच आमचा अभ्यास संशोधकांसाठी महत्वाचा ठरलाय. या पृथ्वीवरचं जीवन कसं कसं उत्क्रांत होत गेलं, हे सांगणारं जिवंत पुस्तकच, आम्ही ठरलोय.
तर मघापासून, आम्ही आम्ही जे चाललय, ते आम्ही कोण? हा प्रश्न तुम्हला पडला असणारना. तर, आम्ही म्हणजे फुलपाखरु! इटुकले-पिटुकले! पण, जीवनाच्या उत्क्रांतीचा भले मोठे “शास्त्र” घेऊन वावरणारे.
जेव्हा तुम्ही आम्हाला पकडायला जाल, तेव्हा ही बाब ध्यानात ठेवा म्हणजे झालं.
सुरेश वांदिले