(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

गणित आवडत नाही किंवा जमत नाही आणि जीवशास्त्र आवडतो म्हणून एमबीबीएस होण्याचं स्वप्न बघितलं जातं. जीवशास्त्र आवडतं म्हणजे नेमकं काय? हे ना पालक विद्यार्थ्यांना विचारत ना विद्यार्थी स्वत:चं आत्मपरीक्षण करत. जीवशास्त्रामध्ये गणिताची आकडेमोड नाही म्हणून ते सोपे किंवा अवघड नाही, अशी आपली पारंपरिक समजूत वर्षानुवर्षे तशीच आहे. ती बदलावी म्हणून शिक्षकसुध्‍दा आग्रही नसतात किंवा त्यांना त्याची गरज भासत नाही. पाठांतराने जीवशास्त्रात बरेच गुण मिळतही असतील. पण याचा अर्थ जीवशास्त्र समजलं  किंवा अजिबात अवघड नाही, असं समजणं म्हणजे स्वत:ची फसवणूक करुन घेण्यासारखं ठरतं. जीवशास्त्रातील अनेक संकल्पना समजण्यासाठी कठीण असतात. त्या समजल्या नाहीत तर पुढे‍ या विषयातही गती प्राप्त करणं शक्य होत नाही. दुसरी बाब म्हणजे केवळ जीवशास्त्रात चांगलं जमून चालत नाही तर, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रही तोडीसतोड यायला हवं. नीटच्या परीक्षेत या दोन्ही विषयांवरचे प्रश्र असतात. बऱ्याच प्रश्नांचा आधार गणित राहू शकतो. त्यामुळे गणितीय संकल्पना स्पष्ट नसल्यास प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळणं अवघड जाऊ शकतं. पुढे एमबीबीएस करताना रसायनशास्त्राच्या आणि भौतिकशास्त्राच्या संकल्पाना स्पष्ट नसतील तर अभ्यासात‍ील प्रगती खुंटण्याची शक्यता असते. तेव्हा, १२वीमध्ये असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी एमबीबीएसला जाण्याची आकांक्षा बाळगली असेल त्यांनी आपली रसायनशास्त्र व भौतिकशास्त्रातील रुची आणि गती याचा प्रामाणिकपणे विचार करायला हवा.

एमबीबीएसला वा डेन्टलला प्रवेश नाही मिळाला म्हणजे, पुढे‍ आयुष्यात घोर अंधकार आहे, असे अजिबातच नाही. एमबीबीस पदवी मिळवणारे कदाचित चार पावलं समोर राहतील. कुणी किती समोर जावं, हे प्रत्येकाच्या बौध्दिक क्षमतेवर अवलंबून‍ असतं. त्यामुळे इतरांशी तुलना करण्यात काही हशील नसतो. वैद्यकीय क्षेत्रातील इतर ज्ञान शाखांमध्ये उत्तम ज्ञानप्राप्ती करुन त्याचा प्रभावी वापर केला तर एमबीबीएस इतकेच किंवा त्यापेक्षाही अधिक यश मिळवणारेसुध्दा अनेकजण असतातच.

०००

दर्जेदार संस्था

एमबीबीएस व दंतवैद्यकीय शाखांमध्ये देशातील काही महाविद्यालयांनी गेली काही दशके सातत्याने उत्तम कामगिरी केली आहे. अशी काही महाविद्यालये  (अ) एमबीबीएस – (१) ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस- नवी दिल्ली. (या संस्थेचा दर्जा आणि गुणवत्ता सर्वश्रेष्ठ आहे. येथील शिक्षण तणावविरहित असते. संशोधन कार्यास अधिक प्राधान्य दिलं जातं. सांस्कृतिक वैविध्यतेमुळे विद्‌यार्थ्याच्या व्यक्तीमत्वाचा चौफर विकास होतो. रुग्णांच्या बहुविविधतेमुळे वैविध्यपूर्ण वैद्यकीय कौशल्याचा विकास होतो.), (२) जवाहरलाल इंस्टिट्यूट ऑफ पोस्‍ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च- पुडुचेरी, (३) ख्रिश्चन मेडिकल कॉलेज हॉस्पिटल- वेल्लोर, (४) आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज- पुणे, (५) मौलाना आझाद मेडिकल कॉलेज- नवी दिल्ली,

 ०००

(ब) दंतवैद्यक (डेंटल) बीडीएस महाविद्यालये- (१) मौलाना आझाद इंस्टिट्यूट ऑफ डेंटल सायंसेस – नवी दिल्ली, (२) फॅकल्टी ऑफ डेंटल सायंसेस, किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी -लखनौ, (३) फॅकल्टी ऑफ डेंटल सायंसेस, इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी- वाराणसी, (४) पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टिट्यूट ऑफ डेंटल सायंस- रोहतक , (५) मनिपाल कॉलेज ऑफ डेंटल सायंसेस- मनिपाल, (६) गव्हर्मेंट डेंटल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल- मुंबई, (७) नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज- मुंबई, (८) डॉ.जियॅऊदिृन अहमद डेंटल कॉलेज, अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी-अलिगढ, (९) मनिपाल कॉलेज ऑफ डेंटल सायंसेस-मेंगळुरु, (१०) गव्हर्मेंट डेंटल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल-नागपूर.

सुरेश वांदिले