(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

जैवतंत्रज्ञान नवोपक्रमांना साहाय्य

 केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या, जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन साहाय्य (बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टंस काउंसिल-बीआयआरएसी) मंडळामार्फत सातत्याने, या क्षेत्रातील नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना राबवल्या जातात. या अनुषगांने, संबंधित इच्छुकांकडून नियमितपणे प्रस्ताव मागवण्यात येतात.

हे प्रस्ताव नवोपक्रमाचा विकास, उत्पादन किंवा तंत्रज्ञानाच्या वाणिज्यिक वापरापूर्वीचे प्रमाणीकरण या प्रकारातील असावेत. यासाठीची क्षेत्रे ही पुढील प्रमाणे आहेत- (१) औद्योगिक जैवतंत्रज्ञान (इंडस्ट्रिअल बायोटेक्नॉलॉजी), (२) पर्यावरणीय जैवतंत्रज्ञान (एन्व्हीराँन्मेंटल बायोटेक्नॉलॉजी) ,(३) कृषी आणि दुय्यम कृषी (ॲग्रिकल्चर ॲण्ड सेकंडरी ॲग्रिकल्चर), (३) पशुवैद्यकीयशास्त्र आणि जलचर (व्हेटर्नरी सायंस ॲण्ड ॲक्वाकल्चर), (४) औषधीनिर्माण  आणि जैविक औषधी निर्मितीची संयुगे (फार्मा/बायोफार्मास्युटिकल्स), (५) उपकरणे आणि निदानतंत्र (डिव्हायसेस ॲण्ड डायग्नोस्टिक्स)

 या घटकातील प्रस्ताव, ‘आय फोर (इंटेंसिफायिंग द इम्पॅक्ट ऑफ इंडस्ट्रिअल इनाव्हेशन- औ्द्योगिक नवोपक्रमांचा प्रभाव तीव्र किंवा गतिमान करणे’) या योजनेखाली  मागवण्यात येतात.

या प्रस्तावांना, स्माल बिझिनेस इनोव्हेशन रिसर्च इनिशिएटिव्ह (एसबीआयआरआय)- लघुउद्योग नवोपक्रम संशोधन उपक्रमशीलता/ पुढाकार आणि जैवत्रंज्ञान उद्योग भागिदारी कार्यक्रम- बायोटेक्नॉलॉजी पार्टनशीप प्रोग्रम (बीआयपीपी) या दोन शासकीय उपक्रमांमार्फत  साहाय्य केलं जातं.

हे प्रस्ताव खाजगी संस्था, सार्वजनिक संस्था, सेक्शन आठ नुसारच्या कंपनी, नफ्यासाठीची कंपनी, नफ्यासाठी नसणारी कंपनी आणि लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशीप कंपनी सादर करु शकतात.

हे प्रस्ताव ऑनलाइन सादर करावे लागतात. त्यासाठी https://www.birac.nic.in/birac_registration_page.php या संपर्क साखळीचा उपयोग करुन नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर, अर्ज भरण्यासाठीची माहिती स्वयंस्पष्टपणे समोर येते. ती वस्तुनिष्ठपणे भरणं आवश्यक आहे.

एसबीआयआरआय

या उपक्रमांतर्गत, मंजुर झालेल्या प्रस्ताव किंवा प्रकल्पांना बीआयआरएसी मार्फत ५० लाख रुपयांपर्यतच्या शंभर टक्के  अर्थसाहाय्य केलं जातं. ५० लाखापेक्षा अधिक मूल्याच्या प्रकल्पांना ५० लाख रुपयांचं अर्थसाहाय्य आणि ५० लाख रुपयांपेक्षा अधिक मूल्य वाढत असल्यास त्या मूल्याच्या ५० टक्के अर्थसाहाय्य/अनुदान दिलं जातं.

नवोप्रकमांचा विकास, तांत्रिक साहाय्यता आणि प्रमाणिकरणासाठी सर्वोतोपरी साहाय्य केलं जातं.

वेगवेगळया वेळी जाहीर झालेल्या या योजनेंतर्गत आतापावेतो ४२९ लाभार्थ्यांना आणि ३३७ प्रकल्पांना साहाय्य करण्यात आलं. ५७६ कोटिंच्या निधीचं आश्वासन दिलं गेलं. ४८ इंटलेक्चुअल प्रॉपर्टी (बौध्दिक संपदा) ची नोंद करण्यात आली. ८७ नव्या उत्पादनाचा विकास/ तंत्रज्ञानाचा विकास / वाणिज्यिकरण करण्यात आलं.

बीआयपीपी

या उपक्रमांतर्गत सादर केलेल्या, प्रकल्प किंवा प्रस्तावाचं मूल्य कितीही असलं तरी अर्थसाहाय्य मात्र ५० टक्क्यांपेक्षा अधिक दिलं जात नाही. यामध्ये प्रमाणिकरणासाठी साहाय्य केलं जातं. सादरीकरण व तंत्रज्ञान आणि उत्पादनाच्या वाणिज्यिक पूर्व तयारीसाठी साहाय्य केलं जातं.

वेगवेगळया वेळी जाहीर झालेल्या या योजनेंतर्गत आतापावेतो ३३० लाभार्थ्यांना आणि २४६ प्रकल्पांना साहाय्य करण्यात आलं. ५७४ कोटिंच्या निधीचं आश्वासन दिलं गेलं. ४१ इंटलेक्चुअल प्रॉपर्टीची नोंद करण्यात आली. ९५ नव्या उत्पादनांचा विकास/तंत्रज्ञानाचा विकास / वाणिज्यिकरण करण्यात आलं.

दोन्ही उपक्रमांमध्ये प्रकल्पखर्च किंवा मूल्यासाठी काही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. बीआयआरएसीच्या नियमावलीनुसार स्वामित्वधन दिलं जातं.

कार्यप्रणालीचे टप्पे

(१) दोन्ही उपक्रमांतर्गत प्रस्ताव सादर केल्यावर प्रारंभी त्यामधून  क्षेत्र/विषयानुसार तज्ज्ञांच्या समितीमार्फत सुयोग्य प्रस्तावांची छाननी केली जाते व पुढील टप्प्यासाठी निवड केली जाते. (२) निवड झालेल्या प्रस्तावांचं, संबंधितांना या क्षेत्रीय समितीसमोर प्रत्यक्ष सादरीकरण करावं लागतं. (३) यानंतर प्रत्यक्ष कार्यक्षेत्राची भेट अथवा ऑनलाइन चर्चा केली जाते. (४) तांत्रिक तज्ज्ञ समितीमार्फत प्रस्तावाचं सखोल मूल्यांकन केलं जातं. (५) सर्वोच्च समितीमार्फत पूर्नमूल्याकन केलं जातं. (६) हा टप्पा पार पडला की प्रकल्पाला मान्यता दिली जाते आणि निधी उपलब्ध करुन दिला जातो.

संपर्क- बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स काउंसिल, ५ वा माळा, एनएसआयसी बिझिनेस पार्क, एनएसआयसी भवन, ओखला इंडस्ट्रिअल इस्टेट, नवी दिल्ली-११००२०, ईमेल- birac.dbt@nic.in, संकेतस्थळ- www.birac.nic.in,दूरध्वनी- ०११-२९८७८०००

सुरेश वांदिले