(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

परवा मालकीनबाई दोन दिवसांसाठी त्यांच्या बहिणीच्या गावाला गेल्या. जातांना त्यांनी मार्गारेट मांजर मावशीला, ‘घरातच राहा, इकडेतिकडे उंडारु नकोस नि त्या उंदऱ्यावर लक्ष ठेव’, अशा सूचनांचा भडिमार केला. मार्गारेटने आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे मान हलवली.

मालकीनबाई घराबाहेर पडताच तिने स्वत:भोवती मस्तपैकी गिरकी घेतली. मालकीनबाई घराबाहेर कधी पडतात याची वाटच बघत असणारा रॉबिन्सन उंदीरमामा बिळातून बाहेर आला. आता दोन दिवस मज्जा करायची, हे त्याने मालकीनबाईंचं संभाषण ऐकलं तेव्हाच ठरवलं होतं.

“मावशे, आता दिवस आपला, रात्र आपली, मज्जा करुया आपल्या महाली.”

“घरकोंबड्या, आता हा महाल काय कामाचा, आनंद घेऊ बाहेरच्या जगाचा.”

“म्हणजे काय करायचं?”

“आपण जंगलात जावूया. खूप दिवस झाले माझ्या भाचऱ्याला भेटले नाहीरे. त्याची फार आठवण येतेय.”

“हा कोण तुझा भाचरा मध्येच टपकला?”

“अरे वाघोबा. माझा लाडोबा.”

“बापरे, त्याची नजर माझ्यावर गेली तर…”वाघोबाचे नाव ऐकून रॉबिन्सनच्या पोटात गोळाच आला.

“मार्गी सोबत असताना तुला रे कसली भीती. त्याने काही आगळीक केली तर त्याचे कानच उपटीन जोराने.” मावशीने रॉबिन्सनला समजावले. हो नाही करत तो जंगलात जायला तयार झाला.

खिडकीच्या फटितून दोघेही बाहेर पडले. आडवाटेने जंगलात पोहचले. जंगलात हिरव्यागार झाडांची गर्दी होती. काही लहान झाडं, काही खुरटी झाडं, तर काही उंचच उंच झाडं. अशी झाडं आकाशाला टेकल्यासारखी वाटत होती. या झाडावरुन थेट आकाशात नि मग चंद्रावर जाता येईल, या कल्पनेत मामा रमला. काही क्षण तो त्या उंच झाडाकडे एकटक बघत राहिला.

“राब्या, काय दिसलं तुला या उंच झाडावर?एवढा काय टक लावून बघतोस ते.”

“या उंच झाडावर चढून थेट आभाळात नि मग चंद्रावर जाता येईल का? हा विचार करत होतो.”

“हे झाड या जंगलातलं सगळ्यात उंच असलं तरी यापेक्षाही उंच झाडं दुसऱ्या जंगलात आहे म्हंटलं.”

“वाव, मग तर आपल्याला चंद्रावर जाणं सहजच शक्य होईल. पण मावशे, जगातलं सगळ्यात उंच झाडं कुठे आणि त्याची उंची किती?”

“रॉब्या, उंचिच्या शोधाची गंमतच आहे.”

“उंचीची गंमत? भारीच म्हणायचं. कुणी केली ही गंमत?”

“दुसरं कोण करणार? या उपदव्यापी मनुष्यप्राण्याशिवाय.”

“म्हणजे काय केलं त्याने?”

जंगलातून पुढे जात मावशी सांगू लागली,

“रॉब्या, तुला जगातल्या उंच झाडाचा प्रश्न पडला. पण मनुष्यप्राण्याला झाडं जास्तीतजास्त किती उंच वाढू शकतात, हा प्रश्न पडला.”

“कुणाला बरं पडला हा प्रश्न?”

“अमेरिकेतील नॉर्दन ॲरिझोना विद्यापीठातील प्राध्यापक डॉ.जॉर्ज कॉखला.”

“प्रश्न पडला की उत्तर शोधण्यासाठी हा मनुष्यप्राणी धावाधाव करतो. मग या कॉख का खॉकसाहेबांनी कुठे धावाधाव केली?”

“रॉब्या, हे कॉखसाहेब गेले कॉलिफोर्निया प्रांतातील जंगलात.”

“काय दिसलं तिथे त्यांना?”

“त्यांच्या लक्षात आलं करी रेडवूड जातीची झाड जगातील सर्वात उंचीची आहेत.”

“पण हे कळलं कसं?”

“त्यांनी आधी जगातल्या वेगवेगळ्या झाडांच्या उंचीचा अभ्यास केला. रेडवूड झाडाची उंची जेव्हा त्यांनी प्रत्यक्ष मोजली तेव्हा ती ११२.७ मीटर निघाली. तेव्हा त्यांना कळलं की हे जगातील सगळ्यात उंच झाड. पण कॉखसाहेबांना या उंचीत काही रस नव्हता. त्यांना शोधायचं होतं की एखादं झाड यापेक्षा अधिक उंची गाठू शकेल का?”

“मग काय केलं त्यांनी?”

“दोऱ्या, वर चढण्यासाठीचे क्रेन यासारखी उपकरणे यांच्या साहाय्याने कॉखसाहेब रेडवूडच्या शेंड्यापर्यंत पोहचले. तिथे पोहचल्यावर त्यांनी रेडवूडच्या झाडांमध्ये काय हालचाली सुरु आहेत, याचा अभ्यास केला.”

“अभ्यासाच्या भानगडीशिवाय येतच काय म्हणा या मनुष्यप्राण्याला?”

“गधड्या, अरे या अभ्यासाच्या  भानगडीतूनच झाडांच्या उंचीचं रहस्य कळलना.”

“ते कसं?”

“अरे, प्रकाशसंश्लेषणाचं (अन्न तयार करण्याची प्रक्रिया) काम झाडाची पानं करतात. झाडाच्या मुळातून मिळालेले पाणी आणि हवेतून शोषून घेतलेला कॉर्बन डायऑक्साइड हे सूर्यप्रकाशामुळे एकत्र येतात. त्यातून कर्बोदकं तयार होतात. कॉखसाहेबांना दिसलं की रेडवूडच्या सर्वात उंच पानावर प्रकाशसंश्लेषण अतिशय धिम्या गतिने आणि किमान कार्यक्षमतेनं होतं होतं. पानांचा आकार खुरटा झाला होता. त्या उंचीवर असलेल्या ढगांमध्ये असलेलं मुबलक बाष्प असूनही ते रेडवूडच्या पानांना शोषून घेता येत नव्हतं. मुळांपासून येणाऱ्या पाण्याचा ओघही आटला होता.”

“बापरे, ही जरा वेगळीच भानगड दिसते.”

“रॉब्या, असं पुन्हापुन्हा  भानगड म्हणू नकोस, नाहीतर तुझी मान वाकडी करायला एक क्षणही लागणार नाही मला.” मावशी त्याला तीक्ष्ण दात दाखवत रागावली,

“बरं बाबा बरं, भानगड नव्हे तर हे वेगळच गणित म्हणूका?”

“ओके. तर, रॉब्या गुरुत्वाकर्षणाचं जे बल असतं, त्यावर मात करुन झाडाची मुळं पाणी वर चढवतात. त्यासाठी झाडात असलेल्या अतिशय पातळ झायलेम (झाडाच्या आतल्या पाईपसारखी नलिका) नावाची जलवाहिनी हे कार्य करतं. या पातळ जलवाहिन्या एखाद्या पंपासारखं फार उंचिवर पाणी नेऊ शकतात. या जलवाहिन्यांमधून, सलग साखळीसारखं पाणी वर जातं. पाण्याचे रेणू एकमेकांना घट्ट धरून ठेवतात.

“त्याने काय होतं?”

“त्यामुळे पाणी उलट्या दिशेने जाऊ शकत नाही.”

“भारीच म्हणायच हे सारं.”

“पंपांना जोडलेल्या नलिकांमध्ये पाणी ओढण्यासाठी जोर लावला तर पाण्याची धार मोडून त्यात हवेचे बुडबुडे तयार होत असल्याने पाणी आणखी वर ओढलं जाऊ शकत नाही. पण झायलेमच्या नलिकांचा परिघ फार कमी असल्याने त्या जास्त उंचिवर पाणी ओढू शकतात.”

“मग हे चांगलच नाही का? तरीही पाणी वर जाण्याचं गणित चुकतं कुठं?”

“हे जरी खरं असलं तरी नलिकांच्या भिंतीशी होणारं घर्षण आणि गुरुत्वाकर्षणाच्या बलावर मात करण्यासाठी झायलेमला बरीच उर्जा खर्ची करावी लागते.”

“याचाच अर्थ असा की, जशी अधिक उंची वाढते तशी या नलिकांची कार्यक्षमता घटते. बरोबर.”

“वारे मेरे इंटेलिजेंट मामू, अगदी बरोबर. हेच कॉखसाहेबांच्या लक्षात आलं. त्यामुळेच ११० मीटरपेक्षा अधिक उंचीवर रेडवूडच्या पानांना पाण्याची कमतरता जाणवत होती. पाण्याची कमतरता कमी म्हणजे कार्यक्षमता कमी.”

“पुढे काय झालं? कॉखसाहेबांनी काही निष्कर्ष काढला असेलना यावरुन.”

“होना. कोणत्याच झाडाची उंची १३० मीटरपेक्षा अधिक म्हणजे ४५ मजल्यांपेक्षा राहू शकत नाही असा निष्कर्ष त्यांनी काढला. तो त्यांनी २००४ साली नेचर मासिकात प्रसिध्द केला. जगभरातल्या मनुष्यप्राण्यांनी तो मान्यही केला. ही झाली तेव्हाची गोष्ट”

“म्हणजे कहानीमे ‍व्टिस्ट?”

“व्टिस्ट नाहीरे. पण, जगातलं सर्वात उंच झाड शोधण्याचं कार्य या उपदव्यापी माणसांचं संशोधन सुरुच ठेवलं. त्यातून त्यांनी कॅलिफोर्नियातच ११५ .९२ मीटर (३८०.३ फूट) उंचीचं ‘हायपेरियन’ हे झाडं शोधलं. हे झाड कोस्टल रेडवूड या नावानंसुध्दा ओळखलं जातं. २०२५ पर्यंतचं हे सर्वात उंच झाड ठरलय.”

मावशी ही माहिती देत असताना, जंगलातून वाघोबाने डरकाळी दिली. त्या आवाजाने मावशी दचकली. ‘अरे बापरे!’ असं तिच्या मुखातून उस्फुर्तपणे निघून गेलं.

“मावशे, एवढं घाबरायला काय झालं?”

“अरे, तो वाघोबा.”

“तो तर तुझा भाचराना, मग? ”

“त्याचा पणजोबा माझा भाचरा होता. हा मला ओळखेल की नाही कुणास ठाऊक. तो इकडे येण्याआधी इथून सटकेलेलं बरं.” असं मावशी म्हणत नाही तोच पुन्हा एक डरकाळी आली. मावशी गर्रदिशी मागे वळली नि भूत पाठिमागे लागल्यासारखी पळू लागली. रॉबिन्सनलाही तसे करण्यावाचून पर्याय उरला नाही. तोही मावशीच्या पाठिमागे पळू लागला.

 

सुरेश वांदिले