(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

वर्ल्ड टुरिझम आणि ट्रॅव्हल या संस्थेच्या अहवालानुसार गेल्या दीड दोड वर्षात प्रत्येक चार नोकऱ्यांमागे एक नोकरी किंवा रोजगार संधी ही पर्यटन आणि प्रवास क्षेत्राशी निगडीत आहे. जागतिक पातळीवर या कालावधीत निर्माण झालेल्या ३३४ मिलियन रोजगार संधींपैकी १०.६ टक्के रोजगार संधी या पर्यटन क्षेत्रातील आहेत. युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम संस्थेच्या अहवालानुसार २०२५ पर्यंत दरवर्षी  किमान  ३.३ टक्के पर्यटकांची वाढ सध्याच्या पर्यटकांमध्ये होऊ शकते. या बाबी लक्षात घेतल्यास भारतातही विपुल रोजगार संधी निर्माण होऊ शकतात. त्या अनुषंगाने पुढील संस्थांमधील अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतात.

(१) इंडियन इंस्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट सिरमौर-

 या संस्थेने, एमबीए इन टुरिझम मॅनेजमेंट, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कालावधी दोन वर्षे. कोणत्याही विषयातील पदवीधर हा अभ्यासक्रम करु शकतो.  खुल्या संवर्गातील उमेदवारास पदवी परीक्षेत किमान ५० टक्के  आणि अनुसूचति जाती, जमाती आणि दिव्यांगांना ४५ टक्के गुण मिळायला हवेत.

  या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला कॉमन ॲडमिशन टेस्ट (कॅट) मध्ये सुयोग्य गुण मिळायला हवेत. ही परीक्षा ज्याने दिली नसेल त्याला संस्थेमार्फत घेण्यात येणारी चाळणी परीक्षा द्यावी लागते. या दोन्ही चाळणी परीक्षेत सुयोग्य गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी पाचारण केलं जातं. त्यांनतर अंतिम निवड केली जाते.

काय शिकाल?

या अभ्यासक्रमात पुढील विषयांचा समावेश आहे – (१) पर्यटन संसाधने आणि व्यवसाय विकास, (२) पर्यटन उद्योजकता, (३) डेस्टिनेशन (विशिष्ट ठिकाण/स्थळ) नियोजन, (४) हवाईवाहतूक आणि हवाई दळणवळण व्यवस्थापन, (४) पर्यटन व्यवसायासाठी निगडित धोरणे आणि कायदेविषयक बाबी, (५) पर्यटकांची वर्तणूक, (६) आतिथ्यशीलता व्यवस्थापन, (७) पर्यटन आणि प्रवास कार्यान्वयन व विश्लेषण, (८) पर्यटन व्यवसायाशी निगडित विविध बाबी आणि मार्केटमधील संधी.

वर्गातील अध्ययन, प्रकल्प, प्रयोगशाळेतील कार्य, प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावरील अध्ययन, प्रकरणनिहाय अभ्यास अशा विविध बाबींचा समावेश अभ्यासक्रमात आहे. व्यवसाय आणि व्यवस्थापकीय कौशल्याची निर्मिती व्हावी यासाठी अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे.

संपर्क –  आयआयएम, सिरमौर, रामपूर घाट रोड, पाओतना साहीब, जिल्हा सिरमौर-१७३०२५, ईमेल-admission@iimssirmaur.ac.in, संकेतस्थळ- https://iimsirmaur.ac.in/mba-tourism

०००

(२) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, हैदराबाद

(१) एमबीए इन टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी. कालावधी दोन वर्षे. अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी.राखीव संवर्ग विद्यार्थ्यांना- ४५ टक्के.

(२) बीबीए इन टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी- कालावधी चार वर्षे. अर्हता- १२ वीतील कोणत्याही शाखेत ५० टक्के गुण. राखीव संगर्व ४५ टक्के गुण. दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते.

संपर्क- टेलकॉम नगर, गाचीबावली, हैदराबाद- ५०००३२, संपर्क- https://nithm.ac.in/

०००

(३) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट

एमबीए इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल. या क्षेत्राशी संबंधित हा महत्वाचा अभ्यासक्रम समजला जातो. या उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांमध्ये सर्व प्रकारची आव्हानं स्वीकारण्याचं कौशल्य आणि तंत्र प्रदान केलं जातं. एकूण ७५० जागा भरल्या जातात.

प्लेसमेंट

संस्थेने दिलेल्या माहितीनुसार (१) मेक माय ट्रिप, (२) थॉमस कूक, (३) ली पॅसेज टू इंडिया, (४) टीयूआय डॉट इन, (५) द रिट्ज कार्लटॉन, (६) कुओनी, (७) यात्रा डॉट कॉम, (८) हॉलिडे इन, (९) आयआरसीटीसी, (९) केरला हॉलिडे मार्ट, (१०) शेरॅटॉन हॉटेल्स ॲण्ड रिसॉर्टस, (११) बनायन टूर ॲण्ड ट्रॅव्हल, (१३) मॅरिऑट हॉटेल्स रिसॉर्ट, (१४) बाल्मर लॅवरी ट्रॅव्हल आणि व्हॅकेशन, (१५) पॅलेस ऑन व्हील्स, (१६) इंडियन हॉरिजॉन-इंडियन ट्रॅव्हल एजन्सी, (१७) जिंजर, (१८) ॲडव्हेंचर ट्रॅव्हल, (१९) ग्रीन ॲडव्हेंचर्स, (२०) ॲडव्हेंचर टुर्स इंडिया, (२१) हॅप्पी टूर-कॉर्पोरेट ट्रॅव्हल मॅनेजमेंट, (२२) राजविलास जयपूर आदी कंपन्यांमध्ये हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळालं आहे.

अर्हता – विद्याशाखेतील ५०  टक्के गुणांसह पदवी. राखीव संवर्गातील उमेदवारांना गुणांमध्ये टक्क्यांची सूट. यंदा पदवीची अंतिम परीक्षा दिलेले विद्यार्थी ही चाळणी परीक्षा देऊ शकतात.

ग्वाल्हेर, नॉयडा, नेल्लोर आणि भूवनेश्वर कॅम्पसमध्ये नाममात्र शुल्कात मर्यादित स्वरुपात निवासाची व्यवस्था करण्यात येते

प्रवेश प्रक्रिया

प्रवेशासाठी दोन पध्दती अवलंबण्यात येतात. () पुढील चाळणी परीक्षेपैकी कोणतीही एक परीक्षा दिलेली असावी- (१) मॅट- मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट, (२) कॅट- कॉमन ॲडमिशन टेस्ट, (३) सीमॅट- कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट, (५) झॅट- झेवियर ॲप्टिट्यूड टेस्ट , (६) जीमॅट- ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट, (७) असोशिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल मार्फत घेतली जाणारी एआयएमएस टेस्ट फॉर मॅनेजमेंट ॲडमिशन. (८) सीयुइटी-पीजी  २०२६ (सेंट्रल  युनिर्व्हसिटी एन्ट्रस टेस्ट- पोस्ट ग्रॅज्युएट) यापैकी कोणतीही परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना, आयआयटीएम ॲडमिशन टेस्ट द्यावी लागेल. ही परीक्षा ग्वाल्हेर, नॉयडा, भुवनेश्वर, नेल्लोर आणि इतर केंद्रांवर घेतली जाईल.

ही परीक्षा वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी पध्दतीची आहे. एकूण गुण १००. या पेपरमध्ये सामान्य अध्ययनाचे ५० प्रश्न, भाषिक कौशल्याचे २५ प्रश्न आणि सांख्यिकी कौशल्याचे २५  प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असून निगेटिव्ह गुण नाहीत. पेपरचा दर्जा हा पदवी परीक्षेचा असतो. ही परीक्षा किंवा उपरोक्त नमूद परीक्षेतील गुणांवर आधारित निवड विद्यार्थ्यांना मुलाखत आणि समूहचर्चेसाठी बोलावलं जातं. अंतिम निवड करताना प्रवेश चाळणी परीक्षेतील कामगिरीला ७०  टक्के वेटेज आणि समूहचर्चा व मुलाखतीसाठी प्रत्येकी  १५ टक्के वेटज दिलं जातं.

संपर्क – इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, गोविंदपुरी, ग्वाल्हेर- ४७४०११, दूरध्वनी- ०७५१-२४३७३००, ईमेल- admissions@iittm.ac.in, संकेतस्थळ-www.iittm.ac.in

०००

(३) महाराष्ट्र स्टेट इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटेरिंग टेक्नॉलॉजी, पुणे-

अभ्यासक्रम

(१) डिप्लोमा इन ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम, या अभ्यासक्रमाला १० वी नंतर प्रवेश घेता येतो. अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षे आहे. या अभ्यासक्रमाला तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रिभूत प्रक्रियेव्दारे प्रवेश दिला जातो.

काय शिकाल?

या अभ्यासक्रमात पुढील विषय घटकांचा समावेश आहे- (१) देशातील पर्यटन स्थळे, (२) भारताचा सांस्कृतिक इतिहास, (३) पर्यटनाचा प्रभाव, (४) परदेशातील पर्यटन स्थळे, (५) व्यवसाय पर्यटन, (६) पर्यटन संस्था  व्यवसायासाठी लागणारी साधनसामग्री, (७) पर्यटकांना सेवासुविधा पुरवण्यासाठी  आवश्यक असणारी कौशल्ये, (८) पर्यटन कागदपत्रे, (९) पर्यटनाचे विपणन (मार्केटिंग), (१०) व्यवस्थापन आणि मनुष्यबळ विकास, (११) हवाई प्रवासासाठीच्या तिकिटा, (१२) स्थळांचे नियोजन, (१३) उद्योजकता विकास, (१४) विविध जीवनकौशल्ये, (१५) पर्यटन व्यवसायाशी निगडित लेखाविषयक कौशल्ये, (१६) हॉटेल कार्यान्वयनच्या मुलभूत बाबी, (१७) इंग्रजी, (१८) संवाद कौशल्य, (१९) संगणकाचे ज्ञान.

फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश भाषा शिकण्याचा पर्याय दिला जातो. टूर एस्कॉर्ट, व्हिजा कागदपत्रे हाताळणी, वाहतूक व्यवस्थापन, साहस पर्यटन, वैद्यकीय पर्यटन हे काही एैच्छिक विषय अभ्यासासाठी निवडता येतात.

करिअर संधी

हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील संधी मिळू शकतात – (१) केसरी, वीणावर्ल्ड, थॉमस कूक, कॉक्स ॲण्ड किंग्ज, बीटीडब्ल्यू विजा सर्विसेस, ट्रॅव्हल मार्स्टस आदी टूर  ऑपरेटर्स कंपन्यामध्ये वेगवेगळया पदांसाठी प्लेसमेंट, (२) एअरलाइन्स, (३) इव्हेंट मॅनेजमेंट, (४) आयटी कंपनी, (५) स्वत:च्या पर्यटन कंपनीची स्थापना, इत्यादी.

(२) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल- हा अभ्यासक्रम कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधराला करता येतो. कालावधी एक वर्षं.

संपर्क-  ४१२-सी, के.एम.मुन्शी रोड, लक्ष्मी सोसायटी, मॉडेल कॉलनी, शिवाजी नगर पुणे- ४११०१६ दूरध्वनी- ०२०-२५६७७१८९

संकेतस्थळ- https://www.msihmctpune.org.in/

०००

(४) विश्वकर्मा युनिव्हर्सिटीमध्ये बीए इन  ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम करता येतो. कालावधी तीन वर्षे. संपर्क-https://admission.vupune.ac.in

सुरेश वांदिले