
ट्रास्कैडेकाफोबिया
तेजोमयीचे १२ पर्यंतचे पाढे पटापट पाठ झाले. तेराचा पाढ मात्र पाठ होण्याचे नावच घेईना. त्यामुळे तिला पाढे पाठ करण्याचा कंटाळा आला. तिची गाडी तेरावरच अडकली. हा तेरा आकडा काळ्या मांजरीचा सारखाच दिसतो. आडवा गेलाय मला. तेजोमयी बोलून गेली.
काय गं एकटीच कुणाशी बोलतेस तू… कोण तुला आडवा गेला म्हणालीस. बाबांनी विचारलं. तेव्हा तेजोमयीने तेरा आडवा गेल्याच सांगितलं.
बाबा, यावर मनमुराद हसले.
अगं तेरा आकडा, म्हणजे एखादा प्राणी आहे की काय, आडवा जायला..आणि समजा तो आडवा गेला म्हणून तुझी पाढे पांठातर गाडी, पंक्चर झाली का?
हो ना हो बाबा, १२ पर्यंतचे पाढे कसे पटापट पाठ झाले. पण १३ ने मात्र नाकी नऊ आणले.. बाबा हा १३ नंबर अशूभ असतो, असं एकदा मी वाचलं होतं. तसं तर झालं नसेल.
अगं बाई, निर्जीव असणारा १३ आकडा कसा काय अशूभ राहू शकतो. खर तर कोणताच आकडा अशूभ राहू शकत नाही. पण काही देशांमध्ये १३ आकड्यास चांगलं समजत नाही. त्यामुळे त्या देशात १३ क्रमांकाच्या खोल्या नसतात. १३ क्रमांकाचे आसन नसते. विमानात १३ क्रमांकाची ओळ नसते. १३ तारखेला शुक्रवार आला नि त्या दिवशी एखाद्यास काळी मांजर दिसली तर मोठे संकटच कोसळणार असं समजलं जात. तेराच्या या भीतीने अनेकजण पछाडेले असतात. त्यांना ट्रास्कैडेकाफोबिया झालाय असं समजलं जातं.
बापरे बाप..ट्रास्कैडेकाफोबिया हे नाव घेताघेताच दमछाक व्हायला लागलीय..फारच डेंजरस दिसतोय हा १३. पण बाबा या १३ मध्ये मध्ये इतकी अशूभ शक्ती आली तरी कुठून हो?
अगं, कसली शक्ती नि कसलं काय…कुणीतरी चारपाच व्यक्ती गैरसमजूत करुन घेतात. त्यावरच चर्चा करतात, चर्चा वाढवत राहतात.
पण बाबा, अशा पोकळ चर्चेमुळे थोडीच भीती वाढणार ना..काहीतरी सतत अघटित झालेलच असणार..
अगं बाई, एखादं-दुसरी घटना घडलीही असेल तेरा तारखेला..पण अशा दुर्घटना प्रत्येकच तारखेस घडू शकतात की..म्हणून काय प्रत्येक आकडा अशूभ समजायचा का..नाही ना..
तेही बरोबरच आहे म्हणा..
अगं उलट प्रत्येक आकडा आपल्याला आवडला पाहिजे..म्हणजे तुझा कंटाळा जाईल नि तेराचा पाढाही पाठ होईल झटदिशी..
होय बाबा
पण, तू इतकीही १३ च्या प्रेमात पडू नकोस नाहीतर तुला ट्रायस्कैडेफिलिआ झाल्याचं समजलं जाईल.
आँ…
हाँ..जे १३च्या खूप प्रेमात पडतात ना त्यांना असं समजलं जातं..
आँ…
हाँ.. बाबा प्रत्युत्तरात म्हणतातच दोघांच्याही चेहऱ्यावर हसू आलं.
सुरेश वांदिले