डबलच्या तावडित टोळी
अवकाशाच्या पोकळीत कितीतरी अद्भूत गोष्टी सारख्या घडतात.काही दिवसांपूर्वी मानवी यानाने धुमकेतूला धडक दिली.पृथ्वीवरची जीवसृष्टीची निमिर्ती कशी झाली असेल या रहस्याचं भेद करण्यासाठी ही धडक उपयुक्त ठरेल असा ठाम विश्वास शास्त्रज्ञांना आहे.ही धडक पृथ्वीपासून कोटयावधी मैलावर घडली.ही धडक आणि त्या नंतर जे काही घडलं ते सर्व शास्त्रज्ञांनी पृथ्वीवर आपल्या प्रयोगशाळेत कॉफी पित पित बघितलं.यासर्व चित्तथरारक घटना संगणक-कॉम्पुटर नियंत्रित दुर्बिणी बघत होत्या.त्या होत्या पृथ्वीवरील प्रयोगशाळेपासून लाखो किलोमीटर दूर.तरी शास्त्रज्ञांनी ही घटना अगदी जवळून बघितलं आणि त्याच्या विश्लेषणाचं कामही तात्काळ सुरु केलं.
पृथ्वीपासून काही लाख किलोमीटर दूर मानवानं हबल नावाची दुर्बिण एखाद्या उपग्रहासारखी फिरती ठेवली आहे.ही दुर्बिण मानवासाठी तिसऱ्या डोळयाचं काम करते.अंतराळात काय चाललय याची बित्तंबातमी हबल दुर्बिण ठेवते.शंकराचा तिसरा डोळा विशिष्ट प्रसंगी उघडला जायचा.पण मानवाचा हा तिसरा डोळा 24 तास उघडा असतो.अंतराळात ताऱ्यांचा स्फोट होऊन ते नष्ट होतात.ज्या ठिकाणी प्रकाशही शिरु शकत नाही असं ब्लॅक होल-कृष्ण विवर तयार होतं.ताऱ्यांच्या गर्भात हैड्रोजन आणि हेलियम हे वायू असतात.ताऱ्याच्या स्फोट होतो तेव्हा आपली पृथ्वी किमान 50 हजारवेळा नष्ट होईल एवढी उर्जा बाहेर फेकली जाते.अशा अनेक चमत्कारसदृष्य गोष्टी हबल बघत असते.शनी ग्रहाभोवतीची चमत्कारिक रिंग हबलने जवळून अनुभवली आहे.गुरु ग्रहाचे 20-25 चंद्र ही दुर्बिण कायमच बघत असते.पृथ्वीच्या चंद्राची जी बाजू आपल्यालाकधीच दिसत ती हबलने बघितली आहे.सूर्यावर उठणारे काळे ढग किंवा पट्टेही ही दुर्बिण बघते.सूर्यावर उठणाऱ्या प्रचंड वादळांच अंतरंगही या दुर्बिणिने बघितले.मानवाने अंतराळात पाठवलेल्या एका यानाने नुकताच एक पृथ्वीसारखा ग्रह आणि त्याच्या अवती भोवती असणारे तीन सूर्यांना बघितल्याचं आपणा सर्वांच्या कानावर आलच आहे. बोलता बोलता टिल्लू थांबला.
एखाद्या रहस्यमय कादंबरितील प्रकरणाचं वाचन जसं केलं जातं तसं त्याचं बोलणं होतं.एका खास बैठकीसाठी त्याने आपल्या टोळीला मंत्रालयाजवळील एअर इंडियाच्या इमारतीजवळ बोलावलं होतं. त्याच्या टोळीमध्ये कल्याणी,तेजोमयी आणि टंकलूचा समावेश होता.त्यांना एका रहस्याचा शोध घ्यायचा होता. त्यासाठी टिल्लू आणि टोळी गेल्या काही दिवसापासून विविध प्रकारे प्रयत्न करित होती. पुस्तक वाचत होती. आपापसात चर्चा करत होती.पण रहस्याचा शोध काही लागत नव्हता.
या टोळीला मुंबईतून पळून जाऊन हॅगवार्टच्या जादूच्या शाळेत नाव टाकायचं होतं. पण काही केल्या याशाळेचा पत्ता लागत नव्हता. तेजोमयीचा काका लंडनला शिकण्यासाठी होता.त्याला तिने पावणे दहा क्रमांकाचा प्लॅटफार्म कुठे आहे हे शोधायला सांगितल, पण अकरा वेळा लंडनला पालथे टाकूनही त्याला पावणे दहा क्रमांकाचा प्लॉटफार्म दिसला नाही.
टिल्लू टोळीने मुंबईत सीएसटी, चर्चगेट, कुर्ला टर्मिनस,बांद्रे टर्मिनस येथे डोळे फाडून फाडून पावणे दहा क्रमांकाच्या प्लॅटफार्मचा शोध घेतला पण त्यांना हा प्लॅटफार्म दिसला नाही. त्यामुळे हा प्लॉटफार्म आहे की नाही ही शंका या टोळीला येऊ लागली.असल्या काही शंका आल्या तर त्या पालीसारख्या हाकलून लावा, असं परवाच विज्ञान शिकविणाऱ्या सरांनी टिल्लू आणि कंपनीला सांगितलं होतं.त्यामुळे त्यांनी ही शंका फार काळ आपल्या जवळ ठेवली नाही. जादूच्या शाळेत जायचच असं त्यांनी ठरवलं.
पण कुठे मिळेल पत्ता ? या रहस्याचा शोध घेण्यासाठी ही टोळी एअर इंडियाच्या इमारतीजवळ गोळा झाली होती.
“जादूच्या शाळेचा पत्ता आपल्याला हबल दुर्बिणिद्वारे कदाचित लागेल असं टिल्लू म्हणाला. मग या दुबिर्णीजवळ कसं जायचं किंवा तिच्या पर्यंत हा संदेश कसा पोहचवायचा? “असं तेजोमयीनं विचारलं.
“धुमकेतूच्या धडकेनंतर जे विश्लेषण शास्त्रज्ञांनी केलं त्यामधूनही जादूच्या शाळेचा पत्ता लागू शकेल”.टिल्लू म्हणाला.
” ह्या फक्त जर आणि तरच्या शक्यता झाल्या. “
जादूच्या शाळेचा शोध घेण्याच्या गप्पा रंगात आल्या होत्या.गप्पा करत करत टोळीने एअर इंडियाच्या इमारतीला दोनदा फेरा मारला. पण जादूच्या शाळेच्या रहस्यापर्यंत कसं पोहोचायचं हे त्यांना कळेना.त्यांच्या या हालचालीकडे लक्ष ठेऊन असलेल्या एका माणसाने शेवटी त्यांना हटकलेच.
” कोण रे तुम्ही, ” तो जोराने म्हणाला. “येथे काय करताय तुम्ही मघापास्नं. ” त्याने विचारले.
“जादुच्या शाळेच्या रहस्याचा शोध घेतोय. “टिल्लूने न घाबरता सांगितलं. अशा प्रसंगी तो कधीच घाबरायचा नाही.टिल्लू घाबरला नाही म्हणून टोळीतील इतर सदस्यही पोपटासारखे बोलू लागले.
” तुम्ही कोण आम्हाला विचारणारे, “तेजोमयीने डोळे मोठ्ठे करीत विचारले.
“मी हबलचा भाऊ डबल. “तो माणूस आकाशाकडे पाहत म्हणताच टोळी हादरलीच.
” हबल वर असते, तुम्ही खाली काय करताय. “
“तुमच्यावर लक्ष ठेऊन आहे. तुम्ही शाळा सोडून जादूच्या शाळेत जाण्याचं प्लानिंग करताहात. “
” तुला कसं कळलं? “
” कारण मी डबल आहे. “
“मग डबल्या, जर तुला हे कळलं तर त्या तुझ्या हबल नावाच्या बहिणीला विचारुन आम्हाला जादुच्या शाळेचा पत्ता देना. “
“तिला काही विचारायची गरज नाही. “
“म्हणजे तुला प्लॉटफार्म नंबर पावणे दहा ठाऊकाय. “
“आहे ना. “
“हुर्रे “टोळी एकमुखाने ओरडली.
“पत्ता सांगना रे,पत्ता सांगना रे” असं टोळितील प्रत्येकजण लाडे लाडे म्हणू लागला.
“सांगेन.पण एका अटिवर. “
तुझ्या सर्व अटी आम्हाला मान्य आहे”टोळी एकमुखाने म्हणाली.
“माझी अट ही आहे की मी पत्ता सांगितल्यावरही या शाळेत तुम्ही जायचं नाही. “
“कां पण? “तेजोमयी आश्चर्यानं म्हणाली.
“अट मान्य असेल तर सांगा. “
टोळीने नाईलाजाने अट मान्य केली.
” पत्ता कधी सांगतोस. “टिल्लू अधिरतेने म्हणाला
” अगदी सोप्पा आहे तो. “
” व्हाट? “कल्याणी किंचाळली
“जादुची शाळा वसली असते आपल्या प्रत्येकाच्या मनात. या शाळेत आपल्याला कधीही, केव्हाही जाता येतं, आणि परतता येतं.या शाळेत जाण्यासाठी पावणे दहा प्लॉटफार्मची गरज नसते. “डबल म्हणाला.
“हे तू आम्हाला सांगायची गरज नाही.ते आम्हालाही कळतं. “
” कळतं पण वळत नाही. तसं असतं तर गेल्या दहा दिवसापासून तुम्ही जादूच्या शाळेचा पत्ता शोधण्यासाठी आपला किमती वेळ दवडत आहात की नाही. ते कां? “
या प्रश्नाचं उत्तर कुणालाच देता आलं नाही. तेव्हा डबलच म्हणाला, “अरे जादू बिदू कथा कादबंऱ्यात ठीक आहे.पण प्रत्यक्षात तसं काहीही नसतं.जादुचा आनंद थोड्यावेळपुरता घेऊन आपल्या जगात यायचं. तुमचं जग म्हणजे खेळ मस्ती,गप्पा आणि अभ्यास.हे सोडून तुम्ही जादुच्या शाळेचा शोध काय घेत बसलात. “
“हँ, हू”,असं म्हणत टोळीने डबलच्या बोलण्याला थंड प्रतिसाद दिला. तेवढयात बुट्टे विकणाऱ्या माणसाने स्वीटकार्न आणून दिले.समुद्राच्या लाटाकडे बघत बघत टोळी स्वीट कार्न खाऊ लागली..
