(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

तो लहान होता, तेव्हापासूनच त्याला आकडेमोडीची गोडी लागली. गणितीय आकडेमोड करुन वेगवेगळ्या समस्या सोडवता येतात, हे त्याला तेव्हा कळलं. त्यामुळे त्याची आकडेमोडितील रुची आणि गती वाढली. यातूनच तो संगणकशास्त्राच्या अभ्यासाकडे वळला. संगणकीय तंत्रज्ञनाच्या प्रभावी वापरासाठी आणि वेगवेगळया सामाजिक समस्यांच्या सोडवणुकीसाठी ‘डेटा’ आणि ‘आकडेवारी’ महत्वाची भूमिका बजावते, हे त्याच्या लगेच लक्षात आल्याने, त्याने या विषयात स्वत:ला झोकून दिलं.

संगणकशास्त्रााचं ज्ञान प्राप्त करत असतानाच, आपण ज्या समाजात राहतो, त्याच्या भल्यासाठी स्वत:चं योगदान द्यायला हवं, असं त्याला सारखं वाटत राहतं. त्याचं वाटणं केवळ मनातले मांडे नसतात. तो त्यादृष्टिने प्रयत्नही सुरु करतो. उदाहरणच द्यायंच झाल्यास, दिल्लीचं प्रदुषण! या प्रदुषणांनं दिल्लीकरांना अनंत समस्यांना तोंड द्यावं लागतं. हे प्रदुषण नेमकं असतं तरी किती? याची मोजमाप करायला हवं, असं त्याच्या मनाने घेतलं. मग काय, त्याने या संदर्भातील माहितीचा साठा म्हणेजच ‘डेटा’ गोळा केला नि त्याचं खोदकाम म्हणा किंवा विश्लेषण करुन दिल्लीतील प्रदुषणावर देखरेख ठेवणारं डिजिटल मॉडेल (प्रारुप) तयार केलं. याचा उपयोग प्रदुषण नियंत्रण ठेवण्याच्या विविध उपाययोजना करण्यासाठी झाला. त्याचे सगळे प्रयत्न हे अशा प्रकारे डिजिटल युगाशी सुसंगत असतात. सध्या तो सोनपत येथील अशोका युनिव्हर्सिटितून कॉम्प्युटर सायंस, या विषयात शिक्षण घेत आहे.

कोणत्याही समस्यांच्या मुळाशी जायला ‘डेटा’चा मार्ग त्याला सुलभ वाटतो. हा ‘डेटा-मार्ग’ त्याला गेल्या वर्षी ऑफ्रिकेत घेऊन गेला. तिथे ‘सिस्टोसामेसेस’ या परजिवीनजन्य (पॅरॉसाइट) आजारावर मात करण्याचं संशोधन आणि या आजारावरील उपचाराच्या पध्दती एका संशोधन पथकामार्फत शोधल्‍या जात आहेत. आफ्रिकेत ज्या आजारामुळे सर्वाधिक मृत्यू होतात, त्यात ‘सिस्टोसामेसेस’ या आजाराचा दुसरा क्रमांक लागतो. हा तीव्र स्वरुपाचा संसर्गजन्य आजार आहे. यामुळे दरवर्षी दोन लाखाच्या आसपास लोक मृत्यूमुखी पडतात. या संशोधन पथकाव्दारे सगळ्यांना परवडू शकतील अशा अत्यल्प दरातील उपचार साधन शोधलं जात आहे. या पथकात स्टॅनफोर्ड विद्यापीठीतील बायोइंजिनीअरिंग विषयातील पीएचडी करणारे  ३ विद्यार्थी होते. तो, या संशोधन पथकातला सर्वात लहान आणि एकमेव अंडर ग्रॅज्युएट सदस्य होता. या पथकाला उपचार पध्दतीचा शोध घेण्यासाठी साहाय्यभूत ठरणारं, मशिन लर्निंग मॉड्यूल त्याने (सॉफ्टवेअर) विकसित करुन दिलं. त्यासाठी त्याची ‘डेटा’सोबतची मैत्री फार उपयुक्त ठरली.

इकडे दिल्लीत, त्याने तपमान नियंत्रण करणाऱ्या विटांच्या निर्मितीमध्ये आपलं “डेटा” योगदान दिलं. या प्रकारच्या विटा वापरल्यास एअर कंडिशनरचा वापर कमी करावा लागलो. त्यामुळे उर्जेची बचत होते आणि प्रदुषणालाही आळा बसतो.

खेडयापाड्यात असणाऱ्या संगणकीय निरक्षरतेची त्याला फार चिंता वाटते. अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना संगणकांचं मूलभूत ज्ञान नसल्याबद्दल तो खेद व्यक्त करतो. तळागाळातील विद्यार्थ्यांना सुलभतेनं तंत्रज्ञान शिकता यावं यासाठीचं मॉड्युल तयार करण्याचं त्याचं स्वप्न आहे. वैद्यकीय क्षेत्रातील वेळखाऊ आणि अकार्यक्षम कामांना, स्वयंचलितपणे करण्याचं तंत्रही त्याला शोधायचय.

तर, असा हा वैभव शोकीन. वय वर्षे २१. हल्ली मुक्काम दिल्ली.

सुरेश वांदिले