डेटा सायंटिस्ट
डेटा सायन्स या विषयातील अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना सध्याच्या काळात विविध क्षेत्रांमध्ये उत्तमोत्तम करिअर संधी मिळू शकतात. यामध्ये टेलिकम्युनिकेशन, एविएशन, कृषी, बँकिंग, आरोग्यसेवा आणि सुविधा, रिटेल, मॅन्युफॅक्चुरिंग, आदी क्षेत्रांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. डेटा सायन्स विषयाशी निगडीत विविध घटकांचे प्रशिक्षण घेऊन स्वत:च्या ज्ञानाचे उन्नतीकरण करण्याऱ्या विद्यार्थ्यांना अशा अनेक संधी मिळू शकतात.
मिळणाऱ्या संधी
पायथान, आर, एसएस अशा सारख्या संगणकीय भाषा आणि गणितीय घटकांचा अभ्यास केलेल्या असे विद्यार्थी उद्योग जगताला हवे असतात. त्यांना (१) बिझिनेस ॲनॅलिटिक्स, (२) डेटा सायंटिस्ट, (३) डेटा इंजिनीअर्स, (४) रिस्क ॲनॅलिस्ट, (५) रिटेल डेटा ॲनॅलिस्ट, (६) आयटी प्रोसेस मॉडेलर, (६) इंडस्ट्रिअल डेटा सायंटिस्ट, (७) प्रोसेस ॲटोमेशन स्पेशॅलिस्ट, (८) प्रेडिक्टिव्ह मेंटनन्स इंजिनीअर, (९) क्लिनिकल डेटा ॲनॅलिस्ट, (१०) मेडिकल डेटा ॲनलिस्ट, (११) चॅटबॉट डेव्हलपर, (१२) क्रेडिट रिस्क ॲनॅलिस्ट आदी जबाबदाऱ्या मिळू शकतात.
डेटा सांयस मधील अभ्यासक्रम केलेल्या काही विद्यार्थ्यांना २२ ते ३० लाखांपर्यंतचे वार्षिक वेतन काही कंपन्यांनी देऊ केले आहे. नुकतेच पदवीधर झालेल्या डेटा इंजिनीअर आणि मशिन लर्निंग इंजिनीअर्सना काही कंपन्यांनी १४-१५ लाखांचे वार्षिक वेतन दिले आहे. डेव्ह ॲप इंजिनीअर्सना १२ लाख रुपयांचे वार्षिक वेतन मिळाले आहे. सात- आठ वर्षांमध्ये अशा डेटा इंजिनीअर्सचे वार्षिक वेतन हे ४० ते ४५ लाख रुपयांपर्यंत पोहचू शकते. मॅक्वायर ग्रुप, ॲमॅझॉन, वॉल्टर्स क्लुवर, एजरेड अनॅलिटिक्स, इंटिग्रिटी सोल्युशन, एनएसडब्ल्यू गव्हर्नमेंट, व्हिट्टेल बिग डेटा ॲनॅलिटिक्स सेंटर, ओसीबी बँक, सॅविल्स व्हिएतनाम, आयटीआर व्हिएतनाम आदी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना चांगले प्लेसमेंट मिळाले.
गेल्या वर्षीच्या आयआयटी गौहाटीमधील एमटेक – डेटा सायंस, हा अभ्यासक्रम केलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲक्सेंच्युर, ॲक्सट्रिया, सिस्को, एचसीएल, आयबीएम, मायक्रोसॉफ्ट, एमटीएक्स, ओरॅकल, सॅप लब्स, केपीएमजी, लेनोव्हो, रेडहार्ट, टेराडेटा, इंडिजेन, मॉर्निंगस्टार, एचडीएफसी, व्होडाफोन आयडिया अशा सारख्या कंपन्यांमध्ये तत्काळ प्लेसमेंट मिळाले.
वाढती उपयुक्तता
(१) डेटा सायंटिस्ट, त्यांच्यासमोर आलेल्या माहिती साठा प्रतिमा किंवा व्हिडीओचा सखोल अभ्यास करुन आणि त्यावर आधारित निष्कर्ष काढतात. सध्या जगातील विविधांगी उद्योग आणि व्यवसायाच्या दैनंदिन समस्यांच्या निराकरणासाठी प्रभावी उपाय सुचवू शकतात. (२) डेटा सायंटिस्ट सेन्सॉर, कॅमेरा, न्युरल नेटवर्क आणि मशिन लर्निंग अल्गॉरिथम्स यांचा उपयोग करतात. मानवी भावभावना, संभाषण यांचाही उपयोग केला जातो. (३) बँक आणि फिनटेक कंपन्यांकडे कर्जासाठी येणाऱ्या ग्राहकांची अर्हता, पात्रता वस्तुनिष्ठरित्या तपासणाऱ्या मॉडेल्सची निर्मिती डेटा सायंटिस्ट करु शकतात. (४) मुलांच्या अवैध वाहतुकीच्या समस्येच्या निराकरणासाठी या विषयातील तज्ज्ञ माहितीचे विश्लेषण करुन उपाय सुचवू शकतात. (५) ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, नेटफ्लिक्स, यू ट्यूब सारख्या माध्यमांना त्यांच्या ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार, व्यक्तिगत स्वरुपाच्या सेवा/वस्तू/उत्पादने यांचा अधिकाधिक पुरवठा करण्यासाठी डेटा सायंटिस्ट, माहितीच्या साठ्याचे विश्लेषण करुन व्युहनीती ठरवू शकतात. यामुळे या कंपन्यांची विक्री आणि नफ्यात वाढ होऊ शकते. (६) कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करुन डेटा सायंटिस्ट यांनी परीक्षेतील गैरव्यवहार थोपवता येतील असे मॉडेल्स तयार केले आहेत. (७) नोकरीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या क्षमतेचे अचुक विश्लेषण करणारे मॉडेल्सही विकसित केले आहेत. (८) कॉम्प्युटर व्हिजन तज्ज्ञांचीही गरज वाढली आहे. (९) वैद्यकीय क्षेत्रातील डेटा अधिक सोप्या पध्दतीने डॉक्टर आणि सर्वसामान्यांना उपलब्ध करुन देता येणे शक्य झाले आहे.
वाढती मागणी
डेटा सायंटिस्ट यांना लिनिअर अलजेब्रा, कॅलक्युलस, प्रॉबेबलिटी, स्टॅटिस्टिक्स, पायथॉन प्रोग्रॅमिंग, डेटा बेस मॅनेजमेंट, बिग डेटा, डेटा व्हिज्युलायझेशन, मशिन लर्निंग डीप लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेस, बिझिनेस डोमेन या घटकांमध्ये प्रशिक्षित केले जाते. बुध्दिमत्तेला आव्हान देणारे, उत्तम वेतन देणारे आणि उत्कृष्ठ करिअर संधी उपलब्ध करुन देणारे हे अभ्यासक्रम असल्याने या विषयाकडे अधिकाधिक विद्यार्थी आकर्षित होत आहेत.
आयआयटी गौहाटीच्या, स्कूल ऑफ डेटा सायंस ॲण्ड आर्टिफिशिअल इंटिलिजन्सचे प्रमुख रणजित भट्टाचार्य यांच्या मते, बहुतेक सर्वच उद्योगांमध्ये माहितीच्या साठ्याचा विश्लेषणावर भर देण्यात येत असल्याने डेटा सायंटिस्टची मागणी दिवसेंदिवस वाढत चाललीय. दररोज माहितीचा साठा निर्माण होत असून, त्यातून कंपनी/ उदयोगासाठी अचूक आणि उपयुक्त माहितीचा शोध घेणे आणि त्याचे विश्लेषण करणे हे अत्यंत फायदेशीर ठरु शकते.
डेटा सायंटिस्टसना, सांख्यिकी, संगणक शास्त्र, व्यवसाय/ उद्योगाच्या मुलभूत बाबी शिकवण्यात येत असल्याने ते उद्योग /व्यवसायांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण प्रभाविरीत्या करु शकतात.
मनुष्यबळ विकास क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या टिमलिझ कंपनीने नुकताच एक अहवाल प्रकाशित केला असून त्यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या क्षेत्रात सध्या भारतात ४५ हजाराच्या आसपास मनुष्यबळाची गरज असल्याचे नमूद केले आहे. क्रिटिकल ॲण्ड इर्मजिंग टेक्नॉलॉजी, या क्षेत्रासाठी भारत अमेरिका या दोन देशांनी सहकार्यासाठी गेल्या वर्षी स्वाक्षऱ्या केल्या असून या करारात कृत्रिम बुध्दीमत्तेच्या क्षेत्रावर सर्वाधिक भर देण्यात आला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील सर्वोच्च पातळीवर रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात निर्माण होतील. या अहवालानुसार भारतात कृत्रिम बुध्दीमत्ता या विषयातील ४ लाखाच्या आसपास तज्ज्ञ किंवा प्रशिक्षित मनुष्यबळ आहे. ही संख्या या विषयातील एकूण जागतिक मनुष्यबळाच्या १६ टक्के आहे. मात्र ८० टक्के भारतीय मनुष्यबळाचे कौशल्य हे कृत्रिम बुध्दीमत्तेविषयी जागितक उद्योगांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास फारसे सक्षम नसल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. २०२२ मध्ये कृत्रिम बुध्दीमत्तेला विकसित करण्यासाठी जागतिक तुलनेत भारतात केवळ १.५ टक्के इतकी गुंतवणूक झाली. त्यामुळेच आता नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळ – एनएसडीसी) या संस्थेने डेटा सायंस या विषयाशी निगडित लघु मुदतीचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. स्केलर या तंत्रशैक्षणिक कंपनीच्या सहकार्याने एनएसडीसीने डेटा सांयस या विषयातील विविध घटकांमध्ये कौशल्य विकसित करणे, कौशल्य वृध्दींगत करणे आणि कौशल्य उन्नतीकरण करणे यासासाठी सहकार्य करार केला आहे. त्यानुसार मशिन लर्निंग, डेटा ॲनॅलिटिक्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनीअर्सना नव्या उदयमान क्षेत्रासाठी आवश्यक अशा कौशल्य निर्मितीची संधी उपलब्ध झाली आहे. ही कौशल्यनिर्मिती, (१) डीबी क्युरी लँग्वेज, (२) स्क्रिप्टिंग, (३) डीप लर्निंग, (४) नॅचरल लँग्वेज प्रोसेस, (५) रि-इनफोर्समेंट लर्निंग, (६) पेडेक्टिव्ह ॲनॅलिटिक्स, (६) रोबोटिक्स, न्युरल नेटवर्क, (७) क्लाऊड कॉम्प्युटिंग,आदी घटकांमध्ये केली जाते.
०००
एमएस-डेटा सायंस ॲण्ड मॅनेजमेंट
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदौर आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंदौर या दोन संस्थांनी एकत्र येऊन मास्टर ऑफ सायन्स इन डेटा सायंस ॲण्ड मॅनेजमेंट, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. अर्हता- बीटेक/ बीई/ बीएस/ बीफार्मा, बीआर्क, बीडिझाइन, बी. फॅशन टेक्नॉलॉजी, चार वर्षे कालावधीचा बीएस्सी, एमएस्सी, एमसीए, एमबीए.
या अभ्यासक्रमाला कॅट (कॉमन ॲडमिशन टेस्ट), गेट (ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग), जीमॅट (ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट), जीआरई (ग्रॅज्युएट रिकॉर्ड एक्झामिनेशन), जॅम (जॉईंट एन्ट्रन्स फॉर मास्टर्स) यापैकी कोणत्याही एका स्पर्धा परीक्षेचे मागील तीन वर्षाचे गुण ग्राह्य धरले जातील.
या परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिल्या नसतील त्यांना, डेटा सायंस ॲण्ड मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट ही स्पर्धा परीक्षा द्यावी लागेल. ही परीक्षा इंदौर येथे घेतली जाईल. ही परीक्षा ऑनलाइन देण्याची सुध्दा सुविधा आहे. संपर्क – दूरध्वनी – ०७३१-२४३९७३६, संकेतस्थळ- msdsm.iiti.ac.in , ईमेल – msdsm-office@iimidr.ac.in आणि msdsm-office@ iiti.ac.in