(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

डॉक्टर होण्यासाठी…

समाजामध्ये मान- सन्मान-प्रतिष्ठा आणि पैसा मिळवून देणारा व्यवसाय म्हणजे डॉक्टरकी. त्यामुळेच एमबीएबीएस प्रवेशासाठी विद्यार्थी जिवाच्या आकांताने प्रयत्न करतात. करिअर घडवणाऱ्या विविध ज्ञानशाखा असल्या तरी वैद्यकीय शाखेचाच सर्वाधिक आणि सर्वप्रथम पालक विचार करतात. ८ वी किंवा ९ वीत मुलगा किंवा मुलगी गेली की तेव्हापासूनच पालक मंडळी त्यांचा पाल्य डॉक्टर झाल्याचे किंवा एमबीबीएसला प्रवेश मिळाल्याचे स्पप्न बघू लागतात. तुला काय व्हाययचय, असे त्यांच्या पाल्याला कुणी विचारलं आणि त्याने, डॉक्टर व्हायचय असं उत्तर दिलं की, पालकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्यात गैर काहीही नाही.

तथापि, आपल्या देशात डॉक्टर होण्याची इच्छा असलेले विद्यार्थी आणि एमबीबीएसच्या पहिल्या वर्षासाठी असलेल्या जागा, यांचे प्रमाण फार व्यस्त आहे. इच्छूक विद्यार्थ्यांच्या एक टक्काही अशा जागा नाहीत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी नीट (नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट- अंडर ग्रॅज्युएट) या परीक्षेत उच्च दर्जाची कामगिरी करावी लागते. खाजगी महाविद्यालयांमध्ये सुध्दा प्रवेशासाठी या परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जातात. तिथेही स्पर्धा असते. अशा संस्थांचे प्रवेश शुल्क हे धडकी भडवणारे असले तरी ते भरण्याची तयारी असलेल्या पालकांची संख्याही मोठी असते. त्यामुळे खाजगी संस्थांच्या प्रवेशासाठीही विशिष्ट गुण प्राप्त करणे आवश्यक ठरते.

उच्च कामगिरी,मोठा फायदा

नीट परीक्षेत जर अत्युच्च श्रेणिची कामगिरी करता आली तर त्याचे बरेच लाभ होऊ शकतात. उदाहरणार्थ, विद्यार्थ्याने, पुणे येथील ऑर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज मधील प्रवेशाचा पयार्य स्वीकारला तर त्याला संपूर्ण अभ्यासक्रमासाठी कोणतेही शुल्क लागत नाही. अभ्यासक्रम आणि पुढचे प्रशिक्षणादी सोपस्कार पार पाडल्यावर अशा उमेदवारांना अधिकारी पदावर थेट नियुक्ती दिली जाते.

जोधपूर येथील ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसचे २०२१ चे प्रवेश शुल्क अवघे १३५० रुपये होते. नवी दिल्ली येथील ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसचे (एम्स) २०२१ चे प्रवेश शुल्क अवघे १६२८ रुपये होते. एम्सचे रायपूर आणि भुवनेश्वरचे शुल्क ५८५६ रुपये होते. नागपूरसह इतरही एम्सचे प्रवेश शुल्क सुध्दा अल्पच आहे.

लेडी हार्डिंग्ज मेडिकल कॉलेज नवी दिल्लीचे शुल्क ६ हजार ७७५ रुपये, मौलाना आझाद मेडिकल कॉलेज नवी दिल्लीचे शुल्क- १९,२६५ रु, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायंसेस नवी दिल्लीचे शुल्क – २३,९३० रुपये, जवाहरलाल इंस्टिट्यूटट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन ॲण रिसर्च पुड्डीचेरीचे शुल्क- ३४,५०० रुपये आणि उस्मानिया मेडिकल कॉलेज हैदराबादचे प्रवेश शुल्क ५२ हजार २५० रुपये होते.

अभ्यासात कसूर नको

या अल्प आणि अत्यल्प शैक्षणिक शुल्काचा लाभ घ्यावयाचा असेल, तर नीट परीक्षेच्या अभ्यास आणि सरावात कोणताही कसूर सोडता कामा नये. यानंतर भविष्यात नागरी सेवा परीक्षेच्या (सिव्हिल सर्व्हिस) वेळेसच अशा अत्यंत कठीण स्पर्धेस तोंड द्यावे लागू शकते.

महत्वाची महाविद्यालये

गेल्या काही वर्षात पुढील वैद्यकीय महाविद्यालांनी आपला दर्जा आणि गुणवत्ता आबाधित राखला आहे. साधारणत: या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी  विद्यार्थ्यांचा कल दिसून येतो. () ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस, नवी दिल्ली,

() ऑर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज, पुणे,  () मौलाना आझाद मेडिकल कॉलेज नवी दिल्ली, () जवाहरलाल इंस्टिट्यूटट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन ॲण रिसर्च पुड्डीचेरी, () इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, वाराणसी, () किंग्ज जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी, लखनौ, () वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज, नवी दिल्ली, () युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायंस, नवी दिल्ली, () लेडी हार्डिंग्ज मेडिकल कॉलेज, नवी दिल्ली, (१०) ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई, (११) उस्मानिया मेडिकल कॉलेज हैदराबाद, (१२) ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस ,जोधपूर, (१३) ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस भूवनेश्वर, (१४) बी.जे मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेज- पुणे, (१५) ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस ,रायपूर, (१६) राजेंद्र प्रसाद गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कांग्रा, (१७) जीएस मेडिकल कॉलेज ॲण्ड केईम रुग्णालय- मुंबई, (१८) लोकमान्य टिळक महापालिका वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत वैद्यक रुग्णालय – मुंबई, (१९) महात्मा गांधी इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस – सेवाग्राम, (२०) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, (२१) इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, (२२) जे.जे वैद्यकीय महाविद्यालय मुंबई.

परीक्षेची तयारी

यंदा नीट (यूजी) परीक्षा १७ जुलै २०२२, रोजी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी दोन महिने मिळतील. याकाळात ११/१२ वीमधील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषायाच्या विविध घटकांमधील संकल्पना स्वयंस्पष्ट करुन घेणे आवश्यक आहे. नीट परीक्षा पाठांतराचे कौशल्य किंवा स्मरणशक्तीची तपासणीची परीक्षा नाही ही बाब कायम लक्षात ठेवावी. कोणताही विषय घटक सोडू नये. अशा परीक्षेत हा घटक कमी महत्वाचा आणि दुसरा घटक जास्त महत्वाचा, असे अजिबात करु नये. या परीक्षेसाठी असलेल्या अभ्यासक्रमानुसार प्रत्येक घटक नजरेखालून घालणे आवश्यक आहे. शिकवणी वर्गाचे संचालक, अमूक घटकावर अधिक भर द्या तमूकवर कमी प्रमाणात भर द्या , असे सांगण्याची शक्यता असते. तिकडे लक्ष न देता, जे विषय घटक (टॉपिक्स) अशा संचालकांच्या मते कमी महत्वाचे ठरतात, ते सुध्दा आवर्जून समजून घ्यायलाच हवे. समज-आकलन- संकल्पनेची स्पष्टता-वेगळा विचार करण्याचे कौशल्य आदी बाबींची तपासणी प्रश्नांव्दारे केली जाते.

प्रश्नपत्रिका निर्धारित केलेल्या विषयघटकांवरच आधारित असते. काही प्रश्न वेगळया तऱ्हेने विचारले जातात. संकल्पना स्पष्ट असतील तर अशा प्रश्नातली गुगली लक्षात येते. ज्यांच्या संकल्पना स्पष्ट नसतात किंवा काही विषय बिनमहत्वाचे असल्याचे समजून जे विद्यार्थी अभ्यासत नाहीत, त्यांची विकेट जाऊ शकते. नीट (यूजी) परीक्षेचा पेपर १३ भाषांमध्ये असेल. त्यात मराठीचाही समावेश आहे. इंग्रजीचा शब्द वा वाक्याचा अर्थ लागत नसल्यास, मराठी भाषेच्या पेपरवर लक्ष टाकायला हरकत नाही. मात्र गरज असेलच तरच असे करावे. अन्यथा इंग्रजी – मराठी किंवा मराठी-इंग्रजी करण्यात बहुमूल्य वेळ वाया जाऊ शकतो. या परीक्षेत प्रत्येक सेकंद आणि प्रत्येक गुण महत्वाचा ठरतो. प्रश्नाचे अचूक उत्तर ठाऊक असल्यासच सोडवावे कारण, चुकलेल्या उत्तरासाठी गुण कापला जातो. पेपरचा कालावधी ३ तास २० मिनिटांचा असेल. २०२१ साली नीटसाठी असलेलाच अभ्यासक्रम यंदा आहे. त्यात कोणताही बदल करण्यात न आल्याचे एनटीए स्पष्ट केले आहे. हा अभ्यासक्रम ,

https://neet.nta.nic.in/ या संकेतस्थ्ळावर बघायला मिळू शकतो.

या परीक्षेचे गुण एमबीबीएस प्रवेशासासोबतच, बीएएमएस, बीएचएमस, बीडीएस, बीयुएमएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील. सरावासाठी गेल्या वर्षीचे पेपर https://nta.ac.in/Downloads या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येतात. यंदापासून गुणपत्रिका ब्लॉकचैन तंत्राचा वापर करुन दिली जाईल. यासाठी आयआयटी कानपूरचे सहाय्य घेण्यात आले आहे.

परीक्षा केंद्रे-

ही परीक्षा देशातील ५७२ केंद्रांवर घेण्यात येईल, यामध्ये महाराष्ट्रातील पुढील केंद्रांचा समोवश आहे- भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, उस्मानाबाद, पालघर, नंदुरबार, परभणी, रायगड, वर्धा, वाशिम, यवतमाळ, अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर, ठाणे, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे. यापैकी कोणत्याही चार केंद्रांचा पर्याय अर्ज भरताना द्यावा लागतो. एकदा नमूद केलेले केंद्र पुन्हा बदलता येत नाही.

प्रत्येक परीक्षा केंद्रावर करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक राहील. या केंद्रांवर एन ९५ मास्क दिला जाईल, तो घालणे बंधनकारक आहे.

नॅशनल टेस्टिंग एजंसीने नीट परीक्षेसाठी संदेश ॲप, विकसित असून तो डाऊनलोड करण्याची विनंती करण्यात आली आहे. या ॲपवर नीट संदर्भातील महत्वाच्या सूचना तत्काळ देण्यात येतील. हा ॲप गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊन लोड करता येतो.

संपर्क – हेल्पलाइन – ०११-६९२२७७००, ईमेल-neet@nta.ac.in

 सुरेश वांदिले(ekank@hotmail.com/९३२४९७३९४७)