आधुनिक काळाशी सुसंगत आणि उद्योग विश्वाच्या तंत्रज्ञानविषयक गरजा भागवण्यासाठी नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरु करण्यात इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) ही संस्था आघाडीवर असते. आयआयटी मंडीने, यंदा पासून “इंटिग्रेटेड एमबीए”, असा पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम असून अभ्यासक्रमाची तीन वर्षे पूर्ण झाल्यावर, “बीबीए इन बिझिनेस ॲनॅलिटिक्स” ही पदवी आणि पाच वर्षे पूर्ण झाल्यावर, “एमबीए इन डाटा सायंस ॲण्ड आर्टिफिशिअल इंटेलिजन्स” ही पदवी प्रदान केली जाईल. नवीन शैक्षणिक धोरणानुसार इच्छूक विद्यार्थ्यांना तीन वर्षानंतर अभ्यासक्रम सोडता येतो. अशा विद्यार्थ्यांना, “बीबीए इन बिझिनेस ॲनॅलिटिक्स” आणि चार वर्षानंतर अभ्यासक्रम सोडू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना “बीबीए (ऑनर्स) इन बिझिनेस ॲनॅलिटिक्स” ही पदवी प्रदान केली जाईल.
प्रवेश प्रकिया
सर्व आयआयटीमधील प्रवेश हे जेइइ ॲडव्हान्स्ड परीक्षेतील गुणांवर, संयुक्त प्रवेश प्रकियेव्दारे केल जातात. त्यामध्ये कोणत्याही आयआयटीचा व्यक्तीगत हस्तक्षेप नसतो. मात्र इंटिग्रेटेड एमबीए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रकिया, आयआयटी मंडी स्वत: राबवणार आहे.
(१) प्रारंभिक चाळणीसाठी काही अटीशर्तींसह जेइइ-मेन परीक्षेतील मधील गुण ग्राह्य धरले जातील. (या अटीशर्तींची माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.)
(२) जे इच्छूक विद्यार्थी या अभ्यासक्रमाठी अर्ज करतील त्यांची गुणवत्ता यादी, जेइइ मेन- २०२४ मधील गुणांवर आधारित तयार केली जाईल.
(३) त्यातील निवडक विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावलं जाईल.
(४) प्रवेशासाठी ७० टक्के वेटेज जेइइ मेन मधील गुण आणि ३० टक्के वेटेज मुलाखतीच्या गुणांना दिले जातील.
(५) या अभ्यासक्रमासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना १२ वी विज्ञान शाखेत किमान ७० टक्के आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना ६५ टक्के गुण मिळायला हवेत. १२ वीमध्ये गणित आणि इंग्रजीचा अभ्यास करणे आवश्यक.
(६) https://iitmandiadm.samarth.edu.in/imba/index.php/ या लिंक व्दारेच अर्ज सादर करावा लागेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जून २०२४ आहे. चाळीस विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. यामध्ये भारत सरकारच्या नियमानुसार राखीव जागांचा समावेश आहे.
नवी संधी
हा अभ्यासक्रम यंदाच सुरु होणार असल्याने काहींच्या मनात, प्रवेशासाठी अर्ज करावा की करु नये, हा प्रश्न निर्माण होईल. या प्रश्नाला फार हवा देऊ नये. याचं महत्वाचं कारण म्हणजे, पाच वर्षानंतर या अभ्यासक्रमाची पहिली तुकडी बाहेर पडेल, तेव्हा मोठ्या प्रमाणावर बिझिनेस ॲनॅलिस्ट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायंस या विषयाचे तज्ज्ञ लागतील. पुढील पाच वर्षात या अभ्यासक्रमाची आणखी चर्चा होत राहील. शिवाय आयआयटी ब्रँडचा उद्योग विश्वात मोठा प्रभाव पडतो. या संस्थेकडे असणारे अनुभवी उच्च प्रशिक्षित प्राध्यापक, अत्याधुनिक प्रयोगशाळा, उद्योग विश्वाशी असलेली संपर्क साखळी, इंटर्नशीप आणि प्लेसमेंटच्या सुविधा याबाबींचा लाभ विद्यार्थ्यांना होईल.
यंदा हा अभ्यासक्रम नवा असल्याने तुलनेने स्पर्धा कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र पुढील वर्षापासून या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीही प्रचंड स्पर्धा राहू शकते.
वैशिष्ट्यूपर्ण संरचना
(१) या अभ्यासक्रमाची संरचना वैशिष्ट्यूपर्ण असून व्यवस्थापकीय संकल्पना आणि गणितीय व सांख्यिकीय संकल्पना, ॲनॅलिटिक्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डाटा सायंस या विषयांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.
(२) व्यावसायिक नितीमत्ता, व्यावसायिक कायदे, इतर जीवन कौशल्य यांचेही शिक्षण प्रशिक्षण दिले जाईल.
(३) प्रकल्पआधारित अभ्यासक्रमामुळे उद्योगासाठी लागणा-या नेमक्या कौशल्याची ओळख विद्यार्थ्यांना होईल.
(४) विद्यार्थ्यांना दोन इंटर्नशीप कराव्या लागतील. यापैकी एक सहा महिने कालावधीची असेल.
(४) स्टार्टअप सारख्या संकल्पनेव्दारे स्वत:चा उद्योग सुरु करावयाचा असल्यास संस्थेमार्फत साहाय्य केलं जाईल.
संपर्क- https://www.iitmandi.ac.in/
०००
कौशल्य तंत्रज्ञान
महाराष्ट्र कौशल (महाराष्ट्र स्किल युनिव्हर्सिटी) विद्यापीठाने संगणक तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान आणि मेकॅट्रॉनिक्स शाखेतील बी.टेक अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
(१) संगणक तंत्रज्ञान
या अभ्यासक्रमात संगणक तंत्रज्ञान, संगणकाची कार्यप्रणाली, प्रोग्रॅमिंग, कोडिंग, वेब डेव्हलपमेंट, डाटाबेस डिझाइन या विषय घटकांचं सखोल ज्ञान प्रदान केलं जातं. यामुळे विद्यार्थ्यांना हार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्क, डाटाबेस या घटकांची परिपूर्ण माहिती मिळते. संस्था आणि कंपन्यांमधील संगणकीय समस्यांना विद्यार्थी सक्षमपणे भिडू शकतात. या समस्यांची कारणमीमांसा शोधून त्यांच्या निराकरणाचे उपाय सुचवू शकतात. तसेच नव्या प्रोग्रॅमची निर्मिती, नव्या संकल्पना अंमलात आणू शकतात.
प्राप्त होणारे कौशल्य
हा अभ्यासक्रम केल्यावर, (१) मशिन लर्निंग, (२) डाटा सायंस, क्लॉऊड कॉम्प्युटिंग, (३) जावा सर्टिफिकेशन, (४) स्ट्रक्चर्ड क्युरी लँग्वेज (एसक्यूएल) डेव्हलपर, (५) हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज (एचटीएमएल), (६) प्रोजेक्ट मॅनेजमेंट, (७) परकीय भाषा आदी कौशल्य विद्यार्थी हस्तगत करतात.
(२) बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम केल्यावर- (१) रेड हॅट सिस्टिम ॲडमिनिस्ट्रेटर, (२) इंसिडंट रिस्पांस ॲण्ड थ्रेट इंटेलिजन्स, (३) रोबोटिक्स ॲण्ड ऑटोमेशन, (४) इंटरनेट ऑफ थिंग्ज ऑन क्लाऊड, (५) जावा सर्टिफिकेशन, (६) स्ट्रक्चर्ड क्युरी लँग्वेज (एसक्यूएल) डेव्हलपर, (७) हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज (एचटीएमएल), (८) परकीय भाषा आदी कौशल्य प्राप्त होतात.
(३) बीटेक इन मेकॅट्रॉनिक्स हा अभ्यासक्रम केल्यावर- (१) मटेरिअल ॲनॅलिसीस, (२) इंजिनीअरिंग डिझाइन ॲण्ड मॉडेलिंग, (३) डिजिटल इलेक्ट्रॉनिक डिझाइन, (४) पायथॉन प्रोग्रॅमिंग, (६) मशिन डिझाइन, (७) डाटा कम्युनिकेशन, (८) एम्बेडेड सिस्टिम डिझाइन, (९) व्हायब्रेशन ॲण्ड कंट्रोल, (१०) परदेशी भाषा हे कौशल्य प्राप्त होतात.
हे अभ्यासक्रम नवी मुंबई आणि पुणे कॅम्पसमध्ये चालवले जातात. यामध्ये ४० टक्के हा सैध्दांतिक भाग आणि ६० टक्के प्रत्यक्ष कामाचा (ऑन जॉब ट्रेनिंग) भाग आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार या अभ्यासक्रमातून दोन आणि तीन वर्षानंतर बाहेर पडण्याची सुविधा आहे. दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर डिप्लोमा, तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर बॅचलर ऑफ व्होकेशन आणि ४ वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर बीटेक ही पदवी प्रदान केली जाईल.
प्रवेशासाठी अर्हता-
(१) १२ वी विज्ञान शाखा (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित)- खुला संवर्गातील विद्यार्थ्यांना ५० टक्के आणि राखीव संवर्गातील ४५ टक्के गुण मिळायला हवेत. (२) तीन वर्षे कालावधीचा अभियांत्रिकी/तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम- खुला संवर्ग – ५० टक्के गुण आणि राखीव संवर्ग ४५ टक्के गुण. (३) एक वर्षं कालवधीचा आयटीआय (ट्रेड) आणि एक वर्षाची उद्योगामध्ये केलेली अप्रेंटिसशीप किंवा दोन वर्षे कालावधीचा आयटीआय (ट्रेड) आणि १२ वी समकक्ष अभ्यासक्रम प्रमाणपत्र.
अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. १२ वी, एमएच-सीइटीचे गुण अपलोड करावे लागतात. अशा विद्यार्थ्यांना संस्थेची ऑनलाइन चाळणी परीक्षा द्यावी लागते.
संपर्क- महाराष्ट्र स्टेट स्किल युनिव्हर्सिटी, एलफिंन्स्टन टेक्निकल स्कूल, महापालिका मार्ग, धोबी तलाव मुंबई- ४००००१, संपर्कध्वनी-०८६५५९४६६५
०००
बीटेक-एमबीए
इंदिरा गांधी दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटी फॉर वुमेन या संस्थेत, ” बीटेक (इन मेकॅनिकल ॲण्ड ऑटोमेशन इंजिनीअरिंग)- एमबीए” हा ड्युएल डिग्री अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी सहा वर्षाचा आहे. चार वर्षानंतर अभ्यासक्रमातून बाहेर पडण्याची सुविधा आहे. अशा विद्यार्थ्यांना, बीटेक पदवी प्रदान केली जाते. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी, जेइइ मेन परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. एकूण जागांपैकी १५ टक्के जागा या देशस्तरीय आहेत. १२ वीमध्ये रसायनशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी हे विषय घेतलेले असावेत. सरासरीने ६० टक्के गुण मिळणं आवश्यक.
या संस्थेत, बीटेक इन (१) कॉम्प्युटर सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, (२) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, (३) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग हे अभ्यासक्रमही करता येतात.
या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रकिया सुरु झाली आहे. ही संस्था दिल्ली सरकारने स्थापन केली आहे. शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जामुळे महत्वाच्या कंपन्या, उद्योग प्लेसमेंटसाठी जातात. या संस्थेत केवळ महिलांनाच प्रवेश दिला जातो.
संपर्क-https://www.igdtuw.ac.in/
सुरेश वांदिले