(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाच्या प्रवेश माहिती पुस्तिकेत सामायिक प्रवेश प्रकिया (कॉमन ॲडमिशन प्रोसेस- कॅप) च्या सर्व फेरींच्या प्रक्रियेची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. ही माहिती, पालक व विद्यार्थ्यांनी समजून घेतली तर कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

महत्वाच्या बाबी

(१) सामाजिक शैक्षणिक मागास (एसईबीसी) प्रवर्गासाठी  १० टक्के जागा राखीव आहेत. (२) महिला उमेदवारांसाठी ३० टक्के जागा आरक्षित ठेवल्या जातात. तथापि हे आरक्षण दिव्यांग, संरक्षण आणि अनाथ संवर्गातील महिला उमेदवारांना लागू नाही. (३) खुल्या संवर्गातील महिला उमेदवारांच्या जागा रिक्त राहिल्यास त्या याच संवर्गातील पुरुषांना आणि मागास संवर्गातील महिला उमेदवारांच्या जागा शिल्लक राहिल्यास त्या याच संवर्गातील पुरुष उमेदवारांना दिल्या जातील. (४) इतर मागास प्रवर्गातील जागा रिक्त राहिल्या त्या विशेष मार्ग प्रवर्गातील उमेदवारांना जास्तित जास्त दोन टक्केच्या मर्यादेत दिल्या जातील.

प्रवेश सूत्र

(१) एसएससी (दहावी) नंतर प्रथम वर्ष पदविका प्रवेशाचे सूत्र- (१) सर्व शासकीय, अशासकीय अनुदानित संस्था, स्वायत्त संस्था (अल्पसंख्याक संस्था वगळून)- (अ) मूळ जिल्ह्यातील जागा -७० टक्के, (ब) इतर जिल्ह्यातील जागा- ३० टक्के, (क) या संस्थांमध्ये अल्पसंख्याकांसाठी जागा राखीव नाहीत.

(२) सर्व शासकीय, अशासकीय अनुदानित अल्पसंख्याक संस्था ( स्वायत्त संस्थांसह) -(अ) मूळ जिल्ह्यातील जागा – ३५ टक्के, (ब) इतर जिल्ह्यातील जागा- १५ टक्के, (क) अल्पसंख्याकांसाठी ५० टक्के जागा राखीव.

(३) शासकीय संस्था- अल्पसंख्याकांसाठीच्या तुकड्या- (अ) मूळ जिल्ह्यातील जागा – २१ टक्के, (ब) इतर जिल्ह्यातील जागा- ९ टक्के, (क) अल्पसंख्याकांसाठी ७० टक्के जागा राखीव.

(२) एचएससी (१२वी) नंतर पदविका अभ्यासक्रम प्रवेश सूत्र-

(१) सर्व शासकीय, अशासकीय अनुदानित संस्था, स्वायत्त संस्था (अल्पसंख्याक संस्था वगळून)- (अ) सर्वसाधारण जागा -१०० टक्के (ब) अल्पसंख्याक कोटा नाही.

(२) सर्व शासकीय, अशासकीय अनुदानित अल्पसंख्याक संस्था ( स्वायत्त संस्थांसह) – (अ) सर्वसाधारण जागा – ५० टक्के, (ब) अल्पसंख्याक कोटा- ५० टक्के

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

(१) १० वीनंतर प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रम- सर्व संवर्गातील उमेदवार- (१) राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, (२) एसएससी गुणपत्रिका, (३) १० वी उत्तीर्ण झाल्यावर शाळा सोडल्याचा दाखला, (४) लागू असल्यास-इंटरमिजिएट ग्रेड ड्रॉईंग परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, (५) लागू असल्यास-एचएससी/एचएससी व्होकेशनल गुणपत्रिका आणि सोडल्याचा दाखला

(२) १२ वीनंतर प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रम -सर्व संवर्गातील उमेदवार-(१) राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, (२) एचएचसी गुणपत्रिका, (३) एसएससी गुणपत्रिका, (३) १२ वी उत्तीर्ण झाल्यावर शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला, (४) लागू असल्यास-इंटरमिजिएट ग्रेड ड्रॉईंग परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र,

प्रवेश प्रकियेच्या वेळी काही सवलत किंवा सुट मिळवायची असेल तर अधिकृत प्रमाणपत्रे सादर करावी लागतात. ही प्रमाणपत्रे पुढील अधिकाऱ्यांनी दिलेली असावित-

(१) आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) प्रमाणपत्र- (१) तहसिलदार, (२) उपविभागीय अधिकारी, (३) उपजिल्हाधिकारी, (४) ‍जिल्हाधिकारी, (५) महानगर दंडाधिकारी किंवा योग्य प्राधिकरण

(२) नॉन क्रिमि‍लेअर प्रमाणपत्र – (१) उपविभागीय अधिकारी, (२) उपजिल्हाधिकारी, (३) ‍जिल्हाधिकारी, (४) महानगर दंडाधिकारी किंवा योग्य प्राधिकरण.

(३) ट्युशन फी वेव्हर योजनेसाठी वार्षिक उत्त्पनाचे प्रमाणपत्र – (१) तहसिलदार, (२) उपविभागीय अधिकारी, (३) उपजिल्हाधिकारी, (४) ‍जिल्हाधिकारी, (५) महानगर दंडाधिकारी किंवा योग्य प्राधिकरण

दिव्यांग प्रकार

दिव्यांगांसाठी ५ टक्के आरक्षण ठेवण्यात येते. त्यासाठी पुढील दिव्यांगाचा विचार केला जातो-

(१) मानसिक आजार, (२) लोकोमोटर अक्षमता, (३) कमी दृष्टी, (४) कुष्ठरोग बरा झालेली व्यक्ती, (५) बहिरा, (६) मल्टिपल स्क्लेरोसीस, (७) सेरेब्रल पाल्सी, (८) ऐकायला कठीण जाणे, (९) पार्किंसन आजार, (१०) बुटकेपणा, (११) भाषा आणि बोलणे अक्षमता, (१२) हेमोफेलिया, (१३) स्नायुंची स्वीकृती, (१४) बौध्दिक अक्षमता, (१५) थॅलेसेमिया, (१६) ॲसिड हल्लाग्रस्त, (१७) विशिष्ट शिक्षण अक्षमता, (१८) सिकल सेल आजार, (१९) अंधत्व, (२०) एकापेक्षा अधिक अपंगत्व, (२१) ऑटिझम स्पेक्ट्रम डिसॉर्डर

प्रवेश प्रकिया

अर्ज ऑनलाइनच भरावा लागतो. त्यासाठी सुविधा केंद्रांची व्यवस्था केली जाते. अर्ज अंतिम करण्यापूर्वी, त्यात काही त्रुटी राहिल्या असतील किंवा दुरुस्त्या करायच्या असतील तर, त्या या केंद्रावर जाऊन करता येतात. प्रवेश शुल्क खुल्या संवर्गासाठी ४०० रुपये तर राखीव संगर्वासाठी ३०० रुपये. अर्ज सादर करताना आवश्यक मूळ प्रमाणत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड कराव्या लागतात.

कागदपत्रांची प्रत्यक्ष छाननी केली जाते त्याचबरोबर, “ई स्क्रुटिनी” ही कार्यप्रणाली/पध्दती वापरली जाईल. उमेदवार त्याच्या सोईनुसार छाननीची पध्दत स्वीकारु शकतो.

ई-स्क्रुटिनी – (१) यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. (२) कोणत्याही ठिकाणावरुन इंटरनेटशी जोडलेल्या लॅपटॉप अथवा स्मार्टफोनच्या मदतीने अर्ज सादर करता येतो आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करता येतात. (३) उमेदवारास अर्जाच्या पडताळणीसाठी आणि निश्चितीसाठी कोठेही जाण्याची गरज नाही. (४) उमेदवाराने ऑनलाइन अर्ज दाखल केल्यावर, ई-स्क्रुटिनी पध्दतीच्या सुविधा केंद्रांव्दारे अर्जाची पडताळणी केली जाते. अर्ज व कागदपत्रे निश्चित केले जातात. (४) सुविधा केंद्राकडून, ई- स्क्रुटिनीसाठी उमेदवाराच्या अर्जाची निवड होण्यापूर्वी, त्यात काही दुरुस्ती करावयाची असल्यास ती करता येते. तशी सुविधा उमेदवाराच्या, “लॉग-इन”च्या स्वरुपात असेल. (५) सुविधा केंद्रात एकदा अर्जाची निश्चिती झाल्यावर अर्जातील माहितीत बदल करता येत नाही. (५) कोणत्याही दुरुस्त्या असल्यास त्याबाबत तक्रार नोंदवता येते. (६) या स्क्रुटिनी प्रकियेत त्रुटी आढळली नाही तर अर्ज आणि अपलोड केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करुन अर्ज निश्चित केला जातो. याविषयीची माहिती उमेदवाराच्या “लॉग-इन” मध्ये उपलब्ध असेल व त्याला याची पोच पावतीही दिली जाते. (७) अर्जात त्रुटी आढळल्यास त्या “लॉग-इन”व्‍दारे उमेदवारांना दुरुस्तीसाठी कळवण्यात येतात. (८) उमेवारास दुरुस्ती केलेला अर्ज पुन्हा सादर करावा लागतो. दुरुस्तीसाठीचे कागदपत्रे किंवा (गरजेनुसार) सवलतीच्या दाव्यांसाठीचे कागदपत्रे अपलोड करावे लागतात. (८) अर्जातील दावा सिध्द करण्यासाठी वैध आणि सुसंगत कागदपत्रे सादर करावी लागतात. तसे न केल्यास एखादी सवलत मिळवण्यासाठी केलेला दावा उमेदवार गमावतील. अशा दाव्यांचा विचार न करता अर्जाची निश्चिती केली जाते.

(२) प्रत्यक्ष स्क्रुटिनी – हा पर्याय मोबाइल किंवा संगणकाव्दारे सुचित करुन स्वीकारता येतो.

(१) प्रत्यक्ष स्क्रुटिनीसाठी उमेदवार, सर्वात जवळच्या सुविधा केंद्रात जाऊन त्याच्या सोईचा दिवस आणि वेळ ठरवू शकतो. (२) यावेळी सुविधा केंद्र प्रमुख आवश्यक कागदपत्रांची मूळ प्रतीनुसार पडताळणी करेल. (३) ऑनलाइन प्रक्रियेव्दारे अर्जाची निश्चिती केल्याचे उमेदवारांना कळवले जाते व पोचपावती दिली जाते.

(४) अर्जातील दावा सिध्द करण्यासाठी वैध आणि सुसंगत कागदपत्रे सादर करावी लागतात. तसे न केल्यास हा दावा उमेदवार गमावतील. अशा दाव्यांचा विचार न करता अर्जाची निश्चिती केली जाते. (४) सुविधा केंद्रावर एकदा अर्ज अंतिमरित्या सादर केल्यावर उमेदवारास माहिती बदलता येणार नाही.

गुणवत्ता यादी प्रकाशित झाल्यावर, ती ई स्क्रुटिनी पध्दतीचा अवलंब केलेल्या उमेदवारांना “लॉग-इन” प्रक्रियेव्दारे पाठवली जाते. याच माध्यमातून आक्षेपही नोंदवले जातील.

प्रत्यक्ष स्क्रुटिनीचा पर्याय स्वीकारलेल्या उमेदवारांना गुणवत्ता यादीवर आक्षेप घ्‍यावयाचा असल्यास, आधी निवडलेल्या सुविधा केंद्रावरच जाऊन हा आक्षेप नोंदवावा लागेल. अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाते. अभ्यासक्रम व संस्थांचे विकल्प ऑनलाइन पध्दतीने भरता येतात. ते कमित कमी १  जास्तित जास्त ३०० पर्यंत असू शकतात.

एखाद्या संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर दुसरी संस्था बदलून दिली जाऊ शकते. त्यासाठी काही अटी-शर्ती टाकल्या जातात. त्याची विस्‍तृत माहिती नियम पुस्तिकेत दिलेली आहे.

संपर्क संकेतस्थळ- https://poly25.dtemaharashtra.gov.in/diploma25/

सुरेश वांदिले