बाबांच्या स्वप्नात “ताईचा” हत्ती यावा, असं वैष्णवीस परवा वाटलं. “त्या”, ताईची गोष्ट ऐकून ती फार प्रभावीत झाली होती. या ताईला तिच्या मनासारखं शिकायला मिळालं. पण आपल्याला तसं मिळेल की नाही, याची शंका सध्या वैष्णवीला सारखी येऊ लागली होती.
वैष्णवी आठवीत शिकते. गेल्या काही दिवसांपासून तिच्या घरी, ” वैष्णवीने हे व्हायला हवं नि ते व्हायला हवं”, अशी चर्चा तिचे आईबाबा आणि घरी येणाऱ्या त्यांच्या जवळच्या मित्रांमध्ये होऊ लागली.
वैष्णवी खूपच हुषार असल्याची तिच्या बाबांची समजूत. त्यामुळे तिच्या हुषारीला केवळ वैद्यकीय क्षेत्रातच खरा न्याय मिळू शकेल, असं काहीसं तिचे बाबा एकदा आईला बोलून गेले. ते ऐकल्यावर आधी आईने, आँ केला. याचा अर्थ तिला बाबांचं सांगणं कळलं नसावं असा होता.
“म्हणजे, तिने डॉक्टर व्हायला हवं, असं तुम्हाला म्हणायच का? आईने विचारलं.”
“हो हो हो, अगदी बरोबर, वैष्णवी इतकी हुषार आहे की तिला मेडिकलला सहजच प्रवेश मिळेल.” बाबा स्वत:वरच खुष होऊन म्हणाले. सहामाही आणि वार्षिक परीक्षेत चांगले गुण मिळतात म्हणून वैष्णवीस ते खूप हुषार समजत.
वैष्णवीच्या कानावर ही चर्चा हळूहळू येऊ लागली. आत्तापासून यांना मला डॉक्टर करण्याची कां बरं घाई झालीय? असं तिला वाटू लागलं. डॉक्टरचं नाव कानावर पडलं तरी तिच्या पोटात कससंच व्हायच. तिला खरा रस होता धावण्यात! तिला पी.टी.उषासारखं धावपटू होऊन ऑलंपिकमध्ये सुवर्ण पदक जिकांयचं,तीचं स्वप्न आहे. त्यामुळे धावण्यात ती खूप रमते. धावण्याच्या लहानमोठ्या सर्वच स्पर्धांमध्ये भाग घेते. तिला बक्षिसही मिळतात. शाळेत याचं खूप कौतुक होतं. घरी, आई कधीतरी कौतुकाचे दोन बोल बोलते. मात्र बाबा, “हं ! अच्छा…बरं बरं…” एव्हढीच प्रतिक्रिया देतात.
धावण्यात रमणारी नि त्यात तासनतास घालवणारी वैष्णवी बाबांना अजिबात आवडत नसे. त्यामुळेच यंदा उन्हाळ्याच्या सुटीत त्यांनी, मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या पूर्वतयारीचा आठवीपासूनचा “नीट” परीक्षेचा क्लास लावून दिला.
“कसं बरं समजवायचं बाबांना?” वैष्णवी विचार करु लागली.
देवाने तिची प्रार्थना ऐकली असावी. कारण तिच्या कानावर “ताईची” गोष्ट पडली.
ही ताई म्हणजे कार्तिकी. तिचं आडनाव गोन्साल्विस. ते महत्वाचं नाही.
महत्वाचं हे की, परवा ऑस्कर चित्रपट सोहळ्यात कार्तिकीताईने दिग्दर्शित केलेल्या हत्तीवरील एका डॉक्युमेंट्रीस ऑस्कर मिळालं. बाबा, वैष्णवी आणि आई तिघेही हा सोहळा बघत होते. कार्तिकीताईला पुरस्कार जाहीर झाला तेव्हा जणूकाही त्यानांच पुरस्कार मिळाल्याचं समजून बाबांनी जोरजारात टाळया वाजवल्या. वैष्णवीकडे बघून ते म्हणाले, “बघ बघ, असं यश मिळवायचं असतं.”
“म्हणजे हो काय बाबा?” असं वैष्णवीला विचारावं वाटलं. पण ती गप्प बसली. ही कार्तिकीताई आपल्या मदतीला येऊ शकते असं तिला त्याक्षणी वाटलं.
सोहळा संपल्यावर सगळेजण झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर वैष्णवीने गुगल महाराजांना कार्तिकीताई बद्दल प्रश्नांवर प्रश्न विचारले. गुगल महाराजांनी दिलेली उत्तरं बघून कार्तिकीताईच आपल्या मदतीस येऊ शकते याची तिला खात्री पटली.
दुसऱ्या दिवशी सकाळी, बाबा पेपर वाचत असताना, ती त्यांच्याकडे जाऊन सांगू लागली, “कार्तिकीताईचे बाबा आयआयटी मद्रास येथे कॉम्प्युटर सायंस विषयाचे प्राध्यापक आहेत.”
“अरे वा!”
“तिच्या आईने, पूर्व युरोपीय देशांचा अभ्यास करुन पीएचडी मिळवलीय.”
“वा मस्त, छान!” अशी प्रतिक्रिया देऊन बाबांनी पेपरमध्ये डोकं खुपसलं.
लगेच त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक? पेपर बाजूला ठेवत वैष्णवीला विचारलं…
“अगं पण, तू मला हे कां बरं सांगतेस?”
“अहो बाबा, कार्तिकीताईचे आईबाबा इतके हुषार म्हणजे तीसुध्दा खूप हुषार असणारच ना!”
“हं, असायला पाहिजे.”बाबा म्हणाले.
“पाहिजे नाही बाबा, असणारच.”
“बरं मग?”
“ही ताई इतकी हुषार असूनही फोटोग्रॅफी आणि फिल्ममेकिंग शिकली.”
“अगं, पण तू हे मला कां सांगतेस?” बाबांनी पुन्हा विचारलं.
“अहो बाबा, तिच्या आवडीचं शिकली म्हणूनच हत्तीवरची डाक्युमेंट्री, ती करु शकली ना…”
“अगदी बरोबर.”
“म्हणूनच तिला तुम्ही म्हणता तसं, जबरदस्त यश मिळालं.”
“अगदी बरोबर.”
“समजा तिची हुषारी बघून तिच्या आईबाबांनी तिला आयआयटीत टाकलं असतं तर ती, फार तर कॉम्प्युटर इंजिनीअर बनली असती.”
“अगदी बरोबर.” बाबा बोलून गेले.
“अगं तू, वाट्टेल ते काय मला सांगत बसलीस?” ते लगेच स्वत:ला सावरत म्हणाले. वैष्णवीचा आटापिटा कशासाठी चाललाय हे बहुदा त्यांच्या लक्षात आलं असावं.
तिच्या डोळयात बघून ते काहीशा कठोर आवाजात म्हणाले, “हे बघ, कार्तिकीने काय केलं किंवा नाही केलं, हे मला सांगू नकोस. तुला डॉक्टरच व्हायचय हे लक्षात ठेव.”
दोघांचा संवाद तिथेच थांबला.
आजचा पेपर वैष्णवीने हातात घेतला. पेपरमध्ये आलेली कार्तिकीताई आणि तिच्या हत्तीची बातमी तिने मन लावून वाचली. कानाजवळ जाऊन गुजगोष्टी करणाऱ्या हत्तीवर कार्तिकीताईने डाक्युमेंट्री बनवली होती. हा हत्ती बाबांच्या स्वप्नात यावा नि त्याने बाबांना आपल्या धावपटू होण्याच्या आपल्या स्वप्नाविषयी समजावून सांगावं, अशा विचारचक्रात ही बातमी वाचता वाचता वैष्णवी रंगून गेली.