(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

रात्री मालकीनबाई झोपल्या की मार्गारेट मावशी हळूच रॉबिन्सन मामाला इशारा करायची. मग दोघेही स्वयंपाकखोलीत जाऊन छान मेजवाणी करत. ते झालं की मग हळूच बाहेर पडून गच्चीवर जात. हा त्यांचा रोजचा दिनक्रम. गच्चीवरील थंडी हवा हे एक आकर्षण होतच पण त्याचबरोबर निळ्या आभाळात दिसणारे तारे या दोघांना फार आवडत. कितीतरी वेळ या ताऱ्यांना, गच्चीच्या या टोकाकडून तर कधी त्या टोकाकडून दोघही बघत.

“मावशे, आपण नाही का जाऊ शकणार का गं, त्या ताऱ्यांजवळ? ते, इतक्या दूरुन इतके छान दिसतात तर मग त्यांच्या जवळ गेल्यावर किती मस्त दिसतीलना?” एकदा मामाने मावशीला विचारलं. खरंतर मावशीलासुध्दा तसच वाटायाचं. मामाने हा विषय छेडल्यावर ती म्हणाली,

“मलासुध्दा आवडेलरे त्या ताऱ्यांजवळ जायला. पण तिकडे खायला चिजच मिळालं नाही तर? हा विचार सारखा मनी येतो नि माझं मन काही तिकडे ताऱ्यांकडे जायला धजवत नाही.”

“आता, तुलाच जायचं नाही म्हंटल्यावर मी तरी बापुडा, त्या ताऱ्यांकडे जाऊन काय करणार म्हणा?” असं दोघेही बोलत असताना मामाने एक ताऱ्याकडे मावशीचं लक्ष वेधलं.

“मावशे, हा तारा कसा लुकलुकतोय बघ?”

“खरंच की,” मावशी त्या ताऱ्याकडे बघत म्हणाली. तिने आता काळजीपूर्वक आकाशावर नजर फिरवली. तिच्यासोबत मामानेही मान फिरवली.

“कायरे मामू, तुला काही जाणवलं का? काही लक्षात आलं का?”

“म्हणजे?”,

“अरे तू, दाखवला तो एकच तारा लुकलुकत नाहीय तर आकाशातील सगळेच तारे लुकलुकताहेत.”

“आँ! हे तर माझ्या लक्षातच आलं नाही.”असं म्हणून मामाने पुन्हा एकदा मान वळवून वळवून आकाश चारही अंगानं बघितलं. आकाशातील असंख्य तारे लुकलुकताना बघण्याची त्याला गंमतच वाटली.

“मावशे, आपण आजपर्यंत इतक्यांदा आकाश बघितलं, पण हे काही लक्षात आलं नव्हतं गं. या लुकलुकण्याचही काही गणित असू शकेल कां?”

“क्या बात है राब्या, तू थेट भानगडीवरुन गणितावर आलास. शाब्बास! शाब्बास!! अशीच ज्ञानतृष्णा वाढवत राहा बघू.” मावशीने लाड करत त्याची मिशी ओढली.

“मग, माझी ज्ञानतृष्णा पूर्ण कर की?” मामाने मावशीचा गालगुच्चा घेत म्हंटलं.

आता मावशीला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. तिने डोळे मिटले नि ती माहितीच्या माहाजालात जाण्यासाठी सज्ज झाली. मावशीने राबिन्सनला आपल्या पाठिवर बसवलं नि माहितीच्या महाजालात उडी घेतली. दोघांनांही आता पंख फुटले नि ते वेगाने आकाशाकडे झेपावले. ताऱ्यांजवळून जाऊ लागले.

त्यांच्याजवळ एक तारा आला नि त्याने दोघांना हाय केले.

तो तारा प्रखर चमकत होता. खालून जसा लुकलुकताना दिसायचा तसं काही नव्हतं.

मामाने न रहावून विचारलंच,

“कायरे तारोबा, तू आम्हाला पृथ्वीवरुन तर लुकलुकताना दिसतो, इथे मात्र तुझा प्रखर प्रकाश. हे कसं काय,गड्या

?

“दोस्तांनो,मी सांगतोकी सारं काही. मी आणि माझ्यासारखे तारे स्वयंप्रकाशित असतात.”

“म्हणजे काय?”दोघांनीही विचारलं

“ तुमच्या त्या चंद्रोबाला स्वत:चा प्रकाश नाही. सूर्याची किरणं त्याच्या पृष्ठभागावर पडून ती परावर्तीत होतात. तो प्रकाश तुम्हाला चंद्राचा वाटतो. पण तो तसा नसतो. आमचं तसं नाही.”

“मग तुमचं कसं?” मावशीने विचारलं. मामाने री ओढली.

“आमच्या अंतरंगात अणुभट्ट्यासारख्या भट्ट्या प्रज्वलित झालेल्या असतात. त्यातून बाहेर पडणारी उर्जा प्रकाशलहरींच्या स्वरुपात उत्सर्जित होते. या प्रकाशाचे किरण अवकाशाच्या पोकळीतून प्रवास करतात. त्यातून बहुतांश प्रवास हा निर्वात पोकळीतून होतो. हा प्रकाश जेव्हा पृथ्वीकडे येतो तेव्हा त्याला तुमच्या पृथ्वीच्या सभोवताल असणाऱ्या वातावरणाचा सामना करावा लागतो.”

“याचा अर्थ, इथे काहीतरी भानगड होणार म्हणजे..” मावशीकडे डोळा किलकिला करत मामा बरळला. मावशीने त्याचा कान ओढला.

 “भानगड नाही रे दोस्ता.”

“मग?”

“ताऱ्यांचा प्रकाश जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात शिरतो, तेव्हा त्याला या वातावरणातील ढगांमधून जावं लागतं.”

“मग, हा ढग्गोबा काही भानगड करतो का?” मामा पुन्हा बरळला. मावशीने त्याचे कान जोरात ओढले नि एक ढुशीही मारली. गप्प बसण्याचा इशारा केला. हे बघून तारकोबा मंदमंद हसला.

“तारकोबा, प्रकाश किरण ढगोबातून बाहेर पडताना काही अडचणबिडचन येते का?” मावशीने विचारलं.

“अडचण नाही येत. पण हे ढगोबा, सारखे हलत असतात. आता या ठिकाणी तर डोळ्याची पापणी लवते न लवते तोच दुसऱ्या ठिकाणी.”

“खरंच की मावशे, आपणसुध्दा बरेचदा तसं बघितलं. शिवाय हे ढगोब्बा जादूगरच असले पाहिजेत.”

“म्हणजे रे मित्रा?”

“अहो तारकोबा, हे ढगोब्बा इकडूनतिकडे असे झर्रदिशी जातात फर्रदिशी आपला आकार बदलवतात. कधी कशाचा तरी कधी अशाचा…नाही का गं मार्गे मावशे?” मावशीकडे बघत मामा म्हणाला. मामा इंटेलिजेंटली बोलताना बघून मावशीचा उर भरुन आला. तिने त्याला हळूवार थोपटले. तारकोबा हसून म्हणाला.

“तुझं निरीक्षण एमदमच परफेक्‍ट आहे बघ मित्रा. या हलत्याडुलत्या नि सतत एका रुपातून दुसऱ्यात जाणाऱ्या ढगोब्बांमुळे वातावरणातील वायूही हलतेडुलते होतात. हवाही हलत राहते. त्यामुळे यातून प्रकाशकिरण जाताना ते स्थिर नसून तेसुध्दा हलल्यासारखे वाटतात. खरंतर हवा हलत असते. पण, तुम्हा पृथ्वीवासियांना वाटतं तारेच हलतात म्हणजे लुकलुकतात.”

“ओह मॉय गॉड!” मामा जोरात म्हणून गेला.

“आता काय झालं, गधड्या?” मावशी डोळे वटारत म्हणाली.

“मावशे, भानगड नसेल झाली पण गणित तर घडलं ना या प्रकरणी. पण हे गणित आपल्या सूर्याबाबाबत कां बरं चुकतं? तो सुध्दा ताराच ना.”

“खरंच की..”मावशी तारकोबाकडे बघत म्हणाली.

“त्याचं काय आहे, मित्रांनो अरे, कोणताही तारा तुम्हाला ठिपक्यासारखा किंवा बिंदूसारखा दिसत असला तरी प्रत्यक्षात त्याला वस्तुमान असतं. आकार असतो. त्याच्यातून निघतो तो प्रकाशाचा झोत. केवळ प्रकाशाची किरणं निघत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे.

“अच्छा, ठेवलं आम्ही लक्षात. मग पुढे या प्रकाशाच्या झोताचं काय होतं?”मामाने विचारलं.

 “हा प्रकाशाचा झोत किरणांनी बनलेला असतो. या झोताचे सर्वच किरणं हवेतून जाताना एकाचवेळी आणि एकसारखे हलत नाहीत. सूर्याचा प्रकाश, झोताच्या स्वरुपात पृथ्वीवर येतो. तो मोठ्या प्रमाणावर पसरतो. त्याचं पृथ्वीपासूनचं अंतर हे इतर ताऱ्यांपेक्षा तुलनेने फारच कमी आहे. त्यामुळे तो लुकलुकताना दिसत नाही. माझ्यासारखे कोट्यवधी प्रकाशमैल दूर असणाऱ्या ताऱ्यांचा प्रकाश झोताच्‍या स्वरुपात निघाला तरी तुमच्यापर्यंत येईपर्यंत हा झोत कमजोर म्हणा किंवा मग क्षीण होतो. हलत्याडुलत्या हवेशी त्याचा संपर्क आला की तो हलतो नि तुम्हाला वाटतं तो लुकलुकतोय.”

“पण कायरे तारकोबा,” एका लाल रंगाच्या गोलाकडे लक्ष वेधत म्हणाली,

“हा तारा कां बरं लुकलुकत नाही?

“अगं, तो तारा नाही तर ग्रह आहे.”

“ग्रहांच्या लुकलुकण्याला कुणाचं ग्रहणब्रिहण लागल की काय?”

“ग्रहण नाही की ब्रिहण नाही. हे ग्रह ताऱ्यांपेक्षा कमी अंतरावर असतात. दुसरं म्हणजे ते स्वयंप्रकाशी नसतात. त्यांचा प्रकाश झोतसुध्दा सूर्यप्रकाशासारखाच पृथ्वीवर येतो नि मोठ्या प्रमाणात पसरतो. त्यामुळे हलत्याडुलत्या हवेतून जाताना सगळी किरणं काही हलत नाही. त्यामुळे ते लुकलुकत नाहीत असं तुम्हाला वाटतं.”

“ओह मायॅ गॉड!” मामा पुन्हा बरळला.

“आता काय झालं?” मावशीने त्याचा कान ओढत म्हणाली.

“अगं, आपण खूप वेळ असं या तारकोबाजवळ राहिलो तर याचा प्रकाश आपणास गिळून टाकायचा. मग या लुकलुकच्या भानगडीत आपलच टूकटूक व्हायचं…”मामा डोळे मिचकावत म्हणाला. मामास ज्ञानतृष्णा भागवण्याचा कंटाळा आल्याचं मावशीनं ओळखलं. त्याला धाडदिशी माहितीच्या महाजालातून बाहेर आणलं. धाडदिशी खाली पडल्यानं, मामाच्या डोळयापुढे अंधारी आली. नि आणि तारे जमीनपे आल्याचा त्याला भास होऊ लागला.