(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

प्रत्येक इटुकल्या-पिटुकल्या बाळास गोष्टी ऐकणं आवडतं. अशा गोष्टी आवडीने सांगणारी आई असेल तर मग विचारुच नका. माझ्या आईकडे गोष्टीचा खजिनाच आहे. या खजिन्यातून ती मला दररोज गोष्ट सांगायची. पण हळूहळू या खजिना रिकामा होऊ लागला. शेवटची गोष्ट संपली, तेव्हा आईला प्रश्न पडला, आता काय?

पण, आई अखेर आईच असतेना. बुध्दिमान, समयसुचक आणि स्मार्ट! माझी आईसुध्दा अशीच.

तिने मग पुन्हा जुन्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. यात कसली आलीय समयसुचकता, अशा प्रश्न नक्कीच तुमच्या मनी आला असेल. ही जुनी कथा तिने सांगायला सुरुवात केल्यावर माझ्या कपाळावर आठ्याच आल्या. कंटाळाही आला. पण कथा कथा संपताना आईने गंमत केली. ती हळूच म्हणाली, “या जुन्या कथेला नवा शेवट कोणता बरं राहू शकेल. सांगू शकशील का तू?” खरंतर हा नवाच खेळच होता. मी आईकडे डोळे मोठ्ठे करुन बघितले. “खरंच मी शेवट सांगू शकेन का?” मी तिला विचारलं.

“कां नाही? नक्कीच. थोडं डोक्याला ताण दे. मेंदूला डिवच. म्हणजे तोच तुला एखादी छान कल्पना सुचवेल.” आई म्हणाली.

मग काय, “मी मेंदुला म्हंटलं गड्या, चल आता दाखव तुझी कमाल. या जुन्या गोष्टित आण नवी धम्माल!” मी डोळे मिटले. मेंदूने मला कल्पनारुपी फुलपाखरु केलं. नि मी या कल्पनेवरुन त्या कल्पनेवर भिरभिर उडू लागले. काही वेळाने जुन्या गोष्टीसाठी नवा शेवट मला सुचला. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. आईचा तर त्यातून अधिक.

 मग काय विचारता, जुनी कथा, नवा शेवट हा खेळ दररोज जोरात आम्ही खेळू लागलो. मग एकवेगळीच गंमत झाली. जुन्या कथेचा नवा शेवट शोधता शोधता मलाच नवी कथा सुचू लागली. मग मी माझी स्वतंत्र कथा लिहित गेले. तेव्हा माझं वय होतं अवघं पाच वर्षाचं. या माझ्या लिखाणातूनच, ‘हंट्रेस ऑफ द ग्लूम- लॉस्ट लँड्स ऑफ एलिसिया’  आणि ‘द मर्डर एक्स्चेंज’ या दोन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या.

ही पुस्तकं मस्त, छान, वंडरफूल वगैरे असली पाहिजेत, असं मी नाही म्हणतेय हं. स्वत:चं कौतुक करुन घेणं बाई मला नाही आवडतं. तर मग कुणाला वाटली माझी पुस्तंक छान आणि वंडरफुल! तर मला २०२५ साली, गोल्डन बूक ॲवार्ड आणि १८ वर्षाखालील मुलामुलींसाठी असलेला इंटरनॅशनल ॲवार्ड मिळाला, तेव्हा सारेचजण तसं म्हणू लागले.

कथा, कादंबरीसोबत मला कविताही करायला आवडतात. माझ्या बऱ्याच कविता समाज माध्यमावर आहेत. या कवितांचं ‘द लेटर्स आय हॅव्ह नेव्हर सेंट’, हा संग्रहही प्रकाशित झालाय.

मला लिखाणाची आवड आहेच. पण माझ्या या आवडीला, माझे आईबाबा मला प्रोत्साहन देतात. त्यामुळे‍ मला आणखी प्रेरणा मिळते. नव्या कल्पना सुचतात. मग नवं छान काहितरी माझ्या ह्रदयातून निघतं नि ते कागदावर उतरतं.

कथा कादंबरी कविता लिहायला आवडतच मला. भविष्यात डॉक्टर होऊन रुग्णांना बरं करण्याचं माझं स्वप्न आहे. पण, कथा कादंबरी, कविता मी लिहितच राहणार कारण त्यामुळेसुध्दा अनेकांचं दु:खं कमी होतना.

तर मी, जिया  हिमांशू दोशी. वय वर्षे १७. मुक्काम मुंबई

सुरेश वांदिले