(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मी नाम्या!,

मी खूप भाग्यवान समजते स्वत:ला. कारण अगदी लहानपणीच माझ्या हातात स्मार्टफोन आला. तसा तो बहुतेक सर्वच मुलांच्या हाती येतो म्हणा. या स्मार्टफोनचं मला वेड लागलं. त्यातले गेम्स मी खेळत बसायचे. असं खेळता खेळता मला ‘मिन्सरक्रॅफ्ट, हा खेळ गवसला. त्यात मी तासनतास रंगून जाई.

मी स्वत:ला भाग्यवान याचसाठी म्हंटलं की माझ्या आईबाबांनी या मोबाइल वेडाला हाटहूट केलं नाही की माझ्या हातून मोबाइल हिसकावून घेतला नाही. त्यामुळे मला अगदी मोकळेपणानं ‘मिन्सरक्रॅफ्टवर लक्ष केंद्रित करता आलं. तेव्हा मी होते ५ वीत. ९ वर्षाची गोडुली, आईबाबांची लाडुली!

मी लाडुली झाले कारण, ज्या ‘मिन्सरक्रॅफ्टने मला वेड लावलं तो खेळ अभ्यासातील कोणताही विषय समजण्यासाठी उपयोगी पडू शकतो हे माझ्या लक्षात आलं. केवळ लक्षात आलं असं नव्हे, तर मी या मिन्सरक्रॅफ्टचा उपयोग करुन लिखीत शब्दांमध्ये असलेला अभ्यासाचा विषय खेळाव्दारे समजावून सांगू लागले. मोबाइलचं हे वेडं असं मला ज्ञानवर्धक करुन गेलं.

सध्या मी,११वीत आहे. लुधियानातील, सत पॉल मित्तल शाळेत शिकते. अर्थातच गणित हा माझा आवडता विषय! ‘मिन्सरक्रॅफ्ट खेळातील माझी गती आणि विविध विषय समजावून घेण्यासाठी करत असलेला त्याचा वापर बघून, मायक्रोसॉक्ट कंपनीने मला,’ मिन्सरक्रॅफ्ट स्टुटंड ॲम्बॉसिडर (विद्यार्थी सदिच्छा दूत)’ म्हणून सामील करुन घेतलय. विद्यार्थ्याला कोणताही विषयघटक कठीण वाटत असेल किंवा समजत नसेल तर मी मिन्सरक्रॅफ्टचा उपयोग करुन तो घटक खेळाच्या स्वरुपात समजावून देते. आतापर्यंत मी असे ५०० मॉड्युल्स आणि ट्युटोरिअल्स तयार केले असून ते सगळे इंटरनेटवर बघता येतात. असे १०० व्हीडियो मी ऑनलाइन टाकले आहेत.

करोनातील टाळेबंदिच्या काळात, मी संगणकाची पॉयथान आणि इतर भाषा शिकायला लागले. मग मला कोडिंगने भारावून टाकल्यानं माझं सुरु झालं, कोडिंग एके कोडिंग. या नव्या वेडाचा मला फायदाच झाला. मिन्सरक्रॅफ्टच्या मदतीने मी कोडिंग शिकवू शकते याचा मला आत्मविश्वास आला. मग काय,शिकवू लागले की, मी माझ्या मित्र मैत्रिणींना आणि ज्याला ज्याला कोडिंग कठीण वाटत असेल त्या सर्वांनाच.

माझं शिकवणं आवडल्यानं माझ्या शाळेच्या प्राचार्यांनी शाळेतील चौथी आणि पाचवीतील विद्यार्थ्यांना ‘मिन्सरक्रॅफ्ट शिकवण्याची संधी दिली. तेव्हा मी अवघी ११ वर्षाची होते. तुम्हाला म्हणून सांगते. लहान तोंडी मोठा घास समजून नका हं प्लिज! कारण  शिक्षकांनीसुध्दा, कोडिंगसाठी मला त्यांचा गुरु बणवून टाकलं. माझ्या शाळेतील शिक्षकांना तर मी एका महिन्यात प्रशिक्षित केलं.

हे आपणास उत्तमच जमतं असं लक्षात आल्यावर मग मी माझं ध्येय वाक्य ठरवलं,”इच वन, टिच टेन.बघता बघता गेल्या सहा वर्षात मी १५ हजार व्यक्तींना मोफत कोडिंग प्रशिक्षण दिलं.  यामध्ये ५ हजाराहून अधिक शिक्षकच होते.  अर्थातच माझा अधिकाधिक भर मुलींवर असतो, हे विशेषत्वांनं सांगावसं वाटतं. विज्ञान (एस-सायंस), तंत्रज्ञान (टे-टेक्नॉलॉजी), अभियांत्रकी (इ-इंजिनीअरिंग) आणि गणित(एम-मॅथेमॅटिक्स) म्हणजेच स्टेम गटातील मुलींचा एक कोडिंग क्लब तयार केलाय. यात १०० मुली आहेत. इतर मुलामुलींनासुध्दा असे कोडिंग क्लब सुरु करण्यासाठी मी मदत करते.

डिजिटल गेम आणि स्टेम तत्वज्ञान एकत्र करुन करुन मी हवामान बदल,गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि लैगिंक असमानता यावर समाजमाध्यमातून जनजागृती करायला लागले. समाजमाध्यमावरचा माझा हा वावर अनेकांच्या लक्षात आला. त्यामुळे बऱ्याच विज्ञापीठांमध्ये आणि इतर शाळांमध्येही मिन्सरक्रॅफ्ट शिकवण्यासाठी मला बोलवण्यात येऊ लागलं.

आपण असं काही आगळंवेगळं केलं की पुरस्कार आणि बक्षीससुध्दा आपल्या दिशेने येऊ लागतात. २०२३ साली, मी ग्लोबल स्टुडंट प्राईज या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार मला भेटला. २०२१ साली डायना पुरस्कार मिळाला. २०१८ साली युनेस्को वर्ल्ड युथ मल्टिमीडिया कॉम्पिटिशनमध्ये मला यश मिळालं. या स्पर्धेत मी मिन्सरक्रॅफ्टमधील धड्यांचं आभासी वाचनालय तयार केलं. २०२४ च्या जानेवारी महिन्यात, बेट युनायटेड किंगडम एडटेक कॉन्फरंसमध्ये प्रमुख वक्ता म्हणून मला निमंत्रित केलं गेलं. या ठिकाणी ३० हजार शिक्षणतज्ज्ञ सहभागी झाले.

डिजिटल प्लॅटफॉर्मचा असा सुंदर उपयोग करत असल्याचं बघून माझ्या आईबाबांचा उर अभिमानाने भरुन येतो. त्यांनी मला लहानपणापासून पाठिंबा दिला. मोबाइल गेमिंमध्येच मी सदैव गुंतलेली असते, यासाठी मला न रागवता त्यांनी गेमिंगचं वेड माझ्यासाठी कसं फायदेशीर ठरेल, माझा विकास कसा होईल, माझ्या ज्ञानात कशी वाढ होईल हे बघितलं. माझं आईबाबा दोघेही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतात. म्हणजे ते स्वत: खूप खूप व्यस्त. पण म्हणून काही त्यांनी, माझ्याकडे दुर्लक्ष केलं नाही. माझ्यासाठी बरोबर वेळ काढून मला मार्गदर्शन केलं.

आपलं वेड हे व्यसन होऊ न देता ते सकारात्मकपणे वापरलं तर खूप छान छान गोष्टी आपल्या जीवनात साध्य होतात, पटलय ना तुम्हाला.

कोणत्याही गोष्टीमध्ये तात्पर्य असतं. तर माझ्या गोष्टीमध्ये दोघांसाठी तात्पर्य आहे. एक म्हणजे पालकांसाठी. त्यांनी जर मुलांसाठी वेळ काढला आणि मुलं नेमकं काय करताहेत हे बघून मार्गदर्शन केलं, समजावलं तर कोणतही स्मार्ट गॅजेट् हे मुलांसाठी उपयुक्तच ठरु शकतं.

दुसरं तात्पर्य मुलांसाठी. आपण अलिबाबाच्या गुहेची कथा ऐकतो नि वाचतो. त्या गुहेत प्रचंड धनसंपत्ती होती म्हणे.ही गुहा गोष्टीतली. त्यामुळे त्यात कल्पनेनंच जावं लागतं. मात्र मोबाइल ही खरीखुरी अलिबाबाची गुहा. तुम्ही ज्ञान मिळवण्यासाठी या गुहेत शिरलात तर तुम्ही ज्ञानसंपन्न होऊ शकता. ही संपन्नता कोणत्याही धनापेक्षा मेाठी आणि श्रेष्ठ असते.

तर मी नाम्या!

नाम्या जोशी! हल्ली मुक्काम लुधियाना.

०००