(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

विजयनगरचे साम्राज्य असलेल्या हम्पी येथे तेजोमयी, तिचे आईबाबा आणि सोबत कॉलनीतले काकाकाकू नुकतेच गेले होते. गाईडसह हम्पीचं दर्शन छान घडत होतं. विजयनगर साम्राज्य हे जवळपास ३०० वर्षे अस्तित्वात होतं. जगातील अत्यंत प्रबळ राज्यांमध्ये त्याचा समावेश होत होता.

या साम्राज्याची राजधानी होती हम्पी. तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर असलेलं हे वैभवशाली नगर, त्या काळात जगातील हिरे-मोती-माणके-सोने-चांदी अशा मौल्यवान धातूंच्या विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना आकर्षित करायचं. जसे भाजीपाला, किराणा, कपडे यांची बाजारपेठ असते तशी या मौल्यवान धातुंच्या विक्रीची खास बाजारपेठ हम्पीत होती. या बाजारपेठेच्या अवशेषांचे दर्शन घडवत गाईड उत्साहाने ही माहिती देत होता.

इतके श्रीमंत आणि समृध्द असलेल्या विजनगरच्या साम्राज्यात अनेक भव्य इमारती बांधल्या गेल्या. मंदिरं बांधली गेली. या मंदिरात एक महत्वाचं मंदिर म्हणजे विजय विठ्ठल मंदीर. या मंदिरात या साम्राज्याचे सर्वात प्रतापी सम्राट कृष्णदेवरायांचे गुरुबंधू पुरंदरदास विठ्ठलाची भक्ती करत.

पाचशे साडेपाचशे वर्षापूर्वी विजयनगर साम्राज्याच्या पतनानंतर राजधानी हम्पीची रया गेली. शत्रूने अनेक वर्षे हम्पीला लुबाडले. भव्य भव्य इमारती जमिनदोस्त केल्या, मंदिरं उध्वस्त केलीत. जाळपोळ केली. या आगित वाचून काही मंदिरं, काही इमारतीचे अवशेष टिकून राहिले. त्यातही विजय विठ्ठल मंदिर बऱ्यापैकी शाबूत राहिले.

या मंदिराच्या समोर गरुडाचे वाहन असलेला भव्यरथ आहे. या रथाला भारत सरकारने ५० रुपयांच्या नोटावर अंकित केलं आहे. मंदिराचे बरेच स्तंभ हे अदभूत आहेत. या दगडी स्तंभातून वेगवेगळ्या हळूवार हातोडा मारला की वाद्याचे सूर ऐकायला येत. आता हे आवाज ऐकण्यासाठी या स्तंभावर लावलेला क्यू आर कोड स्कॅन करावा लागतो. गाईडने माहिती दिली. सर्वांनी वेगवेगळ्या स्तंभावरचे कोड स्कॅन करुन वाद्यांचा आवाज ऐकला. एका स्तंभातून तबल्याचा तर एका स्तभांतून ढोलकीचा तर एका स्तंभातून सारंगीचा आवाज येत होता.

गाईडने नंतर विठ्ठल रुक्माईची मूर्ती असलेल्या गर्भगृहात नेले. आता तिथे विठ्ठल रुक्माईची मूर्ती नाही. पण ज्या आसनावर मूर्ती विराजमान होत्या ती दोन्ही आसनं तिथे दिसतात. या मूर्ती कुठे गेल्या? त्यांचं काय झालं? हे कुणालाही ठाऊक नाही. त्याचा शोध घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण तो शोध लागला नाही.

आता या मंदिरात पूजा अर्चा होत नसल्याने ते ‘जिवंत मंदिर’ मानलं जात नाही. त्यामुळे आत चप्पल जोडे घालून जाता येत असल्याचं गाईडने सांगितलं.

“पण आपण चप्पल जोडे काढूनच आत जायचं.” तेजोमयीने आग्रह धरला.

“अगं, पण त्याची गरज नसल्याचं गाइडने सांगितलयना.” बाबा म्हणाले.

“तुमच्या तेजोमयीचं काहितरी तिसरचं चालतं.” सोबतच्या काकांनी हसून टोमणेवजा प्रतिक्रिया दिली.

“अहो काका, तिसरच कसं काय म्हणता?” तेजोमीयनं विचारलं. यावर प्रत्युत्तर न देता ते काका आणि काकू जोडे घालूनच आत गेले. तेजोमयीने मात्र तिच्या आईबाबांना जोडे आणि चप्पल काढायलाच लावली. आत गेल्यावर रिकाम्या आसनांना तिने भक्तिभावाने नमस्कार केला. आईबाबांनाही करायला लावला. बऱ्याच जणांना त्या तिघांची ही कृती विचित्र वाटून ते चमत्कारिक नजरेनं त्यांच्याकडे बघू लागले.

“तुमच्या तेजोमयीचं तिसरच काहितरी असतं,” असं सोबतचे काका मंदिराच्‍या बाहेर आल्यावर पुन्हा टोमणेवजा सुरात म्हणाले.

गाईडने मात्र तेजोमयीचं कौतुक केलं.

“तुला कां बरं जोडे चप्पल बाहेर काढावं वाटलं?” असं त्याने उत्सुकेतेनं विचारलं.

“अहो काका, या मंदिरात आज जरी विठोबा रुक्माई नसतील. पण पाचशे वर्षापूर्वी ते इथे होतेचना. भक्त पुरंदरदासांनी त्यांची मनाभावे पूजा अर्चा केली. सम्राट कृष्णदेवराय या मूर्तींसमोर नतमस्तक होत असणार. त्यांच्यानंतरही कित्येक वर्षं विठ्ठल रुक्माइची पूजा अर्चा होत होतीच. आता मूर्ती नसली म्हणून काय झालं. त्या देवांचा वास या वास्तूत  असेलच की नाही. समजा नसेलही पण आपण आदर म्हणून चप्पल जोडे बाहेर काढायला नको का? आपण आपल्या घरात काय चप्पल जोडे घालून जातो का? हे तर विठ्ठल रुक्माइचं घरं होतं. मग त्याचा सन्मान आपण नको का करायला.” तेजोमयीस जे सूचलं ते ती बोलली. आईबाबांचे डोळे पाणावले. गाईड तिच्याकडे बघतच राहिला. तेजोमयीचं तिसरचं काहीतरी असतं असा टोमणा मारणाऱ्या काकांनी तिला जवळ घेऊन पाणावलेल्या डोळयांनी सॉरी म्हंटल.

सुरेश वांदिले