(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

तीन तिघाडा काम बिघाडा

  दुपारचा ऑनलाइन वर्ग संपल्या संपल्या तेजोमयीने आईला मम्मीला नूडल्स करायला सांगितलं..

आइने झपटपट खमंग नूडल्स करुन दिले. नूडल्स खाता खाता तेजोमयीने टीव्ही लावला. टीव्ही बघता बघता ती आजच्या पेपरमधील कार्टून बघू लागली.

    एका वेळी तीन तीन कामं. यामुळे ना धड तिचं खाण्याकडे लक्ष होतं ना टीव्हीकडे. मध्येच ती टीव्हीकडे बघायची. तर कधी कार्टूनकडे. तर कधी नुडल्सच्या काटेचमच्याकडे लक्ष द्यायची.  तिची नजर अशी एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडे फिरत राहयची.

कार्टूनकडे बघता बघता काटे चमच्याने तेजामयीने नूडल्स उचलले नि तोंडात टाकायला गेली तर चमच्याचा टोकदार भाग जिभेला रुतला. अ आई ग म्हणून ती जोरात ओरडली. तिच्या हातून प्लेट खाली पेपरवर पडली. तिच्या ओरडण्याने आई स्वयंपाक खोलितून धावत आली. झाला प्रकार तिच्या लक्षात आला.

तेजोमयीस चांगलं खडसावं असं आईला वाटलं. मात्र आईन रागावर ताबा मिळवला नि तेजोमयीची जीभ बघितली.  जिभेला चमच्याचा टोकदारभाग रुतल्यानं थोडी जखम झाली होती. घरी असलेलं डेण्टोजेल आईनं तिच्या जिभेवर चोळलं. तेव्हा कुठं तेजोमयीला बरं वाटलं. तेजोमयी आईच्या कुशीत शिरली.

   तिला बाजूला सारत आई म्हणाली,

हे बघ बाळ थोडक्यात तुझी जीभ वाचली. चमच्याचा काटा आणखी रुतला असता तर कदाचित ऑपरेशनही करावं लागलं असतं.हो ना.

   हो आई.

   मग गधडे, मम्मी आता मूळ पदावर आली होती. गधडे हे रामायण कशामुळे घडंलं. लक्षात आलं का तुझ्या.

   नाही, तेजोमयी खाली मान घालून रडवलेल्या सुरात म्हणाली.

   गधडे,  तुला कितीदा सांगितलय ना की एका वेळी एकच काम कर.सांगितलंय ना.

   हो.

   मग आता काय करत होतीस तू.

   टीव्ही बघत होते, नूडल्स खात होते नि कार्टून वाचत होते.

   म्हणजे एका वेळेला तीन तीन कामं. अशानं एकही काम नीट होत नाहीत. एकाही कामावर व्यवस्थित लक्ष देता येत नाही. तीन तिघाडा काम बिघाडा असं म्हणतात.नेमकं तेच झालं तुझं.

   सॉरी. आई…

   गधडे सॉरी म्हणून काय उपयोग. आई-बाबा नेहमी नेहमी जे हिताचं सांगतात,ते या कानाने एकतेस नि त्या कानाने सोडून देतेस आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या…

  आता यापुढे असं नाही वागणार  आई ..तेजोमयीने आईला आश्वासन दिलं.

सुरेश वांदिले