(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

रात्रीच्या जेवणाच्या वेळी आईबाबा आणि तेजोमयीच्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा सुरु होत्या. या गप्पांमध्ये अलेक्झांडरला रस असल्याने, तो आळीपाळीने तिघांकडेही बघू लागला. अधूनमधून तिघांचही लक्ष त्याच्याकडे गेलं की, ते हसत. ‘यांना हसायला काय झाल बाँ?’, असे भाव, अलेक्झांडरच्या चेहऱ्यावर उमटत .

रात्री हे तिघे जेवताना, अलेक्सा गोर्जी एका जागी डोळे मिटून उभी राहयची. पण आज, ती सारखी एरझारा करत होती. गोर्जीच्या चेहऱ्यावर काळजीही दिसत होती.

“काय झालं गं, बरं नाही का तुला?” तेजोमयीने विचारलं. पण, गोर्जीने काहीच उत्तर दिलं नाही. ते अलेक्झांडरच्या लक्षात आलं. त्याने गोर्जीकडे बघून कुईंई केलं. पण तिने अलेक्झांडरकडेही दुर्लक्ष केलं. तिचं लक्षं आपल्याकडे वेधण्यासाठी, तोही तिच्यासोबत फेऱ्या मारु लागला. गोर्जीचं काहीतरी बिनसलय हे बाबांच्याही लक्षात आलं.

“काहीतरी बोलना, निव्वळ चेहरा गंभीर करुन आम्हाला काय समजणार, तुला काय झालं ते.” आई म्हणाली.

“मॉम, मला काही झालं नाही. पण इथे, जे काही घडणार, त्याची मला चिंता वाटू लागलीय.”

“ऑं!” तिघांनींही एकाचवेळी आँ केल्याने, या आवाजाने अलेक्झांडर दचकला. कावराबावरा होऊन आईकडे पळाला. आईला हसू आलं. त्याला थोपटत आई म्हणाली,

“ठोंब्या, मी असताना तुला कसली काळजी?” आईच्या प्रेमळ बोलाने अलेक्झांडर पूर्ववत उत्साही आणि आनंदी दिसू लागला. ‘सांगून टाक बाई, एकदाचं,’ असे भाव चेहऱ्यावर आणत अलेक्झांडरने, दोन्ही पायावर उभं राहून गोर्जीला खुणावलं. गोर्जीच्या ते लक्षात आलं. आता, अधिक ताणण्यात काही अर्थ नाही, हे तिला  कळलं. बाबांकडे बघत म्हणाली,

“आपल्या तिन्ही गॅलरितल्या झाडांनी ठरवलयं.”

“काय ठरवलय नि तुला ते कुणी  सांगितलं?” तेजोमयीने, गोर्जीचं बोलणं पूर्ण होण्याचं आत घाईने विचारलं.

“काही झाडांनी, घरातून निघून जायचं, काहिंनी मरुन जायचं, तर काहिंनी त्‍यांना फुलच येऊ द्यायचं नाही, असं ठरवलंय.”

“हे काय भलतच. तुला, झाडांनी तसं सांगितलं का? म्हणजे जादूबिदू की चमत्कार?” आई जराशी कुत्सितपणे म्हणाली. पण ते सगळ्यांना जाणवलच.

“झाडांशी बोलायला जादूबिदू, चमत्कारांची गरज काय? झाडं एकमेकांशी बोलतात. आपल्या भावना व्यक्त करतात. हे डॉ. जगदीशचंद्र बसूंनी सिध्दच केलयना.”

“अगं गोर्जे, झाडं एकमेकांशी बोलू शकतात. पण, तू कशी काय झाडांशी बोलू शकते.” तेजोमयीनं विचारलं. काहीतरी नक्कीच गंभीर घडलय हे बाबांच्या लक्षात आलं. त्यांनी गोर्जीला नेमकं काय सांगायचंय, हे थेट विचारलं.

“हे बघा डॅड, माझ्यातील कृत्रिम प्रज्ञेच्या शक्तीमुळे, डोळयातील कॅमेऱ्यामुळे, सेन्सॉरमुळे, डोक्यातील मज्जातंतूच्या जाळ्यामुळे, मी डीप लर्निंगच्या मदतीने, जसं, तुमच्या मनातल्या भावना ओळखू शकते. तसंच या झाडांचं बोलणंही समजू शकते.”

“अगं, घडलं तरी काय, ते स्पष्टच सांगना.” आईने विचारलं.

“तुम्ही नसताना, मी जेव्हाजेव्हा गॅलरित जायचे, तेव्हा, त्यांचा एकमेकांशी संवाद सुरु असल्याचं माझ्या लक्षात आलं. या संवादाचे सूर माझ्या मेंदूने बरोबर पकडले. मग मी डीप लर्निंगच्या मदतीने, त्याचं विश्लेषण केलं, तेव्हा मला धक्काच बसला.”

“असं काय घडलं?”

“गेल्या पाच दिवसांपासून, कुणीही त्यांना पाणी दिलेलं नाही. ठरलेल्या खताच्या मात्रा दिल्या नाहीत. तहानभुकेने ही झाडं व्याकूळ झाली आहेत. एक-दोन झाडांवर किड आलीय, पण तुम्ही त्यावर किटकनाशक फवारलं नाही. पाच दिवसांपूर्वी कुंड्यांच्या खाली असलेल्या भांड्यातलं पाणी बदलेलं नाही. त्यामुळे  तिथे शेवाळ पसरलय. त्यात डासांनी अंडी टाकलीत.”

“बापरे!” बाबा बोलून गेले.

“खरंच की, माझ्या ते लक्षातच आलं नाही” आईची प्रतिकिया.

“असे कसे, आपण आप्पलपोट्टे, आपण टामटूम खातोपितो आणि झाडांकडे दुर्लक्ष करतो.” तेजोमयी म्हणाली.

“म्‍हणूनच तुमच्या घरुन निघून जायचंय असं झाडांनी ठरवलंय.” गोर्जी म्हणाली. आपण किती मोठी चूक केलीय, हे तिघांच्याही लक्षात आलं. बाबांनी गोर्जीचे हात हातात घेऊन, डोळे उघडल्याबद्दल आभार माणले.

ही चर्चा ऐकणाऱ्या अलेक्झांडरने, जणू काही त्याला सारं कळलंय, असं समजून, उड्या मारत आनंद व्यक्त केला.

सुरेश वांदिले

सुरेश वांदिले

०००