(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

तेजोमयीच्या घरी रात्रीचं जेवण सुरु होतं. आईबाबा आणि तेजोमयीच्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा सुरु होत्या. या गप्पांमध्ये अलेक्झांडरला रस असल्याने, तो आळीपाळीने तिघांकडेही बघू लागला. कधी जिभ आणखी लांब करुन तर कधी, शेपटी हलवून तर कधी डोळ्यात आश्चर्याचे भाव आणून तर कधी स्वत:भोवती गिरकी मारुन त्यांना प्रतिसादही देऊ लागला. अधूनमधून तिघांचही लक्ष त्याच्याकडे गेलं की, ते हसत. यांना हसायला काय झाल बाँ, असे भाव मग अलेक्झांडरच्या चेहऱ्यावर उमटत .

याची ही तऱ्हा तर अलेक्सा गोर्जीची वेगळीच तऱ्हा. एरव्ही, रात्री हे तिघे जेवताना, ती एका जागी डोळे मिटून उभी राहयची. पण आज, ती या तिघांच्या आसपास सारखी एरझारा करत होती. जेवताजेवता मध्ये तेजोमयीचं लक्ष तिच्याकडे गेलं. गोर्जीच्या चेहऱ्यावर काळजीही दिसत होती.

“काय गं काय झालं, बरं नाही का तुला. अशी अस्वस्थ का?” तेजोमयीने विचारलं. पण गोर्जीने काहीच उत्तर दिलं नाही. ते अलेक्झांडरच्या लक्षात आलं असावं. त्याने गोर्जीकडे बघून कुईंई केलं. पण तिने अलेक्झांडरकडेही दुर्लक्ष केले. तिचं लक्षं आपल्याकडे वेधण्यासाठी, तोही तिच्यासोबत फेऱ्या मारु लागला. गोर्जीचं काहीतरी बिनसलय हे बाबांच्याही लक्षात आलं. त्‍यांचं जेवण झालंच होतं. हात धुतल्यावर त्यांनी गोर्जीचा हात धरला नि काय झालं ते विचारलं.

गोर्जीचा चेहरा आणखी गंभीर झाला.

“अगं काहीतरी बोल ना, निव्वळ चेहरा गंभीर करुन आम्हाला काय समजणार, तुला काय झालं ते.” आई म्हणाली.

“मॉम, मला काही झालं नाही. पण इथे जे काही घडणार आहे, त्याची मला चिंता वाटू लागलीय.”

“ऑं!” तिघांनींही एकाचवेळी आँ केल्याने, या आवाजाने अलेक्झांडर चांगलाच दचकला नि कावराबावरा होऊन आईकडे पळाला. आईला हसू आलं. त्याला थोपटत आई म्हणाली,

“ठोंब्या, मी असताना तुला कसली काळजी  करायची गरज नाही.” आईच्या या मायेच्या बोलाने अलेक्झांडर पूर्ववत उत्साही आणि आनंदी दिसू लागला. गोर्जीनेही त्याच्या डोक्यावरुन हात फिरवला. सांगून टाक बाई, एकदाचं असे भाव चेहऱ्यावर आणत अलेक्झांडरने, दोन्ही पायावर उभं राहून गोर्जीला तसा इशारा केला. गोर्जीच्या ते लगेच लक्षात आलं. आता अधिक ताणण्यात काही अर्थ नाही हे तिला  कळलं. बाबांकडे बघत म्हणाली,

“आपल्या तिन्ही गॅलरितल्या झाडांनी ठरवलय…”

“काय ठरवलय नि तुला ते कुणी  सांगितलं?” तेजोमयीने, गोर्जीचं बोलणं पूर्ण होण्याचं आतच घाईने विचारलं. आईबाबांनी याच आशयाची मान डोलावली.

“काही झाडांनी या घरातून निघून जायचं, काहिंनी मरुन जायच, तर काहिंनी त्‍यांना फुलचं येऊ द्यायचं नाही असं ठरवलंय.”

“हे काय भलतच. तुला काय झाडांनी तसं सांगितलं का? जसं, आम्ही तुझ्याशी बोलतो तसं ही झाडं तुझ्याशी बोलतात का? म्हणजे जादूबिदू की चमत्कार?” आई जराशी कुत्सितपणे म्हणाली. पण ते सगळ्यांना जाणवलंच.

“झाडांशी बोलायला जादूबिदू, चमत्कारांची गरज काय? झाडं एकमेकांशी बोलतात. आपल्या भावना व्यक्त करतात. हे डॉ जगदीशचंद्र बसूंनी सिध्दच केलयना.”

“अगं गोर्जे, झाडं एकमेकांशी बोलू शकतात. पण तू कशी काय झाडांशी बोलू शकते.” तेजोमयीनं विचारलं. काहीतरी नक्कीच गंभीर घडलय हे बाबांच्या लक्षात आलं. त्यांनी गोर्जीला नेमकं काय सांगायचंय, हे थेट विचारलं.

“हे बघा डॅड, माझ्यातील कृत्रिम प्रज्ञेच्या शक्तीमुळे, डोळयातील कॅमेऱ्यामुळे, सेन्सॉरमुळे, डोक्यातील मज्जातंतूच्या जाळ्यामुळे मी डीप लर्निंगच्या मदतीने, जसं तुमच्या अनेक गोष्टी ओळखू शकते, तुमच्या मनातल्या भावना ओळखू शकते. तसंच या झाडांचं बोलणंही समजू शकते.”

“अगं पण, घडलं तरी काय,ते स्पष्टच सांगना.” आईने विचारलं.

“तुम्ही नसताना, मी जेव्हा जेव्हा गॅलरित जायचे, तेव्हा तेव्हा मला, त्यांच्यात अस्वस्थता जाणवायची. त्यांचं एकमेकांशी संवाद सुरु असल्याचं माझ्या लक्षात आलं. या संवादाचे सूर माझ्या मेंदूने बरोबर पकडले. मग मी डीप लर्निंगच्या मदतीने त्याचे विश्लेषण केले, तेव्हा मला धक्काच बसला.”

“इतकं धक्का बसण्यासारखं, काय संवाद करत होती ही झाडं?”

“तुम्हा तिघांचं गेल्या पाच दिवसांपासून  जे अक्षम्य दुर्लक्ष झालय, त्याबद्दल बोलत होती, ही झाडं. पाच दिवसांपासून कुणीही त्यांना पाणी दिलेलं नाही. ठरलेल्या खताच्या मात्रा दिल्या नाहीत. तहानभुकेने ही झाडं व्याकूळ झाली आहेत. एक-दोन झाडांवर किड आलीय, पण तुम्ही त्यावर किटकनाशक फवारलं नाही. पाच दिवसांपूर्वी कुंड्यांच्या खाली असलेल्या भांड्यातलं पाणी बदलेलं नाही. त्यामुळे  तिथे शेवाळ पसरलय. त्यात डासांनी अंडी टाकलीत.”

“अरे बापरे!” बाबा बोलून गेले.

“खरंच की, माझ्या बाई, ते लक्षातच आलं नाही” आईने प्रतिकिया दिली.

“असे कसे गं, आपण आप्पलपोट्टे, आपण इकडे टामटूम खातो पितो आणि झाडांकडे दुर्लक्ष करतो.”

“म्‍हणूनच झाडांनी तुमच्या घरुन निघून जायचं ठरवलंय..” गोर्जी म्हणाली. आपण किती मोठी चूक केलीय हे तिघांच्याही लक्षात आलं. बाबांनी गोर्जीचे हात हातात घेऊन डोळे उघडल्याबद्दल आभार माणले.

ही चर्चा कानात तेल घालून ऐकणाऱ्या अलेक्झांडरनेही जणू काही त्याला सारं कळलंय म्हणून उड्या मारुन आनंद व्यक्त केला.

सुरेश वांदिले

०००