देशाचे संरक्षण : आपला अभिमान,आपला गौरव-
यंदाचा स्वातंत्र्यदिन भारतीयांसाठी खास आहे. यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करत आहोत. याचा अर्थ भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतीय स्वातंत्र्याचा लढा अतिशय रोमहर्षक आणि प्रेरणादायी आहे. या लढ्यात लाखो भारतीय नागरिक स्वातंत्र्य सैनिक म्हणून सहभागी झाले होते. प्रत्येकाने आपला वकूब आणि कुवतीनुसार या लढ्यात सहभाग दिला. भारत स्वतंत्र झाल्यावर हे स्वातंत्र्य टिकवण्याची आणि ते अधिक सामर्थ्यशाली करण्याची संधी तरुण-तरुणींना भारतीय लष्कराच्या थलसेना, वायुसेना, नौसेना या तिनही दलांनी उपलब्ध करुन दिली.
या तिनही दलांमध्ये दरवर्षी विविध श्रेणीची पदे दरवर्षी भरली जातात.साहस गाजवण्याची महत्वाकांक्षा आणि देशासाठी त्याग करण्याची प्रबळ इच्छा असणाऱ्या तरुणांनी लष्करामध्ये सहभागी व्हायला हवे. साहसी, प्रज्ञावंत, शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि मानसिकदृष्ट्या कणखर उमदेवारांनी या पर्यायांचा विचार करायला हवा. वेगळे करिअर आणि दर्जेदार जीवनशैली जगण्याची संधी यामुळे मिळू शकते. नागरीसेवांपेक्षा अधिक सुविधा, व्यक्तीमत्व विकासाच्या संधी, निवृत्तीनंतर उत्तम आयुष्य जगण्यासाठी करण्यात येणारे सहाय्य, देशात आणि देशाबाहेरही नियुक्ती, उत्कृष्ट वैद्यकीय सेवा, मुलांच्या शिक्षणासाठी साहाय्य, ही काही या सेवेची वैशिष्ट्ये सांगता येतील.
१२ वीनंतर संधी
(१) थलसेनेत थेट प्रवेश
भारती थलसेनेत थेट प्रवेशासाठी 10+2 टेक्निकल एन्ट्री स्किम, ही योजना राबवली जाते. १२ वी विज्ञानशाखेत गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयामध्ये सरासरीने ७० टक्के गुण मिळवणारे उमेदवार यासाठी पात्र ठरतात. या योजनेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना चार वर्षे कालावधीचे अभियांत्रिकी शिक्षण दिले जाते. हा कालावधी संपल्यावर त्यांना लेफ्टनंट या पदावर नियुक्ती दिली जाते.
या योजनेंतर्गत प्रशिक्षणाचे टप्पे- (१) मुलभूत लष्करी प्रशिक्षण – याचा कालावधी एक वर्षाचा असून ते ऑफिसर प्रशिक्षण केंद्र गया, येथे दिले जाते. (२) फेज वन (टप्पा एक) – नियुक्तीपूर्व प्रशिक्षण – याचा कालावधी तीन वर्षाचा असून ते कॉलेज ऑफ मिलिटिरी इंजिनीअरिंग पुणे किंवा मिलिटरी कॉलेज ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड मेकॅनिकल इंजिनीअरिंग सिंकदराबाद किंवा मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन महू येथे दिले जाते. (३) नियुक्ती नंतरचे प्रशिक्षण – याचा कालावधी एक वर्षाचा असून ते सुध्दा कॉलेज ऑफ मिलिटिरी इंजिनीअरिंग पुणे किंवा मिलिटरी कॉलेज ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड मेकॅनिकल इंजिनीअरिंग सिंकदराबाद किंवा मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन महू येथे दिले जाते.
अभ्यासक्रमाच्या पूर्तेतनंतर विद्यार्थ्यांना जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीची अभियांत्रिकी पदवी प्रदान केली जाते.या उमेदवारांना लेफ्टनंट म्हणून नियुक्ती मिळाल्यावर दोन वर्षात कॅप्टन या पदावर पदोन्नती दिली जाते. सहा वर्षे पूर्ण झाल्यावर मेजर, आठ वर्षे पूर्ण झाल्यावर लेफ्टनंट कर्नल, तेरा वर्षे पूर्ण झाल्यावर कर्नल, सव्वीस वर्षे पूर्ण झाल्यावर कर्नल (टाइम स्केल) या पदांवर पदोन्नती दिली जाते. त्यानंतर ब्रिगेडिअर, मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल, व्हाइस चिफ ऑफ द इंडियन आर्मी, चिफ ऑफ आर्मी स्टॉफ अशा पदोन्नती मिळू शकतात. मात्र त्यासाठी विशिष्ट अशा सेवा शर्ती असतात. त्यापूर्ण करणाऱ्या उमेदवारांची या पदांवर निवड/पदोन्नती होऊ शकते.
अभ्यासक्रम/प्रशिक्षणाचे तीन वर्षे पूर्ण झाल्यावर विद्यावेतन दिले जाते. चौथ्या वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर या उमेदवारांना लेफ्टनंट पदाचे संपूर्ण वेतन , भत्यासह लागू केले जाते.
निवड प्रकिया
या योजनेअंतर्गत निवडीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची, १२ वीमध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात मिळालेल्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. यासाठी विशिष्ट कटऑफ गुण निर्धारित करण्यात येतात. निवडलेल्या उमेदवारांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डा (एसएसबी) पुढे मुलाखती/चाळणी परीक्षा द्यावी लागते. ही चाळणी मानसोपचार तज्ज्ञ, समूह चाळणी अधिकारी आणि मुलाखत घेणारे अधिकारी यांच्याव्दारे घेतली जाते.
प्रत्येक उमदेवारास दोन टप्प्यातील निवड प्रकियेतून जावे लागते. पहिल्या टप्प्यात यशस्वी झालेल्या उमेदवारासच दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरवले जाते. पहिल्या टप्प्यात अयशस्वी झालेल्या उमेदवारांना लगेच परत पाठवले जाते. चाळणी परीक्षा पाच दिवस चालते. दुसऱ्या टप्प्यात यशस्वी झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाळणी घेतली जाते. एसएसबीने निवडलेल्या आणि वैद्यकीय बोर्डाने,वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त ठरवलेल्या उमदेवारांना नियुक्तीचे पत्र दिले जाते. अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना एसएसबीच्या मुलाखत/चाळणी परीक्षेत मिळालेले गुण, उच्च शैक्षणिक अर्हता, एनसीसीचा अनुभव, इत्यादी बाबींचा समावेश केला जातो.
या चाळणी परीक्षेत काही अपघात किंवा जखम झाल्यास कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई दिली जात नाही.
संपर्क-www.joinindiaarmy.nic.in
(२) नौदलात थेट भरती
भारतीय नौदलामार्फत १०+२ (बी.टेक) कॅडेट एन्ट्री स्किम (योजना) राबवली जाते. या योजनेमधून निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरुपी नियुक्ती (कमिशन) दिली जाते. त्यांना नॅव्हल ॲकॅडेमी, एजिमाला (केरळ) येथे चार वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते. या उमेदवारांची शैक्षणिक आणि कार्यकारी, अभियांत्रिकी आणि विद्दूत शाखेसाठी निवड केली जाते. यासाठी, जॉईंट एंट्रंन्स एक्झामिनेशन (जेईई) – मेन या परीक्षेतील गुण आणि प्राधान्यक्रम (प्रिफरन्स) या बाबींचा आधार घेतला जातो. पहिल्या प्रिफरंसमधील शाखा मिळाली नाही तर जागा उपलब्ध असल्यास उमेदवाराचा विचार दुसऱ्या शाखेसाठी केला जाऊ शकतो. उमेदवाराने केवळ एकच शाखा निवडल्यास, गुणवत्ता यादित येऊनही दुसऱ्या शाखेसाठी त्याचा विचार केला जात नाही.
या योजनेंतर्गत अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारास १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात सरासरीने ७० टक्के आणि १२ वी किंवा दहावीत इंग्रजीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक ठरते.
निवड प्रकिया
प्राथमिक निवड यादितील उमेदवारांना एसएसबीच्या केंद्रांमध्ये मुलाखती/ चाळणी परीक्षेसाठी बोलावले जाते. चाळणी परीक्षेचे दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात बुध्दिमत्ता चाचणी, चित्रांचे अवलोकन/ बोध, समूह चर्चा या बाबींचा समावेश असतो. या टप्प्यात अयशस्वी झालेल्या उमेदवारांना त्याच दिवशी परत पाठवले जाते. दुसऱ्या टप्प्याची चाळणी/मुलाखती चार दिवस चालतात. यामध्ये समूह चर्चा, मानसशास्त्रीय चाचणी आणि मुलाखतीचा समावेश असतो. यात यशस्वी झालेल्या उमदेवारांना वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागते. ही चाचणी साधारणत: तीन ते पाच दिवस चालते. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड, नौदलाच्या गरजेनुसार ॲप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग या चार वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी केली जाते. या काळतील संपूर्ण खर्च नौदलामार्फत केला जातो. संपर्क- www.joinindiannavy.gov.in
(३)एनडीएतील प्रवेश
नॅशनल डिफेन्स ॲकॅडेमी आणि नॅवॅल ॲकॅडेमी(एनडीए) (खडकवासला), येथील प्रवेशासाठी संघ लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी ठरलेल्या वेळापत्रकानुसार दोन वेळा चाळणी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेव्दारे साधारणत: ३०० ते ४०० उमेदवारांची निवड केली जाते.
नॅशनल डिफेन्स ॲकॅडेमीसाठीची प्रवेश परीक्षा आणि सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डामार्फत घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेतून तावूनसुखावून निघालेल्या उमेदवारांची थलसेना, वायुसेना आणि नौदलासाठी निवड केली जाते. या उमेदवारांचे प्रारंभिक शिक्षण आणि शारीरिक प्रशिक्षण हे तीन वर्षाचे असून ते एनडीए (खडकवासला) येथे दिले जाते. पहिल्या अडीच वर्षाचे शिक्षण/प्रशिक्षण हे तिनही दलातील उमेदवारांसाठी समान असते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर उमेदवारांना जवाहरलाल नेहरु विद्यापीठाची पदवी प्रदान केली जाते. थलसेना,वायुसेना आणि नौदलासाठी ज्या उमेदवारांची, बी.एस्सी/ बी.एस्सी (कॉम्प्युटर) /बी.ए या पदवी अभ्यासक्रमासाठी निवड झाली असेल त्यांना ही पदवी, संबंधित अभ्यासक्रम, शारीरिक आणि सेवा प्रशिक्षण, एनडीए येथे पूर्ण केल्यावर प्रदान केली जाते. नौदल आणि वायुदलातील ज्या उमदेवारांची बी.टेक अभ्यासक्रमासाठी निवड झाली असेल, त्यांना ही पदवी नियुक्तीपूर्वीच्या प्रशिक्षणा (विमान/जहाज/संस्था) नंतर दिले जाते.
एनडीए मधून उत्तीर्ण झाल्यावर थल सेनेतील उमेदवारांना इंडियन मिलिटरी ॲकॅडेमी देहरादून येथे एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना लेफ्टनंट या पदावर नियुक्ती दिली जाते. नौदलातील कार्यकारी शाखेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी नॅव्हॅल ॲकॅडेमी एजिमाला येथे पाठवले जाते. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्यांना सब-लेफ्टनंट या पदावर नियुक्ती दिली जाते.
वायु दलातील उड्डाण शाखा( एअरफोर्स कॅडेट्स) आणि जमिनीवरील (ग्राउंड ड्युटी) विविध कार्यासाठी आवश्यक अतांत्रिक (नॉन टेक्निकल) शाखेतील उमेदवारांना एअर फोर्स ॲकॅडेमी हैदराबाद येथे पाठविले जाते. उड्डाण शाखेतील उमदेवारांचा प्रशिक्षण कालावधी दीड वर्षाचा असून एका वर्षानंतर त्यांना फ्लाईंग ऑफिसरचा तात्पुरता दर्जा दिला जातो. पुढील सहा महिन्याचे प्रशिक्षण आणि एक वर्षाचे प्रोबेशन संपल्यावर कायमस्वरुपी नियुक्ती दिली जाते.
तांत्रिक शाखेतील ग्राउंड ड्युटी उमेदवारांना एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी एअर फोर्स टेक्निकल कॉलेज बेंगळुरु येथे पाठवले जाते. ग्राऊंड ड्युटी(तांत्रिक/अतांत्रिक) या प्रशिक्षणाचे एक वर्ष पूर्ण झाल्यावर उमेदवारांना फ्लाईंग ऑफिसरचा तात्पुरता दर्जा दिला जातो. एक वर्षाच्या प्रोबेशननंतर कायस्वरुपी नियुक्ती दिली जाते.या प्रशिक्षणकाळात निवास/भोजन, पुस्तके, पोषाख, वैद्यकीय उपचार आणि
सर्व खर्च शासनामार्फत केला जातो.
निवड प्रकिया-
एनडीए परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी संघ लोकसेवा आयोगामार्फत किमान पात्रता गुण ठरविण्यात येतात. हे गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांची यादी एसएसबीकडे पाठवण्यात येते. या बोर्डामार्फत व्यक्तिमत्व आणि बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा घेतली जाते. मानसशास्त्रीय आणि बुध्दीमता चाचणीवर आधारित निवड प्रकिया दोन टप्प्यात राबवली जाते. यासाठी, निवड केंद्र/ हवाई दल निवड मंडळ/ नौदल निवड मंडळासमोर उमेदवारांना हजर व्हावे लागते.
या अधिकारी क्षमता चाळणी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान पात्रता गुण, एसएसबीमार्फत ठरवले जातात. हवाईदल आणि या दलातील उड्डाण शाखेसाठी संबंधित उमेदवारांनी नमूद केलेले प्राधान्य, दिलेला पर्याय आणि अर्हतेनुसार निवड झालेल्या उमेदवारांना कॉम्प्युटराइज्ड पायलट सिलेक्शन सिस्टिम टेस्ट(वैमानिक कल चाचणी,) द्यावी लागते. ही चाचणी एकदाच देता येते. त्यामुळे या चाळणीत मिळालेले चांगले गुण/श्रेणी, हे या उमेदवारासाठी, पुन्हा हवाई दलातील निवड मंडळातील मुलाखतीसाठी ग्राह्य धरले जातात. मात्र ही टेस्ट/चाळणी अनुत्तीर्ण झाल्यास अशा उमेदवारांना एनडीएच्या हवाई दलातील उड्डाण शाखेसाठी किंवा हवाई वाहतूक शाखा किंवा सामान्य सेवा (पायलट/वैमानिक) किंवा नौदलातील हवाई शाखेतील प्रवेशासाठी अर्ज करता येत नाही. यानंतर, लेखी परीक्षेतील गुण आणि एसएसबीच्या परीक्षेत गुणांवर आधारित सर्व उमेदवारांची एकत्रित यादी तयार केली. त्यानंतर अर्हता, वैद्यकीय पात्रता, गुणवत्ता- कम -उमदेवाराने दिलेला पर्याय आणि उपलब्ध जागा लक्षात घेउुन अंतिम निवड यादी तयार केली जाते.
शैक्षणिक अर्हता- थल सेना – १२ वी उत्तीर्ण, नौदल, हवाई दल – गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रासह १२ वी उत्तीर्ण. सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डा (सेवा निवड मंडळ) ने – (एसएसबी) ठरविलेल्या मानकांनुसार उमेदवार वैद्कीय आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक ठरते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एनडीए (नॅशनल डिफेन्स ॲकॅडेमी आणि )आणि एनए(नॅव्हल ॲकॅडेमी) मध्ये अविवाहित मुलींना प्रवेश देण्यास प्रारंभ झाला आहे.
संपर्क (१) थल सेना पर्याय दिलेल्या उमेदवारांसाठी – आर्मी हेडक्वार्टर्स, एजी ब्रँच, आरटीजी (एनडीए एन्ट्री) , वेस्ट ब्लॉक – ३, विंग-१, आर. के. पुरम, नवी दिल्ली – ११००६६, दूरध्वनी – ०११- २६१७५४७३ किंवा joinindianarmy.nic.in, (२) नौदल /नॅव्हॅल ॲकॅडेमी पर्याय दिलेल्या उमेदवारांसाठी- नॅव्हॅल हेडक्वार्टर्स, डायरेक्टोरेट ऑफ मॅनपॉवर ॲण्ड रिक्र्युटमेंट, ओ.आय ॲण्ड आर सेक्शन, रुम नंबर – २०४, सी विंग, सेना भवन, नवी दिल्ली – ११००११, दूरध्वनी-२३०१००९७ ,ईमेल – officer-navy@nic.in किंवा joinindiannavy.gov.in, (३) वायुदलाचा पर्याय दिलेल्या उमेदवारांसाठी – एअर हेडक्वार्टर्स, डायरोक्टोरेट ऑफ पर्सोनेल (ऑफिसर), पीओ ३ (ए), रुम नंबर १७, जे, ब्लॉक, वायूभवनच्या विरुध्द दिशेला, मोतीलाल नेहरू मार्ग, नवी दिल्ली – ११०१०६, दूरध्वनी -०११-२३०१०२३१, किंवा संकेतस्थळ- www.careerindianairforce.cdac.in
संघ लोकसेवा आयोगाचे दूरध्वनी क्रमांक- 011-23385271/011- 23381125/011-23098543
(७)अग्निपथ योजना
लष्करातील तिनही दलातील भरतीसाठी केंद्रसरकारने अग्नीपथ ही योजना यंदा कार्यान्वित केली आहे.साडेसतरा ते २१ वर्षे वयोगटातील १०वी/१२वी उत्तीर्ण मुले या योजनेंतर्गत अर्ज करु शकतात.चार वर्षासाठी या विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.त्यांना सर्व प्रकारचे लष्करी प्रशिक्षण दिले जाईल. पहिल्या वर्षी त्यांना ४ लाख ७६ लाख रुपयाचे पॅकेज दिले जाईल.चौथ्या वर्षापर्यंत या पॅकेजमध्ये ६ लाख९२ हजार रुपयांपर्यतंची वाढ होईल.निवड झालेल्या अग्निविरांमधून २५ टक्के अग्निविरांना त्यांच्या गुणवत्तेनुसार पुढे सेवेत कायम केले जाईल
संपर्क https://www.mygov.in/campaigns/agniveer/
०००
पदवीधरांना संधी
(१) कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिस परीक्षा
पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या युवक युवतींना कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिस ही परीक्षा लष्कारातील नियुक्तीची संधी उपलब्ध करुन देते. ही परीक्षा दरवर्षी दोनदा देशातील विविध शहरांमध्ये घेतली जाते.
या परीक्षेव्दारे पुढील ठिकाणी प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जातो- (१) इंडियन मिलिटरी ॲकॅडेमी देहरादून – यासाठी निवडल्या जाणाऱ्या एकूण उमेदवारांपैकी १३ जागा आर्मी विंगमधील एनसीसी – सी प्रमाणपत्रधारकांसाठी राखीव असतात. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी
(२) इंडियन नॅव्हल ॲकॅडेमी, एजिमाला – यासाठी निवडल्या जाणाऱ्या एकूण उमेदवारांपैकी ३ जागा नॅव्हॅल विंगमधील एनसीसी- सी प्रमाणपत्रधारकांसाठी राखीव असतात. अर्हता- कोणत्याही विषयातील अभियांत्रिकी पदवी (३) एअर फोर्स ॲकॅडेमी, हैदराबाद – यासाठी निवडल्या जाणाऱ्या एकूण उमेदवारांपैकी ३ जागा एअर विंगमधील एनसीसी सी प्रमाणपत्रधारकांसाठी राखीव असतात. अर्हता – कोणत्याही विषयातील पदवीधर या अभ्यासक्रमासाठी अर्ज करु शकतात,तथापि त्यांनी १२ वी मधे भौतिकशास्त्र आणि गणिताचा अभ्यास केलेला असावा किंवा अभियांत्रिकी पदवी. (४) ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडेमी चेन्नई-या ठिकाणी पुरुष आणि महिलांना लघु सेवा कमिशन योजनेंतर्गत अतांत्रिक स्वरुपाचे प्रशिक्षिण दिले जाते. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी
याशिवाय उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे अत्यावश्यक आहे. या पदांसाठी निर्धारित करण्यात आलेल्या शारीरिक क्षमतेची मानके (स्टँडर्ड्स) नियुक्तीच्या वेळेस महत्वाची ठरतात.
अशी असते परीक्षा
(१) इंडियन मिलिटरी ॲकॅडेमी, इंडियन नॅव्हॅल ॲकॅडेमी एअर फोर्स ॲकॅडेमीसाठी परीक्षा — इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि प्राथमिक (एलिमेंट्री) गणित या विषयांचे प्रत्येकी १०० गुणांचे तीन पेपर.कालावधी प्रत्येकी दोन तास.
(२) ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडेमी परीक्षा–या परीक्षेत इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या दोन विषयांचे प्रत्येकी दोन तासांचे आणि प्रत्येकी १०० गुणांचे दोन पेपर्स असतात. प्रश्न वस्तुनिष्ठ पध्दतीचे म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह असतात. सामान्य ज्ञान विषयाचा पेपर हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये असतो. दोन्ही पेपर्सचा दर्जा पदवी परीक्षेचा समकक्ष असतो. परीक्षा केंद्रे- मुंबई,नवी मुंबई,पुणे,ठाणे आणि नागपूर
मुलाखत-
इंडियन मिलिटरी ॲकॅडेमी,इंडियन नॅव्हॅल ॲकॅडेमी एअर फोर्स ॲकॅडेमीसाठी घेण्यात येणाऱ्या मुलाखतीसाठी प्रत्येकी ३०० गुण असतात. ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडेमीच्या प्रवेशासाठीच्या मुलाखतीसाठी २०० गुण असतात.मुलाखतीमध्ये बुध्दीमता आणि व्यक्तीमत्व चाचणी(इंटेलिजंन्स ॲण्ड पर्सनॅलिटी टेस्ट) यांचा समावेश असतो.
ही चाचणी दोनस्तरीय आहे. पहिल्या टप्प्यात ऑफिसर्स इंटेलिजन्स रेटिंग(ओआयआर)चा समावेश असून यात पिक्चर पर्सेप्शन टेस्ट आणि डिस्क्रिप्शन टेस्ट अशा दोन चाळणींचा समावेश केला जातो. या दोन्ही टेस्टच्या गुणांवर आधारीत दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारांची निवड केली जाते. या टप्प्यात मुलाखत, ग्रुप टेस्टिंग ऑफिसर टास्क, मानसशास्त्रीय चाचणी (सायकॉलॉजी टेस्ट) आणि चर्चा (कॉन्फरन्स) यांचा समावेश आहे.
या चाचण्यांची विस्तृत माहिती www.joinindianarmy.nic.in. या संकेतस्थळावर ठेवण्यात आली आहे.
संपर्क– फॅसिलेशन कांऊटर, दूरध्वनी– 011-23381125/011-23385271/011-23098543,संकेतस्थळ- www.upsconline.nic.in
(२) केंद्रीय राखीव पोलीस दल-
सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफ), सेंट्रल इंडस्ट्रिअल सेक्युरिटी फोर्स (केंद्रिय औद्योगिक सुरक्षा बल-सीएसआयएफ), इंडो-तिबेटन बॉर्डर फोर्स (इंडो-तिबेट सुरक्षा बल-आयटीबीपी), सशस्त्र सीमा बल(एसएसबी) आणि सीमा सुरक्षा दल (बॉर्डर सेक्युरिटी फोर्स)-मध्ये दरवर्षी असिस्टंट कमांडंट या पदांची भरती, सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस (असिस्टंट कमांडंट) एक्झामिनेशन या परीक्षेव्दारे केली जाते.
परीक्षा केंद्र नागपूर आणि मुंबई. परीक्षेसाठी upsconline.nic.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा लागतो.
संपर्क– rectt.bsf.gov.in
(३) महाराष्ट्र पोलीस
महाराष्ट्रातील पोलीस सेवेत थेट प्रवेशासाठी राज्य लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेतली जाते. त्याव्दारे पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक या पदावर भरती केली जाते.राजपत्रित अधिकारी पदांसाठी आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सामायिक परीक्षेत पोलीस उपअधिक्षक पदाचा समावेश असतो.पोलीस विभागामार्फत शिपाई दर्जाच्या पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवली जाते.
स्वातंत्र्योत्तर काळात लष्काराने देशाच्या सीमांचे रक्षण करण्यात अत्यंत अभिमानास्पद कामगिरी बजावली.त्याचप्रमाणे देशातील विविध नैसर्गिक आपत्तीच्या वेळी तिनही दलाचे ससैनिक/अधिकारी मदत कार्यात महत्वाची भूमिका बजावत असतात.भारतीय लष्कर हे जगातील सर्वोत्कृष्ट लष्करांपैकी एक समजले जाते. अशा श्रेष्ठ दलाचा एक भाग बनण्याची आणि देशाची सर्वोच्च स्वरुपाची सेवा करण्याची संधी उपरोक्त नमूद विविध मार्गांनी मिळते.ही संधी केवळ गुणवत्तेच्या आधारावर मिळते आणि भविष्यात अजोड पराक्रम-गुणवत्ता आणि दर्जा यांच्या बळावर वरिष्ठ पदांवर कार्य करण्याचीही संधी मिळते.
सुरेश वांदिले
.jpg)