(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

धम्माल म्हणजे काय?

    वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर संपवून तेजोमयी घरी येताच तिने जाहीर केले, आता दोन महिने केवळ धम्माल.     चालेल ना गं आई तुला.  तिने विचारलं.

    कां नाही? मी पण करणार तुझ्यासोबत धम्माल.आई म्हणाली.

    वाS, असं म्हणून तेजोमयीनं आईची पप्पी घेतली.

    टॉS म्हणून आईनं परतफेड केली.

    पण धम्माल करायची म्हणजे काय करणार गं तू ? आईनं विचारलं.

    म्हणजे की नाही...तेजोमयीची गाडी अडकली. तिला आठवेना नि काही सुचेना. अं हं अं, असं म्हणत ती डोकं खाजवू लागली नि एक गिरकी घेत  जसं त्या क्षणाला सुचल तसं आईस सांगू लागली…

मी या सुटीत काहीच वाचणार नाही. 24 तास खेळेन. गप्पा करेन. टीव्ही बघेन. मित्रांसोबत सिनेमाला जाईन. मस्त झोपेन. आहे की नाही धम्माल. असं म्हणून तिने आईला विचारलं,

    तू काय धम्माल करशील गं..

    मी पण मस्त झोपेन, गप्पा करेन, तुझ्या अभ्यासासाठी बंद ठेवलेला टीव्ही पुन्हा सुरु करेन, मैत्रिणींसोबत नाटकाला जाईन आणि पेपर सुध्दा वाचणार नाही.

    छान, असं तेजोमयीला म्हणावसं वाटलं. पण तिच्या लक्षात आलं की आई असं फुल्ल टू धम्माल करत बसली तर स्वयंपाक करणार कोण ? दररोज काही बाबा पार्सल बोलवणार नाहीत. आईने आपली फिरकी घेतल्याचं तिच्या लक्षात आलं नि ती लगेच म्हणाली.

    आई, धम्माल करण्याच्या माझ्या यादीतील पन्नास टक्के भाग काढून टाकला तर चालेल का ?

    कां गं?

    मी तुला या उन्ह्याळयात घर कामाला मदत करीन नि बाबांसाठी चहा नि तुझ्या साठी कॉफी बनवायला शिकून घेईन..ही पण धम्मालच नाही का गं?

    मी सुध्दा माझ्या धम्माल यादितील पन्नास टक्के भाग कमी करुन तुला मुंबईची सैर करुन आणेन. मत्स्यालय दाखवीन, राणिच्या बागेतला पेंग्विन नि वाघीण काकू आणि तिचा बाळ दाखवीन, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहायलतले १०० प्रकारचे कावळे दाखवीन.

    वा S व. १०० प्रकारचे कावळे..म्हणजे ही खरी धम्माल. तेजोमयी आनंदून म्हणाली.

    टा S,असं म्हणून आईनं तिचा गालगुच्चा घेतला.

सुरेश वांदिले