(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मालकीनबाईंच्या घरातील एका बिळात राहणाऱ्या रॉबिन्सन उंदीर मामास, मार्गारेट मनी मावशीची दया यायची. कारण या बिचारीस मालकीनबाईच्या अवतीभवती किती फिरावं लागायचं! जरा म्हणून स्वस्थता नाही. त्या या खोलीतून त्या खोलीत गेल्या किंवा त्या खोलीतून या खोलीत आल्या की मावशीला त्यांच्या पाठिमागे पळावंच लागायचं. ती आपणहून गेली नाही की मालकीनबाईंच्या शिव्यांचा प्रसाद भेटलाच म्हणून समजा.

“बिच्चारी!” मामा पुटपुटला.   मावशीने ते बरोबर टिपलं.

“कोण बिच्चारी रे?” मावशीने डोळे वटारून रॉबिन्सनला विचारलं.

“मावशे, तुला तू बिच्चारी वाटत नाहीस का?”

“असं मला वाटायला काय धाड भरलीय गधड्या?” मावशी रॉबिन्सनवर खेकसली.

“नाही म्हणजे, तुला सारखं मालकीनबाईंच्या अवतीभवती फिरावं लागतं. त्याने तुला किती त्रास होत असेल? तुझ्या गुडघ्यांना किती वेदना होत असतील?”

“गधड्या, याला काय फिरणं म्हणतात?”

“आँ! तुझं असं मग मालकिनबाईंच्या मागेमागे जाण्याला काय म्हणतात?”

“ राब्या, मी करते ते येरझाऱ्या आणि पृथ्वी करते ते फिरणं. समजलं?”

“मावशे पृथ्वीचं फिरणं काही विशेष आहे का?”

“रॉब्या, तिचं फिरणं त्यापलिकडचं आहे.”

“म्हणजे भानगड का?”

“रॉबेटल्या, पुन्हा तू आलास मूळपदावर. तुला जिथे तिथे भानगडच दिसते का रे?”

“तसं नाही गं, तू ‘त्या पलिकडचं’ पृथ्वीचं फिरणं आहे, म्हणालीस ना.”

“अरे मूर्खा, पलिकडचं म्हणजे खास!”

“याचा अर्थ  हे खास फिरणं बघायलाच हवं. मावशे, जरा करना काहीतरी, पृथ्वीचं खासमखास फिरणं बघायचय मला.” 

मामा हट्ट करू लागला. मामाच्या अशा हट्टाला पूर्ण केलं नाही तर त्याची भूणभूण सुरूच राहील हे मावशीला ठाऊक होतं. त्यामुळे डोळे मिटून मंत्र म्हणू लागली,

“ऱ्हीम ऱ्हूम टॉक, ऱ्हीम ऱ्हूम टॉक/ 

बिम बूक बाक, बिम बूम बाक// 

ने आम्हा दोघांना उंच उंच आकाशात/

बघू दे जरा पृथ्वीच्या फिरण्याची करामत//

मंत्र म्हणताच दोघांनाही पंख फुटले. ते अतिवेगाने आकाशात जाऊ लागले. इतके वर गेले की त्यांना खाली वेगाने फिरणारी निळीशार पृथ्वी दिसू लागली.

तो वेग पाहून मामाने आश्चर्याने तोंडात बोट घातलं.

“मावशे बाय, पृथ्वीच काही खरं नाय!”

“अरे मामू, तू घाबरू नकोस. पृथ्वी या वेगाने फिरत असली तरी तिला काहीच होणार नाही.”

“काय गं मावशे, ही इतक्या वेगानं फिरणारी पृथ्वी दररोज किती अंतर धावत असेल गं?”

“वारे मेरे पठ्ठे, तुला पडतो जेव्हा प्रश्न, तोच तर असतो माझ्यासाठी जश्न! मी सांगतेना सारं. अरे, आपण जेव्हा खाली असतो तेव्हा एका जागी वाटणारी पृथ्वी खरंतर स्थिर नाही. ती दोन प्रकारे फिरते! जसा चरखा फिरतो तशी पृथ्वी स्वतःभोवती फिरते. विषुववृत्तावर तिची गती तब्बल १,६७० किलोमीटर प्रति तास असते. समजा मालकीनबाईंनी तुझ्या मिशा एवढ्या वेगाने फिरवल्या तर तू अंतराळात भुर्रकन उडून जाशील.

“अरे वा, छान विनोद आहे. पण मी द्यायला हवी ना मालकीनबाईच्या हाती माझी मिशी. आल्याच माझ्याजवळ तर दाखवीन त्यांना काशी.”मामा दात काढून म्हणाला.

“हा हा हा!”

“वा वा वा… मावशे हे झालं पृथ्वीच पहिलं फिरणं. दुसऱ्या फिरण्याचं काय?”

“रॉबू, पृथ्वीच दुसरं फिरणं म्हणजे सूर्याभोवती प्रदक्षिणा. सूर्यापासून पृथ्वीचं सरासरी अंतर १४.९६ कोटी किलोमीटर आहे. हा मार्ग जवळपास गोल आणि  थोडासा लंबवर्तुळाकार आहे. पण आपण गोल मानूया म्हणजे पृथ्वीच्या फिरण्याचं गणित करणं सोपं होईल.”

“अरे बापरे, इथेही गणित आलं का?”मामा घाबरण्याचा अभिनय करत म्हणाला.

“रॉब्या, त्याशिवाय पृथ्वीचं फिरणं नाही कळायचं.

“बर बाबा, आलिया भोगासी गणिताचा भार, समजून घेण्या आहे सविनय सादर!” मामा अभिनय करत म्हणाला.

“रॉबू, वर्तुळाची परिमिती = २ × π × त्रिज्या या सूत्रामध्ये आकडे टाकायचे.” 

“कोणते गं?”

“वर्तुळाची परिमिती ≈ २ × ३.१४ × १५ कोटी = साधारमण ९४ कोटी किलोमीटर! (९४ दशलक्ष किमी). ही संपूर्ण प्रदक्षिणा पृथ्वी एका वर्षात (३६५.२५ दिवसांत) पूर्ण करते. म्हणजे एका दिवसात पृथ्वी सूर्याभोवती साधारण २ कोटी ५८ लाख किलोमीटर (२५.८ लाख किमी) अंतर कापते!”

“बाप रे बाप! हे ऐकून लागली मला धाप!”

“रॉबू, मालकीनबाईंच्या दोन बेडरुमच्या खोल्यांमधील माझी धावाधाव, पृथ्वीच्या धावण्यापुढे दर्यामे खसखस, असल्याचं तुझ्या लक्षात आलंच असणार, आता.” असं म्हणत मावशीने मामाची मिशी ओढली. मामा भानावर आला.

“खरंच! मालकीनबाईंच्या फक्त दोन बेडरुमच्या खोल्यांत मार्गी फिरुन फिरुन किती फिरणार?  पृथ्वी जर खरोखरच मालकीनबाई असती आणि तिने मार्गेटलिला आपल्या गतीने पळायला लावलं असतं तर बिचारी पाच सेकंदातच पंचतत्वात गेली असती!”

या कल्पनेत मामा रंगला असतानाच मावशीने दुसरा मंत्र दोघांवरही टाकला. 

धाडदिशी दोघे खाली पडले. त्या आवाजाने सोफ्यावर घोरत असलेल्या मालकीनबाई जाग्या झाल्या. 

समोर मार्गारेटला बघून त्या जाम चिडल्या आणि त्या तिला मारायला धावल्या. मार्गारेट घाबरून या खोलीतून त्या खोलीत पळू लागली. 

रॉबिन्सन पटकन बिळात शिरला आणि मावशीची धावाधाव एंजॉय करू लागला.

सुरेश वांदिले