तिने २०२२ साली जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताकडून सुवर्ण पदक पटकावून एक विक्रम केला. कोणत्याही जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी ती देशातील सर्वात लहान खेळाडू ठरली. त्यावेळी तिचं वय होतं १७ वर्षे.
ती दहा वर्षाची असताना एकदा ती आपले वडिल गोपिंचद यांच्यासमवेत, साताऱ्यात क्रीडास्पर्धा बघायला गेली होती. त्यावेळी तिने पहिल्यांदा तिरंदाजिचा खेळ बघितला. तिला हा क्रीडाप्रकार फार आवडला. तिने तिच्या बाबांना तसं सांगितलं. बाबांनी तिला प्रोत्साहन दिलं. एका प्रशिक्षण अकादमित तिला टाकलं. या अकादमीमध्ये ती जवळपास दीडवर्षे कधीही सुटी न घेता अथक सराव करत राहिली.
तिचे बाबा आणि प्रशिक्षक तिला तिरंदाजित वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचे व्हिडिओ दाखवत. अशाच एका व्हिडियामध्ये तिने भारतीय खेळाडू पदक स्वीकारत असताना राष्ट्रगीत ऐकले. तेव्हाच तिने देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करण्याचा निर्धार केला. यानंतर अवघ्या एका वर्षात तिने जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकली. त्यामुळे २०१७ साली तिची आतंरराज्य स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या चमूत निवड झाली. पुढच्याच वर्षी तिने राष्ट्रीय स्पर्धेत चांदिचे पदक जिंकले.
कोविडच्या काळात अकादमी बंद असल्याने तिने घराच्या बाहेर जमेल तसा सराव सुरु ठेवला. कोविड संपल्यावर पुन्हा वेगवेगळया स्पर्धा सुरु झाल्या. २०२१ साली तिने उपकनिष्ट गटातील राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदकं जिंकलं. याच वर्षी ती वरिष्ट गटातील राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरली. या स्पर्धेत तिला चांदिचं पदक मिळालं. तिच्या या सातत्यापूर्ण कामगिरीमुळे तिला २०२२ साली फुकेत येथे झालेल्या आशिया कप स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली. भारताच्या चमुने जिंकलेल्या चांदिच्या पदकात तिचा मोठा सहभाग राहिला. मे आणि डिसेंबर २०२२ मध्ये इराक आणि शारजाहमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत भारतीय चमुने सांघिक सुवर्ण पदक जिंकले. यातही तिचा वाटा मोलाचा होता. शारजाह येथील स्पर्धेत वैयक्तिक स्पर्धेची ती उपविजेती ठरली. त्यानंतर तिचा भारतीय चमूत कायम समावेश होऊ लागला.
तिरंदाज होण्याचं तिचं स्वप्न साकार करण्यासाठी तिच्या बाबांना सतत कर्ज काढावं लागलं. ते १२ लाखांपर्यंत पोहचलं. राष्ट्रीय स्पर्धेत चांगले यश मिळाल्यानंतर तिला दरमहा दहाहजार रुपयांची शिष्यवृत्ती सुरु झाली. इंडियन ऑइल कंपनीनेही दरमहा २० हजार रुपयांची शिष्यवृत्ती सुरु केली. त्यामुळे कटुंबावरचा खर्चाचा भार काहिसा हलका झाला. २०२२ च्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्यावर तिला सात लाख रुपयांचं पारितोषिक मिळालं. ते गोपिचंद यांच्यावरील कर्जफेडीसाठी वापरलं गेलं.
तिला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मिळालेल्या पदकांची संख्या प्रचंड मोठी आहे. सुरुवातीला, साताऱ्यातील दोन खोलिंच्या टिनाच्या घरात ही पदकं ठेवायला जागा सुध्दा नव्हती. २०२४ आलंपिंक स्पर्धेत तिचा ज्या तिरंदाजी प्रकारात सहभागी होते. त्याचा समावेश नव्हता. मात्र २०२८ साली लॉसएंजेलिस येथे होणाऱ्या ऑलंपिक स्पर्धेत या क्रीडाप्रकाराचा समावेश आहे. त्यासाठी तिने अथक सराव सुरु केलाय.
अशी ही अदिती स्वामी. वय वर्षे २३. हल्ली मुक्काम सातारा.
सुरेश वांदिले
००००