(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

झोपेची वेळ होऊनही अलेक्झांडर टक्क जागाच असल्याने आई त्याला रागवली. पण, तो काही जागेवरुन उठेना. तेजोमयी कधीचीच झोपायला गेली होती.

“झोप आली की बरोबर डोळे मिटेल तो”, बाबा आईला म्हणाले.  “उगाच जागा राहू नको ठोंब्या”, त्याला कुरवाळत आई म्हणाली.

“काळजी करु नका मॉम, त्याला मी झोपवते,” अलेक्सा गोर्जीने आईला आश्वस्त केलं. आपल्याबाजूने गोर्जी बोलल्याचं अलेक्झांडरच्या लक्षात आलं. त्याने उडी मारुन आनंद व्यक्त केला. आईबाबा हसले नि झोपायला निघून गेले.

अलेक्झांडर, गोर्जीकडे जिभ लांब करुन बघू लागला. तिच्या गालाला पंजा लावला. खरंतर गोर्जीलाही विश्रांती घ्यावी वाटत होती. पण तिने स्वत:च अलेक्झांडरला झोपवते, असं सांगितल्याने तिचा नाईलाज होता.

“तुला खेळायचय का?”गोर्जीने विचारलं. अलेक्झांडरने नकारार्थी मान हलवली.

“मग काय करायचं?”

अलेक्झांडरने जिभ आणखी लांब करुन, शेपटी हलवून, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. गोर्जीने डोळयातील कॅमेऱ्याने त्याचा मेंदू स्कॅन केला. तेव्हा तिच्या लक्षात आलं की, अलेक्झांडरला गोष्ट ऐकायचीय. आता, कोणती बरं गोष्ट सांगावी याला, याचा विचार ती करु लागली. तिने माहितीच्या माहाजालात मेंदूला पाठवलं. त्याने काही गोष्टी शोधून आणल्या.

“अलेक्झू, मी गोष्ट सांगते. पण, उगाच जागायचं नाही. झोप आली की झोपायचं. उरलेली गोष्ट उद्या सांगेन. समजलना”

अलेक्झांडरने होकारार्थी मान हलवली.

गोर्जी गोष्ट सांगू लागली. गोष्ट सांगता सांगता तीही रंगून गेली.

“असं कुठे असते का?” या आवाजाने तिची तंद्री भंग पावली. तेजोमयी कधी तिथे येऊन बसली हे गोर्जी आणि अलेक्झांडरच्या लक्षातच आलं नव्हतं.

अलेक्झांडरनेही मान वळवून तिच्याकडे बघितलं. तुलासुध्दा झोप येत नाहीका, अलेक्झांडरच्या डोळयात असे भाव उमटले.

“होना.” तेजोमयी, कधी अलेक्झांडरकडे तर कधी गोर्जीकडे बघत म्हणाली.

“तुला आवडली नाही का गोष्ट? तू कां बरं, असं कुठे असते का? म्हणालीस.”

“गोर्जे, तुझ्या गोष्टीतल्‍या प्राण्याबद्दल होतं ते.”

“त्याला काय झालं?”

“काय झालं म्हणजे, अगं, तू ‘नवगुंजरा’ प्राण्याबद्दल सांगत नव्हतीस का? या प्राण्याला म्हणे कोंबड्याचं डोकं, एक पाय मनुष्याचा ,एक पाय हत्तीचा नि एक वाघाचा नि एक सिंहाचा होता. मान मोराची, तर वशिंड बैलाची, कंबर सिंहाची आणि शेपटी नागाची होती. मनुष्यप्राण्यासारख्या दोन हातात त्याने कमळ घेतलेलं होतं. असं कुठं असतं का?”

“तेजो, हा प्राणी महाभारत काळातला. एकदा अर्जून जंगलात ध्यानस्थ बसला असताना, त्याला एका प्राण्याची चाहूल लागली. त्याने डोळे उघडले, तेव्हा त्याला हा दिसला.”

“अर्जून घाबरला का?”

“छे, तो तर महापराक्रमी.”

“मग, हा प्राणी घाबरला का?”

“तो तर सर्वशक्तीमान.”

“मग काय झालं?”

“अर्जुनाने धनुष्याला बाण लावला. तो या प्राण्यावर चालवणार, तोच त्याच्या लक्षात आलं की, हे बरोबर नाही. आपल्याकडे शस्त्र आहे नि हा प्राणी नि:शस्त्र. शिवाय त्याने, आपल्यावर हल्ला केला नाही. उगाच कां त्याला मारायचं? बघ, अर्जुनाच्या काळापासूनच प्राणी उगाचच कुणावर हल्ला करत नाहीत. त्यांना डिवचलं, त्यांच्यावर हल्ला केला तरच, ते प्रतिकार करतात. अर्जुनाला हजारो वर्षापूर्वी लक्षात आलं, पण आजच्या तुम्हा लोकांना ते कळत नाहीय.”

“आजचं सोडून दे, पुढे काय झालं?”

“अर्जुनाने, त्या प्राण्याकडे एकटक बघितलं. त्याच्या लक्षात आलं की, हा प्राणी विचित्र असला तरी तो देवाचा चमत्कार आहे. त्यातून देवाने स्वत:चे दर्शन घडवलय. हे लक्षात येताच, त्याने त्या प्राण्याला दंडवत घातला.”

“असं कुठे असतं का?, बरोबरना रे, अलेक्झू” तेजोमयीने अलेक्झांडरकडे बघितलं.

“आपल्याला कां विचारते बाँ ही तेजो, असे वाटून त्याने मोठ्ठी जांभई देऊन तिथेच ताणून दिली.” दोघेही हसल्या.

“ही झाली अलेक्झांडरसाठीची गोष्ट, आता माझ्यासाठी सांग? तेजोमयीने आग्रह केला.

“हे बघ, तूसुध्दा झोप बघू. उद्या उशिरा उठलीस तर, मग आई तुझ्याकडे, शस्त्र आहे की तू नि:शस्त्र हे काही न बघता, तुला रट्या द्यायची नि माझीही वरात काढायची. मला भिती वाटते बाबा मॉमची.” गोर्जी म्हणाली. तिने चटदिशी आपला स्वीच ऑफ केला.

सुरेश वांदिले