तेजोमयीच्या घरी बाप्पांचं आगमन झालं. बाप्पांना मखरात बसवलं गेलं. सजावटीसाठी बाबांनी खूप फुलं आणली होती. तिघांनीही मिळून छान सजावट केली. मखरात बसलेला कुणीतरी खासा असल्याचं अलेक्झांडर ला कळलं होतं. त्यामुळे तोही कौतुकानं तिघांच्या सजावटीकडे बघत होता.
हे तिघेही काम करताहेत नि आपणास काहीच करता येत नाही, याची खंत अलेक्झांडरला वाटली असावी म्हणून मग त्याने फुलांची पिशवी उचलली नि इकडून तिकडे फिरवून आणली. पुन्हा तो तिघांकडे आणि नंतर बाप्पांकडे उत्सुकतेने बघू लागला. थोड्याच वेळात पुन्हा अस्वस्थ झाला. त्याने पुन्हा फुलांची पिशवी उचलली आणि इकडून तिकडे फिरवून आणली.
अरे, तुझं चाललय तरी काय, जरा शांत बसना, तेजोमयी अलेक्झांडरकडे बघत म्हणाली. आई सांगना याला, तिने आईकडे तक्रार केली.
काय रे ठोंब्या, कां असा अस्वस्थ झालास तू..जरा शांत बसना जरा..आईने त्याला समजावलं. आईचं समजावणं अलेक्झांडरला बरोबर कळतं. त्यामुळे तो काही वेळ, मान जमिनीस टेकवून शांतपणे बसला. पण पुन्हा अस्वस्थ झाला. यावेळी त्याने फुलांची पिशवी घेतली आणि तिला उपडी केली. सर्व फुलं खाली सांडली.
अरे, काय चाललय अलेक्झांडर तुझं हे, गप्प बसना..बाबा जोरात म्हणाले. बिचारा त्यामुळे दचकलाच. आता, आई अलेक्झांडरचे कान नक्कीच उपटते असं तेजोमयीला वाटलं. पण झालं भलतचं. आई बाबांवरच ओरडली.
अहो, असं ओरडू नका बिचाऱ्यावर..
म्हणे बिचारा. बाबांचा राग अजून गेला नव्हता.
अहो,जरा शांत व्हा..अलेक्झांडर मघा दोनदा फुलांची थैली घेउुन इकडून तिकडे करुन आला. आता त्याने फुलांची थैली खाली उपडी केली. याचा अर्थ कळतय का तुम्हास..
कसा अर्थ आई, तेजोमयीनं विचारलं.
सगळा अनर्थ..बाबा रागातच म्हणाले..
अहो, हा मघापासून आपण तिघेही बाप्पांची आरास करतोय हे तो बघतोय ना, त्यालाही तसंच करावसं वाटत असलं पाहिजे..म्हणून तो त्याच्या पध्दतीनं सांगत असावा..पण आपल्या ते लक्षातच आलं नाही.म्हणून शेवटचा उपाय म्हणून अलेक्झांडरने पिशवीच उपडी केली. बरोबर ना रे माझ्या राज्या.आई प्रेमाने त्याच्याकडे बघत म्हणाली.
आई, काही होकारार्थी बोललं की अलेक्झांडरला ते बरोबर कळतं. मान आणि शेपूट दोन्ही हलवून तो आईच्या कुशित शिरला. आईने त्याच्या पाठिवरुन मायेने हात फिरवला. त्याला एक झेडुंचं फुल दिलं. त्याने ते हळूवारपणे मखरासमोर ठेवलं. बाप्पांनाही दंडवत घातला..बाबांचा राग कुठल्या कुठे पळून गेला. त्यांनी अलेक्झांडरला पोटाशी धरलं.तेजोमयीस गहिवरुन आलं. शेपूटवाल्या दोस्तांच्या कृतीकडे अधिक काळजीपूर्वक बघण्याचा धडा तिला मिळाला होता.
०००