२०२३ च्या ऑगस्ट महिन्यातील. भारताचं चंद्रयान-३ चंद्रावर यशस्वीपणे उतरलं होतं. सर्वत्र जल्लोष सुरू होता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील भागात जगात पहिल्यांदाच चंद्रयान उतरवून भारताने इतिहास रचला. त्याच काळात त्याने जागतिक बुद्धिबळ विश्वात खळबळ उडवली. बाकू (अझरबैजान) येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय जागतिक स्पर्धा २०२३ स्पर्धेत त्याने अपराजित जागतिक विजेता मॅग्नस कार्लसनला अंतिम फेरीत टाय-ब्रेकरपर्यंत नेण्यास भाग पाडले. त्यावेळी तो अवघा १८ वर्षांचा होता. या कामगिरीमुळे भारतात पुन्हा एकदा जल्लोष सुरू झाला.सर्व माध्यमांमध्ये चंद्रयान-३ आणि त्याच्या यशाची एकत्र चर्चा होऊ लागली.
या स्पर्धेत त्याने जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हिकारु नाकामुरा आणि तिसऱ्या क्रमांकावरील फॅबिआनो कॅरुआना यांना पराभूत करून स्वतःचा दबदबा निर्माण केला. या भीमकाय पराक्रमामुळे तो बुद्धिबळाच्या पटावरील ‘नवा राजा’ ठरेल, अशी चर्चा जाणकारांमध्ये सुरू झाली.
तो उत्कृष्ट आणि प्रतिभावान खेळाडू असला तरी, जागतिक स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचून जगातील अव्वल खेळाडूंना लागोपाठ पराभूत करेल, अशी अपेक्षा त्याच्या प्रशिक्षक आणि पालकांनाही वाटली नव्हती. पण ते प्रत्यक्षात घडलं. त्यामुळे त्याच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ झाली.
रमेशबाबू आणि नागालक्ष्मी हे त्याचे आई-वडील त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. त्याची बहीण वैशाली हीदेखील या खेळातील उत्कृष्ट खेळाडू. तो लहान असतानाच वैशाली त्याच्यासोबत बुद्धिबळ खेळायची आणि त्याला खेळाचे बारकावे समजावून सांगायची. पण याहूनही महत्त्वाची आहे त्याची चिकाटी, अखंड परिश्रम करण्याची तयारी आणि निष्ठा.
वयाच्या आठव्या वर्षापासून तो प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षकांच्या कठोर आणि अचूक प्रशिक्षणामुळे
२०१३ साली त्याने ८ वर्षांखालील, तर २०१५ साली १० वर्षांखालील वर्ल्ड युथ चॅम्पियनशिप जिंकली. या यशानंतर तो वयाच्या दहाव्या वर्षी इंटरनॅशनल मास्टर झाला आणि जागतिक पातळीवर हा मान मिळवणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला.
वयाच्या १२व्या वर्षी तो ग्रँडमास्टर झाला. २०१९ साली त्याने १८ वर्षांखालील वर्ल्ड युथ चॅम्पियनशिप जिंकली. त्याच वर्षी त्याने एक्स्ट्राकॉन चेस स्पर्धेत १३ ग्रँडमास्टर्सचा पराभव करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पुढे आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चेस फेडरेशनच्या कँडिडेट टुर्नामेंटसाठी पात्र ठरणाऱ्या सर्वात तरुण खेळाडूंमध्ये त्याचा समावेश झाला. हंगेरी येथे पार पडलेल्या चेस ऑलिम्पियाड, वर्ल्ड कप आणि ग्लोबल चेस लिग स्पर्धांमध्येही त्याने अत्युत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. आशियाई क्रीडा स्पर्धेतही तो भारताच्या बुद्धिबळ संघातील महत्त्वाचा खेळाडू होता.
बुद्धिबळाचे सामने प्रचंड मानसिक थकवा आणणारे असतात. पण सामने संपल्यानंतर विश्रांती घेण्याऐवजी तो लॅपटॉप उघडून जगभरातील विविध बुद्धिबळ स्पर्धांचे सामने काळजीपूर्वक पाहतो. सरावाचा कधीही कंटाळा करत नाही. अशा लहान वयात मुले व्हिडिओ गेम्स, सोशल मीडिया, मोबाइल, वेब सिरीज यांच्या आकर्षणात अडकतात; पण त्याने या मोहांना आसपासही फिरकू दिले नाही. त्याने आपले मन आणि ह्रदयातील जागा केवळ बुद्धिबळासाठीच राखून ठेवल्याचं, त्याचे वडील कौतुकाने सांगतात.
तर, असा हा आर. प्रज्ञानंद, वय वर्षे २०.
हल्ली मुक्काम- चेन्नई.