बॅडमिंटनमधील एक महाशक्ती असलेल्या चीनमध्ये तिने पहिल्यांदा बॅडमिंटनची रॅकेट हातात धरली. तेव्हा तिचं वय होतं सहा वर्षे. तिचे बाबा रवीनारायण हे एक सॉफ्टवेअर अभियंते. नोकरीनिमित्त त्यांना २०१५ साली चीनच्या जियांगसू प्रांतात जावं लागलं. भारतात असताना मात्र तिला बॅडमिंटन खेळात फार रस नव्हता. पण, बाबांसोबत जियांगसूला गेल्यावर तिला तेथील बँडमिंटनमय वातावरणानं भारुन टाकलं.
जियांगसूला या मुलीला सोबत नेण्याचा रवीनारायण यांचा निर्णय चांगलाच फलदायी ठरला. ती बॅडमिंटनमध्ये इतकी रमली की तिने सहाव्या वर्षी कुंशान या स्थानिक स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. तिच्या बाबांना बॅडमिंटन खेळातलं तिचं कौशल्य चांगलं भावलं. त्यांनी तिला चीनमध्येच सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण मिळण्यासाठी झॅग ली आणि वू या प्रशिक्षकांची सुविधा उपलब्ध करुन दिली. या दोघांनी तिला अतिशय कठोर आणि कठीण प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. तिला दिवसभरात २०० ते ३०० वेळा सर्व्हिसिंगचा सराव करावा लागे. शिवाय पायांची अचूक हालचाल शिकण्यासाठी आणि स्मॅशविरुद्ध बचाव करण्याचं कौशल्य आत्मसात करण्यासाठी तिच्याकडून अनेक वेळा ते काटेकोरपणे सराव करवून घेत.
लहान वयातील या कठोर प्रशिक्षणामुळे ती, बॅडमिंटन खेळणाऱ्या तिच्या समकालीन मुलींपेक्षा तांत्रिकदृ्ष्ट्या कितीतरी पटिने ती सरस ठरली. तिने पहिले एकेरी विजेतेपद २०१८ साली ‘अंडर एटिन’ या स्पर्धेत मिळवलं. २०१९ साली तिने ‘अंडर नाईन’, ‘अंडर टेन’, ‘अंडर इलेव्हन’ स्पर्धेत विजयी घोडदौड कायम ठेवली.
२०२० साली रविनारायण भारतात परतले. नव्या वातावरणात आल्यावरही तिचा बॅडमिंटनमधील उत्साह आणि रस काही कमी झाला नाही. तिच्या वडिलांनी चिनमधील प्रशिक्षणाचे व्हिडियो, बेंगळुरुच्या प्रकाश पदुकोन बॅडमिंटन ॲकॅदमीच्या प्रशिक्षकांना दाखवले. तिचं तांत्रिक कौशल्य, बॅडमिंटन कोर्टवरील वेगवान, लयबध्द आणि नियंत्रित हालचाली, फटके मारताना वेळेची अचूक जाण बघून प्रशिक्षक प्रभावित झाले. तिला तत्काळ या अकादमित प्रवेश देण्यात आला. इथे तिने सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकांच्या हाताखाली प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. या प्रशिक्षणामुळेच ती वयाच्या १४ व्या वर्षी भारतातील कनिष्ठ गटातील सर्वोत्कृष्ठ खेळाडू ठरली. गेल्यावर्षी तिने चेंगडू येथे झालेल्या ‘एशियन अंडर फिफ्टिन’ स्पधेतील एकेरीचं विजेतेपद पटकावलं.
खडतर परिश्रमामुळे हे यश तिला मिळालं हे खरं असलं तरी कुटुंबाचा तिला मिळालेल्या संपूर्ण पाठिंबाही महत्वाचा ठरतो. कोविडच्या काळात तिच्या वडिलांची बदली ओडिसातील ग्रामीण भागात झाली. तिथेसुध्दा तिने सरावाकडे दुर्लक्ष करु नये याची खबरदारी तिच्या बाबांनी घेतली. त्याठिकाणी तिच्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या खेळांडूसोबत तिने सरावातील सातत्य कायम राखले. तिची आई सैलाबाला ही तिच्या फिटनेस (तंदुरुस्ती)कडे काटेकोरपणे लक्ष पुरवते. चिनमध्ये असताना ऑलंपिक दर्जाच्या स्टेडियमध्ये दररोज पाच किलोमीटर ती धावायची. त्यामुळे तिची सहनशक्ती आणि ताकद वाढण्यासाठी मदत झाली. याशिवाय, चीनमध्ये विकसित झालेली तिची स्केटिंगची आवड बॅडमिंटन कोर्टवरील तिच्या उत्कृष्ट संतुलनास कारणीभूत ठरली.
तिने लहान वयातच मोठं यश मिळवलय. पण तिचं अंतिम उदिष्ट्य आहे, २०२८ मध्ये ऑलंपिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचं. त्यासाठी तिने आपलं सगळं लक्षं केंद्रित केलय.
तर, अशी ही तन्वी पत्री, वय वर्षे १४, हल्ली मुक्काम बेंगळूरू.
सुरेश वांदिले