(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

नवी संधी उद्योजक होण्याची

देशातील युवकांना स्वत:चा उद्योग स्थापन करता यावे, यासाठी केंद्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. स्वयंरोजगारातूनच बेकारी दूर होण्याशिवाय संपत्ती निर्मितीलाही हातभार लागू शकतो. कौशल्यप्राप्त व्यक्ती स्वयंरोजगाराच्या दिशेनं स्वत:ची पावलं आत्मविश्वासाने टाकू शकतात. त्यामुळेच गेल्या तीन-चार वर्षात कौशल्य विकासाच्या विविध योजना आणि उपक्रमांना केंद्रशासनानं गती दिली. काही योजना या सर्वांसाठीच असल्यातरी समाजातील उपेक्षित आणि तळागाळातील घटकांना सक्षमपणे स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

केंद्र शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम मंत्रालयाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या संवर्गातील उमेदवारांसाठी, “राष्ट्रीय एस.सीएस.टी हब, ही योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत आतापावेतो ४० हजारांहून अधिक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती संवर्गातील उमेदवांराना  कौशल्यनिर्मितीचं प्रशिक्षण देण्यात आ. १ लाख २८ हजाराहून अधिक उमेदवारांना विविध प्रकारचं साहाय्य केलं गेलं.

उद्योजकतेला अथवा उद्योजकीय प्रेरणांना वाव मिळावा यासाठी सुध्दा विविध योजना राबवण्यात येतात. भारत सरकारची स्टार्ट- अप इंडिया ही योजना त्याचाच एक भाग. या योजनेमध्ये नवीन उद्योजकांना किंवा ज्या व्यक्ती स्वंयरोजगार सुरु करु इच्छितात त्यांना परवडणाऱ्या व्याज दरानं कर्ज उपलब्ध करुन दिलं जातं.

भारत सरकारमार्फत विविध बाबींसाठी मोठ्याप्रमाणावर खरेदी केली जाते. ही खरेदी करताना लघुउद्योजकांना प्राधान्य देण्यात यावं, असं धोरण ठरवण्यात आलं आहे. या धोरणाचा अधिकाधिक फायदा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती संवर्गातील नव-उद्दमींच्या वस्तू खरेदी करण्यासाठी व्हावा, असा उद्देश, या हबची निर्मिती करण्यामागे आहे.

उपक्रमशिलतेला प्रोत्साहन

या सवंर्गातील तरुण-तरुणींनी उद्योजकतेसाठी प्रेरित केलं जातं. त्यांच्यामधील नावीन्यपूर्ण उपक्रमशीलतेला या माध्यमातून प्रोत्साहन दिलं जातं. विशेषत: शासकीय खरेदी प्रकियेमध्ये या संवर्गातील तरुण-तरुणींना अधिकाधिक संधी मिळावी यासाठी या योजनेची सूत्रं निश्चित करण्यात आली आहेत.

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या तरुण – तरुणिंनी udyogaadhaar.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणं गरजेचं आहे. ही नोंदणी नि:शुल्क करता येते. सध्या काही उद्योजकीय उपक्रम राबवित असलेल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती संवर्गातील व्यक्तीसुध्दा या संकेतस्थळावर नोंदणी करुन या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

लाभाच्या बाबी

या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर पुढील काही बाबींसाठी संबंधित उमेदवार पात्र ठरतात – (1) वेगवेगळी संयंत्रे आणि यंत्रसामुग्रीच्या खरेदीसाठी सबसिडी दिली जाते. (2) देशातील विविध राज्ये आणि परदेशांमध्ये नवउद्योजक आणि उपक्रमांसाठी होणाऱ्या प्रदर्शनींमध्ये सहभागी होण्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी सबसिडी दिली जाते.(3) स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी बँकाकडून घ्यावयाच्या कर्जासाठी हमी (गॅरंटी) दिली जाते. (4) बँक कर्जाच्या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या शुल्काची प्रतिपूर्ती केली जाते. (5) निर्यात संवर्धन परिषदेच्या शुल्काची प्रतिपूर्ती केली जाते. (6) वेगवेगळया बाबिंच्या  परीक्षणासाठी लागणाऱ्या लागणाऱ्या शुल्काची प्रतिपूर्ती केली जाते. (7) राष्ट्रीय लघु उद्योग  महामंडळ म्हणजेच नॅशनल स्माल इंडस्ट्री कॉर्पोरेशनमध्ये विशिष्ट बाबींसाठी नोंदणी करण्यासाठी लागणाऱ्या शुल्कावर सबसिडी दिली जाते. (8) कौशल्य प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. (9) उद्योजकीय उपक्रम सुरु करण्यासाठी लागणारे साहित्य (टूल किट) दिलं जातं. (10) नॅशनल स्माल इंडस्ट्री कॉर्पोरेशनमार्फत सुरु करण्यात आलेल्या बी-टू-बीचे पोर्टल– msmemart.com वर नोंदणी करण्यासाठी सबसिडी दिली जाते.