“या पावसाने नुसता वैतागच आणलाय. आईने चिडून प्रतिक्रिया दिली. तिला भिशीपार्टीसाठी बाहेर जायचं होतं, नि नेमकी पावसाची रिपरिप सुरु झाली. येईल नि लगेच जाईल असं तिला वाटलं. पण, आधी हळूवार येणाऱ्या पावसाने नंतर चांगलाच जोर धरला. त्यामुळे आई वैतागली. तिच्या वैतागण्याकडे अलेक्सा गोर्जीचं लक्षं होतं. आईच्या वैतागाचं तिला हसू आलं. गोर्जी आईवर हसल्याचं लक्षात येताच, अलेक्झांडर रागाने तिच्याकडे धावला. तेजोमयीने त्याला आवरलं.
“गोर्जे, कशाला हसलीस तू? या मेल्या पावसानं माझी फजिती केली म्हणूनना?” आई गोर्जीला रागावली. अलेक्झांडरने पुन्हा रागाने तिच्याकडे बघितलं.
“काय गोर्जे, असं आईला हसायचं असतं का?” तेजोमयी हसू दाबत म्हणाली.
“गप गं, तूसुध्दा काही कमी नाहीस.” आई आता तेजोमयीला रागावली.
“अगं,गोर्जीचा राग माझ्यावर कां काढतेस?”
“तेजो, आईला माझ्यापेक्षा पावसाचा जास्त राग आलाय.”गोर्जी म्हणाली.
“त्याला रागावता येत नाही म्हणून ती तुम्हा दोघांवर डाफरतेय.” या चर्चेत सहभागी होत, बाबा मिश्किलपणे म्हणाले.
“तुम्ही तर काहीच सांगू नका.” आईच्या रागाचा मोर्चा आता बाबांकडे वळला. अलेक्झांडरने दचकून दोघांकडे बघितलं. आपणसुध्दा आईच्या तडाख्यातून सुटणार नाही, ते या चाणाक्षरावांच्या बरोबर लक्षात आलं. अशावेळी कोपऱ्यात जाऊन डोळे मिटून पसरायचं, ही युक्ती त्याला ठाऊक झाली होती. आताही त्याने तेच केलं. मात्र, त्याचे कान आणि डोळे काय घडतय यावर लक्ष ठेऊन होते.
“अगं, मी सांगितल्यातला, ‘स’सुध्दा उच्चारला नसताना, तू असं कसं म्हणून शकतेस?” बाबांनी आईची फिरकी घेतली.
बाहेर पावसाचा जोर आणखीच वाढला. आता बाहेर पडताच येणार नाही, याची पूर्ण खात्री आईला पटली. त्यात बाबांचं हे उपरोधिक वागणं, यामुळे तिचा चिडचिडपणात भर पडली.
“अहो, पाऊस म्हणजे अलेक्झांडर नव्हेना की कान उपटला की शांत बसायला. तेव्हा चिडून काय उपयोग?” बाबांनी आईला समजावलं.
“अगदी बरोबर.”तेजामयी म्हणाली.
“जे आपल्या हातात नाही त्यासाठी कशाला इतकं वैतागायचं?” गोर्जीने पुस्ती जोडली. कान टवकारुन पसरलेल्या अलेक्झांडरने कुईंई करुन गोर्जीला समर्थन दिलं.
“ठोंब्या, उगाच शहाणपणा करु नकोस.” पसरलेल्या अलेक्झांडरकडे आई तिरिमिरीत गेली. त्याचे कान पिरगाळत त्याच्यावर खेकसली. अलेक्झांडर झरदिशी उठला. काहीच संबंध नसताना आपल्याला कां रागावतेय आई? असे भाव त्याच्या डोळयात उमटले.
“बाहेर पाऊस बरसतोय नि आत आई गरजतेय.” गोर्जी अवचित बोलून गेली. आईला याचा फारच राग आला. या रागारागात तिने टेबलवरचा रिमोट उचलला नि धाडदिशी खाली आदळला. त्याचे दोन तुकडे झाले.
ती ताडताड पावलं टाकत बेडरुममध्ये गेली. या आदळआपटीचा नि मनातल्या रागाचा परिणाम दिसून आला. तिला धाप लागली. घाम सुटला. श्वास वाढला. तिच्या पाठिमागे बाबा, तेजोमयी, गोर्जी नि अलेक्झांडरही बेडरुममध्ये आले. बाबांनी तेजोमयीला पाणी आणायला सांगितलं. तेजोमयीनं पाणी दिलं. पण आईची अस्वस्थता काही दूर होईना. हे चिन्ह बरोबर नसल्याचं गोर्जीच्या लक्षात आल्याने तिने बाजूच्या सदनिकेत राहणाऱ्या डॉक्टर कोरेगावरकरांना व्हॉटसॲप मेसेज केला. सुदैवाने ते घरीच होते. ते लगेच सर्व साहित्य घेऊन आले. त्यांनी आईला तपासलं. आईचा रक्तदाब चांगलाच वाढला होता.
काय झालं ते त्यांनी विचारलं. बाबांनी सकाळपासूनचं रामायण सांगितलं.
“याचा अर्थ वहिनींनी निष्कारणच स्वत:ला त्रास करुन घेतला म्हणायचा. जे आपल्या हातात नाही त्यासाठी इतका त्रागा केला की त्याचा त्रास स्वत:लाच होतो. या त्राग्यामुळे शरीरात रासायनिक क्रिया घडायला सुरुवात होते. काही विषारी पदार्थ रक्तात तयार होतात. त्यातून मग असं ब्लडप्रेशर वाढणं, मेंदूतून रक्तस्त्राव होणं, बेशुध्द पडणं असं काहीबाही घडू शकतं.” डॉक्टर कोरेगावकरांनी आईला समजावलं.
“तेच तर आपण आईला सांगायचा प्रयत्न करत होतो.” गोर्जी सर्वांना ऐकू जाईल अशा स्वरात पुटपुटली.
“अहो वहिनी, अशा विनाकारणाच्या त्राग्यामुळे आपण स्वत:चं खूप मोठं नुकसान करुन घेतो, हे आपल्या लक्षातसुध्दा येत नाही.” डॉक्टर म्हणाले. अलेक्झांडरला काय वाटलं कुणास ठाऊक तो पटकन बाहेरच्या खोलित गेला. तुटलेला रिमोट घेऊन आत आला नि तो डॉक्टरांसमोर टाकला.
“अच्छा निष्कारण रागाचा हा विनाकारण प्रताप म्हणायचा.” आईकडे नि रिमोटकडे बघत डॉक्टर म्हणाले. आईलाही हसू आलं. तिचा राग शांत झाला. तिने सगळ्यांना सॉरी म्हंटलं.