(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली. स्वत: पंतप्रधानांनी या परिषदेला हजेरी लावली. या परिषदेत मेरिटाइम क्षेत्रातील करिअर संधींवर भर देण्यात आला. पुढील काळात या क्षेत्रात १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यातून लाख नवीन रोजगार निर्माण होणार असल्याची घोषणा केंद्रीय बंदरे व जलवाहतूक मंत्र्यांनी केली.

पुढील काळात भारतात सागरी क्षेत्रात काम करणाऱ्या सीफेअरर्स (समुद्रमार्गाने वाहतूक करणारे कर्मचारी) यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढणार आहे. देशातील बंदरांची क्षमता जवळपास दुप्पट झाली असून त्यामुळे कार्गो(माल वाहतूक) हाताळण्याची क्षमता वाढेल. भारतातील बंदरे आता जागतिक पातळीवर स्पर्धक ठरली आहेत. पंतप्रधानांनी या परिषदेत पुढील २५ वर्षांत नीलक्रांती घडवण्याचे उद्दिष्ट मांडले, यामुळे भारतास मेरिटाम क्षेत्रात जागतिक नेतृत्वाची संधी मिळेल. ही परिषद ८५ देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडली. ६८० सामंजस्य करार झाले. या सर्व बाबी लक्षात घेता सागरी क्षेत्रातील शिक्षण, प्रशिक्षण हे भविष्यात उत्तम करिअरसाठी उपयुक्त ठरु शकते.

या परिषदेत इंडियन मेरिटाम युनिव्हर्सिटीचा (आयएमयू) महत्वाचा सहभाग होता. ही युनिव्हर्सिटी भारत सरकारच्या बंदरे, जाहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत एक राष्ट्रीय विद्यापीठ आहे. तिचा उद्देश भारतात मेरिटाइम शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि विकासाला चालना देणे हा आहे.

भविष्यात मेरिटाइम उद्योगासाठी कुषल मनुष्यबळ पुरवण्यासाठी आयएमयूला महत्वाची भूमिका बजवावी लागणार आहे. या परिषदेत आयएमयूने डिजिटल शिपिंग, ग्रीन पोर्ट्स, आणि स्मार्ट लॉजिस्टिक्स यासारख्या विषयांवर सत्रांचे आयोजन केले. यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील या क्षेत्रातील रोजगार संधीची माहिती मिळाली. तसेच जवळपास १०० आंतरराष्ट्रीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या फोरममध्येही आयएमयूने सहभाग घेतला. यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगातील थेट संपर्क आणि नोकरीच्या संधी मिळण्यासाठी एक सक्षम संपर्क साखळी निर्माण होण्यास साहाय्य झाले. या परिषदेमध्ये आयएमयूने आपले अभ्यासक्रम, संशोधन प्रकल्प, आणि विद्यार्थ्यांचे नवकल्पनात्मक मॉडेल्स प्रदर्शित केले, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय उद्योग प्रतिनिधींना भारतातील मेरिटाइम शिक्षणाची गुणवत्ता समजली.

आयएमयूचे कॅम्पस आणि अभ्यासक्रम

(१) चेन्नई कॅम्पस – बी.एस्सी इन नॉटिकल सायंस, बी.टेक मरीन इंजिनिअरिंग, एम.बी.ए पोर्ट अँड शिपिंग मॅनेजमेंट, एम.बी.ए इंटरनॅशनल ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक्स, (२) मुंबई पोर्ट कॅम्पस – डिप्लोमा इन नॉटिकल सायंस, (३) नवी मुंबई कॅम्पस – बी.बी.ए मॅरिटाइम लॉजिस्टिक्स (अप्रेंटिससह), डिप्लोमा इन नॉटिकल सायंस, (४) कोलकाता कॅम्पस – बी.टेक नेव्हल आर्किटेक्चर अँड ओशन इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन नॉटिकल सायंस, बी.एस्सी इन नॉटिकल सायंस, (५) कोचीन कॅम्पस – बी.टेक मरीन इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन नॉटिकल सायंस, बी.बी.ए लॉजिस्टिक्स, रिटेलिंग अँड ई-कॉमर्स, एम.टेक मरिन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, (६) विशाखापट्टणम कॅम्पस – बी.टेक नेव्हल आर्किटेक्चर अँड शिप बिल्डिंग इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन नॉटिकल सायंस, एम.टेक नेव्हल आर्किटेक्चर अँड ओशन इंजिनिअरिंग, एम.टेक ड्रेजिंग ॲण्ड कोस्टल इंजिनीअरिंग

रिअर संधी:

आयएमयू मधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील क्षेत्रांमध्ये करिअर संधी उपलब्ध होतात- (१) जहाज चालवणे, (२) मरीन इंजिनिअरिंग, (३)पोर्ट मॅनेजमेंट, (४) लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन, (५) शिपिंग कंपन्या, (६) कोस्ट गार्ड, (७)आंतरराष्ट्रीय मरीन उद्योग

ओशन इंजिनिअरिंग

या शाखेत या बाबींच्या शिक्षण-प्रशिक्षणावर भर दिला जातो. या अभ्यासक्रमात सागरी वाहतूक आणि सागरीय पर्यावरणाच्या अनुषंगाने डिझाइन, निर्मिती, विकास, कार्यान्वयन, नियोजन यांचं प्रशिक्षण दिलं जातं. नॅव्हल आर्किटेक्चर ही ओशन इंजिनिअरिंगची उपशाखा असली तरी आता त्याकडे स्वतंत्रपणे लक्ष पुरवलं जातं.

    या शाखेतील अभियंते आणि तज्ज्ञांना जागतिक पातळीवर वेगवेगळ्या संधी उपलब्ध होतात. यामध्ये (१) डिझायनर्स, (२) बांधकाम निरीक्षक, (३) सल्लागार, (४) विपणन आणि विक्री, (५) कार्यान्वयन नियामक, (६) सर्वेक्षण, (७) संशोधन, (८) विकास, (९) शिक्षण-प्रशिक्षण (१०) कोस्टल इंजिनिअर (११) एन्व्हॅायरेन्मेन्टल इंजिनिअर, (१२) नॅव्हल आर्किटेक्ट, (१३) मरिन इंजिनीअर, (१४) ऑफशोअर इंजिनीअर, (१५) प्रोजेक्ट मॅनेजर,  यांचा ढोबळरीत्या समावेश करता येतो.

 जबाबदाऱ्या

(१) किनारा संरक्षणाच्या विविध संसाधनांची निर्मिती, बंदरे आणि जेट्टींचे डिझाइन, बांधणी, देखभाल, दुरुस्ती आदी जबाबदाऱ्या कोस्टल इंजिनिअर्सना पार पाडाव्या लागतात.

(२) तीव्र सागरीय पर्यावरणाला सक्षमरीत्या तोंड देता यावं म्हणून मजबूत सरंक्षक बांधणी, अडथळे, स्थानके यांच्या डिझायनिंगचं काम ऑफशोर इंजिनियर्सना करावं लागतं.

(३) घातक मानवी प्रदूषण वा अशाच इतर बाबींपासून समुद्र आणि किनाऱ्यांचं संरक्षण  करण्याचं कार्य मुख्यत्वे एन्व्हॅायरेन्मेन्टल इंजिनियर्सना करावं लागतं. सागरी खनिजं, लाटांव्दारे निर्माण होणारी उर्जा, या घडामोडींमध्ये या अभियंत्यांना योगदान द्यावं लागतं.

(४) सागराचं विस्तृत सर्वेक्षण, त्याचे नकाशे तयार करणं, ही कामे ओशन इंजिनियर्सना करावी लागतात. सागरावरील वादळे, इतर अडथळे यापासून जहाजे वा इतर साधनसामग्रीचं संरक्षण करण्यासाठी अशा आरेखनांचा उपयोग होतो. शिवाय यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा विकास या अभियंत्याकडून केला जातो.

(५) सागराच्या आतील ध्वनीलहरींचा अभ्यास करावा लागतो. त्याव्दारे सागरतळाचा विस्तृत अभ्यास शक्य होतो. लाटांच्या वेगांचं गणित, त्याचे होणारे विविध परिणाम याविषयी या अभियंत्यांना कार्य करावं लागतं.

(६) सागरीय जीवशास्त्र, सागरीय भूगर्भशास्त्र आदी शाखांच्या अभ्यासातही या तज्ज्ञांचा सहभाग घेतला जातो.

संबंधिताचं ज्ञान, अनुभव, कौशल्य आणि धडाडी बघून उच्चश्रेणीच्या संधी वेगाने मिळू शकतात.

 अभ्यासक्रम

इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटीने या विषयातील पुढील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

(१) बी.टेक इन () नॅवल अर्किटेक्चर ॲण्ड ओशन इंजिनिअरिंग आणि () नॅव्हल आर्किटेक्चर ॲण्ड शिप बिल्डिंग. दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी चार वर्षे.

अर्हता- १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात सरासरीने ६० टक्के गुण आणि इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवेत.

    (२) तीन वर्षे कालावधीचा बी.एस्सी (शिपबिल्डिंग ॲण्ड रिपेअर) हा अभ्यासक्रम, कॉलेज ऑफ शिप टेक्नॉलॉजी पल्लकड,  येथे करता येतो. ही संस्था या विद्यापीठाशी संलग्नित आहे.

    अर्हता- १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात सरासरीने ५० टक्के गुण आणि इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवेत.

    (३) एम.टेक  इन () नॅवल आर्किटेक्चर ॲण्ड ओशन इंजिनिअरिंग आणि () ड्रेजिंग ॲण्ड हार्बर इंजिनिअरिंग. अर्हता- ६० टक्के गुणांसह मेकॅनिकल/ सिव्हिल/ एरोनॉटिकल/ मरीन/ नॅव्हल आर्किटेक्चर या विषयातील पदवी

एम.टेक अभ्यासक्रमाच्या प्रवेशसाठी घेण्यात सीइटी परीक्षेत बहुपर्यायी वस्तुनि पध्दतीचे १२० प्रश्न विचारले जातात. यामध्ये इंग्रजी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा नॅव्हल आर्किटेक्चर किंवा मरिन इंजिनिअरिंग किवा सिव्हिल इंजिनिअरिंग या विषयातील पदवीस्तरीय अभ्यासक्रमाचे प्रश्न असतात. निगेटिव्ह गुण नाहीत.

या अभ्यासक्रमात जहाजांच्या डिझाइनचे अद्ययावत प्रशिक्षण दिलं जातं. त्याशिवाय बंदर उभारणीचं तंत्रकौशल्य शिकवलं जातं. जहाज बांधणी, दुरुस्ती आणि बंदरे अभियांत्रिकी यामध्ये कौशल्य प्राप्त करुन देणारा हा अभ्यासक्रम आहे.

हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना जपान, कोरिआ, भारत व इतर देशांच्या जहाज निर्मिती  व बांधणी कंपन्या, नौदल, तटरक्षक दल, डॉकयार्ड, शिपयार्ड, शिप सर्व्हेयर, शिप डिझाइन इन्स्टिट्यूट, आइल रिग कॅन्स्ट्रक्शन सेंटर, नॅव्हल आणि ओशनोग्रॅफी सेंटर  आदी ठिकाणी नोकरीच्या संधी मिळू शकतात. हे अभियंता जहाज बांधणी, निर्मिती, डिझाइन व इतर तांत्रिक बाबतीत सल्ला वा सहाय्य सेवा देऊ शकतात. सागरी पर्यावरण व सागरी संशोधनाचं कार्य करण्याची संधी मिळू शकते. जे विद्यार्थी नॅव्हल आर्किटेक्चर आणि जहाज बांधणीच्या क्षेत्रात स्पेशलायझेशन करतात त्यांना संपूर्ण सागरतळाच्या / शिपयार्डच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते किंवा जहाज बांधणीचं नियोजन, निर्मिती आणि त्याची प्रत्यक्ष बांधणी अशा मर्यादित स्वरुपाचं काम सोपवलं जाऊ शकतं. या विषयात संशोधन अभ्यासक्रमही करता येतो.

 

संपर्क- ईस्ट कोस्ट रोड, सेम्मेनचेरी, चेन्नई ६००११९, दूरध्वनी- ०४४-२४५३९०२०, संकेतस्थळ-  www.imu.ac.in , ईमेल-acdemicscell@imu.ac.in

सुरेश वांदिले