(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

न्युट्रिशनिस्ट व्हा!

पोषण आहाराचं महत्व नव्यानं सांगण्याची गरज नाही. आहार उत्कृष्ठ तर आरोग्य उत्तम, हे सनातन आणि शास्वत सत्य! हे माहिती असूनही आपण पोषक आहाराऐवजी रुचकर अर्थातच चमचमीत, चटपटीत, चुरचुरीत अशा आहाराच्या कायम प्रेमात पडतो नि हा आहार त्याच्या प्रेमाच्या धाग्याने बांधून एक किंवा अनेक आजारांना आपल्याला सप्रेम भेट देतो. असा हा चटपटीत आहार आपल्या आरोग्याची कशी हेळसांड करतो नि त्यामुळे आपण काय- कसं -किती नि केव्हा खावं याचा अहवाल नुकताच, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ न्युट्रिशनने प्रकाशित केला. त्यामुळे या संस्थेची चर्चा नव्याने सुरु झाली. ही भारत सरकारने स्थापन केलेली महत्वाची संस्था.

आपल्या देशाचं पोषण आहार धोरण ठरवण्याचं, पोषण आहाराच्या मार्गदर्शक बाबी सुचवण्याचं आणि अंमलबजावणीचं कार्य या संस्थेला करावं लागतं. विविध वयोगटातील लोकसंख्येच्या, आरोग्याशी निगडीत पोषण आहाराविषयक समस्यांचा शोध घेऊन त्यांचं निराकरण करण्यासाठी ही संस्था पुढाकार घेते. पोषण आहार क्षेत्रातील दर्जेदार मनुष्यबळाची निर्मिती व्हावी यासाठीही या संस्थेमार्फत प्रयत्न केले जातात.

करिअर संधी

आहाराच्या अयोग्य सवयींना आपलसं केल्यानेच प्रकृतीची हेळसांड होत असल्याने आता पोषणआहार तज्ज्ञ म्हणजेच न्युट्रिशनिस्टांसाठी चांगल्या करिअर संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. अयोग्य आहाराच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या जशी वाढते आहे, त्याचबरोबर सुयोग्य आहाराकडेही वळणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. डॉक्टरमंडळीही सुयोग्य आहार नियोजनासाठी रुग्णांना बरेचदा न्युट्रिशनिस्टकडे पाठवतात. मोठ्या रुग्णालयांमध्ये इतर स्पेशलाइज्ड डॉक्टरांसोबत, न्युट्रिशनीस्टची सेवा उपलब्ध करुन दिली जाते. विविध क्षेत्रातील वलयांकित व्यक्ती स्वत:च्या आहाराकडे विशेष लक्ष पुरवतात. त्यांचा दररोज खास “डायट प्लॅन” असतो. त्यांना अशी सेवा न्युट्रिशनीस्ट पुरवतात. खेळाडूंची कामगिरी, उत्साह आणि उर्जा यासाठी सुयोग्य पोषण आहाराचा मोठ्याप्रमाणावर हातभार लागतो. वेगवेग्ळया खेळातील प्रत्येक टीमसाठी एक स्वतंत्र न्युट्रिशनिस्ट असतो. काही बडे खेळाडू व्यक्तिगत न्युट्रिशनिस्ट ठेवतात.

संस्था आणि अभ्यासक्रम

या विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम केल्यावर (१) पोषण तज्ज्ञ, (२) आहार तज्ज्ञ, (३) मोठ्या आणि  कॉर्पोरेट रुग्णालयातील पोषण/आहार सल्लागार, (४) वेलनेस सेंटर्स, योग प्रशिक्षण केंद्र आणि आयुर्वेद उपचार केंद्रांमध्ये पोषण /आहार मार्गदर्शक, (५) समुदाय आरोग्याशी संबंधित अशासकीय संस्थांमध्ये मार्गदर्शक/सल्लागार, (६) पोषण आहाराशी निगडित विविध उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या उद्योगांमध्ये अन्नपदार्थ  विश्लेषक किंवा उत्पादन व्यवस्थापक, (७) औषधनिर्मिती कंपनी/उद्योगात संशोधन (८) अन्नपदार्थ उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील उद्योजकता, अशा सारख्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात.

(१) या क्षेत्रातील सर्वोच्च प्रतिचं शिक्षण, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ न्युट्रिशन इथं दिलं जातं.

संस्थेने पदव्युत्तर पदवी पातळीवरील, (अ) एम.एस्सी इन न्युट्रिशन आणि (ब) एम.एस्सी इन स्पोर्ट्स न्युट्रिशन, हे दोन अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

या दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी दोन वर्षे. दोन्ही अभ्यसक्रमांसाठी अर्हता- पुढील विषयातील बी.एस्सी- (१) ॲप्लाइड न्युट्रिशन, (२) न्युट्रिशन, (३) ॲप्लाइड न्युट्रिशन ॲण्ड पब्लिक हेल्थ, (४) क्लिनिकल न्युट्रिशन, (५) फूड ॲण्ड न्युट्रिशन, (६) क्लिनिकल न्युट्रिशन ॲण्ड डायटेटिक्स, (६) एक्झरसाइज फिजिऑलॉजी ॲण्ड न्युट्रिशन (७ ) ह्युमन न्युट्रिशन, (८) न्युट्रिशन ॲण्ड डायटेटिक्स, (९) स्पोर्ट्स न्युट्रिशन (१०) होम सायंस, (११) नर्सिंग, (१२) फूड सायंस ॲण्ड क्वालिटी कंट्रोल, (१३) स्पोर्ट्स सायंस. एमबीबीएस आणि बीडीएस हे पदवीधारकही या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करु शकतात.

दोन्ही अभ्यासक्रमांना संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेव्दारे दिला जातो.

संपर्क- एक्स्टेंशन ॲण्ड ट्रेनिंग डिव्हिजन, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ न्‍युट्रिशन, जमाई-उस्मानिया, हैदराबाद – ५००००७, दूरध्वनी- ०४०-२७१९७२४७, संकेतस्थळ- https://www.nin.res.in, ईमेल- petninhyd@yahoo.com

०००

(२) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स-पतियाळा या संस्थेने, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्टस न्युट्रिशन हा एक वर्षे कालाधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे.

अर्हता- पुढील विषयातील पदवी- (१) न्युट्रिशन, (२) फिजिकल एज्युकेशन, (३) लाइफ सायंस, (४) फिजिकल एज्युकेशन ॲण्ड स्पोर्ट्स (५) डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग आणि कोणत्याही विषयातील पदवी. या अभ्यासक्रमाला सुध्दा एमबीबीएस आणि तत्सम पदवीधारक प्रवेश घेऊ शकतात. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते.

संपर्क – ओल्ड मोतीबाग, पतियाळा- १४७००१, दूरध्वनी-०१७५-२३०६१७१, ईमेल-mail.@nsnis.org, संकेतस्थळ- nsnis.org  

 ०००

(३) नॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी-इफांळने, दोन वर्षे कालावधीचा, एम.एस्सी इन अप्लाइड स्पोर्ट्स न्युट्रिशन हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. एक वर्षानंतर या अभ्यासक्रमातून बाहेर पडण्याची सुविधा आहे. अशा विद्यार्थ्यांना, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स न्युट्रिशन ही पदविका दिली जाते.

अर्हता- ५० टक्के गुणांसह पुढील विषयातील पदवी-    (१) न्युट्रिशन, (२) फुड ॲण्ड न्युट्रिशन, (३) फूड सायंस, (४) होम सायंस, (५) ॲप्लाइड न्युट्रिशन आणि अशाच प्रकारची तत्सम पदवी, (६) स्पोर्ट्स सायंस, (७) बायोकेमिस्ट्री, (८) झुऑलॉजी, (९) ‍फिजिकल सायंस ॲण्ड स्पोर्ट्स, (१०) स्पोर्ट्स न्युट्रिशन हा विषय अंतर्भूत असलेला स्पोर्ट्स कोचिंग. (राखीव संवर्गातील उमेदवारांना किमान ४५ टक्के गुण मिळायला हवेत.) एमबीबीएस, बीएएमस

पदवीधारक सुध्दा या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात.

अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते.

संपर्क- दुसरा माळा ऑलिंपिक भवन, खुमन लंपक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मनिपूर-७९५००१, ईमेल-deanacnnsu@gmail.com, संकेतस्थळ- https://www.nsu.ac.in

०००

() एसएनडीटी विद्यापीठात पुढील अभ्यासक्रम करता येतात- (१) एम.एससी इन फूड सायंस, कलावधी दोन वर्षे. अर्हता- ६० टक्के गुणांसह लाइफ सायंस, बायोटेक्नॉलॉजी, फिजीऑलॉजी, बायोकेमिस्ट्री किंवा मायक्रोबॉयलॉजी. प्रवेश चाळणी परीक्षेव्दारे दिला जातो.

(२) एम.एस्सी इन क्लिनिकल न्युट्रिशन ॲण्ड डायटेटिक्स, (३) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डायटेटिक्स,  (४) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन न्युट्रिशन इन फूड प्रोसेसिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी

 संपर्क- डिपार्टमेंट ऑफ फूड सायंस ॲण्ड न्युट्रिशन, एसएनडीटी महिला विद्यापीठ, जुहू कॅम्पस, विद्याविहार, सांताक्रुज पश्चिम, मुंबई-४०००४९, दूरध्वनी-०२२-२६६०८८५५ ईमेल-fsn@sndt.ac.in, संकेतस्थळ-  sndt.ac.in

() सर विठ्ठलदास ठाकरसे कॉलेज ऑफ होम सायंस- मुंबई येथे, बीएस्सी इन – फूड, न्युट्रिशन ॲण्ड डायटेटिक्स (आहारशास्त्र) हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. अर्हता- १२ वी विज्ञान शाखा.

संपर्क- जुहू तारा रोड, सांताक्रुझ पश्चिम, मुंबई- ४००००९, दूरध्वनी-०२२-२६६०२५०४, ईमेल-enquiry@svt.edu.in संकेतस्थळ-svt.edu.in ‍ि

(४) सिम्बॉयसीस स्किल ॲण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये, बीएस्सी इन न्युट्रिशनल सायंस ॲण्ड डायटेटिक्स, हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. अर्हता- विज्ञान शाखेतील १२ वी उत्तीर्ण (खुला संवर्ग- ५० टक्के/ राखीव संवर्ग ४५ टक्के). प्रवेशासाठी कौशल्य चाचणी घेतली जाते.

संपर्क- किवाळे, पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गाला लागून, पुणे-४१२१०१, दूरध्वनी-०२०-२७१८७७६८, ईमेल-admissions@sspu.ac.in संकेतस्थळ- sspu.ac.in

०००

(५) सिम्बॉयसीस इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ सायंस- पुणे येथे, एम.एस्सी इन न्युट्रिशन ॲण्ड डायटेटिक्स हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. या अंतर्गत (१) पब्लिक हेल्थ न्युट्रिशन, (२) ‍क्लिनिकल न्युट्रिशन ॲण्ड डायटेटिक्स, (३) फूड सेफ्टी ॲण्ड क्वालिटी मॅनेजमेंट, (४) न्युट्रिजेनॉमिक्स या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येतं. अर्हता- (१) होम सायंस, (२) लाइफ सायंस, (४) हेल्थ सायंस किंवा (५) बायोलॉजिक सांयस शाखेतील पदवी (खुला संवर्ग- ५० टक्के आणि राखीव संवर्ग ४५ टक्के). अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुलाखत घेतली जाते.

संपर्क- सिम्बॉयसीस इंटरनॅशनल डीम्ड युनिव्हर्सिटी कॅम्पस, लव्हाळे, ता-मुळशी- पुणे-४१२११५ दूरध्वनी- ०२०-६६९७५०४०, ईमेल- info@sihspune.org, संकेतस्थळ- https://www.sihs.edu.in

(७) कॉलेज ऑफ होम सायंस निर्मला निकेतन मुंबई येथे, बीएस्सी इन  फुड न्युट्रिशन ॲण्ड डायटेटिक्स हा अभ्यासक्रम करता येतो. कालावधी तीन वर्षे. १२ वी विज्ञान शाखेत मिळालेल्या गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. हे महिला विद्यालय आहे.

संपर्क- ४९, न्यु मरिन लाइन्स, मुंबई-४०००२०, दूरध्वनी-२२०७६५०३, ईमेल- office@nnchsc.edu.in, संकेतस्थळ- https://nirmalaniketan.com

(८) डॉ.भानूबेन नानावटी करिअर डेव्हलपेंट सेंटर-मुंबई येथे, डिप्लोमा कोर्स इन न्युट्रिशन ॲण्ड फिटनेस, हा अभ्यासक्रम करता येतो. कालावधी दोन वर्षे. अर्हता- १२वी संपर्क-https://bncdc.org.in

सुरेश वांदिले