(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

परदेशातील दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, विद्यापीठांतर्गत येणारे विभाग, संशोधन संस्था यामध्ये उच्च शिक्षण घेण्याकडे आणि संशोधन कार्य करण्याकडे बऱ्याच विद्यार्थ्यांची तीव्र इच्छा असते. अशा विद्यार्थ्यांचे हे स्वप्न आर्थिक अडचणीमुळे अपुरे राहू नये यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळया विभागांमार्फत वेगवेगळया संवर्गातील मुलामुलींसाठी शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी सगळयात महत्वाची अर्हता म्हणजे, शासनाच्या नियमानुसार संस्थेत प्रवेश मिळाला असावा व तसे प्रवेशपत्र सं‍बंधितांकडे असावे.  प्रत्येक संवर्गासाठी नियमावली स्वयंस्पष्ट असून त्यानुसार आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात व शासनाने ठरवेल्या नियमांची पूर्तता करावी लागते. दरवर्षी या योजनांर्तगत अर्ज प्रकियेची माहिती देणारी प्रत्येक विभागाची जाहिरात प्रकाशित केली जाते.

(१) महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण शिक्षण विभागामार्फत खुल्या संवर्गातील विद्यार्थी – विद्यार्थींना परदेशातील दर्जेदार शिक्षण संस्थांमध्ये अभ्यासक्रम करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. २०२३-०२४ या शैक्षणिक वर्षापासून या शिष्यवृत्तीच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. ही शिष्यवृत्ती पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टरेट अभ्यासक्रमासाठी दिली जाते. शिष्यवृत्तीसाठी निवड करताना ३० टक्के जागांवर महिलांना प्राधान्य दिलं जातं.

 या शिष्यवृत्तीसाठी लाभ घेऊ इच्छिणा-या उमेदवारांना जागतिक पातळीवर पहिल्या २००  क्रमांकात असणाऱ्या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळणं आवश्यक. ही क्रमवारी,” टाइम्स हायर एज्युकेशन (THE)” किंवा “क्वॅकक्वारेल्ली सायमंडस (QS)” या दोन पैकी कोणत्याही एका संस्थेने निर्धारित केलेली असावी.

या शिष्यवृत्तीअंतर्गत पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी ३० आणि पीएचडीसाठी निवड झालेल्या उमदेवारांसाठी १० अशा  एकूण ४० शिष्यवृत्ती आहेत. यामध्ये

(१) कला शाखा- (अ) पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर पदविका- ३, (ब) पीएचडी -१,

(२) वाणिज्य शाखा -(अ) पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर पदविका – ३ (ब) पीएचडी -१,

(३) विज्ञान शाखा-  (अ) पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर पदविका – ३ (ब) पीएचडी-१,

(४) व्यवस्थापन शाखा- (अ) पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर पदविका – ३ (ब) पीएचडी-१,

(५) विधि शाखा- (अ) पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर पदविकासाठी – ३ (ब) पीएचडी -१,

(६) अभियांत्रिकी/वास्तुकला शाखा- (अ) पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर पदविका – १२ (ब) पीएचडी-४ आणि (७) औषधीनिर्माण शास्त्र शाखा- (अ)पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर पदविका – ३ (ब) पीएचडी-१

उच्च तंत्रशिक्षण विभागाने, या शिष्यवृत्तीची अर्जप्रक्रिया सुलभरितीने व्हावी म्हणून, https://foreignscholarship2023.dtemaharashtra.gov.in/ या वेबपोर्टलची निर्मिती केली आहे. या वेबपोर्टलची लिंक तंत्रशिक्षण संचालनालयाच्या- https://dte.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावरील मुख्यपृष्ठावर, “फॉरेन स्कॉलरशीप पोर्टल” यानावाने देण्यात आली आहे. त्यावर क्लिक केलं की शिष्यवृत्ती पोर्टलवर जाता येतं.

या पोर्टलवर, “टाइम्स हायर एज्युकेशन (THE)” आणि “क्वॅकक्वारेल्ली सायमंडस (QS)” या दोन्ही संस्थांनी तयार केलेली क्रमवारीची यादी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थाला या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यापूर्वी त्याला प्रवेश देऊ इच्छिणारी संस्था २०० क्रमांकात येते की नाही, याचा अभ्यास करता येतो. या वेबपोर्टवरल जाऊन शिष्यवृत्तीसाठी नोंदणी करण्यासाठी, ‘लॉग इन” सुविधा देण्यात आली आहे.

अटी आणि शर्ती

(१) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास पदवी परीक्षेत आणि पीएचडी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारास पदव्युत्तर पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळणं आवश्यक.

(२) अनकंडिशनल ऑफर लेटर (कोणत्याही अटींशिवाय/विनार्शत प्रवेशपत्र) मिळालेल्या उमेदवारांना या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येतो. परदेशात जाण्यापूर्वी पासपोर्ट(पारपत्र) आणि व्हिजा मिळवण्याची प्रकिया या उमेदवारास स्वत: करावी लागते. त्यासाठी संबंधित उमेदवारास स्वत: खर्च करावा लागतो. ज्या शैक्षणिक संस्थेत आणि अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असेल, त्याच कारणासाठी व्हिजा घेणे बंधनकारक ठरते.

(३) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणा-या उमेदवाराचं वय  १ जुलै रोजी कमाल ३५ आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांचं कमाल वय ४० असलं पाहिजे. दोन्ही अभ्यासक्रम विहीत कालावधित पूर्ण करणं बंधनकारक आहे.

(४) ही शिष्यवृत्ती कुटुंबातील एकाच सदस्याला फक्त एकदाच दिली जाते.

(५) अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. हा कालावधी साधारणत: पीएचडीसाठी ४ वर्षे, पदव्युत्तर पदवीसाठी २ वर्षे आणि पदव्युत्तर पदविकेसाठी १ वर्षे असावा किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी जो कमी असेल तो, ग्राह्य धरला जातो.

(६) या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित उमेदवारांनी टॉफेल (टेस्ट ऑफ इंग्लिश ॲज फॉरेन लँग्वेज), जीआरई (ग्रॅज्युएट रिकॉर्ड एक्झामिनेशन) या दोन परीक्षा देणे आवश्यक. या परीक्षेतील गुणांचा आधार घेऊन परदेशातील शिक्षण संस्थेत प्रवेश दिला जातो.

(७) या शिष्यृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या पालकांचं सर्व स्त्रोतांव्दारे मागील वर्षाचं उत्पन्न हे ८ लाख रुपयांपेक्षा अधिक नसावं. संबंधित उमेदवार नोकरी करत असल्यास त्याचेही उत्पन्न या मर्यादेत धरलं जातं. (विद्यार्थी आणि पालक दोघेही नोकरी करत असल्यास शिष्यवृत्तीचा अर्ज सादर करताना उमेदवार आणि पालक यांचे आयकर विवरण पत्र, फॉर्म नंबर १६ आणि तहसिलदार किंवा नायब तहसलिदार यांच्यापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेलं उत्पन्नाचं प्रमाणपत्र द्यावं लागतं. इतर उमेदवारांना मात्र उपरोक्त नमूद श्रेणीच्या अधिकाऱ्यांनी दिलेलं, मागील आर्थिक वर्षाचं कुटुंबाचं सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाचं प्रमाणपत्र द्यावं लागतं.)

०००

 (२) मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या संवर्गातील गुणवंत मुलामुलीसाठी, महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नावाने परदेशातील शिष्यवृत्तीसाठी योजना राबवली जाते. या शिष्यवृत्तींतर्गत  अभियांत्रिकी /वास्तुकला, व्यवस्थापन, विज्ञान, वाणिज्य/ अर्थशास्त्र, कला शाखा, विधि शाखा आणि औषधी निर्माणशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी ५० शिष्यवृत्ती दिल्या जातात तर याच शाखांतील पीएचडीसाठी २५ शिष्यवृत्ती दिली जाते.

संपर्क https://sarthi-maharashtragov.in/

०००

(३) इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती या संवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणारी योजना, इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभामार्फ राबवण्यात येते. कला, वाणिज्य, विज्ञान ,व्यवस्थापन, विधि शाखा, अभियांत्रिकी/ वास्तुकला, औषधनिर्माणशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी  शिष्यवृत्ती दिली जाते.

संपर्क-https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in/en/foreign-scholarship-scheme-meritorious-students आणि

https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in/en/contact

०००

(४) अनुसुचित जाती संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. संपर्क https://sjsa.maharashtra.gov.in/en/scheme-category/education-training

०००

(५) अनुसुचित जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी आयुक्तालयामार्फत शिष्यवृत्ती योजना राबवली जाते.

 संपर्क- http://mahatribal.gov.in/1132/State-Govt

(सूचना- वेगवेगळया संवर्गातील परदेशी शिक्षणासाठी शिष्‍यवृत्ती योजनांमध्ये वेळावेळी बदल होत असतात. त्यामुळे सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित संकेतस्थळावर जाऊन योजनेचे सध्याचे स्वरुप, शिष्यवृत्तीची एकूण संख्या, नियम व अटी, याची अद्ययावत माहिती घेणे माहिती घ्यावी. )

०००

(६) जैवविविधता शिष्यवृत्ती

गुणवंत मुला मुलींना कांदळवन आणि सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षणासाठीची  शिष्यवृत्ती वन विभागार्मात राबवली जाते.

(१) मरीन सायंस, (२) मरीन इकॉलॉजी, (३) ओशनोग्रॅफी, (४) मरीन बॉयलॉजी, (५) मरीन फिशरीज, (६) मरीन बायोटेक्नॉलॉजी/मायक्रोबॉयलॉजी, (७) बायोडायव्हरसिटी अशासारख्या विषयांमध्ये परदेशातील पदव्युत्तर पदवीसाठी १५ आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी १५ अशा २५ ही शिष्यवृत्या दिल्या जातील.

“द टाइम्स हायर एज्युकेशन या संस्थेच्या रँकिंग” मधील २०० च्या आत आणि “क्वॅवक्वेअरल्ली सिमडँस किंवा  क्यू एस”  रॅकिंग मध्ये १५० च्या आत येणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये येणाऱ्या संस्थेत प्रवेश मिळालेल्या उमेदवारांना ही शिष्यवृत्ती दिली जाईल. ही शिष्यवृत्ती सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी लागू राहील. यातील ३० टक्के जागा मुलींसाठी राखीव असतील. या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरण्यासाठी संबंधित उमेदवाराच्या  कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न २० लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे. संबंधित उमेदवार जर नोकरी करत असेल तर त्याचेही उत्पन्न यामध्ये धरले जाईल. १ जुलै रोजी, पीएचडी साठी  अर्ज  करणाऱ्या विद्यार्थ्याचे वय ४० आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी  अर्ज  करणाऱ्या विद्यार्थ्याचे वय ३५ असावे.

या संदर्भातील संपूर्ण माहिती www.mangroves.maharastra.gov.in या संकेतस्थळावर ठेवण्यात आली आहे.

सुरेश वांदिले