(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आठवी नववीमध्ये असताना बहुदा पुढे काय करायचं किंवा व्हायचय हे मुलामुलींना कळत नाही. कळत असलं तरी मुलं त्याकडे फारसं लक्ष देत नाहीत. या वर्गातले दिवस हे फुलपाखरासारखे असतात. मस्त मजेत जात असतात. अभ्यास असतोच. पण मित्र-मैत्रिणी, खेळ, गप्पा-टप्पा , सहली, चक्कलसबाजी, टपल्‍यामारणं, रुसणं, फुगणं, टीव्ही बघणं, फिरणं असं सारं काही सुरु असतं.

दहावीतील मुलामुलींना जसं अभ्यासासाठी आईबाबा सतत बोलत राहतात तितकं काही बोललं जात नाही. शिकवणीचा माराही कमीच असतो.

अशा या वर्षात मुलांपेक्षा आईबाबाच त्यांच्या करिअरचं स्वप्न बघत असतात. कुणी आपल्या मुला-मुलींसाठी डॉक्टर होण्याचं, कुणी इंजिनीअर होण्याचं तर कुणी कलेक्टर होण्याचं किंवा एखादा मोठा ऑफिसर होण्याचं स्वप्न बघत असतात.

रश्मीचे आईबाबासुध्दा तिच्यासाठी डॉक्टरकीचं स्वप्न बघायचे. त्याचं कारणही तसंच होतं. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीनुसार रश्मीची अभ्यासातील गती, ती तिसऱ्या वर्गात गेल्यापासूनच आईबाबांच्या लक्षात आली होती. तिची स्मरणशक्ती दांडगी होती. ती गणित भराभर सोडवायची. भाषाही चांगल्या कळू लागल्या होत्या तिला. आठवीत पोहचेपर्यंत रश्मीच्या हुषारीचे अनेक पदर आईबाबा आणि तिच्या शिक्षकांना कळले होते.

हळूहळू, रश्मी पुढे काय होणार, याची चर्चा घरी सुरु झाली. ही चर्चा रश्मीच्याही कानावर पडू लागली. तिच्याशी मात्र याविषयी कुणी बोललं नाही. आईबाबांनीही हा विषय काढला नाही.

आठवीमध्ये पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्यावर आईबाबांनी तिला मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या कोचिंग क्लासला टाकण्याचा निर्णय घेतला. हे तीन वर्षाचं कोचिंग होतं. हा निर्णय जेव्हा आईबाबांनी तिला सांगितला तेव्हा रश्मीनं आपण अशा शिकवणी वर्गाला जाणार नाही हे स्पष्ट केलं. आपणास डॉक्टर व्हायच नाही, हे तिनं त्यादिवशी ठामपणे सांगितलं.

आईबाबांसाठी हा धक्का होता. त्यांनी तिच्यासाठी बघितलेलं डॉक्टरकीचं स्वप्नं असं उद्ध्वस्त व्हावं, याचा हा धक्का होता. दोघांनी रश्मीला खूप समजावलं. डॉक्टर झाल्यावर समाजात कशी मान्यता मिळते, मानमरातब मिळतो, खूप पैसे मिळतात, चांगलं आयुष्य जगता येतं, अशा अनेक गोष्टी त्यांनी रश्मीस समजावून सांगितल्या. पण रश्मीनं शिकवणी वर्गास न जाण्याचा हट्ट कायम ठेवला. आईबाबा रागावले. पण त्याचा उपयोग झाला नाही.

शेवटचा उपाय म्हणून रश्मीचे आईबाबा तिचे मुख्याध्यापक विनायक महाशब्दे यांना  भेटले. त्यानांही आश्चर्य वाटलं. कारण रश्मी ही त्यांच्या शाळेतील  हुषार मुलींपैकी एक होती. तिला डॉक्टरकीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणं कठीण नव्हतं. हे त्यांना ठाऊक होतं. आईबाबांची काळजी त्यांना कळली.

आईबाबा शाळेत आले असतानाच त्यांनी रश्मीस आपल्या केबीनमध्ये बोलावून घेतलं. आईबाबा कशासाठी इथं आले असावेत याची कल्पना त्यांना बघताच रश्मीस आली. ती आत येताच महाशब्दे सरांनी तिला बसायला सांगून, लगेच विषयाला हात घातला.

“आईबाबा जे ठरवतात ते मुलांच्या हिताचं असतं, रश्मी,” तिला समजावत सर म्हणाले.

“पण सर, मला डॉक्टर नाही व्हायचय.”

“अगं, पण तुझ्यासारख्या खूप हुषार मुलीने डॉक्टरकीच्या प्रवेशाची आतापासून तयारी केली तर चांगल्या कॉलेजमध्ये सहज प्रवेश मिळेल. म्हणून तुझे आईबाबा तुला शिकवणी वर्गात आतापासून जा म्हणताहेत. तुला या वर्गातच जायचं नाहीय की घरीच अभ्यास करायचाय?”

“सर, मला डॉक्टर नाही व्हायचय. त्यामुळे या वर्गात जाण्याचा किंवा घरी अभ्यास करण्याचा प्रश्नच येत नाही.”

“असा हट्ट बरा नाही रश्मी.” महाशब्दे सर किंचित कडक बोलले. त्यामुळे रश्मी रडवलेली झाली. तिने मान खाली घातली.

महाशब्दे सर, मग जरा नरमाईने म्हणाले,

“बाळं तुला, डॉक्टर व्हायचं नाहीय तर मग पुढे काय करायचय, हे तरी ठरवलस का?”

“सर, मुलं कुठं असं काही ठरवू शकतात.” बाबा म्हणाले.

“होना.”आईनं त्यांची री ओढली.

“हे मात्र तितकसं खरं नाही, बरं का. ही पिढी अधिक समजूतदार आहे. त्यांना त्यांचं हित कळतं बरोबर.” सर  म्हणाले. आईबाबा निरुत्तर झाले.

तुझ्या मनात दुसरं काही करायचं आहे का?” सरांनी रश्मीस विचारलं. मान वर करुन ती धिरानं म्हणाली,

“सर, मला सैन्यात जायचय.”

“काय?” आई, बाबा आणि मुख्याध्यापक एकाच वेळी म्हणाले. त्या एकत्रित ध्वनीनं आपण मोठ्ठा गुन्हा केला की काय, अशी अपराधी भावना रश्मीच्या मनात आली.

“आपण रश्मीचं कौतुक करायचं सोडून, ती काहीतरी विचित्र बोलल्याचं समजून, काय? असं अधिरतेनं म्हणालो, ते योग्य नव्हतं,” हे महाशब्दे सरांच्या लगेच लक्षात आलं. त्यांनी स्वत:ला सावरलं. चेहऱ्यावर हसू आणत रश्मीचं कौतुक करत म्हणाले…

“अरे वा! व्हेरी गुड! तुला सैन्यात जायचंय हे ऐकून बरं वाटलं मला. असं या वयात कुणी सांगत नाही. बोलत नाही. ठरवत नाही. तुझ्या ते मनात आलं. खूपच छान!”

हे काय भलतच मुख्याध्यापक बोलताहेत असं आईबाबांना वाटलं. आपल्या मुलीचं मन वळवण्यास ते मदत करतील, असं त्यांना वाटलं होतं. उलट महाशब्दे सर रश्मीला पाठिंबा देत होते.

“सर, हे काय बोलता आपण? रश्मी लहान असल्यानं तिला काही कळत नाही. पण तुम्ही तिचं मन वळवाल असं वाटलं होतं मला .सैन्यात जाणं असं म्हणनं सोप्पं. पण सैन्याचं जीवन खडतर असतं. धडधाकट मुलांनासुध्दा ते जमू शकत नाही तर रश्मीसारख्या मुलींना कसं जमायचं?” बाबांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.

“बाबा, जे बोलताहेत ते खरं आहे हं रश्मी. तुला सैन्याचा खडतर प्रवास जमेल का?” सरांनी विचारलं.

“कां नाही जमणार सर? मी आतापासूनच त्याची तयारी करतेय ना. १२ वीनंतर मेडिकलला जाण्याऐवजी मी, नॅशनल डिफेन्स ॲकेडॅमी-एनडीएला जाईन. त्याची तयारी करेन आतापासून. मला देशासाठी सीमेवर जाऊन लढायचय. देशाच्या शत्रूंशी मुकाबला करायचाय.” रश्मी हिम्मत करुन बोलली.

“अगं, पण मुलींना लढायला पाठवलं जात नाही.आई म्हणाली.

“हे मात्र, खरं नाही, रश्मीच्या आई. आता मुलींनाही युध्दवाहू विमान ,विमानवाहू नौका यावर पराक्रम गाजवण्याची संधी दिली जाते. रश्मीससुध्दा अशी संधी मिळू शकते.”

“होय सर, मला नक्कीच संधी मिळू शकते. मुलांनीच सैन्यात जायचं स्वप्न कां बघायचं? मुलीसुध्दा असं स्वप्न बघून ते साकार करु शकतात, हे मला सिध्द करायचय.”

“ग्रेट!” मुख्याध्यापक उर्त्स्फूतपणे म्हणाले.

“सर, मला केवळ सैन्यातच जायचं नाहीय तर देशासाठी सर्वात मोठा त्याग करुन परमीवरचक्रसुध्दा मिळवायचय. परवाच मी लेफ्टनंट मनोजकुमार बात्रा यांची गोष्ट वाचली. त्यांनी रणभूमीवर मोठा पराक्रम गाजवला. त्यासाठी त्यांना सैन्यातला हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. तेव्हाच मी ठरवलं की आपणसुध्दा सैन्यात जाऊन परमवीरचक्र मिळवायचं.”

“अगं, असं काही स्वप्न राहू शकतं का?” आई रडवलेली होऊन म्हणाली.

“कां नाही राहू शकत, रश्मीची आई? अहो एखादी मुलगी, डॉक्टर व्हायचं ,इंजिनीअर व्हायचं, सीए व्हायचं, अभिनेत्री व्हायचं किंवा मिस इं‍डिया व्हायचं जर स्वप्न बघू शकते तर सैन्यात जाऊन परमवीरचक्र मिळवण्याचं स्वप्न कां बघू शकत नाही? असं स्वप्न बघणारे मुलमुली दुर्मीळ असतात. तुम्ही भाग्यवान आहात म्हणून तुम्हाला रश्मीसारखी हुषार आणि बहादूर मुलगी मिळालीय. तिच्या या स्वप्नाला पंख द्या. हे पंख आताच छाटू नका. रश्मीचं स्वप्न ऐकून माझं ह्रदय भरुन आलय. तिच्यासारखी विद्यार्थीनी आमच्या शाळेला लाभली हे या शाळेचं भाग्यच आहे बरं का,” महाशब्दे सर कधी आईबाबांकडे तर कधी रश्मीकडे कौतुकाने बघत बोलले. त्यांचा उर अभिमानानं भरुन आला होता.

त्यांचं बोलणं एकून रश्मीचं मन आणखी कणखर झालं. रश्मीच्या आईबाबांना मुख्याध्यापकांचं बोलणं ऐकायला चांगलं वाटलं. त्यांना तोंडदेखलं तसं म्हणावही लागलं. पण सैन्यात जाण्याची रश्मीची इच्छा त्यांना अजिबातच आवडली नव्हती. ते दोघेही मुख्याध्यापकांचा निरोप घेऊन घरी परतले.

०००

शाळा सुटल्यावर रश्मी घरी पोहचली. ते दोघे तिची वाटच बघत होते. ती येताच तिला फ्रेशही होऊ न देताच जवळ घेत आई म्हणाली,

“हे बघ रश्मी, सैन्यात जाणं हे आपल्यासारख्यांचं काम नाही बेटा.”

” तुला डॉक्टर व्हायचं नसेल तर तसं सांग. इंजिनीअर हो किंवा आणखी कोणत्या दुसऱ्या अभ्यासक्रमाला जायचं असेल तर तसं सांग. पण हे सैन्यात जाण्याचं खूळ डोक्यातून काढून टाक.” बाबा तिला समजावत म्हणाले.

“पण बाबा, हे खूळ नाही. मी आता पक्कं ठरवलय. मी सैन्यातच जाणार नि एके दिवशी परमवीरचक्र मिळवणारच. बाबा, तो दिवस तुमच्या नजरेसमोर आणा. तुमच्या मुलीच्या नावाची परमीवरचक्रासाठी घोषणा झालीय. राष्ट्रपती हे पदक देणार. तुम्हा दोघांची छाती आनंदानं आणि अभिमानानं भरुन आलीय.”

“अगं, पण तू जर हा पुरस्कार घेण्यासाठीच नसशील तर या अभिमानाचा आणि आनंदाचा उपयोग काय? असं बोलून आईन हुंदका दिला. बाबांच्याही डोळयातून अश्रू तरळले.

“हे बघ आई, तुला काय म्हणायच हे मला कळतय. रणांगणावर काहीही होऊ शकतं. पण त्याचा विचार करायचा नसतो. लेफ्टनंट कर्नल करमसिंघ, सेंकड लेफ्टनंट राघोबा राणे, मेजर धनसिंग थापा, सुभेदार जोगिंदर सिंघ, मेजर सैतान सिंघ, मेजर होशिआर सिंघ, नायब सुभेदार बाना सिंघ, मेजर योगेंद्रसिंग यादव हे वीर, शत्रूला पाणीपाजून सहीसलामत परतले. तुम्ही कां बरं वाईट विचार करता आहात?” रश्मीनं ठामपणे आईबाबांना सांगितलं.

००००

मुलगी आता काही ऐकणार नाही हे आईबाबांच्या लक्षात आलं. परमीवरचक्र घेण्याचं स्वप्न बघणाऱ्या मुलींच्या रस्त्यात काटे अंथरायचे नाहीत उलट गुलाबाचे ताटवेच उभे करायचं हे दोघांनी ठरवलं. त्यांच्या मनातील मळभ दूर झालं.

एनडीए प्रवेश परीक्षेसाठी असलेल्या चांगल्या शिकवणी वर्गात रश्मीचं नाव त्यांनी नोंदवलं. त्या अभ्यासासोबत आता दररोज सकाळ-संध्याकाळ स्वत:ची शारीरिक क्षमता वाढण्यासाठी धावणं, दोरींवरून उड्या मारणं, वेगाने चालणं ते विविध व्यायाम प्रकारांवर रश्मी लक्ष द्यायला लागलीय. हे खाणार नाही, ते खाणार नाही असं सतत करण्याची सवय लागली असताना आता जे जे सुदृढ शरीरासाठी पोषक असेल ते ते आवडो की न आवडो ते खायला तिने सुरुवात केलीय. पोषक आहार आणि शारीरिक क्षमतेत वाढ करण्याच्या प्रयत्नात ती एकही दिवस बुट्टी मारत नाही. परमवीरचक्र मिळवण्याची महत्वाकांक्षा आणि स्वप्नामुळे तिला सर्वच अडचणी शुल्लक वाटू लागल्या आहेत.

०००