(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

पायलट व्हा!

भारतीय नागरी हवाई वाहतूक उद्योग, हा अतिशय गतिने वाढणार उद्योग ठरला आहे. या उद्योगामध्ये देशांतर्गत व परदेशातील नागरी विमान सेवा, मालवाहतूक सेवा (एअर कार्गो), एअर टॅक्सी ऑपरेशन, चार्टर्ड विमान सेवा यांचा समावेश होतो. कोविडच्या धक्क्यातून हा उद्योग पूर्णपणे सावरला आहे. जागतिक पातळीवर भारत हा देशांतर्गत हवाई वाहतुकीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोशिएशनच्या अहवालानुसार, २०३० पर्यंत भारत, जगातील सर्वाधिक हवाई प्रवासी वाहतूक करणारा देश ठरण्याची शक्यता आहे.

याक्षेत्राची मागणी लक्षात घेऊन विमानांची संख्या वाढवली जात आहे. २०२७ पर्यंत विमानांची संख्या ११शे पर्यंत जाऊ शकते. गेल्या वर्षभरात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशी संख्येत साडेतेरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीमुळे २०३८ पर्यंत २३८० वाणिज्यिक (कमर्शिअल) विमानांची गरज भासू शकते.

या सर्वबाबी लक्षात घेता, हवाई वाहतूक क्षेत्रासाठी तज्ज्ञ मनुष्यबळाची गरजही सारखी वाढत आहे. यामध्ये विशेषत: पायलट म्हणजेच वैमानिकांची गरज अधिकाधिक लागणार आहे. उत्कृष्ट वैमानिकांना कोणतीही विमानसेवा तत्काळ उत्तम करिअरची संधी देते. वैमानिकाचे शिक्षण-प्रशिक्षण घेऊन ठेवल्यास, उत्कृष्ट करिअर घडवण्यासाठी ते उपयुक्त ठरु शकते.

    इंदिरा गांधी राष्ट्रीय उडाण कॅडेमी

    हवाई क्षेत्रातील करिअरच्या संधी लक्षात घेऊन भारत सरकारने, इंदिरा गांधी राष्ट्रीय उडाण ॲकॅडेमी, ही याक्षेत्रासाठी आवश्यक असणारे शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी संस्था सुरु केली. ही आपल्या देशातील आणि दक्षिण आशियातील दर्जेदार आणि नामवंत प्रशिक्षण संस्था होय. गेल्या  दोन दशकांपासून केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी ही स्वायत्त संस्था आहे.या संस्थेकडे, जागतिक दर्जाची अत्याधुनिक साधनसामग्री आहे. या संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांना देश-विदेशातील नामवंत विमानसेवांमध्ये वैमानिक म्हणून संधी मिळाली आहे.

    कमर्शिअल पायलट लायसन्स कोर्स

    या संस्थेचा अभ्यासक्रम, ॲब इनिशिओ टू कमर्शिअल पायलट लायसन्स कोर्स, या नावाने ओळखला जातो. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षाचा आहे.या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रकिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. २ मे २०२५ आहे. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन चाळणी परीक्षा दि. २४ मे २०२५ रोजी घेतली जाईल.

 अर्हता    (१)हा अभ्यासक्रम करु इच्छिणाऱ्या खुल्या संवर्गातील विद्यार्थ्याला १२ विज्ञान परीक्षेत गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी या विषयांमध्ये सरासरीने ५० टक्के गुण मिळणे आवश्यक ठरते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग संवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्के गुण मिळायला हवेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग संवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या संवर्गापेक्षा ५ टक्के गुणांची सूट दिली जाते. मात्र ही सूट दिल्यानंतरही या संवर्गातील विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, तर तेवढ्या जागा खुल्या संवर्गाला दिल्या जातात.

 (२) विद्यार्थ्याने वयाची किमान १७ वर्षे पूर्ण केली असावित. केंद्रशासनाच्या नियमानुसार कमाल वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – खुला संवर्ग- २८ वर्षे, नॉन क्रिमिलेयर इतर मागास संवर्ग- ३१ वर्षे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती संवर्ग- ३३ वर्षे.

   निवड प्रक्रिया

   (१)या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी देशातील विविध केंद्रांवर चाळणी परीक्षा घेतली जाते. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर आणि पुणे, या केंद्रांचा समावेश आहे. चाळणी परीक्षेच्या ऑनलाइन पेपरमध्ये सामान्य इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र, रिझनिंग-(कार्यकारणभाव), करंट अफेअर्स(चालू घडामोडी) या विषयांवर प्रश्न विचारले जातात. पेपरचा दर्जा बारावीच्या पातळीचा असतो. प्रश्न बहुपर्यायी आणि वस्तुनिष्ठ पध्दतीचे असतात. लेखी परीक्षेच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते.

(२)मुलाखती गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांच्या मुलाखती, संस्थेच्या रायबरेली कॅम्पसमध्ये घेतल्या जातात.

(३)पायलट प्टिट्यूड टेस्ट    मुलाखतीनंतर  निवडक विद्यार्थ्यांना पायलट ॲप्टिट्यूड टेस्ट आणि सायकोमेट्रिक (मानसशास्त्रीय) चाचणीसाठी बोलावले जाते. या चाचणीमध्ये राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना गुणांमध्ये कोणतीही सूट दिली जात नाही.

चाळणी परीक्षेचे शुल्क खुला संवर्ग व इतर मागास वर्ग संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी बारा हजार रुपये आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना चाळणी परीक्षेचे शुल्क भरावे लागत नाही. मुलाखत आणि पायलट ॲप्टिट्यूड टेस्टसाठी निवड झालेल्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या श्रेणीचे रेल्वेचे प्रवासभाडे दिले जाते.

या प्रशिक्षणात जमीनवरील आणि हवेतील प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना, कमर्शिअल पायलट लायसन्स प्रदान केले जाते.या अभ्यासक्रमाच्या कालावधीत विविध प्रकारची आणि इंजिन क्षमता असलेली विमाने हाताळता येतात.

या अभ्यासक्रमाला एकूण १२५  विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यामध्ये ५० विद्यार्थी खुल्या गटातील, १९  अनुसूचित जाती, ९ अनुसूचित जमाती आणि ३४ इतर मागास वर्ग संवर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

    प्रशिक्षणाचे शुल्क

    या अभ्यासक्रमाची फी ४५ लाख हजार रुपये आहे. याशिवाय गणवेष, अभ्यासाचे साहित्य, नेविगेशन कॉम्प्यूटर, हेडफोन,परीक्षा आणि पायलट परवाना फी यासारख्या बाबींसाठी आणखी २ लाख रुपये भरावे लागतात. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी  संस्थेने  वसतीगृहाची व्यवस्था केली आहे. मुलींसाठी स्वंतत्र होस्टेल आहे. या वसतिगृह आणि भोजन  खर्च दरमहिन्याला पंधरा हजार रुपये असून एका खोलीत दोन विद्यार्थ्यांना राहावे लागते.

इतर अभ्यासक्रम

(१) एअरक्रॅफ्ट मेंटनन्स इंजिनीअरिंग

या संस्थेने, हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रमही सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाला चाळणी परीक्षेव्दारे प्रवेश दिला जातो. अर्हता- भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र या विषयांसह १२ वीमध्ये ५० टक्के गुण (खुला संवर्ग), ४५ टक्के गुण राखीव संवर्ग.

(२) बीएस्सी -एव्हिएशन

बॅचलर ऑफ सायन्स इन एव्हिएशन या अभ्यासक्रमाचा पर्याय, वैमानिक प्रशिक्षणासोबतच विद्यार्थी स्वीकारु शकतात. या तीन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाला ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.(यंदाच्या शैक्षणिक वर्षात ही संख्या ८० पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.) राम मनोहर लोहिया विद्यापीठ अवध, मार्फत पदवी प्रदान केली जाते.

 

    संपर्क-    द डायरेक्टर, इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण ॲकॅडेमी, फुरसतगंज एअर फिल्ड- २२९३०२,जिल्हा अमेठी, दूरध्वनी-०५३५ -२४६१५३७०, संकेतस्थळ- www.igrua.gov.in,ई-मेल-admissions@igrua.in

 

०००

   बॉम्बे फ्लाईंग क्लब

   बॉम्बे फ्लाईंग क्लबने, वैमानिक प्रशिक्षण आणि एअरक्रॉफ्ट दुरुस्ती देखभालीचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. या संस्थेला भारत सरकारची मान्यता मिळाली आहे.या क्षेत्रातील शिक्षण- प्रशिक्षण देणारी सर्वाधिक जुनी संस्था आहे.

     अभ्यासक्रम

 

    ()कमर्शिअल पायलट लायसन्स हा अभ्यासक्रम २००  तासांचा आहे. त्याचा कालावधी हा साधारणत: ८ ते १० महिन्यांचा भरतो. भौतिकशास्त्र आणि गणित विषयात १२ वी उत्तीर्ण  विद्यार्थ्यास  हा अभ्यासक्रम करता येतो. या दोन्ही विषयात  किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत.इंग्रजीवर प्रभुत्व असल्यास उत्तम.

    ()बॅचरल ऑफ सायन्स इन व्हिएशन –     या अभ्यासक्रमाचा कालावधी ३ वर्षे आहे. अर्हता-भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी विषयांसह १२ वी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमात जमिनीवरील प्रशिक्षण, हवाई प्रशिक्षण आणि हवामानशास्त्राचा समावेश आहे. कमर्शिअल लायसन्स पायलटचा परवाना मिळण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता या अभ्यासक्रमामुळे प्राप्त होते. हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे. हवाई प्रशिक्षण जुहू (मुंबई) आणि धुळे इथे दिले जाते.

 

()बॅचरल ऑफ सायन्स इन रोनॉटिकल इंजिनीअरिंग –     या अभ्यासक्रमाचा कालावधी -३ वर्षे आहे. अर्हता-भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी विषयांसह १२ वी उत्तीर्ण. हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे.

 ()एअरक्रॉफ्ट मेन्टनन्स इंनजिनीअरिंग इन व्हिऑनिक्स ण्ड मेकॅनिकल या अभ्यासक्रमाचा कलावधी ३ वर्षांचा आहे. एअरक्रॉफ्ट मेन्टनन्स इंजिनीअरने प्रमाणित केल्याशिवाय कोणत्याही विमानास उड्डाण भरता येत नाही. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्हता- भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी विषयांसह  १२ वी उत्तीर्ण. हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे.   

संपर्क- द बॉम्बे फ्लाईंग क्लब, जुहू एरोड्रम, जुहू विले पार्ले, मुंबई-४०००५६, संकेतस्थळ- www.bfcaviation.com/www.thebombayflyingclub.com, दूरध्वनी-०२२-२६१०१०२७, ईमेल-pilotinfo@ bfcaviation.com

सुरेश वांदिले